गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ८

Submitted by रुद्रसेन on 21 April, 2024 - 03:51

रॉबिन वाड्यात आल्यावर त्याने चहूकडे नजर फिरवली, संध्याकाळची वेळ असल्याने तुळशीवृंदावनापाशी उदबत्ती लावलेली होती त्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता. आता या वेळी वाड्यात सगळे असतील हा अंदाज बांधूनच रॉबिनने या वेळी वाड्यात येण्याचं ठरवलं होतं. आत आलेल्या हवालदाराला गेस्टरूमच्या बाजूला उभं राहायला सांगून रॉबिन पुढे जाऊन आबांच्या खोलीकडे जाऊ लागला.
“ देशमुख मी इथे उभा आहे तुम्ही वाड्यातल्या इतर सगळ्यांना बोलावून आणा.” रॉबिन पुढे जात म्हणाला.

रॉबिनच्या म्हणण्यासरशी देशमुखांनी सगळ्यांना आवाज द्यायला सुरुवात केली. कमलाबाई आणी नंदिनी जवळच स्वयंपाक घरात असल्यामुळे त्या लगेचच बाहेर आल्या आणी काय झालंय म्हणून बावरलेल्या नजरेने आबांच्या खोलीबाहेर उभं आलेल्या रॉबिनकडे पाहू लागल्या. वरच्या मजल्यावरून अविनाश खाली आला आणी त्याने काय झालं? का हाका मारून बोलावत आहात? अशा अर्थाने देशमुखांना विचारणा केली तेव्हा देशमुखांनी त्याला सांगितलं कि रॉबिनने सगळ्यांना बोलावलंय. सगळ्यात शेवटी वरच्या मजल्यावरून हळूहळू खाली बघत चष्मा सावरत आशुतोष खाली आला. सगळेजण रॉबिनच्या समोर जमा झाले, जो आबांच्या खोलीबाहेर हाताची घडी घालून गंभीर चेहरा करून उभा होता. सगळे आल्यावर रॉबिन अविनाशकडे पाहत म्हणाला.

“ अविनाश तुम्हाला आबांना घेऊन बाहेर फिरायला जायचं असेल ना?
“ अ..हो थोड्याच वेळात निघणार होतो मी त्यांना घेऊन ..” चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत अविनाशने उत्तर दिलं.
“ ठीक आहे, पण आज तुम्हाला बाहेर जाता येणार नाही कारण मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. या इथे आतमध्ये” असं म्हणून रॉबिन मागे वळाला आणी आबांच्या खोलीची बाहेरील कडी काढून आतमध्ये प्रविष्ट झाला. आतमध्ये आबा बेडवर एका अंगावर झोपलेले होते. समोरच्या भिंतीवर असलेली खिडकी रॉबिनने पुढे जाऊन उघडली तशी वाऱ्याची मंद झुळूक आतमध्ये आली, आणी बाजूलाच उभी असलेली एक लाकडी खुर्ची खिडकीजवळ ओढली आणी पायावर पाय ठेवून त्या खुर्चीत रॉबिन आरामात बसला.
रॉबिनच्या मागोमाग सगळेजण आतमध्ये आले. आबांची खोली बर्यापैकी मोठी होती. आतमध्ये आल्यावर आबांच्या बेडवर अविनाश बसला. दाराजवळ कमलाबाई आणी तिच्या मागे नंदिनी उभी होती. त्यांच्यापुढे आशुतोष उभा होता. इ. देशमुख दरवाजातच उभे राहून पुढे काय होणार हे कुतुहूलतेने पाहत उभे होते.

आतमध्ये आल्यावर सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला होता कि रॉबिनला नक्की काय बोलायचं आणी त्याने सगळ्यांना आबांच्या खोलीत का बोलावलंय. सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून रॉबिन गंभीर चेहरा सोडून जरा हसरा चेहरा करत म्हणाला.
“ तुम्हा सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला असेल कि मी असा अचानक या वाड्यात येऊन सगळ्यांना इथे का बोलावलं असेल.” रॉबिनच्या या वाक्यावर कोणीच काहीही बोललं नाही.
“ तुमच्या पैकी कोणी नाटकं पाहिलं आहे का”? रॉबिनच्या या पुढच्या प्रश्नावर सगळे अजूनच बुचकळ्यात पडले.
इ. देशमुखांना सुद्धा कळल नाही रॉबिन नाटकाविषयी का विचारतोय.
“ अविनाश तुम्ही सांगा तुम्ही नाटक पाहिलं आहे का कधी प्रत्यक्ष” अविनाशकडे पाहत रॉबिनने स्मित करत विचारलं.
“ अ...हो..पाहिलं आहे” अविनाश काहीसा बावरत आणी प्रश्नार्थक मुद्रा करत म्हणाला.
“ नाटक संपल्यावर पडदा पडतो आणी काही नाटकवेडे प्रेक्षक स्टेजच्या मागील खोलीत नाटकात काम केलेल्या कलाकाराचं अभिनंदन करायला किंवा त्यांच्या कामाचं कौतुक करायला त्यांची भेट घेतात. काहीजण तर त्यांची सही सुद्धा घेतात. हो ना अविनाश ?...” परत अविनाशकडे हसरा चेहरा करत रॉबिनने प्रश्न विचारला.

यावर अविनाशने होकारार्थी मान हलवली खरी पण रॉबिनला नक्की म्हणायचं काय हे कोणालाच समजत न्हवत.
सगळेचजण प्रश्नार्थक नजरेने रॉबिनकडे पाहत होते. सगळ्यांचे असे चेहरे पाहून रॉबिनने विषय जास्त न ताणता मुद्द्याला हात घालायला सुरुवात केली.

