दुपारचे बारा वाजत आले होते. इ. देशमुख तणतणच रॉबिनच्या घराजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर ताण आणि राग दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. देसाई खून प्रकरण लवकरात लवकर सोडवावं असं त्यांना वाटत होतं. तसचं त्यांना वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश सुद्धा होते. पण त्यांच्या हाती काही लागतं न्हवता. खुनाच हत्यार पण अजून त्यांच्या हाती लागलेलं न्हवत. तपासाची पुढची दिशा निश्चित होत न्हवती त्यामुळे एका वेगळ्याच तणावाखाली ते होते. आणी अशाच अविर्भावात ते रॉबिनच्या घराच्या दरवाजाजवळ आले आणी जोरजोराने दरवाजा ठोठावू लागले. दरवाजा उघडायला काही वेळ लागला पण नंतर आतून रॉबिनने दरवाजा उघडला.
“ अरे काय रॉबिन किती वेळ लावलास दरवाजा उघडायला” देशमुख त्रासिक सुरात बोलले. रॉबिनच्या उत्तराची वाटही न पाहता समोरच्या टेबलावर आपली डोक्यावरची टोपी आपटली आणी शेजारच्या खुर्चीत स्वतःला झोकून दिलं. देशमुखांचं हे वर्तन पाहता देशमुख वैतागलेल्या अवस्थेत आहेत हे कळायला रॉबिनला गुप्त्हेरीतल्या कौशल्याची गरज न्हवती.
“ देशमुख साहेब झोपलो होतो मी त्यामुळे दरवाजा उघडायला उशीर झाला जरा “ देशमुखांच्या समोरील रिकाम्या खुर्चीत विसावत रॉबिनने टेबलावरचा लायटर घेतला आणी जवळील सिगारेट काढून शिलगावली.
“ अरे हि काय वेळ आहे झोपायची, १२ वाजत आलेत, आपण सध्या किती गुंतागुंतीच प्रकरण सोडवत आहोत त्यावर काम करण्याच सोडून तुला झोप कशी लागून शकते” मनगटावरील घड्याळाकडे पाहत आणि अजूनच त्रासिक सुरात देशमुख बोलेल.
“ काल रात्री कमलाबाईकडे जाण झालं, तिथून माघारी आलो तेव्हा विचार करता करता झोप लागली नाही, मनामध्ये काही दुवे जुळवता जुळवता झोप उशिरा आली म्हणूनच उशिरा जाग आली. पण तुम्ही आज एवढे वैतागलेल का आहात” शांतपणे सिगारेटची वलये हवेत सोडत रॉबिन म्हणाला.
“ रॉबिन एवढे दिवस झाले मालतीताई यांच्या खून प्रकरणाला आपल्या हाती अजून काहीच कसं लागत नाहीये. ना कोणी संशयित ना खुनाच हत्यार” देशमुख त्रासिक सुरात म्हणाले.
“ काही प्रकरणात धीराने काम करावं लागतं देशमुखसाहेब, हे कोणत्याही मुरलेल्या गुन्हेगारच काम नाहीये, ज्याची गुन्हेगारी पद्धत गुन्हेगारी विश्वातील लोकांशी मिळतीजुळती असेल. इथे आपली गाठ एका हुशार व्यक्तीशी आहे जिने धीर धरून बरोबर संधी साधून मालतीताई यांचा काटा काढलाय. त्यामुळेच गुन्हेगाराचा हाच शिरस्ता आपल्याला अवलंबून धीराने काम घ्यावं लागेल. सरतेशेवटी तो आपल्या हाती लागेलच हे नक्की.” रॉबिनने सिगरेटची राख झटकत सांगितलं.
“ बऱ मला सांग काही नवीन माहिती हाती लागली तुला, काल तू कमलाबाईच्या घरी गेला होतास तेव्हा” देशमुख शांत होत म्हणाले.
“ हम्म.. काहीशी नवीन माहिती हाती लागली म्हणू शकता पण ठोस काही नाही. “ रॉबिन हवेत एक झुरका सोडत म्हणाला.
“ म्हणजे नक्की काय? आणि तुला कोणावर संशय आहे का? कमलाबाई यांनी विशेष काय सांगितलं ?देशमुख एका मागोमाग एक प्रश्न विचारत गेले.
“ देशमुख तुम्हाला तुमच्या चौकशीत हे समजलं का कि मालतीताई या आबांच्या दुसऱ्या पत्नी होत्या आणी अविनाश हा आबांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता? तो लहान असताना त्याचं संगोपन नीट व्हावं म्हणून आबांनी दुसरं लग्न मालतीताईशी केलं आणी नंतर मालतीताई यांपासून त्यांना आशुतोष हा दुसरा मुलगा झाला” रॉबिन शांतपणे म्हणाला.
“ काय सांगतोस काय, आम्हाला हि माहिती न्हवती. चौकशीत कुठे असे प्रश्न विचारलेच गेल नाहीत.” देशमुख आश्चर्यच्या सुरात म्हणाले.
“ या माहितीचा आपल्याला कितपत उपयोग होईल माहित नाही पण पोलिसांनी कमलाबाईची योग्य चौकशी करण आवश्यक होतं. घरात खून घडला असेल तर अशा प्रकरणात घरातल्या नोकराला घरातल्या माणसांची आणी त्यांच्या स्वभावाची इत्यंभूत माहिती असते, म्हणूनच ती माहिती वेगळ्या पद्धतीने घेणे गरजेचे असते हे तुम्हाला माहिती असेलच” रॉबिन सिगारेटची राख झटकत म्हणाला.
