एक 'हकनाक' विवाह - एकदाचं संपूर्ण

Submitted by अस्मिता. on 23 April, 2024 - 22:30

अनेक महिन्यांपूर्वी लिहून अर्धवट सोडून दिला होता. आज थोडी डागडुजी करून प्रकाशित केला. फक्त करमणूकीसाठी लिहिला आहे, चूभूदेघे. Happy

----------------

विवाह नेटफ्लिक्स वर आलेला आहे, बघायचा असल्यास ....का पण?! तरीही मी बघतेय. कारण घरी कोणी नाही. रामायणातल्यासारखे संगीत सुरू झाले आहे, इंग्रजी वर्णनात Set up for an arranged marriage, a young couple enjoys an old-fashioned courtship, until an accident days before their wedding tests their nascent love. ह्या nascent चा अर्थ मी गुगलणार नाही , सरळ 'नाशवंत' असा घेणार आहे. रेटिंग १४ व जॉन्रा 'फिअर' आहे. यावरुन तुम्हाला खात्री पटेल की मी निर्भय असून कधीतरी पौगंडावस्थेत असते.

बाबूजी (आलोकनाथ) जे 'बाऊजी' म्हणून संबोधल्या जातात, हे नावाला जागून स्वगतात नेहेमी बाऊ झाल्यासारखे बोलत असतात. तरूणपणी यांना खऱ्याखऱ्या केसांचा टोप होता, (पाच मिनिटांत येणाऱ्या वर्तमानात) वय झाल्याने तो काढून ठेवला. हे सतत आपलं मुलगी म्हणजे पराया धन ,त्यांचं विश्वच वेगळं, पराया घराच्या मालकीणी , इथे छोट्या कळ्या- सासरी जगत्जननी असं 'रावणचहाकर' बाईंचं भाषणटाईप दुकानातली हिशेबाची लाल चोपडी वाटावी अशा वहीत लिहीत बसलेयतं. (ह्यात चंडी, काली, दूर्गा, महिषासुरमर्दिनी या अवस्थांचा सोयीस्कर अनुल्लेख केला आहे.) हे स्वगत इतके मोहक आहे की शकिरा याविषयी आधीच ''Oh बाबू, When you talk like that, you make a woman go mad' आकाशवाणी करून गेली आहे. त्यामुळे हे पुढचं लेखन "mad woman" ने केलं आहे मी नाही.

ह्याच स्वगतात तो 'णम्रपणे' सांगतोय की तो एक मधुपूरचा छोटामोठा फळविक्रेता आहे. आमच्या घराजवळचा बागवान फार बदमाश होता, द्राक्षं घेताना नेहमी काटा मारायचा म्हणून माझा काही याच्यावर विश्वास बसत नाहीये. शिवाय एवढ्या बेताच्या परिस्थितीतही तो रोज शुद्ध नाही पण वनस्पती तुपात तरी नक्कीच स्नान करतो हेही दिसतेय. काही जणं चांगल्या तुपातली म्हणून डालडातली मिठाई विकतात , सुरज बरजात्यानी तेच केलेयं !! (मग आपण म्हणतो 'तेलातली घेतली असती तर निदान घसा तरी बसला नसता'.)

याचं आपल्या पुतणी व लेकीसाठी लग्न लावून 'विदा' करणे हे एकच स्वप्न आहे. शिक्षण-नोकरी वगैरे गोष्टी तेलभांडारवाल्यांच्या नायिकांसाठी क्षुल्लक आहेत. पिळणे आणि तळणे आले म्हणजे झाले. त्यात (पूनम-अमृता राव) पूमृता फार लाडकी आहे. तिला आईवडील नाहीत त्यामुळे ती तूपीकाकांकडे रहाते, आणि ती गोरी असल्याने व पोटची लेक 'छोटी/रजनी' सावळी असल्याने काकू (सीमा बिस्वास) पंधरा वर्षांपासून रूसलेली आहे व सारखं तिला फेसपॅक लावायला सांगत असते. खरंतर ती गोरी म्हणून तिचे नाव 'पूनम' व ही सावळी म्हणून हिचे नाव 'रजनी' ठेवून हे स्वतःच क्रिंज झाले आहेत. पूमृता एवढी गुणी व लाघवी आणि नियमितपणे पाय चेपत असूनही काकूंना काही माया येत नाही. काकूंचा मत्सर आणि असूया इतकी 'इंटर्नल' आहे की या 'रामायणा'त तीच फक्त खरी वाटते! छोटीचा मूळ रंग गोराच आहे बहुतेक, त्यावर एकजिनसी नसलेला काळा रंग फासला आहे. छोटीचा वावर गोड व एनर्जेटीक आहे. लहानपणापासून तूपीकाका पूमृताशी भावला-भावलीची शादी-शादी , डोली-डोली, लाल जोडा-लाल जोडा, बारात-बारात ई ई खेळत ब्रेन वॉश करत असतात. पूमृता काकांसोबत 'फळं विकू-फळं विकू' खेळत असते.

आता भगत (मनोज जोशी#कचरासेठ) या अरूंद गल्लीतून फटाक्यांपासून स्वतःला वाचवत येतो. इथेच तुम्हाला पहिला 'रेड फ्लॅग' दाखवल्या जातो. कचरासेठ दागिन्यांचा व्यापारी आहे म्हणून तो कन्यादानात दागिने लागतातंच वगैरे म्हणत 'हीहीही' करत बिझनेस बिल्ड अप करत डाकूकाकूंना बांगड्या दाखवतो. मग पूमृता सगळ्यांना 'जल लिजिये' म्हणत एकदम ग्लास तोंडासमोर धरत पाणी विचारते. साध्या पाण्याचे 'जल' म्हणून प्रमोशन केल्याने आपल्याला पूमृता फक्त गुणीच नाही तर सरळसरळ पवित्र आहे हे लक्षात येते. काकू बांगड्या घेऊन किंचित आनंदी झाल्याने कचरासेठला फुकटची रबडी गिळायला मिळते, तो मधुपूरची रबडी जगातली बेस्ट म्हणतो. तुम्हाला 'वर्ल्डस् बेस्ट दामाद मिळू देत' अशा शुभेच्छा देतो व पूमृता एवढी गुणी व रूपवान आहे की तुम्हाला आपल्या समाजातून स्थळं येतच असतील असेही बोलून दाखवतो. त्यावर तूपीकाका म्हणतात," येतात होss, पण आजकाल वो वाले संस्कार कहां"! नेमके किती व कोणते हे दाखवण्यासाठी ते दोघे जेमतेम उंबरठ्यावरच असताना पूमृता ताबडतोब भजन गात संस्कारांचे थेटप्रक्षेपण सुरू करते.