“ मी सुद्धा आज इथे अशाच एका कलाकालाराला भेटायला आलोय. ज्याने नाटकातील कलाकाराप्रमाणेच अतिशय उत्तम अभिनयाचा नमुना दाखवत नाटकं छान चालवलं आहे, खरंतर अशा कलाकाराला नाट्य क्षेत्रातील मोठा पुरस्कारच द्यायला हवा. पण दुर्दैवाने त्या नाटकावर पडदा पडायची वेळ आलेली आहे. आणी ते सौभाग्य मी स्वतःकडे घेत आहे” रॉबिन नाटकीय पद्धतीने म्हणाला.
“ रॉबिन आम्हाला खरंच कळत नाहीये तूम्ही काय बोलताय, तेव्हा कृपा करून आता स्पष्टपणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं” अधीर होत पण चेहऱ्यावर नाराजीचे भाव आणत अविनाश म्हणाला. आता सगळ्यांच्याच धीराची परीक्षा होत आहे हे ओळखून रॉबिन जागेवरून उठत पुढे म्हणाला. –
“ त्या बेडवर झोपलेले आबा देसाई हेच त्या नाटकाचे कलाकार आहेत. म्हणजेच मागचे काही दिवस स्मृतिभ्रंशाचं नाटकं करतं बेडवर पडलेले असतात.”
त्याचं ते वाक्य बॉम्ब पाडाव तसं खोलीत घुमलं. कोणीच काही बोललं नाही. कारण कोणालाच ते वाक्य पचले नाही. हे असं रॉबिनला माहित असल्याने तो पुढे बोलला –
“ २ महिन्यापूर्वीच ते स्मृतिभ्रंशाच्या व्याधीतून बरे झालेत, आणी तरीसुद्धा कोणाला कळू न देता आपण अजूनही बरे झालेलो नाही, आणी काही आठवत नाही अशा अविर्भावात ते वावरत आहेत. रॉबिन म्हणाला.
कमलाबाईने तोंडावर पदर ठेवला. नंदिनी आणी अविनाश अविश्वासाने रॉबिनकडे पाहत होते. बाजूला उभ्या आशुतोषला याचं काहीही देणंघेणं नसल्यासारखा तो मान खाली घालून उभा होता. दरवाजात उभ्या असलेल्या इ. देशमुखांना पण चांगलाच हादरा बसला होता आणी ते अविश्वासाने आतमध्ये पाहत होते. आबा अजूनही बेडवर एका कुशीवर झोपूनच होते. पण आता अविनाशचा तोल सुटला आणी तो मोठ्याने बोलला.
“अहो हे काय बोलताय रॉबिन, काय वाट्टेल ते बोलत आहात तुम्ही. कशावरून तुम्ही असे आरोप करताय. आणी आबांना असं करायची गरजचं काय आहे.”
“ गरज काय आहे ते आबा स्वतःच सांगतील. पहिल्यांदा जेव्हा आबांच्या या खोलीत आलो तेव्हा फक्त टेबलावरील पुस्तकं पडल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली होती. आज आपण एवढ मोठ्याने बोलतोय इथे तरीही त्यांची झोपमोड होत बघा कसं झोपेचं सोंग करत पडलेत” रॉबिन जरा घुश्यातच म्हणाला.

“ रॉबिन तुम्ही माझ्या वडिलांना पुराव्याशिवाय काहीही बोलू शकत नाही” आपल्या जागेवरून उठत तावातावात म्हणाला.
“ पुरावा हवाय तुम्हाला....” देशमुख.... “बाहेर बघत मोठ्याने रॉबिन म्हणाला. “ त्या पाटील डॉक्टरला आतमध्ये आणा ज्याने चौकशीत आपल्याला सांगितलं कि आबा हे चोरून रात्री अपरात्री त्यांना भेटायला येतात आणी तशी साक्ष पण तो कोर्टात देणार आहे.” रॉबिनने बिनदिक्कतपणे खडा मारला होता.
रॉबिनच्या वाक्यासरशी देशमुखांनी अंगणातील हवालदाराला इशारा केला. तो हवालदार पळतच बाहेर गेला. आणी काही वेळातच हवालदार म्हस्के बाहेरून पाटील डॉक्टरांना हाताला धरून आबांच्या खोलीबाहेर आला. सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळाल होतं कोणाला काय बोलावं ते समजत न्हवत. डॉक्टर पाटलांना आपणाला इथं का आणलाय तेच समजत न्हवतं आणी ते प्रचंड घाबरलेले होते. पाटील डॉक्टरांना घेऊन देशमुख आत आले.

“ हे बघा आबा तुम्ही रंगवलेल्या नाटकातील तुमचे सहकारी पाटील डॉक्टर आतमध्ये आलेले आहेत आणी.... थोडसं थांबून हलकसं हसत पुढे जाऊन आबांच्या जवळ जात त्यांच्या कानात हळूच म्हणाला “कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल पण माहिती लागलीय आम्हाला”
तेवढ्यात पटकन अंगावरची चादर बाजूला फेकत आबा ताडकन बेडवर उठून बसले आणी कडाडले.
“ मूर्ख माणसा, थोडे दिवस थांब असं म्हणलो होतो ना. लगेचच घाबरलास पोलिसांना. सगळं सांगून बसलास. असला कसला शेळपट डॉक्टर आहेस रे तू”
असं म्हणून आबा रागारागाने डॉक्टर पाटलांना मारायला धावले. रॉबिनने त्या दोघांमध्ये पडत आबांना धरले आणी बेडवर बसवले. डॉक्टर पाटलांना घाबरून काय होतंय तेच समजत न्हवत आणी त्यामुळे त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. कसायला दिलेल्या बकरीसारखी त्यांची अवस्था झालेली होती.