“ हम्म कमलाबाईला आम्ही वाड्यातच प्रश्न विचारले होते. तेव्हा तिने घटनेसंदर्भात माहिती दिली कि ती त्या दिवशी वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीवर नंदिनिसोबत कपडे धुवत बसली होती. कळशी विहिरीत पडली म्हणून कमलाबाई वाड्याच्या आतमध्ये आल्या. तेव्हा मालतीताई जमिनीवर कोसळलेल्या दिसल्या अशी माहिती त्यांनी दिली त्याची खातरजमा पण करून घेतली, कारण इतर सगळ्यांच्या स्टेटमेंट मध्ये एकवाक्यता वाटत होती. मला वाटलं तेवढं पुरेसं आहे” देशमुख हनुवटी खाजवत बोलले.
“ तेवढ पुरेसं होतं. पण वाड्यात तुम्ही कमलाबाईला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जरी असते तरी तिला उत्तर द्यायला प्रशस्त वाटलं नसतं. म्हणूनच एकदा प्रत्यक्ष मी काल तिच्या घरी जाऊन भेट घेऊन चौकशी करणे भाग होतं. आणी त्यासाठीच मी तिच्या घरी जाऊन आलो” एवढं बोलून रॉबिनने सिगरेटचा शेवटचा झुरका घेऊन सिगरेट विझवून डोकं वर करून खुर्चीत बसला.
“ अच्छा... आम्ही सध्या बाहेर चौकशी करत आहोत कि मालतीताई याचं कोणी राजकीय शत्रू वगेरे होते का जे असे कृत्य करू शकतात.” देशमुख सांगू लागले. पण त्यांना पुढे काही बोलू न देताच रॉबिन वर डोकं केलेलं असतानाच मधे म्हणाला” काही वेळा शत्रू फक्त बाहेरचेच असत नाही ते घराच्या आतमध्ये देखील असू शकतात.”
रॉबिनच्या या वक्तव्यावर देशमुख विचारात पडले कि रॉबिन नक्की कोणाबद्दल बोलत असावा.
“ देशमुखसाहेब, मालतीताईंचा सख्खा मुलगा आशुतोष बद्दल काय माहिती काढलीत तुम्ही” रॉबिन आता खुर्चीवर ताठ बसत म्हणाला.
“आशुतोष हा परदेशात शिक्षणाला जाण्याची तयार करत होता. मालतीताईंचीच तशी इच्छा होती म्हणून मागील वर्षीच त्याने त्यासाठी तयारी करण्यासाठी शहरातल्या मुख्य भागात क्लास देखील लावला आहे. मालतीताईंचा मृत्यू झाला तेव्हा तेव्हा तो क्लासमध्येच होता. त्याची खातरजमा पण केली.” देशमुखांनी माहिती पुरवली.
“ ओह्ह अस्सं आहे तर... परदेशी शिक्षण म्हणजे पैसे पण जास्तच लागत असतील अर्थात देसाई कुटुंबियांना पैशाची चणचण तशी नाहीये पण तरीही एक गोष्ट विशेष आहे अविनाशच शिक्षण पदवीपर्यंत देखील झालेलं नाहीये पण धाकट्या मुलाला आशुतोष मात्र परदेशात जायला मुभा मिळालीय. देशमुख इथे एक प्रकारचा भेदभावाच झालेला दिसून येत नाही का तुम्हाला.” रॉबिनने प्रश्नार्थक मुद्रा करत देशमुखांना विचारलं.
“ कदाचित अविनाशला शिक्षणात रस नसेल आणी तसंही त्याची फळझाडांची नर्सरी आहे त्यामुळे धंद्यामध्ये त्याला रस असेल, आणी म्हणून त्याने शिक्षण पूर्ण केलं नसेल.” देशमुखांनी आपलं मत मांडले.
“ असं तर नाही ना कि मुद्दाम अविनाशला छोटा मोठा उद्योग काढून दिला आहे. आणी धाकट्या मुलाला आशुतोषला उच्च शिक्षण घायला लावलंय कदाचित कोणतातरी वेगळाच बेत असेल त्यामागे. कदाचित अविनाशला काहीतरी मोठं काहीतरी करायचं असेल पण मालतीताईनी त्याला ते करू दिलं नाही आणी नर्सरी काढून दिली. त्याला त्या गोष्टीचा राग असेल” रॉबिनने आपला संशय व्यक्त केला.
“ तुला नक्की काय म्हणायचं रॉबिन? “ देशमुख गंभीर होत म्हणाले.
“ दोन्ही भावांना घरात समान वागणूक मिळत होती कि नाही? दोघांमधले संबंध कसे होते? आपल्याला सगळ्या शक्यतांचा विचार करावा लागेल” रॉबिन म्हणाला.
“ तसं बघायला गेलं तर कमलाबाईवर तरी किती विश्वास ठेवायला हवा, कारण मालतीताईंना पहिल्यांदा जमिनीवर पडलेलं त्यांनीच पाहिलं होतं कदाचित कळशी न्यायला वाड्यात आल्यावर त्यांचीच कसल्या तरी हत्याराने मालतीबाईयांचा काटा काढला असेल” देशमुखांनी आपली शंका व्यक्त केली.