ते बघून तिला श्रीमंत घरचा व्हिजा मिळतो. हरिश्चन्द्र ( अनुपमखेर #डॅडीकूल ) नावाचे 'उंचा खानदान'चे सद्गृहस्थ आहेत व पूमृतेसाठी त्यांचा मुलगा 'प्रेम' (शाहीद कपूर# शाहीपनीर-सारखे-शाहीप्रेम) तोडीसतोड तुपकट आहे हे कचरासेठ आपल्याला ऐकवतात. चालायचंच ... कुणीतरी म्हटलंय तसं , ''उंचे लोग उंची पसंद"! पण बाऊजी विव्हळतात," ते एSवढे तुपकट त्यांच्यासमोर तर आम्ही जणू तेलकटंच, हा रिश्ता कसा तळायचा म्हणजे जमायचा." तरी बाऊजी पूमृताचा फोटो कचरासेठला देतात.

पूमृता जे लाजायला सुरू करते की ज्याचं नावं ते, तिचा तर जन्मंच लग्न करण्यासाठी झालाय म्हणां. मग ती लाजतेच आहे तर छोटीलाही तिला 'सुन, सुन, सुन दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है' टाईप गाणं म्हणत चिडवावंच लागतं. या दोघी बहिणी चिडवाचिडवी करत गच्चीवर पकडापकडी खेळताहेत. पूमृता नाचाच्या नावाखाली 'गाय म्हणाssली,
गाय म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी वारीन माश्या
गाय म्हणाली अश्शा अश्शा
शेपटीने मी वारीन माश्या
घोडा म्हणाsला
घोडा म्हणाला ध्यानात धरीन ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने असेच करीन असेच करीन' जास्तच झालं हे, असो.. असू देते. तर पूमृता या स्टाईलने ओढणी हलवत पळतेय. या दोघींचं होईपर्यंत मी 'मेरे सैयांजीसे आज मैने ब्रेकप कर दिया' ऐकतये.

हा रिश्ता अर्जंट नाही हे न कळल्याने कचरासेठ दिल्लीला पोचल्याबरोबर स्वतःच्या घरी न जाता फोटो घेऊन तडक डॅडीकूलना भेटायला आला आहे. ते एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात पण आपण नवीन आहोत म्हणून ते आपल्यासाठी तेचतेच बोलतात. इथे अतीश्रीमंत डॅडीकूल आपल्या नातवासोबत सुटाबुटातच शाळेचा रंगवण्याचा गृहपाठ करत बसलेयतं. बागेतल्या फर्निचरनी घर सजवलेय. पडदे निळे-सोफा लाल, एका बाजूला जमिनीवर पितळी सुरई, मागे अजिंठाच्या लेणीचा फोटो ठेवलेला आहे. हे बघून मला ते श्रीमंतही वाटत नाहीत आणि चोखंदळही ! डॅडीकूल यांना दोन मुलं, त्यापैकी एक मोठा व दुसरा छोटा आहे ही माहिती याठिकाणी आपल्याला मिळते. आता तुम्हाला वाटेल यात काय माहितीये, 'हे जुळे तर नाहीत नं' ही माहिती!

मोठयाचे (समीर सोनी#मलईकोफ्ता, आपण कसं शाहीपनीर ऑर्डर केलं की ,मलई कोफ्ता नको सारखंच होईल दोन्ही म्हणतो तसंच आहे हे बंधुद्वय! ) लग्न त्याच्याच बायकोशी कधीच झालेले आहे व त्यांना एक गृहपाठ वेळेवर न करणारा मुलगा आहे. आपल्याला तेवढाच एक 'विवाह' कमी बघितल्याचं समाधान!

मलईकोफ्त्याची बायको 'भाभी' आहे , जी फक्त भाभीच आहे. ती फेसलेस, सुंदर, आनंदी व गृहकृत्यदक्ष आहे. ही दहा वर्षानंतरची पूमृताच आहे. इथेच पिक्चर संपवला तरी चालेल किंवा सुरूच केला नाही तरी उत्तम. पण एवढं कुठलं आपलं नशीब! आता वेगवेगळ्या सीन्स मधे कचरासेठला गुंतवून ते किती श्रीमंत आहेत हे आपल्याला हाताखालच्या कर्मचाऱ्यांची संख्या, बिझनेस टाईम्स, नाश्त्याचे सिरिअल व स्क्वाशबद्दल बोलून सांगितलेले आहे. घर नीट सजवलं असतं तर ह्याची गरजच पडली नसती. डायनिंग टेबलच्या मागेही एक सुरई दिसतेय , ती बाहेरचीच उचलून आणलीये की वेगळी आहे हे मी बघणार नाही. प्रत्येक रूममधे एक सुरई का लागते यांना ?! सगळेच अतिशय आनंदात आहेत व एकमेकांवर प्रेम करत आहेत, मला अर्थातच 'प्यार आणि अपनापन' तालिबान्यांप्रमाणे बोअर व्हायला लागल्याने मी पळवत आहे.