आबांच्या त्या ताडकन उठण्याने सगळेच आवक झाले त्याहूनही ते जे स्पष्टपणे बोलले त्याने तर इ. देशमुखांसोबत घरातील सगळ्याचं धक्काच बसला. नंदिनी तर रडवेल्या चेहऱ्याने मटकन खालीच बसली. कमलाबाईने मोठ्याने आ वासला. अविनाश डोळे मोठे करून विश्वास न बसल्यासारखा आबांकडे पाहत बेडवर खिळून होता. आशुतोषसुद्धा आश्चर्याने पाहत होता.
“ आबांना पाणी द्या प्यायला” अविनाशला निर्देश करत रॉबिन परत खुर्चीत बसत म्हणाला.

रॉबिनच्या वाक्यासरशी अविनाश भानावर आला आणी आबांना मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागला. आबांनी सुद्धा पाणावलेल्या नेत्रांनी त्याला छातीशी धरलं. नंदिनी सुद्धा स्फुंदून स्फुंदून रडू लागली, कमलाबाईचे डोळे सुद्धा पाणावले.
थोड्या वेळ त्यांना एकमेकांना सावरायला लागला त्यामुळे रॉबिन शांतपणे खुर्चीत बसून सगळ्यांना न्याहाळत उभा होता. अविनाशला आबांनी मिठीतून सोडवलं आणी डॉक्टर पाटलांकडे पाहत म्हणाले “ डॉक्टर तू या पोलिसांना आणी या रॉबिनला सगळंच सांगायची गरज न्हवती. काही दिवस थांब असं म्हणलो होतो मी”
“ अहो आबा मी यांना काहीही सांगितलेलं नाहीये. यांनीच मुद्दाम तुम्हाला तुमचं बिंग बाहेर पडावे म्हणून खोटच सांगितलंय सगळं” डोक्यावर हात ठेवत रडवेल्या सुरात डॉक्टर पाटील म्हणाले.
पाटलांच्या या वाक्यासरशी आबा चमकून रॉबिनकडे पाहू लागतात. रॉबिन मात्र गालातल्या गालात हसत खुर्चीत आरामात रेलून बसलेला होता.
“पण तुम्हाला कुटीरोवांच्या शस्त्राबद्दल कसं माहिती आहे. ते एक दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेल हत्यार आहे ज्याची माहिती कोणालाच नाहीये” आबा शांतपणे रॉबिनकडे पाहत म्हणाले.

“ त्या आधी तुम्ही मला सांगा तुम्हाला हे नाटक करायची काय आवश्यकता होती, आजूबाजूला प्रेम करणारी मुलं आणी सुना असताना आणी तुमची एवढी काळजी ते घेत असताना त्यांना असं अंधारात ठेवायला तुम्हाला जराही वेदना झाल्या नाहीत “ रॉबिन मुद्दाम भावनिक शब्दात म्हणाला. यावर आबांची नजर खाली गेली.
“ वेदना झाल्या, खूप झाल्या. पण काय करणार ...” एवढ बोलून आबा शांतपणे जमिनीकडे पाहू लागले.
“ मग आता हे सगळं का आणी कशासाठी केलं, ते सविस्तर सांगा अगदी कुटीरोवांच्या माहितीसकट” रॉबिन खुर्चीवर रेलत म्हणला.
“ सांगतो.. सगळं सांगतो” असं म्हणून आबा दोन्ही हात बेडच्या काठावर ठेवून सांगू लागले –

“ मला पहिल्यापासूनच फिरायची खूप आवड होती. नोकरीत असतानादेखील मी माझी हि आवड जोपासायचो. कामाच्या ठिकाणी असताना माझे दोन मित्र होते गजानन सुरवसे आणी प्रमोद टेके या नावाचे. त्यांना सुद्धा फिरायचा खूप नाद होता, एकदा कामाच्या ठिकाणी असताना गजानन म्हणाल होता, कि दक्षिण भागात जिथे खूप दाट जंगलं आहेत तिथे खूप रम्य धबधबे आणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षि पाहायला मिळतात, आपण तिथे फिरायला जाऊयात. तो तसा म्हणाला खरा पण योग काही आलाच नाही. घरात पण मालतीची चिडचिड जास्तच वाढली होती. येऊन जाऊन ती सगळ्यांवर डाफरत असायची. मी घरात असलो कि सांभाळून घ्यायचो सगळ्यांना पण माझा मागे तिला आवरण इतरांना अशक्य होऊन जायचं. मागच्या वर्षाखाली एकदा गजाननचा फोन आला कि जिथे आमचं फिरायला जायचं ठरलं होतं तिथं जाण्यासाठीची तिकीट त्याने बुक केलेली होती आणी मला तिकडे चलण्यासाठी तो गळ घालत होता सोबत प्रमोद पण येणार होता. मला नाही म्हणवल नाही, आणी दुसरीकडे निसर्ग सुद्धा खुणावत होताच. घरच्या कीटकीटीतून जरा विरंगुळा सुद्धा होणार होणार होता. मी होकार दिला आणी आम्ही फिरायला निघालो, अतिशय रम्य अशा अशा ठिकाणी फिरलो वेगवेगळे पक्षी पहिले, धबधबे आणी उंचच उंच कडे कपारी पहिल्या मस्त वाटलं. गजाननच्या म्हणण्यानुसार इथे ठराविक अशा प्रकारच्या आदिवासी जमाती राहत असतं. पण त्या सहसा कोणाला दिसायच्या नाहीत. तिथे मला नंदिनीची माझ्या सुनेची जास्तच आठवण आली तिला अशा ठिकाणी फिरायला फार आवडते. इथल्या वातावरणाबद्दल सांगायला मी काही पत्र पण लिहून घरी पाठवली होती.
पुढच्या वेळी अविनाश आणी नंदिनीला नक्की या ठिकाणी पाठवायचं असा निर्धार मी केला. तिथे एके ठिकाणी उंच सुळक्या जवळ मी फिरत होतो, त्या दिवशी गजाननला जरा बऱ वाटत न्हवते म्हणून तो आणी त्याच्या सोबत प्रमोद दोघे आम्ही ज्या ठिकाणी मुक्काम केला होता तिथेच थांबले होते. मी मात्र जरा पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडलो, एका उंच कड्याच्या टोकाजवळ मी उभा होतो. तिथून खालचा ओढा वाहत असतांनाच दृश्य खूप छान दिसतं होतं. अजून थोडं खाली एक वेगळ्याच प्रकारची रानटी फुलं पाहण्याच्या नादात मी जरा कड्याच्या खाली उतरलो. फुलं बघण्याच्या नादात हे विसरलो कि वर परत जायला रस्ता नाहीये, कडा उतरून खाली जाऊन एक फेरी मारून मग दुसऱ्या बाजूंला जाणे या एकंच मार्ग होता. डोक्यावर हात मारून मी कडा हळूहळू खली उतरलो आणी खाली कच्च्या रस्त्याला लागलो आणी कड्याच्या भोवतालच्या कच्च्या रस्त्याने चालू लागलो.