“कमलाबाई या सुद्धा संशयाच्या बाहेर नाहीयेत, पण तुम्ही दिलेल्या या तर्कानुसार डॉक्टर पाटील सुद्धा हि गोष्ट करू शकतात. मालतीबाई यांच्यावरचा त्यांचा राग त्यांनी बागेत जेव्हा त्यांची मी म्हातार्याच्या रुपात भेट घेतली तेव्हा व्यक्तच केला होता. वाड्याच दार उघडंच होतं, संध्याकाळी आबांची तब्बेत तपासण्याच्या बहाण्याने ते आंत आले असतील आणी वाड्यात कोणी नाही हे पाहून मालतीबाईच्या खोलीबाहेर आले. नुकत्याच अंघोळ करून आलेल्या मालतीबाई पाटलांना दिसल्या असतील. मग संधीचा फायदा घेऊन बेसावध मालतीताई यांना मागून इंजेक्शनला वेगळीच कोणतीतरी विषारी सुई लावून मागून मालतीताईना मानेला टोचली असेल आणी लपून छपून आपल्या क्लिनिक मध्ये पळून गेले असतील. डॉक्टरी पेशात असल्याने विष आणी विषसदृश पदार्थांबद्दल त्यांना नक्कीच ज्ञान असावे. आणी नंतर लोकांच्या सांगण्यावरून साळसुदपणे वाड्यात आले असतील.” रॉबिन आपला तर्क मांडला.
“ हम्म.. हे पण होऊ शकतो विषसदृश पदार्थ मिळवणे डॉक्टरांना सहज शक्य आहे” देशमुखांनी पुस्ती जोडली.
“ या तर्कात नक्की कोण बसतंय हे पाहण्याआधी आपल्याला खुनात कोणतं हत्यार वापरलं गेलंय त्या हत्यारबद्दल माहिती मिळणं आवश्यक आहे. उगाचच कोणावरही संशय घेऊन त्या बाजूने तपास करण्यापेक्षा एकदा का खुनाच हत्यार मिळालं कि ते कोण वापरू शकत याचा शोध घेऊन त्या दिशेने तपास करता येईल.” रॉबिनने विश्वासाने सांगितलं.
“ पण हत्यार मिळणार कसे, घटनास्थळी असं कोणतही हत्यार किंवा काही संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांनी वाड्यातील सगळ्यांच्या खोल्या तपासल्या तरीसुद्धा काहीही सापडलं नाही.” देशमुख हताश होत म्हणाले.
“ सगळीकडे शोधलं असं मला वाटत नाही देशमुख” रॉबिन इ. देशमुखांकडे घारीसारखी नजर रोखून म्हनला.
“ म्हणजे तुला म्हणायचं काय रॉबिन? पोलिसांनी कुठे शोधायचं राहिलंय आता” देशमुखांनी साशंकतेन विचारलं.
“ पोलिसांनी वाड्याच्या आसपास पाहिलं का? वाड्याचं कंपाऊंड जिथं आहे तिथून आतपर्यंत पर्यंत ३-४ मीटर रिकामी जागा वाड्याचा सगळ्या बाजूंनी आहे. कदाचित तिथे आसपास कुठेतरी ते हत्यार पुरून ठेवलेलं असू शकत. जमिनीवर जमीन खणलेल्या तशा प्रकारच्या खुणा असू शकतील” रॉबिन बारीक डोळे करत म्हनला.
“ ओह्ह्ह... तू म्हणतोस त्या जागा खरंतर तितक्या व्यवस्थितपणे पहिल्या गेल्या नाहीयेत. अगदीच वरवरची पाहणी झाली.” देशमुख विचार करत म्हणाले.
“ तसं असेल तर आजचं वाड्यात जाऊन मी पाहून येतो बघू हाती काही लागतंय कि नाही. कारण तिथे आसपास काहीतरी मिळेल असं मला वाटतंय” रॉबिन खुर्चीवरून उठत म्हणाला. अंगावरचे कपडे झाडत तो आरशात स्वतःला निरखू लागला.
“ ठीक आहे रॉबिन तु तुझा पद्धतीने बघ काही मिळतंय का? काही मदत लागली तर सांग” देशमुखसुद्धा खुर्चीवरून उठत म्हणाले.
“ तुम्ही एक काम कराल का?” भिंतीवरच्या आरशांत हातानेच केसांचा भांग पाडत रॉबिन देशमुखांना म्हणला.
“ जरूर .. सांग काय हवंय ते ” देशमुख म्हणाले.
“तुमचा एक खास माणूस आशुतोषच्या मागावर ठेवा. आशुतोषचा क्लास कुठे आहे, क्लास व्यतिरिक्त तो कुठे जातो, त्याचे मित्र कोण आहेत. त्याची माहिती मिळवा” रॉबिन म्हणला.
खरंतर आशुतोषच्या मागावर माणूस का ठेवायचा. रॉबिनला त्याच्यावर एवढा संशय का वाटतोय याचा उलगडा देशमुखांना होईना.
“ जरूर ..पण असं करण्यामागे काही विशेष कारण “ देशमुखांनी अखेर विचारलेच.
“ तरुण मुलांचा खरा स्वभाव हा घरातल्या माणसांपेक्षा घरातल्या बाहेरच्यांना जास्त माहित असतो. तेव्हा त्याचाबद्दलची खरी माहिती आपणाला बाहेरूनच मिळू शकते” रॉबिन वळून देशमुखांकडे पाहत म्हणाला.
तसं ते कारण देशमुखांना पटलं आणी त्यांनी मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं आणी देशमुखांना सुद्धा ड्यूटी वर जाण्याची आठवण झाली. रॉबिन लगेचच आवरून देसाई वाड्यावर जाणार होता, त्यामुळे देशमुखांनी रॉबिनची रजा घेतली आणी काही महत्वाचं कळल्यास तातडीने फोन करण्यास सांगून देशमुख रॉबिनच्या घरातून पोलीस स्टेशनला निघून गेले. देशमुख गेल्यावर तडक रॉबिनने अंघोळ वगेरे करून तयार झाला आणी आपल्या दुचाकीवर बसून देसाई वाड्याकडे जाण्यास निघाला.