सूट घातलेले बाबुजींचे व्हर्जन शाहीदला 'लग्न कर, लग्न कर' म्हणून मागे लागले आहेत. तो म्हणतो 'एवढी जल्दी कशाला' ते म्हणाले 'तुझ्या भैय्याची व माजीबी जल्दीच झाल्ती'. त्यामुळे तुला किती छान आई मिळाली, एवढी छान आई दुसरी मिळाली असती का ? हे काय लॉजिक आहे, त्याला कसं कळणार होतं वेगळी आई कशी असती ते..! हे एकदम आधुनिक पद्धतीने समजावले आहे, त्यामुळे सारांश 'तेरे जैसे बड़े चौधरी देखे हैं मरजाणे,सॉन्ग सुना के इंग्लिश के जो डाले देसी दाणे' हा आहे. 

कट टू साखरपुडा -- 'काय बोलू काही कळत नाही' असे काही तरी गाणं मागे चालू आहे. गच्चीवर एकांतात प्रेम आणि पूनमला बोलायला सोडून भाभी खाली जातात. पूनम कायम 'खाली मुंडी पाताळ धुंडी' अवस्थेत खुसपुस करत असते.... पवित्र आहे ती. मग ती तिची आवडती पुस्तकं सांगते आणि तो विचारतो तुम्ही तर आध्यात्मिक पण वाचत असाल , इथं मला स्वतःवरच फिसकन हसू आलं. 

पूमृता बाऊजीला छोटी करवून म्हणते की 'वो स्थळ बिलकुल आप जैसा है. अरे देवा..! हिरवगार सरबत पाजवून काकू किरकिर करायला बाऊजीला कोपच्यात घेते. डॅडीकूल मधेच कडमडून म्हणतात 'आम्हाला सव्वा रू आणि नारळ चालेल'. साखरपुडा पार पडतो. सोमसरोवरला आमंत्रित करून सगळे आपापल्या घराकडे जातात.

कट टू सोमसरोवर- गावातील कोठी मग पुन्हा 'सुन सुन दीदी तुझा रिश्ता कडमडलाय' भाग २. तुकड्या तुकड्यात बघूनही असह्य होत आहे. वळणावळणाच्या रस्त्यावरून रिश्ता येतोच आहे -येतोच आहे. पूनम लाजतेच आहे- लाजतेच आहे. पुन्हा 'जल लिजिये' कार्यक्रम आहे. जळजळ होते आहे. पूमृता म्हणते सर्दी झाल्यावर थंड पाणी पिऊ नये हे ऐकून प्रेम पाणी ओतून देतो. किती गं बाई माझा आज्ञाधारक..!

काकू लाडू वळताना मदत म्हणून एक लाडू बाऊजींनी वळला आहे. सगळे जेवायला बसतात. ते बारकं पोरगं जरा क्रीपी आहे. थाळीकडे विचित्र नजरेने बघू लागले. फक्त गृहपाठापुरतं नाही हे ! 

आता सगळे खाली गाद्या घालून झोपणार आहेत. तेवढ्यात लोटा घेऊन पू येते आणि काकांना सकाळी सकाळी तांब्याचाच लोटा लागतो म्हणते. अर्थात. थाळीला जागणारा, लोट्याला कसा मुकेल..!

स्वास्थ्य 'बनवायला' सकाळी सगळे फिरायला जातात व येताना जिलब्या खातात. शाब्बास! काकू कधी हसरी, कधी उदास, कधी दुसऱ्या ग्रहावरची दिसते. मग तरुण मंडळी एकटीच पिकनिकला जाते. भैय्या-भाभी यांचा सौम्य हनिमून सुरू होतो व प्रेम व पूमृता यांचे 'सत्संग' सुरू होते. प्रेम झेंडूच्या फुलांची माळ तिला घाल म्हणतो. अरे, आज काही दसरा नाही, पूनम काही गाडी नाही. 

पाऊस सुरु होतो पण संस्कारांच्या अदृष्य 'चॅस्टिटी बेल्टमुळे' 'मिलन अभी आधा अधुरा है' वाजवावं लागतंय. आता दोघेही लाजत मुरकत बघत बसले आहेत. आता रात्र झाली आहे 'प्यार आणि अपनापन' नंतर रोमॅन्स सुरु होऊन मला असह्य झाले आहे. 'मुझे हक है , तुम्हे हक है' .... परमेश्वरा... व्हाट द हक? हा 'हकहकाट' रात्रभर चालला. 

 सकाळी रिश्तापीप्स परत निघाले. पूमृता 'थंड पाणी पित जाऊ नकोस रे माझ्या राज्जा' म्हणत एक 'जल फॉर द गो' देते आणि स्वतः च पिऊन टाकते. हे उच्च प्रतीचे प्रेम बघून प्रेमला 'टडोज' होते.

आssssक्रssमssssssण ---

पूमृता उष्टावलेलं जल प्रसादासारखे प्राशन करते आणि डोळे भरून टाटा करते. बाकीची रिश्ता गॅंग गाडीत तासभर झाले बसली आहे, एवढ्या वेळात आमच्याकडे तीनदा भांडणं झाली असती. ह्या जलग्रहणात 'पाणीग्रहण' रहायची वेळ आली. इथून गेला नाहीस तर विरहाचे पाच महिने कसे सुरू होणार.

विरह सुरू ---

प्रेमला परत आल्यावर कळतं की इतक्या दिवसांच्या अनुपस्थितीमुळे घरच्या हापिसात त्याचं प्रमोशन झाले. कामही ऐसा करो की सब बोले राहू दे मी करतो...! झगा घातलेली प्रेमळ पारशी बाई हे सांगते व तिला सोमसरोवरची फुकटची मिठाई मिळते. हापिसात हे दोघेच आहेत. ती पण प्रेम-दिक्राला प्रमोशनचा निरोप देण्यासाठीच फक्त थांबली आहे.