अंधार पडू लागल्याने पटापट चालत होतो, आजूबाजूला जंगलचा भाग होता. लवकर मुक्कामी पोहोचावं म्हणून झपझप पावलं टाकत असतानाच एका खड्यात माझा पाय अडकला आणी तोल जाऊन पडलो. पाय मुरगळल्याने मला उठता येईना आजूबाजूला कोणीच माणूस दिसत न्हवता. बराच वेळ तिथे कण्हत नशिबाला दोष देत बसून होतो. एवढ्यात मागून २ आदिवासी बायका येत होत्या, त्यांना मी जमिनीवर बसलेला दिसलो. त्या इथे झाडपाला गोळा करायला आल्या होत्या. मला त्यांची भाषा समजत न्हवती पण त्यांना माझी भाषा थोडीशी समजत होती. त्यांनी माझी मोडक्या तोडक्या भाषेत विचारपूस केली. मी माझा पाय मुरगळल्याच सांगितलं. तस त्या दोघींनी मला आधार देत उचललं आणी जवळच आपल्या पालावर नेऊन जायला लागल्या. गजाननने सांगितल्याप्रमाणे इथे खरंच आदिवासी जमाती वास्तव्यास होत्या हे खर होतं तर. जंगलात आतमध्ये एके ठिकाणी त्यांनी मला नेलं, माझ्या पायाला खूप वेदना होत होत्या. काही वेळातच आम्ही त्यांच्या पालावर पोचलो, आजूबाजूला ४-५ लहान झोपड्या आणी मध्ये छोटी शेकोटी केलेली होती. तिथे ३-४ लहान मुले आणी काही वृद्ध मंडळी बसली होती. आम्ही येताच सगळ्यांनी आमच्या भोवती कोंडाळ केलं, पालावरचे इतर आदिवासी त्या बायकांना माझ्याबद्दल विचारू लागले. तेव्हा त्यांच्या आदिवासी भाषेत त्यांनी काहीतरी सांगितलं आणी मला बाजूच्या झोपडीत घेऊन गेले. तिथे नंतर त्यांच्यातील एक वृद्ध आदिवासी जवळ आला कदाचित त्यांचा वैद्य असावा त्याने माझा पाय पाहिला आणी त्या मुरगळलेल्या पायावर त्यावर २-३ लहान काठ्या वेलाच्या सहाय्याने बांधल्या आणी कसलातरी पानाचा लेप लावला. जवळच्याच भांड्यातील एका पदार्थाचा आग लावून धूर केला. आणी तो धूर माझ्या नाकाजवळ आणला आणी क्षणार्धात मला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा सकाळ झाली होती. उठून बसलो तर मी कालच्याच झोपडीत एकटा होतो. पायाला वेदना अजिबात होत न्हाव्त्या, पाय हलवून पाहिलं तर तो अगदी ठणठणीत बरा झालेला पाहून आश्चर्य आणी आनंद दोन्ही भावना मनात आल्या. मग मी झोपडीच्या बाहेर आलो तर काही आदिवासी मंडळी बाहेरचं उभी होती. मी आल्यावर आनंदाने ती माझाजवळ येऊन उभी राहिली आणी मला बाजूला एका दगडावर बसवलं आणी मोडक्या तोडक्या भाषेत माझी विचारपूस करू लागली. खूप प्रेमळ स्वभावाची अशी ती लोकं होती. त्यांनी मला खाण्यास काही फळे दिली, नंतर दिवसभर मी त्यांच्या सोबतच घालवला. आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणी वनस्पती असल्याचं मला त्यांच्याकडून कळल. मुख्यत्वे हि लोकं फुलं आणी झाडावरचा मध गोळा करून आसपासच्या गावात विकून आपली गुजराण करत असत. तेवढाच काय तो त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध. बाहेरील लोक सुद्धा त्यांचाशी तेवढाच संबंध ठेवायचे. मला त्यांच्या सोबत दिवस काढायला मिळाल्याने मी खुश होतो. जंगलात असणाऱ्या विविध प्राण्यांची मुख्यकरून ससे किंवा हरीण यांची ती लोक शिकार करायची.

जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासठी विशेष अशी विषारी हत्यारे वापरात असत. तिथे एका वृद्ध अदिवास्याने मला सांगितलं कि त्यांच्या जमातीला कुटीरोवा असं म्हणतात. त्याने तिथली विविध प्रकारची औषधी झाडे मला दाखवली. त्यात ओल्डोमा नावाची अत्यंत दुर्मिळ वनस्पती देखील होती. ओल्डोमा वनस्पतीच्या पानांच्या रसाचा वापर करून तो हत्याराच्या टोकाला लावत असत. विशेष म्हणजे त्या वनस्पतीची खोडं जरा काटक होती आणी तिचं खोडं वापरून ती मध्ये पोखरून त्याच्या मध्ये त्याचं खोडांपासून बनवलेल्या टोकदार सुया शिकारीला वापरत. त्या सुयांच्या टोकाला लावलेल्या त्याचं वनस्पतीच्या पाल्याच्या विषाने सावज जागीच ठार व्हायचं एवढ जालीम विष होतं ते. मला त्या वृद्ध माणसाने त्या वनस्पतीच्या खोडापासून ते हत्यार कसं तयार करायचं आणी पानांचा रस काढून विष कसं लावायचं हे दाखवलं होतं. मला त्यांची ती पद्धत खूप आवडली. पण अखेर निरोप घ्यायची वेळ झाली. माझा पाय बरा केल्याने मी त्या आदिवासींचे मनापासून आभार मानले. त्यांना देखील भरुन आलं होतं. जाताना मला त्यांनी ओल्डोमा वनस्पतीच्या काही बिया आठवण म्हणून दिल्या.

जड अंतकरणाने मी त्या प्रेमळ लोकांचा निरोप घेतला. जंगल तुडवत कच्च्या रस्त्याला आलो आणी मुक्कामाच्या स्थळी पोहोचलो. गजानन आणी प्रमोद यांना मला बघून जीवात जीव आला. दोघे रात्रभर मलाच शोधात होते. त्यांना मी पडल्याचं आणी कुटीरोवा या आदिवासी जमातीच्या पाल्याला भेट दिल्याच सविस्तर वर्णन सांगितलं. त्यांना कुटिरोवांनी दिलेल्या ओल्डोमा वनस्पतीच्या बिया सुद्धा दाखवल्या. तिथला प्रवास उरकून आम्ही भाड्याने केलेल्या एक चारचाकी गाडीने परतत होतो. पण दुर्दैव माझं रस्त्यात एका अपघाती वळणावर आमच्या गाडीला अपघात झाला. मी गाडीतून बाहेर फेकला गेलो आणी माझा डोक्याच्या मागे मार लागला आणी माझी शुद्धच हरपली. जाग आली तेव्हा कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये असल्याचं जाणवलं. बोलायला बघितलं तर तोंडातून शब्द फुटत न्हवते. परत शुद्ध हरपली त्यात मध्ये किती दिवस गेले कोण जाणे. एकदा परत जाग आली तेव्हा याचं खोलीत होतो रात्र झाली होती उठता येत न्हवते आणी जीभ पण जड झाली होती. हळूहळू जाणीवा होऊ लागल्या होत्या. काही दिवसांनी दिवसापासून उठता बसता येऊ लागलं.

वाड्यातल्या लोकांना सुरुवातीला ओळखता येत नसायचं म्हणून गप्पच असायचो पण नंतर नंतर सगळं आठवू लागलो. बायका मुलं सुना सगळ्यांचे चेहरे ओळखीचे वाटू लागले पण बोलत नसायचोच. हळू हळू समजायला लागलं कि अविनाशने माझी ट्रीटमेंट करण्यासाठी एका पटवर्धन नावाच्या डॉक्टरकडे नेत होता. त्याचाकडे गेल्यावर आणी त्याची औषधं घेतल्याने मला बऱ वाटू लागलं होतं. अविनाश रोज बाहेर फिरायला घेऊन जायचा त्याने जास्तच बऱ वाटायचं. हळूहळू माझी स्मृती पण माघारी येऊ लागली होती आणी जीभ थोडीशी जडत्व रहित झालेली होती. पण बोलत नसायचो. एके दुपारी अचानक झोप मोडली ती कसल्याशा आवाजाने मी उठून बसलो. तर मालती तावातावाने कोणाशी तरी बोलत होती. बाहेर जायला बघितलं तर माझ्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी होती. मग आतूनच कान देऊन ऐकू लागलो. मालती माज्या सुनेला मोठमोठ्याने शिव्यांची लाखोली वाहत होती आणी माझी गरीब बिचारी सून रडत गयावया करत उभी होती. मला आतून काहीच करता येईन बोलता सुद्धा येत न्हवते कि दार उघडा म्हणून. मग तसाच आतमध्ये बसून राहिलो.

एकदा हा डॉक्टर पाटील रात्री तपासायला आला होता. खोलीबाहेर त्याचं आणी अविनाशचं बोलणं कानावर पडलं पाटील डॉक्टर बोलत होते कि मालती सुनेला कशी त्रास देते. अविनाशला कशा प्रकारे वागवते. बाहेर सुद्धा तिने लोकांना त्रास देऊन कसे पैशाचे गैर व्यवहार केलेलं होते, ते ऐकून पित्तच खवळल. लहान होता म्हणून अविनाशच्या संगोपनासाठी मालतीला घरात आणले होते पण तिची हि थेरं ऐकून मस्तकच फिरलं, क्षणभर विश्वासच बसला नाही. डॉक्टर पटवर्धनांच्या उपचारांचा चांगलाच असर माझ्यावर होत होता. पण मला सगळ आठवत असल्याचं मी कोणालाच सांगितलं नाही कारण माझे मागे मालती काय काय प्रताप करते हे मला पहायचे होते.