देसाई वाड्यावर पोहोचल्यावर त्याने आपली दुचाकी वाड्याच्या बाहेरचं एका झाडाखाली लावली. वाड्याच दार उघडच होतं त्यामुळे रॉबिन आतमध्ये आला. वाड्यात शुकशुकाट जाणवत होता. आतमध्ये तुळशी वृन्दावनाजवळ येऊन रॉबिन सगळीकडे नजर फिरवत असतानाच त्याला जिन्याच्या बाजूला पाठमोरी नंदिनी उभी असलेली दिसली. नुकतंच विहिरीवर धुणं धुवून ती आली होती आणी बादलीतले कपडे पिळत व्हरानड्यातल्या दोरीवर कपडे सुकायला टाकत होती. तिला पाहताच रॉबिन जागीच उभा राहिला. नंदिनीला मागे रॉबिन आल्याचं कळाल नाही, ती आपल्याच कामात गर्क होती. रॉबिनला सुद्धा आपल्या उपस्थितीची कल्पना तिला कशी द्यावी कळेना. नंदिनीची पाठमोरी मूर्ती न्याहाळत रॉबिन तसाच उभा होता. नंदिनीने आपला पदर कमरेला खोचला होता त्यामुळे तिचा कमनीय देह दिसून येत होता. ओले कपडे झटकताना शरीराच्या हालचालींमुळे तिचा चेहऱ्यावर केसांच्या बटा अलगदपणे गालावर रेंगाळत होत्या. त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. रॉबिन तसं तिला मागून नुस्त पाहत बसणं प्रशस्त वाटेना त्यामुळे तो जरासा खाकरला.
त्यासरशी नंदिनीची मान झटकन मागे वळली. रॉबिनकडे पाहताच ती कावरीबावरी झाली कारण रॉबिन अचानक मागे उभे राहिलेला होता याची तिला कल्पना न्हवती. हातातली कपड्याची वळकटी तिने खाली ठेवली आणी कमरेचा पदर सोडून तिने तो डोक्यावर कसाबसा धरला आणी चेहऱ्यावरच्या बटा हाताने कानामागे खोचल्या. नंदिनीने कपळावर असलेली एक नाजुकशी टिकली तिच्या सौंदर्यात जास्तच भर टाकत होती.
“ क..कधी आलात तुम्ही..माफ करा मला समजलंच नाही तुम्ही आलेलं “ नजर खाली करत कावऱ्याबावऱ्या अवस्थेत नंदिनी बोलली. तिचा आवाज खूपच नाजूक आणी गोड होता.
“ मी आत्ताच आलो... वाड्याच दार उघड होतं म्हणून सरळ आत आलो... माफ करा माझ्या अचानक येण्याने तुम्ही दचकलात” रॉबिन सुद्धा मधाळ आवाजात बोलला.
“ नाही माझंच लक्ष न्हवत, आणी वाड्याच दार पण उघडच असत, त्यामुळे आवाज दिल्याशिवाय कोण आलंय हे कळत नाही” नजर जमिनीकडे ठेवूनच नंदिनी म्हणाली.
“ अच्छा.... काही नाही त्या दिवशी रात्री मी वाड्यात आलो होतो त्यामुळे वाडा नीट पाहता आला नाही त्यामुळे म्हटलं दिवसाउजेडी वाडा नीट पाहावा” इकडे तिकडे नजर फिरवत रॉबिन म्हणाला.
“अच्छा.. थांब मी पाणी आणते आणी चहा टाकते तुमचासाठी” लगबगीने स्वयंपाकघराकडे वळत नंदिनी म्हणाली.
“ नाही नाही.. त्याची काहीही आवश्यकता नाहीये.. मी फक्त वाडा पाहायला आलोय तुम्ही उगाच तसदी घेऊ नका. तुम्ही तुमची कामं करा माझामुळे व्यत्यय नको त्यात” पुढे जाणार्या नंदिनीला रोखत रॉबिन म्हणाला.
“ अहो व्यत्यय कसला यात, घरात आलेल्याला चहा पाणी करण या घराची पद्धतच आहे” नंदिनी म्हणाली.
“ नाही नको... अशा औपचारिकतेची गरज नाहीये आणी तसही माझं चहापाणी झालंय, त्यामुळे खरंच तसदी घेऊ नका” रॉबिन अतिशय सौम्य शब्दात म्हणाला. रॉबिनचा ठाम नकार ऐकून मग नंदिनीने जास्त आग्रह केला नाही.
“ बंर वाड्यात कोणकोण आहे आत्ता” रॉबिनने विचारलं.
“ मी आणि आशुतोष भावजी आहेत, बाकी कोणी नाही” नंदिनीने माहिती पुरवली.
“ ओके, अविनाश आणी आबा कुठे आहेत, आणी कमलाबाई आलेल्या नाहीत का आज कामाला” रॉबिनने प्रश्न केला.
“आबांना घेऊन आमचे हे नर्सरीवर गेले आहेत्त. तिथे कामं पण आहेत आणी आबांना पण सहज बदल म्हणून नेलंय. आणी आज कमलाबाई जरा उशिरा येतील” नंदिनी म्हणाली.
“आबांची तुम्ही दोघं खूप काळजी घेता खरोखरंच असा मुलगा आणी सून मिळाल्याने ते भाग्यवानच आहेत” रॉबिन स्मित करत म्हणाला.