मधुपूरची तुपकट प्रजा शादीची तयारी करत आहेत. पूमृता लाजतलाजत 'मेहमानो की यादी' कम्प्युटरवर करते. याला काय करायचाय कम्प्युटर. दुकानाचे व्यवहार चोपडीवर आणि याद्या कंप्युटर वर. सोमसरोवरचं घर गहाण ठेवून थाटामाटात लग्न करायचा आगावपणा बघून डाकूकाकू आहेरमाहेरावरून किरकिर सुरु करते.

आपल्याकडच्या दोन काकवा, चार आत्या, दोन माम्या,दोन मावश्या व आज्या यांची जबाबदारी हिच्या एकटीवरच आहे. त्यामुळे सरळ आधी डाकूचा रोल केलेलीच काकू घेतली असावी. ती म्हणते 'हिच्या नादात आपल्या कार्टीला उजवायच्यावेळी काय शंख करणार का'. काका भिंतीकडे बघून सुस्कारे सोडत आहेत. हे चोरून ऐकून वर जिन्यात उभ्या पूमृतेच्या हृदयाचे जल-जल होते व डिस्टेंपरसारख्या मेकअपवरुन वहायला लागते. तिचे हुंदके ऐकून तूपीकाका 'कौन कौन' करत वर तरफडतात. कोण असणारे बरं तुमच्या घरात, छोटी घरात नाही, काकू खौट बोलून आत्ताच खाली गेली आहे. आता उरलं कोण? कॉमनसेन्स तूपीड्यूड, कॉमनसेन्स..!

काका तिचं 'वॅंव-वॅंव' थांबवायला डॅडीकूलचं पत्र वाचून दाखवतो. त्यात 'प्यार आणि अपनापन' मुळे आपला रिश्ता कुठल्याकुठे गेला, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली विचारलेले असते. कुठपर्यंत आली काय, सव्वा रुपया आणि नारळ पुरे म्हणाला होता नं हा. अजून एक बदाम- बदाम काढलेलं पत्रही आलं आहे. ते तूपीकाकांनी नंतर का दिलं असेल? आधी काय सासऱ्याचं पत्र वाचतं का कुणी.

पत्रास विनाकारण की-

प्रेमने लिहिलेय, रोज सकाळी चारला उठतोय, मग कॉफीवर कॉफी पितोय पण आजकाल 'जिंदगीत कैतरी केलं पाहिजे' असं वाटतं. म्हणजे इतके दिवस काय करायचा ? सारांश - तुझ्या लव्हात कै तरी जादूच है बग..!

नंतर उगाचच बेरकी वाटावा अशा मुनीमाच्या काळ्या ट्रिंग-ट्रिंग फोनवर फोन सुरू होतात. मुनीम हिला लाजायला प्रायव्हसी मिळावी म्हणून फोन आला की मुरमुरेवाल्या सारख्या अगम्य हाका मारत तिथून काढता पाय घेत असतो. हा या सतयुगातलाच मुनीम असूनही याला हा व्यर्थ 'बेरकी' लूक का दिला असावा.

फोनवर प्रेम सांगतो की आज मिटिंग झाली. तेव्हा लंगरला लाजवेल असे सगळे जेवण यायची वाट बघत बसले आहेत असे दिसते. समीर सोनी कालची शिळी वांग्याची भाजी कोण खाणार विचारल्या सारखं 'बहोत बडी मल्टी नॅशनल कंपनी'च्या कामासाठी जपानला कोण जाणार कारण शिळी कढी तर मी खातोय म्हणजे स्वित्झर्लंडला मी जातोय तर जपानला कोण. तर सगळेच 'आता कोण खाणार' चिंतेत, हा प्रेम 'मी खाईन भैया, मी खाईन, होऊदेत गॅसेस पण जिंदगीत काहीतरी करेनच' थाटात.

हाही रिपोर्ट फोनवर पूमृताला देतो. लगेहात अजून एक मिटींग सुरु होते. तिथे आत्मविश्वास डगमगल्यामुळे विचारतो, मी तीन दिवसांत जातोय जापानला तर सोबत हापिसातल्या पूजा व मनोहर यांना नेऊ का ? चुकून हिला पूनम म्हणतो तर ही एकदा कोफ्ताभैयाकडे आणि एकदा 'रॅंडम' मनोहरकडे बघून सायलेंट 'इश्श' टाईप मुरकते. आता हे काय अजून. सौम्य हनिमूनची लागण झाली आहे..!

तो असं म्हणाल्यावर कोफ्त्याने अतिशय निर्विकार भाव आणले आहेत, हा न-अभिनय अशक्य कोटीतला आहे. माणूस म्हटलं की काही न काही भाव येतातच चेहऱ्यावर, त्यामुळे कौतुक..!

हे सगळं पुन्हा मुनीमाच्या फोनवर रिपोर्ट होते. हे ऐकून पूमृता हसते त्याला, तो रुसून कट्टी करतो. ही आई आणि हे बालवाडीतलं लेकरू अशी केमिस्ट्री बघायला मिळते.‌ नंतर पोरीपोरी रुसवा काढण्यासाठी गावातल्या PCO वर जाऊन फोन करतात. मुरमुरेवाल्याच्या फोनवर फक्त 'ईन-कमिंग' आहे.

कट्टी झाल्याने हे यडं थंड पाणी पिते व पुन्हा सर्दी होते. ती लगेच ओळखते ह्याने जलाचं पथ्य पाळलं नाही. शिवाय त्याला जपानचं टेन्शन आल्यामुळे दिलासा देण्यासाठी ती म्हणते 'मै प्रार्थना करुंगी, मै प्रार्थना करुंगी, मै प्रार्थना करुंगी.' आता काय काम व्हायचं रहाणारे का ..! तिकडून रॅंडम मनोहर कडमडतो 'सर आपको मिटिंग के लिये बोलवायलेत'. हे ऐकून तिकडून पूमृता 'जाईये, हम आपसे प्रेम करते है'. ते ऐकून 'एवढ्या' सर्दीतही हा उल्हासाने मीटिंगला पळतो, रॅंडम मनोहर अवाक!