रोज दुपारी अविनाश नसताना मालती नंदिनीवर ओरडत असताना मी ऐकायचो. संध्याकाळी अविनाश आला कि त्याचावर खेकसायची. माझ्या डोक्याचा पारा चढत चालला होता. एके रात्री मी ठरवलं कि डॉक्टर पाटलांना कल्पना द्यायची कि मी बरा झालोय. माझ्या खोलीच्या खिडकीतून अंगावर शाल पांघरून हळूच बाहेर पडलो. मुख्य दरवाजा रात्री बंद असल्याने मी कंपाऊंडची भिंत उडी मारून कशीबशी ओलांडली. आणी आडमार्गाने डॉक्टरच्या घराकडे निघालो. त्याला मला पाहताच त्याची बोबडीच वळली. पण मी डॉक्टरला विश्वासात घेऊन सांगितलं कि मी बरा झाल्याचं कोणाला सांगायचं नाही कारण माझामागे मालती ची काय थेरं चालतात मला पहायचं होतं. डॉक्टरांकडून मला समजलं कि बाहेर सुद्धा अनेक गैरव्यवहारामध्ये मालती गुंतलेली होती, डॉक्टरांचे पाटलांचे पैसे सुद्धा दिलेलं न्हवते, आणी ते मागायला आले तेव्हा भर लोकात त्यांचा अपमान केला होता. मुलांना एक चांगली आई मिळेल या उद्देशाने मी दुसरं लग्न केलं होतं. पण ती बाई अशी निघाली. वेळ मिळेल तसं मी रात्री डॉक्टरांच्या घरी जायचो. आणी त्यांचाशी बोलायचो, ते माझं म्हणणं ऐकून घ्यायचे.

त्यात एके दिवशी संध्याकाळी पोलीस घरी आलेले पाहिलं. मला कळेना पोलीस का आलेत. हे कसं काय झालं मला समजेना. मी आणी अविनाश बाहेरून आलेलो. मालातीचा खून झाल्याचं नंतर समजलं. मला वाईट नाही वाटलं नक्कीच कोणाच तरी वाटोळ केलं असणार तिने त्यामुळेच असं घडलं तिच्याबाबतीत. काही दिवसांनी रात्री पुन्हा डॉक्टर पाटलाकडे गेलो, पाटलांनी सांगितलं कि त्यांनीच पोलिसांना बोलावून घ्या असं सांगितलं होतं. खरतरं बाहेरच्या माणसाच हे काम असावं म्हणून पाटलांनी अविनाशला तसं सांगितलं, पण मीच पाटलाला ओरडलो कि अरे सुंठेवाचून खोकला गेलेला असताना तू कशाला शहाणपणा करून पोलिसांना बोलावून घेतलंस, सांगितलं असत लोकांना हृदयविकाराच्या झटक्याने गेली ती. खरतर पाटलांच्या शहाणपणामुळेच पोलिसांचा संबंध इथे आला. परत पाटलांना वाटू लागलं मीच मालतीला मारलंय. पण मी म्हणालो खरतरं खुन्याने माझा हातून हि संधी नेली कारण खरंतर मलाच माझा हाताने तिचा गळा आवळायचा होता. पण माझ्या नशिबात ते न्हवते. एवढ बोलून आबा शांत बसले.

खोलीत निरव शांतात होती सगळेजण ऐकत होते.
“ पण मग तुम्हाला कसं कळल कि आबा माझ्याकडे येतात ते? डॉक्टर पाटील रॉबिनकडे पाहत जमिनीवर बसून बोलले.
“ त्या रात्री तुमच्या घरी भेट दिली तेव्हाचं समजल कि तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय आणी तुम्ही त्याला घरात लपवताय, टेबलावर तुम्ही त्यांना प्यायला दिलेला पाण्याच्या ग्लासच पाण्याचं वर्तुळ त्याची साक्ष देत होतं. म्हणून तुमच्या घरातून निघाल्याचं नाटक करत मी बाहेरचं तुमच्या घरासमोरच्या झाडीत बसून पाळत ठेवत होतो कि नक्की तुम्ही कोणाला लपवत होतात.” रॉबिन खुचीत बसूनच बोलला.
“ हो त्या दिवशी तुम्ही वाड्यावर आला होतात, तेव्हा नंदिनी अविनाश ला सांगत होती कि रॉबिन वाड्यावर आला होता पाहणी करायला. त्या रात्री मी डॉक्टरकडे गेलेलो होतो हेच सांगायला कि या प्रकरणात आता एक हुशार गुप्तहेर सुद्धा सामील आहे, तेव्हा आज ना उद्या हा गुप्तहेर माझं बिंग बाहेर काढायच्या आत मी बरा झाल्याचं दाखवतो नाहीतर विनाकारण आपल्यावर संशय यायचा, कारण डॉक्टर सुद्धा घाबरला होता कि मी रात्री असे त्याला भेटतो म्हणून खुनाचा संशय त्याच्यावर येऊ नये. आबांनी पुस्ती जोडली.

“ त्या रात्री अचानक दार वाजलं तेव्हा मी जाम घाबरलो, आमचं बोलणं थांबवून आबांना माझ्या घरातल्या दरवाजा मधून क्लिनिकमध्ये लपवलं. कोण आहे ते पाहून बाहेरच्या बाहेर त्या व्यक्तीला कटवायच हा विचार करत दार उघडलं. तर समोर गुप्तहेर रॉबिन माझी तर वाचच बसली होती. कसबस तुम्हाला झोप येतेय म्हणून आणी उद्या घर पहा असं सांगून घरातून घालवलं नंतर तुम्ही गेल्यावर आबा माझ्याशी बोलून खूप वेळाने निघाले, कारण रात्र जरा अजून झाली असती आणी कोई त्यांना पाहिलं पण नसत” डॉक्टर म्हणाले.