“अहो ते तर कर्तव्यच आहे आमचं, आमच्या ह्यांचे वडील ते माझेच वडील असं मानून त्यांची काळजी आम्ही नेहमीच आनंदाने घेतो. आबांची स्मृती जाण्याआधी आबा आमच्या दोघांवरही खूप जीव लावायचे, खूप मजा मस्ती करायचे आम्हा दोघांसोबत. मला कधीही ते माझे सासरे आहेत असं वाटलं नाही. पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळायचे मला. त्यांना वाचनाची आणी भटकंतीची खूप आवड होती बऱ्याच ठिकाणी ते फिरून आले होते. वाचनाची आवड मला त्यांचामुळेच लागली. पण जसा त्यांचा अपघात झाला तसं ते सगळ्या गोष्टी विसरले. आम्हाला देखील ओळखेनासे झाले“ नंदिनीचे डोळे पाणावले आणी निराश होतं करत जमिनीकडे पाहू लागली. नंदिनीला निराश झालेलं पाहून तिला जास्त काही विचारायला नको असं रॉबिनला वाटलं.
“ ठीक आहे मी जरा वाड्यातील खोल्या पाहतो, तुमचा कामात अजून व्यत्यय आणत नाही “ असं म्हणत रॉबिनने विषय बदलला.
नंदिनी देखील काही लागल्यास ती स्वयंपाकघरात आहे असं सांगून तिकडे निघून गेली. नंदिनी निघून गेल्यावर रॉबिनने एकवार खालच्या सगळ्या खोल्यांकडे नजर फिरवली आणी त्याची नजर मालतीबाई यांचा खोलीकडे गेली. मागच्या वेळी ती खोली पहिल्याने रॉबिनला आता परत तिथे जाण्याची जास्त आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे त्याचा शेजारील आबांच्या खोलीकडे त्याने मोर्चा वळवला. पुढे जात दरवाजा उघडून रॉबिनने आबांच्या खोलीत प्रवेश केला. आबांचा बेड व्यवस्थित लावलेला होता. आजूबाजूला जास्त समान न्हवत. समोरच्या भिंतीवर एकच खिडकी होती ती रॉबिनने जवळ जाऊन उघडली. खिडकीला गज न्हवतेच. बाहेर चांगलंच कडक ऊन पडलेलं होतं.
रॉबिनने खिडकीच्या बाहेरच्या बाजूला जमिनीवर नजर फिरवली. आसपास खुरटी गवत आणी सदाफुलीची झाडं आलेली होती. जमिनीवर जास्त माती दिसत न्हवती, उलट जमीन जास्तच टणक दिसत होती. जरावेळ आसपास नजर फिरवून रॉबिनने खिडकी लावून टाकली. आबांच्या खाटेच्या बाजूला एक कपाट होतं ते जवळ जाऊन रॉबिनने उघडलं, आतमध्ये आबांचे ३-४ सदरे आणी पायजमे काही चादरी सोडल्यास इतर काहीही गोष्टी न्हवत्या म्हणून रॉबिनने कपाट लावून टाकलं. बेडच्या खाली पाहावं म्हणून रॉबिन जमीवर ओणवा झाला आणी बेडच्या खाली पाहू लागला बेडच्या आतमध्ये त्याला आबांचा बुटाचा एक राखीव जोड होता तो दिसला. तो बूट त्याने बाहेर काढला, बूट तसा जुनाट वाटत होता आणी पुढच्या भागात चौड्याकडे तो जरासा घासला गेला होता नेहमीच्या वापरात असावा अशी चिन्हं त्यावर होती. बूट परत तसाच ठेवून रॉबिन मागे असलेल्या टेबलाकडे वळला.
खिडकीच्या बाजूला असलेल्या टेबलावर आबांच्या गोळ्या आणी औषधं होती. मागच्या वेळी आलो तेव्हा इथे पुस्तकं ठेवलेली होती असं त्याला आठवलं. त्या टेबलाच्या खाली एक बंद कप्पा होता, रॉबिनने तो कप्पा उघडला तिथे आतमध्ये १०-१२ पुस्तकांचा ढीग रचलेला होता. आबांना पुस्तकं वाचायची आवड होती त्यामुळे एवढी पुस्तकं त्यांचा खोलीत असणं साहजिक होतं. पुस्तके बाहेर काढून त्यांचा शीर्षकावरून तो नजर फिरवू लागला. काही कथा कादंबऱ्या होत्या तर काही पुस्तकं हि प्रवासवर्णनांवर आधारित होती. डोंगर दऱ्यामधील भटकंती आणी जंगल प्रवासातील सुरस अनुभव यावर आधारलेली ती पुस्तकं होती. त्यातली काही पुस्तकं रॉबिनने आपल्या हातात घेतली आणि ती घेऊन जाण्यचा विचार त्याने केला. पुस्तके कशी न्यावी असा विचार करत असतानाच त्याला टेबलाजवळ काही कापडी पिशव्या पडलेल्या दिसल्या. त्यातल्याच एका रिकाम्या पिशवीत त्याने ती पुस्तके टाकली आणी तो खोलीबाहेर आला. नंदिनी स्वयंपाक घरातच होती. तिच्या नजरेत न येता रॉबिन हळूच वाड्याच्या दरवाजाजवळ आला आणी ती पुस्तकांची पिशवी गाडीच्या हँडलला लावली. ही पुस्तके त्याला गुपचूप न्यायची होती. पिशवी अडकवून तो परत वाड्याच्या आतमध्ये आला.