हकहकाटाचे पार्श्वसंगीत जपानपर्यंत पोचते. इकडे काकू पूमृतेला छळायचे प्रयत्न करते. इतकं सोपं नाही ते. ती इतकी तडजोडी आहे की तिला छळणं मोठं कठीण होऊन बसलं आहे. काका मंदिरात जाताना इस्त्रीची शाल पांघरतात म्हणे, तर अशी छोटी-छोटी कामे छोटीला करू द्यायला आणि काकांना आपण सासरी गेल्यावर आपल्या नसण्याची सवय करून द्यायला शाल देणं बंद..!

अरे हे काय, आपण हे बोलत बसलो तोवर भैया फोनवर म्हणतो, 'जे काम बडेबडे लोकही करू शकणार नाहीत ते काम प्रेमने तडीस नेले म्हणे आणि तो उद्याच परत येतो आहे. प्रेमच्या स्वागतासाठी पूमृतेला दिल्लीला पाठवा उद्या गाडी पाठवतो.' तिकडे जपानचं विमान आणि इकडे ह्यांची गाडी निघाली. विमानात गाणं सुरू झाले. हमारी शादीमे ढुढूक....! हे गाणं म्हणजे जोनास ब्रदर्सचे I am a sucker for you या गाण्याचं रविंद्र जैन व्हर्जनने गायलेलं व प्रौढ साक्षरता अभियानाला अनुरूप असलेलं गाणं आहे. आधी आकडे, मग घरची माणसं नंतर गाड्यांचे प्रकार सांगितले आहेत. त्याला सगळ्या बायांमधे हीच दिसते आहे. नाचतोय-गातोय पण ते स्वप्न पवित्र असल्याने स्वप्नात सासुसासरे व मेव्हणीही आलेत.

स्वप्नापेक्षा अवास्तव यांचं सत्य आहे म्हणा. प्रेम पोचतो. सियाचीन ग्लेशियर वरुन परत आलेल्या जवानासारखं याचं स्वागत होतं. घरी मोठी मेजवानी आहे. डॅडीकूल आणि भगत इतकावेळ कुठं तरफडले होते माहिती नाही पण आता परत आले आहेत व काकांना 'पकोडे खा-पकोडे खा' करत आहेत. पकोडे वाढताना पूमृतेला बघून 'आता ही या घरात रांवाउका करणार' ह्या स्वप्नपूर्तीने काकांच्या डोळ्यात पाणी..!

तोवर प्रेम पूमृतेला आपली खोली व मायेने लावलेले सासरच्या मंडळीचे फोटो दाखवतो. कोणत्या जावयाचं चुलत सासुसासऱ्यांवर प्रेम असतं बरं, याला संग्रहालयात ठेवायला हवे.. गेलाबाजार प्राणीसंग्रहालयात तरी.

पूमृतेने टचटचीत-भगभगीत -चमचम-मारवाडी साडी घातली आहे तरी भावना त्याच आहेत. पुन्हा डोळ्यात पाणी. सिडीवर ह्या पार्टीचा थाटमाट बघून काकूचं डोकं अजून सरकतं. ती आधी दिलेले दागिने परत घेते, नवराबायको कडंकडं भांडतात. किल्ली फेकून काकू तरातरा खाली निघून जात असते तर पूमृता तेव्हाच दिल्लीहून आणलेल्या भारी-भारी सामानाची सुटकेस उलथून सांडते.... झाले. काकूचे 'आधीच मर्कटा, त्यात मद्य प्याला, वर विंचू चावला' होते .

कचरासेठ शादीचा जोडा घेऊन येतो. या लग्नाशी देणंघेणं नसल्याचे दाखवण्यासाठी काकू पुस्तके वाचायला सुरुवात करते. वाचाल तर वाचाल! 'परदुःख शीतल' असल्याने मी आग लागायची आतुरतेने वाट बघत आहे.

हळद - मारवाडी पद्धतीने सगळं सुरू आहे. कपडे फार भडक आणि सुळसुळीत घातलेत सर्वांनी. काकू पूजेला आली नाही म्हणून कचरासेठ भोचकपणे 'कुटं गेल्या वैनी, दादा' विचारतोय. ती राग आला की गुडघे धरुन बसतेय. काका काकूला 'तू हे केलं तरी- मी गप बसलो, तू ते केलं- तरी मी गप बसलो' म्हणून तिच्या पापाचा पाढा वाचतोय. आता तरी पाव्हण्यारावळ्यात तमाशा नको हा सारांश. तिकडे पूमृता काकूंच्या मायेसाठी तरसून काकूनी मायेने आशीर्वाद देऊन विदा केलेलं दिवास्वप्न बघते आणि दरवाजाला धडकते.

खाली यांचे महामूर्ख शेजारी टिचभर बोळात 'बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना' होऊन शेकडोंनी फटाक्यांच्या लडी, रॉकेट उडवत आहेत. मला खलनायक जीवन सारखं 'आता आग लागणार... आता आग लागणार...' आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

फटाका उडून पडदा पेटला, एक रूम पेटली तरी कुणाला काहीही लक्षात आले नाही. गच्चीवर एक तेलाची कढई आहे तीही पेटली, मुनीमाच्या मूर्ख नोकराने तेलाचा डबा सांडून शब्दशः आगीत तेल ओतले. माणसं इतकी तेलकट-तुपकट असताना आग पसरायला काय वेळ लागणार. सगळे 'बाहर निकलो- बाहर निकलो' करत आहेत . आता अचानक काकूची गुडघे दुखी कुठल्याकुठे गेली. ती जिन्यावरून तुरुतुरु खाली आली.