“ मग मी त्यांचा पाठलाग केला” हलकंस हसत रॉबिन बोलू लागला – आबांनी मस्त शाल वगेरे पांघरून आपली ओळख लपवायचा प्रयत्न केला होता. पण डॉक्टरानच्या क्लिनिकबाहेर पडत असताना मला अचनाक त्यांच्या पायातला बूट दिसला. जो मी वाड्यात त्यांच्या बेडखाली पहिला होता. आत्तासुद्धा तो बेडखाली असेल पहा आणी त्याचा पुढचा भाग घासल्याने तो जरासा खरवडला गेलाय. त्यामुळे माझा संशय आबांवर बळावला, पाठलाग करत असताना आबा पुढे निसटून गेले तेव्हा रात्रीच्या त्या अंधारात लांबवर लुकलुकणारे दिवे वाड्याच्या आसपास असावेत असं दिसतं होतं. त्यामुळे हि व्यक्ती वाड्यातीलच असणार असं वाटून गेलं. त्याआधी दिवसा एकदा वाड्याची पाहणी करायला आलेलो असतना आबांच्या खोलीबाहेर जरा पाहणी केली त्यात आबांच्या खिडकीबाहेर असलेल्या भिंतीवरचा रंग काहीतरी घासल्यामुळे उडालेला होता तोच रंग काहीसा आबांच्या बुटाला पुढच्या भागाला लागलाय. तेव्हाच मला संशय आला होता कि कोणीतरी या खिडकीमधून भिंतीवर पाय देऊन आतबाहेर करत आहे, भिंतीवर खालच्या बाजूला असलेल मातीचे डाग याला अजूनच बळकटी देत होते. प्रथम आबांच्या खोलीचा वापर करून कोणीतरी दुसराच हे काम करतोय असं मला वाटलं कारण आबांना स्मृतीभ्रंश असल्याने त्यांना या गोष्टी जमणार नाहीत. पण डॉक्टर सचित पटवर्धन यांचाकडे जाऊन जेव्हा मी या गोष्टीची माहिती मिळाली कि तुमच्याकडे येण्याऱ्या पेशंटच बरे होण्याच प्रमाण काय तेव्हा समजले त्यांच्या माहितीनुसार त्यांची उपचार पद्धती खूपच गुणकारी होती, मला जरा शंका वाटू लागली कि आबा हे बरे झालेत आणी नाटक करतायत. अर्थात पटवर्धन डॉक्टरांकडे जायची कल्पना पाटील डॉक्टरांमुळेच मिळाली म्हणा”

“ माझ्यामुळे ...ते कसं काय” डॉक्टर पाटील आश्चर्याने म्हणाले.
यावर रॉबिन म्हणाला” तुम्हाला आठवतंय का डॉक्टर त्या रात्री तुमच्या घरी आल्यावर मी तुमच्या शेल्फ मधली वैद्यकीय मासिक पाहत होते”
“ अ..हो... तुम्ही तिथली माझी मासिक पाहत होतात” चष्मा सावरत पाटील म्हणाले.
“ येस..मग त्या मासिकातच डॉक्टर पटवर्धन डॉक्टरांच नाव आणी त्यांचा लेख नजरेस पडला. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी पटापट वाचल्या. त्यामुळे त्यांना जाऊन एकदा भेटणं महत्वाचं वाटलं. त्यांच्या बोलण्यावरून एक समजलं कि त्यांच्या नवीन उपचार पद्धतीने बरेच पेशंट बरे होतात तर त्याला आपले आबा अपवाद कसे काय. मग मी माझा संशयाचा भवरा आबांकडे वळवल्यावर गोष्टी मला समजत गेल्या. आबा हे बरे आहेत अगदी ठणठणीत आहेत, आपल्या खोलीच्या बाहेर ते खिडकीतून बाहेर पडतात ते बुटाच्या खरवडलेल्या आणी भिंतीच्या रंग उडालेल्या परिस्थितीवरून सिद्ध होतं. आणी मगाशी मी त्यांच्या कानामध्ये कुटीरोवांच्या जमातीबद्दल माहिती असल्याचं सांगितलं ज्याने मला शंभर टक्के खात्री होती कि आबा आपलं सोंग टाकून देतीलच” रॉबिन हाताची बोट एकमेकांवर ठेवत म्हणाला.

“ पण रॉबिन तुला कुटीरोवाजमातीबद्दल आणी त्यांच्या विशिष्ट शस्त्रांबद्दल कस समजलं, “ इ. देशमुख म्हणाले.

“ आबांच्या खोलीत काही प्रवासवर्णनावर आधारित पुस्तकं होती. जी मी हळूच इथून घेऊन गेलो आणी माझ्या घरी जाऊन रात्रभर वाचून काढली. त्यामध्ये आबांचे मित्र गजानन सुरवसे यांनी लिहिलेलं एक पुस्तक होतं त्यातच त्यांनी आणी आबांनी दक्षिणेत प्रवास केल्या गोष्टिंची वर्णनं केली होती. त्यात त्यांनी कुटीरोवा आणी त्यांच्या जमातीबद्दल केलेला उल्लेख मी वाचला. आणी राहून राहून मला वाटू लागलं कि नक्कीच या शस्त्राचा वापर मालातीताईच्या हत्येत झालाय.” रॉबिन खुर्चीतून उठत म्हणाला.
“ अरे हो गजानन ने पुस्तक लिहून झाल्यावर एक प्रत मला पाठवली होती. पण तेव्हा मी शुद्धीत न्हवतो नंतर अविनाश आणी नंदिनीच्या बोलण्यातून कळाल मला ते” आबा केसांवरून हात फिरवत म्हणाले.
सगळ्या गोष्टी ऐकून झाल्या होत्या देशमुख पुढे होऊन आबांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या तयारीत होते.
“ चला आबा आता इतर गोष्टी आपण पोलीस स्टेशनला जाऊनच करूयात” देशमुख बोलले.