पण वाड्याच्या आतमध्ये न जाता त्याने आता वाड्याचा आतून डाव्या बाजूने कंपाउंडजवळून चालायला सुरुवात केली. डावीकडे कंपाऊंडची भिंत आणी उजवीकडे वाड्याचा खोल्यांचा भिंती यांच्या मधल्या भागातून तो हळुवार चालत होता. जमीनीच व्यवस्थित निरीक्षण करत कुठे काही सुगावा लागतोय का हे पाहतच तो चालला होता. पुढचा स्वयंपाकघरच्या बाहेरचा भाग ओलांडून तो वाड्याच्या डाव्या भागाकडे आला. हा भाग आबांच्या आणी मालतीताई यांचा खोलीबाहेरचा होता. चालत चालत तो मगाशी आबांच्या खोलीची खिडकी उघडी होती त्या खिडकी खाली आला. आणी तिथल्या अजुबाजुच्या परिसराच निरीक्षण करून लागला.
खिडकी रॉबिनच्या हाताला लागेल एवढ्याच उंचीवर होती. खिडकीच्या खाली भिंतीवर जरा व्यवस्थित पाहिल्यावर दिसलं कि तिथला भिंतीवरचा रंग काहीतरी घासल्यामुळे उडालेला होता. खिडकीच्या खाली जमिनीवर खाली उगवलेल्या खुरट्या गवतांच तो बारकाईने निरीक्षण करू लागला. तिथली जमीन हि टणक स्वरुपाची होती त्यामुळे तिथे कसल्याही खणल्याचा किंवा इतर खुणा न्हव्त्या. पण जमिनीपासून एका फुटावर भिंतीवर मातीचे डाग पडलेले होते ते पाहून रॉबिन थोडासा विचारात पडला, नंतर आजूबाजूला ३-४ सदाफुलीच्या झाडांच्या गर्दीमध्ये त्याने हात टाकून त्याने तिथली जमीन पण व्यवस्थित तपासली न जाणो तिथे काहीतरी असेल म्हणून पण काहीच संशयास्पद आढळलं नाही. ओठावर ओठ दाबून तो काहीतरी विचार करत तो पुढे चालू लागला. आता रॉबिन मालतीताईच्या खोलीबाहेरील खिडकीजवळ आला तिथे आसपास जास्त झाडी न्हवती नाही म्हणायला वाळलेली खुरटी गवत होती. हि खिडकी सुद्धा हाताला येईल एवढ्या उंचीवर होती. पण खिडकी खालचा भिंतीवरचा रंग मात्र जसा आहे तसाच होता. तिथे कसल्याही खाणाखुणा न्हव्त्या. खालची जमीन सुद्धा टणक होती आणी कसल्याही खुणा न्हवत्या. रॉबिनने खिशातून आपली डायरी बाहेर काढली आणी सगळ्या गोष्टींच्या पटापट नोंदी घेऊ लागला. तिथून पुढे चालत रॉबिन आता वाड्याच्या मागील बाजूस आला.
वाड्याच्या मागील भागात २ मोठी प्राजक्ताची झाडे होती आणी एका कोपऱ्यात बाजूला रहाट असलेली विहीर. वाड्याच्या मागून विहिरीपासून जवळच वाड्याच्या आतल्या भागात जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता होता त्याचं मार्गाने कमलाबाई त्या दिवशी विहिरीत रहाटाला लावलेली पडल्यावर कळशी दुसरी कळशी आणायला आत गेली होती. प्राजक्ताच्या झाडाखाली प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. तिथे जाऊन रॉबिनने पायानेच जमीन चापचून पहिली. आजूबाजूला झाडाचा पालापाचोळा सुद्धा बराच पडलेला होत्या त्याजवळ जाऊन पाने बाजूला करत त्याने तिथला भाग न्याहाळला. जमीन थोडीशी नरम आणी ओलसर होती. कदाचित वाड्यातील मंडळी पाण्याने इथे प्राजक्ताच्या झाडाच्या आसपास सडा मारत असावेत. मग तिथून पुढे समोरच्या विहिरीजवळ आला. विहिरीत त्याने डोकावून पाहिलं तर विहिरीला चांगलंच पाणी होतं आणी विहिरीचं पाणी स्वच्छ दिसतं होतं इतकं कि विहिरीचा तळसुद्धा स्पष्ट दिसतं होता. रॉबिनने विहिरीत डोकावून पहिले आणी जरा डोळे बारीक करून निरीक्षण केल्यावर तळाशी एक पितळेची कळशी दिसली. कमलाबाई आणी नंदिनी कपडे धुत असताना ती कळशी पडलेली हे कमलाबाईने सांगितल्याच रॉबिनला आठवलं. मालतीबाई यांचा मृत्यू प्रकरणानंतर ती कळशी काढायच कोणाच्या लक्षात आलं नसेल. विहीर पाहून झाल्यानंतर रॉबिन आता वाड्याच्या उजवीकडच्या भागात आला.