पूर्ण इमारतीने पेट घेतला आहे, लोक तांब्यातांब्या जल टाकून विझवायचा यत्न करत आहेत. आगीचा बंब बोळात उभा आहे. छोटी धुराने बेशुद्ध. पूमृता छोटी-छोटी करत शोधत येते. तिला कसंबसं नेताना तिच्यावर वरचं लाकडी छत पडते. तिला ढकलून ही सती गेल्याप्रमाणे तिथंच उभं रहाते.

हे इकडे हॉस्पिटलमधे आणि तिकडे बारात- नवरदेव औक्षण करून इकडे येण्यासाठी सज्ज. डॉ मोहनिश बहल काका आणि भगतला घाबरवायला ऑफिसमध्ये घेऊन जातो व चाळीस टक्के भाजली आहे पण 'गनिमत आहे की चेहरा बच गया' म्हणतो. काका सुटकेचा निःश्वास सोडतात, 'कल उसकी बारात आयेगी, उसका विवाह है आता कसं'... दिसनं का मुडद्या काय चाललंय. डॉ मोहनिश 'अशा केसेस मधे तर लग्न मोडतंच सहसा' म्हणतो. How dared he , so unprofessional !

इकडे बातमी पोचते, धक्कादायक असल्याने भाभींच्या हातून तांदूळ सांडतात. काकूला वाईट वाटतंय, ती दवाखान्यात चोरून बोलणे ऐकत उदास होते आहे. एवढं होऊनही बेशुद्धावस्थेत पूमृता 'छोटी ठीक है ना' विचारते. या हृदयद्रावक घटनेने काकूचं हृदयपरिवर्तन तर झालंच, मी पण पदराला अश्रू पुसायला गेले. पदरच नव्हता पण. असो.

आधी फक्त पूमृता रडायची आता कचरासेठ सगट सगळेच रडत आहेत. काकू क्षमा मागतेय तर काका वैराग्याचा झटका टाईप काही तरी करत आहेत. मोहनिश बहल जास्तच अभिनय करत आहेत, पाहुणा कलाकार असताना 'अरब आणि उंट' प्रकार होत आहे.

प्रेमला सगळं बघून अकालीप्रौढत्व आले. दुःखाचा मंद हकहकाट सुरु झाला आहे. ठरलेल्या मुहूर्तावर शादी केली पाहिजे, जीव गेला तरी बेहत्तर. पूमृता म्हणते आता मी आधीसारखी सुंदर नाही, आर यू शुअर? सिंदूरची डबी घेऊन काही तरी बाष्कळ बोलत बसलेत. लावा एकदाचा सिंदूर !

आयसियूत लग्न होते. ठरल्याप्रमाणे लग्न झाल्याचे बघून सर्व आनंदात, तूपीकाका तर जळलेली पोरगी अजून जड झाल्यासारखे उपकृत का काय! इथून पुढं तिची जबाबदारी आता प्रेमची म्हणून डॉक्टर मोहनिश इस्टेट असल्यासारखे तिची कागदपत्रे त्याला स्वाधीन करतो. 'नई दुल्हन को ऑपरेशन थेटर मे लाईये' म्हणतो. जहाँ तक शादीशुदा जिंदगी का सवाल है वहां कोई दिक्कत नही, बाकी जळालेलं भरून निघेल हळूहळू' म्हणतो. डॉक्टरसहित सर्वांना दहा मारून एक मोजले पाहिजेत.

हकहकाटाची सनई सुरु. पुन्हा विवाह फरक एवढाच की काकू थेरपी झाल्यासारखी रिलॅक्स आणि आनंदात. अडतीसावं बंडल गाणं. पूमृतेला चकरा येत आहेत तरीही फेरे सुरू. झालं एकदाचं लग्न. कंटाळून सुहागरात वर उडी मारतेय. प्रेम म्हणतो 'ड्रेसिंग का टाईम होगया'. डू यू मीन अनड्रेसिंग? पवित्र प्रेमाचा शेवटचा हकहकाट होऊन सर्वनाश होतो. पादा पण नांदा...!

©अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं अस्मिते.. किती कामाला लावशील? (मुव्ही बघायला लावशील) ए दिल है मुश्किल बघायचा आहे आणी आता आता हे वाचून हा पण (परत) बघावाच लागणार Lol
या सिनेमातच आहे ना वाड्याला आग लागणे, मग अमृताने बहिणीला जीव धोक्यात घालून वाचवणे वगैरे वगैरे. की मी दुसरं काहीतरी कनेक्ट करतेय.

भैय्या-भाभी यांचा सौम्य हनिमून सुरू होतो >>>> सौम्य Lol
बडजातीय मुव्हीज मधे सगळे भैया भाभी, माता पिता कपल्स सौम्य हनिमून मोड मधेच असतात कायम.. नो वसवस
आठवा रेणूका शहाणे - मोहनीश बहल, रिमा लागू- अनुपम खेर

तुफान परिक्षण!
प्रेम झेंडूच्या फुलांची माळ तिला घाल म्हणतो. अरे, आज काही दसरा नाही, पूनम काही गाडी नाही. >>>याला फुटलेच!

या सिनेमातच आहे ना वाड्याला आग लागणे, मग अमृताने बहिणीला जीव धोक्यात घालून वाचवणे वगैरे वगैरे. की मी दुसरं काहीतरी कनेक्ट करतेय.>> आप सही लाइन पे हो!
तुकड्या तुकड्यात बघूनही असह्य होत आहे. वळणावळणाच्या रस्त्यावरून रिश्ता येतोच आहे -येतोच आहे. पूनम लाजतेच आहे- लाजतेच आहे. >>> लाजण्याचा इतका भारि इफेक्ट आहे की अचानक पुनमचे केस भसा भसा वाढुन कमरेपर्यत येतात.
यात अम्रुता कि शाहिद कोण जास्त लाजाळू ?ही स्पर्धा लावल्यानेच पुढे जावुन शाहिदचा कबिर सिन्ग झाला असावा!