“ तुम्ही असं करू शकत नाहीत इन्स्पेक्टर, आत्ताच आबा म्हणाले ना कि त्यांनी काही केलेलं नाहीये. त्यांनी फक्त ते बर झाल्याचं लपवलं हा गुन्हा असू शकत नाही” अविनाश कातर आवाजात म्हणाला.
“ त्याचं उत्तरं आता आबाच देतील ते पण पोलीस स्टेशनमध्ये” इ. देशमुख पुढे होत कडक आवाजात म्हणाले. जणू काही देशमुख आबांना अटक करायला पुढे जात होते.
“ मी कशालाही घाबरत नाही, मी कुठेही यायला तयार आहे देशमुखसाहेब. कारण मी काहीही केलेलं नाहीये” शांत स्वरात आबा म्हणाले.
नंदिनी आणी कमलाबाई तर पुरत्या हबकल्याच होत्या. आशुतोष काहीही समजत नसल्यासारखा उभा होता.
“ एक मिनिट देशमुख ...रॉबिन खुर्चीवरून उठत म्हणाला. त्याच्या आवाजासरशी सगळेच शांत होऊन रॉबिनकडे पाहू लागले.
रॉबिन पुढे होऊन आबांना म्हणाला” त्या ओल्डोमा वनस्पतीच्या बियांचं काय झालं ज्या तुम्हाला कुटीरोवांनी भेट म्हणून दिल्या होत्या”
“ त्या माझ्याजवळ नाहीयेत आता “ आबा म्हणाले.

“ काय... नाहीत म्हणजे” जवळजवळ ओरडतच रॉबिन म्हणाला.

तसं आबांनी आपल्या बेडच्या गादिखाली एका कोपऱ्यात हात घातला आणी एक छोटीशी कंपाससारखी एक पेटी बाहेर काढली.
“कुटीरोवांनी दिलेल्या बिया मी प्रवासावरून परतत असतानाच या पेटीत ठेवल्या होत्या हे मला आठवतंय. घरात आल्यावर नीट बऱ झाल्यावर मी त्या बिया शोधण्यासाठी माझी खोली पूर्ण तपासली तेव्हा बेडखाली हि पेटी सापडली. मी पेटी उघडली पण त्यात एकही बि न्हवती” आबांनी पेटी उघडून दाखवली.
रॉबिनने पेटी तपासून पहिली आतमध्ये काहीही न्हवत. रॉबिनची पुरती निराशा झालेली होती.

“ या वनस्पतीच्या विषानेच मालतीताई यांचा मृत्यू झालाय आबा. नक्की तुम्ही बिया यामध्येच ठेवल्या होत्या.” रॉबिनने आबांना विचारलं.
“ हो नक्की आठवतंय.. म्हणजे मालतीचा मृत्यू नक्की या ओल्डोमाच्या या बियामुळेच झाला असल्याचं मला माहित न्हवत, अपघातानंतर माझं प्रवासी समान घरातच होतं. मला जेव्हा शुद्ध न्हवती तेव्हा त्या बिया कुठे होत्या माहित नाही. शुद्धीत आल्यावर मी खोलीत शोधाशोध केल्यावर मला बेडखाली पेटी सापडली, पण ती रिकामी होती ” आबा कपाळावर आठ्यांच जाळ आणत म्हणाले.

पेटी हातात घेऊन रॉबिन खुर्चीवर जाऊन बसला आणी काहीतरी विचार करू लागला. इकडे देशमुखांनी बाहेरच्या हवालदाराला हाक मारली आणी आबांना घेऊन जाण्याची तयारी करू लागले. पेटीत बिया नाहीत हे आबांना माहित नाही यावर देशमुखांचा विश्वास बसला न्हवता त्यांना वाटत होतं पोलिसी खाक्या दाखवल्यावर आबा कबुल करतील कि खून त्यांचीच केला आहे किंवा पाटलांना करायला सांगितला आहे. अविनाश आणी नंदिनी त्यांना विरोध करत होते. रॉबिन जागेवरून उठला आणी विचार करताच बाहेर व्हरांड्यात आला. आणी बाहेरूनच त्याने देशमुखांना हाक मारली. त्याचा आवाज ऐकून देशमुख कपाळाला आठी पाडतच बाहेर आले.
“ काय झालं रॉबिन आबांना आपण पोलीस स्टेशनला न्यायला हवंय, आपल्याला ते अजून काही लपवत आहेत का ते पाहायला हवं” देशमुख रॉबिनला मनवत म्हणाले.

“ त्याची काही एक गरज नाहीये देशमुख. खुनात हत्यार कोणतं वापरलं गेलंय हे समजलंय आपल्याला, पण ते सापडलं नाहीये” रॉबिन पुढे जात विचार करत म्हणाला.
“ अरे पण खूप महत्वाची माहिती त्यांनी लपवली आहे” देशमुख म्हणाले.
बोलत बोलत देशमुख आणी रॉबिन वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ आले.
“ सुरुवातीला मलासुद्धा असचं वाटलं होतं कि आबांचंच षड्यंत्र असावं सगळ्यामागे पण आत्ता मला वाटतंय आबांनी काही केलेलं नाहीये, त्यांची जर काही चूक असेलच तर ती हि आहे कि त्यांनी आजारी असल्याचं दिर्घकाळ केलेलं नाटक, बाकी काही नाही. आपलं आजचं काम झालंय इथलं, तेव्हा आपण निघुयात इथून” एवढ बोलून रॉबिन दरवाजाबाहेर पडला.
त्याच्या या पवित्र्यापुढे देशमुखांचा नाईलाज झाला आणी ते सुद्धा त्यांच्या पोलिसी ताफ्याला घेऊन वाड्याच्या बाहेर पडले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users