बाजूला अडगळीच सामन ठेवायच्या ज्या खोल्या होत्या त्यांच्या बंद खिडक्या होत्या. पुढे आल्यावर गेस्ट रूमची बाहेरची खिडकी होती. या भागात बरीच छोटी छोटी झुडुपे होती. रॉबिन तिथल्या भिंतीच्या जवळची जमीन चापचू लागला. तेवढ्यात .. गेस्ट रुमच्या खिडकीखालील जमीन न्याहाळताना त्याला एक छोट्या गवताच्या झुडुपात अडकलेलं सिगारेटच थोटूक दिसलं. रॉबिनने ते थोटूक हातात घेतलं आणी नाकाने जळालेल्या भागाचा वास घेतला. जळलेल्या त्या थोटकाच्या वासावरून एक गोष्ट त्याला समजली कि हि सिगारेट १-२ दिवस आधी वापरली आहे, कारण आतील तंबाखुचा दर्प तितका कडक न्हवता आणी थोटूक सुद्धा जरासं सादाळलेलं होतं. कदाचित गेस्ट रूममध्ये कोणीतरी आलेलं असावं ज्याने सिगारेट पिऊन थोटूक बाहेर फेकलं असेल असं वाटून त्याने त्याने थोटूक बाजूला फेकून दिलं. तिथून पुढची आसपासची जागा व्यवस्थित पाहत रॉबिन वाड्याच्या पुढच्या भागाकडे आला.
त्याने संपूर्ण वाड्याला प्रदक्षिणा मारली होती या उद्देशाने कि वाड्याच्या आसपास काहीतरी पुरावा आढळेल कुठेतरी काहीतरी लपवलं असेल पण तसं काहीच आढळलं नाही. वाड्याच्या मुख्य दाराजवळ येऊन त्याने तिथली जमीन सुद्धा नीट पहिली पण संशयास्पद असं काहीच आढळलं नाही. काहीच हाताशी आला न्हवत त्यामुळे रॉबिन तिथेच विचारात उभा होता. नंतर त्याचा लक्षात आलं कि नंदिनीने मगाशी सांगितलं होतं कि आशुतोष वाड्यातच आहे आणी आता वाड्यात आलोच आहोत तर त्याचीपण भेट घ्यावी असं त्याला वाटलं. रॉबिन खालच्या जिन्यावरून वरच्या मजल्यावर आला जिथे आशुतोषची खोली होती.
जिन्याचा विरुद्ध बाजूला अविनाशच्या नर्सरीच्या सामान ठेवण्याचा आणी अडगळीच्या खोल्या होत्या ज्या त्याने आधीच पाहिलेल्या होत्या. जिन्याचा पुढे अविनाश आणी नंदिनीची झोपायची खोली होती. तिथे एक धावता कटाक्ष टाकून मग पुढे असलेल्या आशुतोषच्या खोलीकडे जावं असा विचार करत त्याने अविनाश आणी नंदिनीच्या झोपायच्या खोलीची कडी उघडून आत प्रवेश केला. या दाम्पत्याची खोली छान सजवल्यासारखी दिसत होती. भिंतीवर विविध प्रकारची निसर्गचित्रांच्या पेंटीग्स, टेबलावर छानसा टेबलक्लॉथ आणी त्यावर फ्लावरपॉट. मध्यभागी मोठा बेड आणी त्याचा बाजूला एक मोठं कपाट. रॉबिनने कपाट आणी खोलीचे कोपरे व्यवस्थित चेक केले. काही विशेष सापडलं नाही, सगळं काही नॉर्मल दिसतं होतं, त्यामुळे रॉबिन त्या खोलीतून बाहेर पडला आणी दरवाजाला कडी लावून पुढे आला. अडगळीच समान ठेवलेली खोली ओलांडून तो आशुतोषच्या खोलीजवळ आला. दरवाजापुढे उभं राहून थोडं थांबून त्याने दारावर टकटक केली.
“वहिनी मला भूक नाहीये तुम्ही जेवून घ्या” आतून आशुतोषचा आवाज आला. नंदिनी जेवायला बोलवत असेल असं वाटून त्याने तसा आतून आवाज दिला होता म्हणून थोडंसं थांबून रॉबिन बोलला
“आशुतोष मी रॉबिन, दरवाजा उघडशील का तुझाशी थोडं बोलायचं होतं”
रॉबिनने आवाज दिल्यावर आतून कसलाही प्रतिसाद दिला नाही. थोड्या वेळाने रॉबिनने परत हाक मारली.
“ आशुतोष दरवाजा उघडशील का?”
काही क्षण शांततेत गेले आणी थोड्या वेळाने दरवाजा अर्धवट उघडला गेला. आतून चष्मा घातलेला आशुतोष आणी कपाळावर आठ्यांच जाळ असलेलं त्याचं डोकं दिसलं.
“ काय हवंय तुम्हाला” आशुतोषने आतूनच तसाच अर्धवट दरवाजा उघडा ठेवून विचारलं.
“ मला आत येऊ देशील का तुझा आईच्या खुनासंदर्भातच तपास करायला मी आलोय तेव्हा दरवाजा उघड आणी मला आत येऊ देत” रॉबिन जरा कडक आवाजात म्हणाला. रॉबिनचा तसा कडक स्वर ऐकून आशुतोष थोडासा टरकला आणी त्याने दरवाजा उघडून रॉबिनला आतमध्ये घेतलं.
आत आल्यासरशी रॉबिनची नजर घारीसारखी सगळ्या रूमभर फिरू लागली. आशुतोषच्या खोली सामान बरेच होते आणी खोलीसुद्धा अजगळासारखी अस्तव्यस्त होती. कपड्याचे जोड जमिनीवर पडलेले. कॉलेजची सॅक अर्धवट उघडी पडलेली, भिंतीवर कोणत्यातरी म्युसिकल बँड चे पोस्टर, एका कोपऱ्यात कागदांची रद्दी आणी त्यांना बांधायचा सुतळ्या, जवळच अभ्यासाचे प्रश्नसंचाचे गठ्ठे पडलेले होते. चहूकडे पाहत हाताची घडी मागे बांधून रॉबिन पाहत होता.