अति भयंकर Lol
पूनम काही गाडी नाहीये ला फुटले Happy
जबरदस्त पंचेस. शाहिद कपूर ला बिचाऱ्याला काय आर्थिक निकड असेल म्हणून असा पिक्चर केला?

भारी आहे! :-p वाचताना हे संपूच नये असे वाटत होते. (सिनेमा पाहिला तेंव्हा कधी एकदाचा संपेल असं वाटत होते. ) अस्मिता, असे भयानक (genre-फिअर) सिनेमे पाहताना वाटतं की, का? हा अत्याचार, पण मग तुमचे लेख वाचून वाटतं पहायला पाहिजे परत एकदा. मागे मुझसे दोस्ती करोगे पण पाहिला होता.

'मुझे हक है , तुम्हे हक है' .... परमेश्वरा... व्हाट द हक? हा 'हकहकाट' रात्रभर चालला. Rofl

रावणचहाकर हे रामतीर्थकर वरून साभार. बऱ्याच जणांना लक्षात आला नाही हा संदर्भ. नेटफ्लिक्सने काढला हा सिनेमा आता, प्राईम पैसे मागत आहे, सोशिकांना सहन करायला खास यूट्यूबर जावे लागतेय. Happy

'तूपी' शब्द लेकीचा आहे, ती तुपकट म्हणत नाही. ऑयली आणि तूपी म्हणते. कारण इंग्रजीत तुपकटला चपखल शब्दच नाही. बटरी, फॅटी वेगळं. Lol हे जीभेवर रेंगाळणारं, हाताला ओशट लागणारं वैतागवाणं तूपी !

मंदार, इंटर्नलच आहे. असूया सूक्ष्म आहे, कडाकडा भांडण्यापेक्षा धुसफुसत रहाते.
अंजली, वहीच तो सिनेमा हय ये.
मी देवाचे आभार मानले महाराष्ट्रात जन्माला घातल्याबद्दल.... +१

मैत्रेयी, Lol . यातही विचित्र रिग्रेसिव्ह आधुनिकता आहे. भाभी एकदा शर्ट पँट घालते, आणि अनुपम खेरही women are good administrator असं काही तरी म्हणतो. 'सॉन्ग सुनाके इंग्लिश के जो डाले देसी दाणे' हेच पर्फेक्ट वर्णन आहे. हे संस्कार पोकळ नाहीत, असं काहीतरी सिद्ध करायला आणलेला खोटा आव वाटत रहातो.

त्याच्यासमोर बडजात्यानी फारच इमले बांधलेले. >>>> Lol
अचानक पुनमचे केस भसा भसा वाढुन कमरेपर्यत येतात.>>>> Lol

देवीचा महोत्सव वारंवार होत राहो आणि हे महोत्सवी वातावरण नेहमी अनुभवायला मिळो हीच प्रार्थना !
आचार्य, ही देवीची आरती घ्या. >>>>> Lol

दरवाज़े को कुंडी मारो, कोई ना बच के जाने पाए
DJ को समझा दो, music ग़लती से भी रुक ना जाए
थका-थका जो feel करे, वो जा के दो Red Bull गटक ले
और जिसको dance नहीं करना, वो जा के अपनी भैस चराए

अरे, अभी तो party शुरू हुई है
अरे, अभी तो party शुरू हुई है
Yeah (ये तो बस शुरुआत है)

फारएण्ड,
याच्या विरूद्ध अर्थी काय असावा ? इयन बोथमी ? (संदर्भ हवा असल्यास फारेण्ड यांच्याशी संपर्क साधावा).
>>>>> हा संपर्क आहे. आचार्यांच्या संदर्भाचे स्पष्टिकरण हवे आहे. Happy

इतक्या भरगोस प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद. इथे सिनेमाबद्दल काय लिहायचं ते लिहा खुशाल. Happy

ऑयली आणि तूपी >>> Lol

आचार्यांचा प्रश्न मलाही बाउन्सर गेलाय. तेव्हा आचार्य आता तुम्हीच उत्तर द्या Happy

आता पुन्हा वाचताना फेसलेस भाभी, श्रीमंती बद्दल घर नीट सजवलं असतं तर याची गरज पडली नसती, सौम्य हनिमून, सत्संग, संस्कारांचे थेट प्रक्षेपण वगैरे सगळे धमाल आहे Happy

"जल लिजीये" वर मी एक मीम पाहिली होती. असा खरेच संवाद आहे माहीत नव्हते Happy हे दोघे इतके संस्कारी आहेत व भाषा संस्कृतप्रचूर आहे. नाहीतर शाहिद तिला क्या तेरा जलवा है वगैरे म्हणू लागला तर तिला वाटेल हा पाण्याबद्दल बोलतोय.

नाहीतर शाहिद तिला क्या तेरा जलवा है वगैरे म्हणू लागला तर तिला वाटेल हा पाण्याबद्दल बोलतोय.>>>>> फारएण्ड, जबरी .

क्या तेरा जलवा >> Lol

क्रिकेटशी संबंधित अधिकृत माहितीचे मायबोलीचे द्वारकानाथ संझगिरी म्हणून फारेण्ड प्रसिद्ध असल्याने संपर्क करा असे म्हटले होते. बोथमच्या मैदानाबाहेरच्या "त्या" कामगिरीने मराठी वर्तमानपत्रांचे रकाने भरभरून वाहीले होते. चाणाक्ष गुगलखोरांना वेसांनल.

देवीची आरती Lol

क्या तेरा जलवा >> Lol हा एक राजर्षीचा पवित्र भोजपुरी सिनेमा होऊ शकतो. "पीके संस्कारी जलवा, बिहाय होई कमालवा"

धागा अगदी जलमय झालाय
आता,
तोंडचे जल पळणे, काळजाचे जल होणे, छातीत जलजल, लाथ मारीन तिथे जल काढीन असे वाक्प्रयोग यायला हरकत नाही

भारी परीक्षण /पिसवाँ अस्मिता. मलाही वरती कुणीतरी म्हणाले तसं आवडतो हा सिनेमा ( कधीतरी 'अति सात्त्विक' बघण्याचा मूड असतो तेव्हा.) पण यातल्या काकूची धुसफूस अवाजवी वाटत नाही. बाऊजी जरा जास्तच पुपूमृताप्रेम दाखवत असतात असं वाटतं. 'सगळं ' काही न्योछावर वगैरे करतात तिच्यासाठी.
सोमसरोवर चं जेवण, तो प्रसंग आवडतो. म्हणजे ती छोट्या चौरंगावरील ताटांची मांडणी, धुसफुसत का होईना, पण काकू चारीठाव स्वयंपाक (चविष्ट लागतो ते अनुपम खेरमुळे कळतं. संदर्भ - डैलॉग - "भाभीजी, ही इज अ लकी मॅन" यावर काकूचं दुर्मिळतम स्मित. लेक म्हणतो की तिला याचा अर्थ कळून हसतेय की अशीच आपल्याशी बोलला म्हणून) करते.
कढी इतकी चटपटी असू शकते, ह्याचे भान यात बघितल्यावरच आले.
आख्खा सिनेमा पूनम काय बोलते (पुटपुटते) ते जिवाचे कान करून ऐकावं लागतं. एवढं तर शाहीदलादेखील करावं लागणार विवाहानंतर. तिला पु(तणी) पु(टपुटी) पूमृता ही पदवी द्यायला हवी.
मी आधी ' मैं हूँ ना' मधली अमृता पाहिल्यामुळे हे सात्त्विकपण सात्त्विक असूनही पचायला हलकं वाटत नाही.
फारएण्ड, 'जलवा' जबरदस्त!

घर नीट सजवलं असतं तर ह्याची गरजच पडली नसती>>> जहरी टोमणे Rofl
काय काय नी किती कोट करू? हसून डोळ्यांत पाणी आले.. विनोदाची पखरण मुक्तहस्ते झालिये अस्मिता धमाल लेख Lol
१-१ पॅरा चव घेत घेत वाचलाय प्रत्येक विनोदा ला न्याय देत Lol

इथल्या चर्चेमुळे काल थोडा वेळ विवाह "चाळला".
अमृता राव (एक अरोरा पण होती ना ? खूप गोंधळ होतो) बोलते तेव्हां तिच्या तोंडाचं व्हॉल्युमचं बटण एकच्या पुढे जातच नसावं असं वाटतं. हल्ली फॅनचे नवीन रेग्युलेटर्स कसे एक आणि पाचवरच चालतात तसा बिघाड असावा. बरं ही इतकी हळू बोलते तर शाहीद कपूरला पण तेव्हढेच हळू बोलावे लागणार. अशा हळव्या जोडप्याच्या लग्नात "झिंग झिंग झिंग झिंगाट" किवा "जवा नवीन पोपट हा किंवा "तू औरों कि क्यू हो गई " यापैकी एखादं गाणं लावून डेसीबल्स डेफिशिअन्सी भरून काढावी का ? कानाचे पडदे दडा लागून फुटणारा ढणढणाट कुठे आणि कानच स्प्रिंग सारखे बाहेर काढून ऐकावे लागणारे संवाद कुणीकडे ! थ्रीडी सिनेमाला गॉगल देतात तसे या सिनेमाला वटवाघळाचे कान असलेले यंत्र दिले पाहीजे होते.

छान लिहिलं आहे . सिनेमा ज्यावेळी आला होता तेव्हाच बघवणार नाही हे समजून पास दिला होता .. आईने मात्र आवडीने पाहिला होता पूर्ण .. शेवटी पसंद अपनी अपनी !

ते गाणं फार अश्लील आहे आधा अधुरा

कुछ बातें हो चुकी हैं, कुछ बातें अभी हैं बाकी
बौछार इक पड़ी है, बरसातें अभी हैं बाकी
खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है
हो खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है
मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है
मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है

अगदी relate झालं हे परीक्षण.
अभ्यास करून करून कंटाळा आला तेव्हा माझी रूम मेट आणि मी रूमच्या बाहेर पडलो आणि जो असेल तो सिनेमा बघू येऊ असे ठरवले. थेट बंद्र्याला गेलो. गेईटीला विवाह लागलेला. बाहेर चक्क ब्लॅक ने २ तिकिटे घेऊन थेटरात शिरलो.
इतके इतके इतके पस्तवलो, त्या पेक्षा अभ्यास बराच बरा होता. .
शेवट इतका बंडल अख्खा सिनेमा च बंडल. इतके हळू बोलत होते हिरो आणि हिर्विन काहीही ऐकू येत नव्हते. त्यांना जितके हळू बोलाल तितके ५०० रुपये येक् वडापाव incentive scheme दिलेली असावी.
इतके भाजून पण हिरविन चा चेहरा तसाच राहतो एकदम clean जरा सुधा ओरखडा नाही.
कसातरी एकदाचा सिनेमा संपला. हॉस्टेलला juniors ला आधीच सुगावा लागलेला. त्यांनी जाम जाम पिडले. २-३ दिवस आम्ही दोघी दिसल्या रे दिसल्या की एका सुरात ...मुझे हक है.. रेकुन रेकून गाऊ लागत.
मी परत कधीही हा सिनेमा बघूच शकत नाही.
एकदम भारी लिहिले आहे. उरलेली पिसे लवकर काढा.

सध्या तूनळीवर बघण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, सुपारी फोडणे यासारखे कार्यक्रमांच्या रिल्स टाकतात, यात या हकनाक मधल "दो अंजाने" गाणं सतत असत.

Pages