“ अरेरे काय रे तुझ्या खोलीची अवस्था, कमलाबाई तुझी खोली झाडत नाही कि काय? आजूबाजूला पाहत रॉबिन समोरच्या खिडकीजवळ आला.
“ नाही, मी माझ्या रुममध्ये कोणालाच येऊ देत नाही” आशुतोष मान खाली घालून खालच्या सुरात म्हनाला.
“ ओह्ह... असं काय दडवुन ठेवलयस तू इथे कि कोणाला आतमध्ये येऊ देत नाहीस” रॉबिन इकडे तिकडे पाहत बोलला.
“ त..तसं काही नाही..मला एकट राहायला आवडत. फक्त कधी मधी मी दादा आणी वहिनिनसोबत गप्पा मारत असतो ते पण खाली जाऊन” आशुतोष शांत स्वरात म्हनला.
“ दादा आणी वहिनींसोबत जास्त जमत वाटत तुझं.. असो सध्या काय करत असतोस तु, काय शिकतोस? रॉबिनने विचारलं.
“ मी सध्या परदेशात शिकायला जाण्याची तयारी करतोय” आशुतोषने सावकाशपणे उत्तरं दिलं.
“ हम्म...काय वाटत तुला आशुतोष.. तुझा आईची अशी हत्या कोणी केली असेल” मुद्दाम त्याला राग येईल अशा भाषेत म्हणाला.
“ म..मला नाही माहित” खाली मान घालून बाजूच्या खुर्चीवर बसत आशुतोष म्हणाला.
आशुतोषच्या खोलीला एकच खिडकी होती. गज नसलेली ती खिडकी रॉबिनने उघड्ली. आणी तिथेच उभा राहिला.
“ अच्छा.. तुझा दादा सोबत कशी वागायची तुझी आई. कारण अविनाश तुझा सावत्र भाऊ आहे ना” खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून अगदीच स्पष्ट बोलत आणी नजरेच्या कोपऱ्यातून आशुतोषचे हावभाव पारखत रॉबिन म्हणाला.
या वाक्यावर आशुतोषने जरा चळवळ केली. काहीही न बोलता हाताची बोट एकमेकांवर घासत तो जमिनीकडे पाहू लागला.
“ त्रास द्यायची का तुझी आई त्याला” रॉबिन अजूनच स्पष्ट बोलला.
“ माझी आई खूप कडक स्वभावाची होती. सगळ्यांशीच ती कडकपणे वागायची.” आशुतोषने सांगितलं.
“ तुझाशी पण असंच कडकपणे वागायची का तुझी आई” रॉबिन थोडंसं पुढे झुकत म्हणाला.
“ नाही तितकं नाही “ आशुतोष चाचरत म्हणाला आणी त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली.
यापुढे रॉबिनने आशुतोषला काही प्रश्न विचारले नाही. खोलीमधल्या कपाटाजवळ जात रॉबिनने कपाटाचा दरवाजा उघडला. आतमध्ये कपडे खोलीमधल्या कपड्यासारखेच असत्याव्यस्त पडलेले होते. २-३ कप्पे होते आणी काही बॉक्सेस होते, ज्यात औषधं आणी बँडेज होतं. कपाटाच्या तळातल्या कप्प्यात रॉबिनला एक दोरखंड दिसला. त्याला मधेच गाठीगाठी बांधलेल्या होत्या. रॉबिनने काहीही न बोलता उभा राहुनच तो दोरखंड न्याहाळला. दोरखंड थोडासा जाड असून लांब पण होता. आतील कपडे इकडे तिकडे पाहण्याचा बहाण्याने रॉबिनने तो दोरखंड नीट न्याहाळला पण आशुतोषला याबद्दल काही विचारलं नाही. आशुतोष रॉबिनच्या हालचाली बघत तसाच खुर्चीवर कपाळावर आठ्या पाडून बसला होता. रॉबिनने आपल्या डायरीत काही नोंदी घेतल्या आणी कपाटाच दार लावून खोलीच्या खिडकीजवळ आला.
खिडकीच्या बाहेर खाली पाहू लागला. वरून खाली पहिल या खिडकीपासून खालची जमीन बर्यापैकी उंचावर होती. खिडकीच्या चौकटीला पाहत रॉबिनने थोडंस बाहेरच्या बाजूला झुकत बाहेरच्या भिंतींवर नजर टाकली. खिडकीच्या बाहेरच्या बाजूला भिंतीच्या एका भागावर काळसर डाग पडलेले त्याला दिसले.
रॉबिनने आपलं डोकं अजून थोडसं बाहेर काढलं आणी ते डाग बघण्याचा प्रयत्न करू लागला अर्थात हे आशुतोषच्या लक्षात न येता. कशाचे काळसर डाग असावेत ते, असं वाटून रॉबिनने पुढे झुकत जरा बारकाईने पाहिल्यावर अचानक रॉबिनची ट्यूब पेटली.
“ओहो.. असं आहे तर... ते काळसर डाग कशाचे असावेत याचा अंदाज रॉबिनला आला होता.
क्रमशः
छान चालली आहे गोष्ट
छान चालली आहे गोष्ट
छान सुरू आहे. पुभाप्र.
छान सुरू आहे. पुभाप्र.
छान सुरू आहे. पुभाप्र.
छान सुरू आहे. कळशी उगीच पडली नसणार....
वाचायला आवडते आहे ही कथा.
वाचायला आवडते आहे ही कथा.
रोज एकच भाग येणार का ?
रोज एकच भाग येणार का ?
छान चालु आहे कथा.
छान चालू आहे..
छान चालू आहे..