निवळशंख....
Life is simple, just add water हे वाक्य वाचलं आणि आत काहीतरी हललं.
गेल्या वर्षभरात "उदंड पाहिले पाणी" हा योग आला.आधी नर्मदामाई, मग गंगामाता,त्रिवेणी संगमावर गंगा, यमुना, सरस्वती आणि मधल्या काळात चमचमता अरबी समुद्र..आणि परत आता नर्मदामैय्या!
सगळ्यांच्या अविरल प्रवाहामुळे डोळे आणि मन सुखावलं, तृप्त झालं खरं तरी परत दर्शनाची ओढ ठेवून!
पुण्यात आता 'तसं' पाणी दिसत नसल्यानं, ह्या उदंड पाण्यानं मनात अगदी काठोकाठ भरुन गेलं.. माहेश्वरच्या घाटावर बसून जी काही शांतता मनाला लाभली आहे,ती कधी रात्री जाग आली तरी अनुभवता येतेय. एकीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं वैराग्यपूर्ण ऐश्वर्य आणि दुसरीकडे नर्मदामातेचं समृद्ध अस्तित्व..विशेष काहीतरी होतं त्या वातावरणात..
ह्याच माहेश्वरमध्ये काही परिक्रमावासी दिसले..पाठीवर सॅक, एक वळकटी, हातात कडीचा डबा घेऊन चालणारे,जगाशी संबंध नसलेले..छोट्या पडव्यांमध्ये मुक्काम केलेले.पांढऱ्या वस्त्रांतले..
तसेच ते मांडवगडावरही दिसले..
राणी रुपमतीची नर्मदेला बघायची ओढ,त्यासाठी बाजबहादूरनी नर्मदा नजरेला पडेल असा महाल बांधणं आणि मार्कन्डेय ऋषींसाठी तिनं कुंडात प्रकट होणं अशी आख्यायिका आहे आणि आपल्या दर्शनाशिवाय घासही न खाणाऱ्या रुपमतीसाठी नर्मदेचं रेवा कुंडात प्रकट होणं असंही म्हणतात..सगळंच विलक्षण..ह्याच रेवाकुंडात स्नान करणारे परिक्रमावासी..ते स्नान परिक्रमा पूर्ण होण्यासाठी अनिवार्य असणं हे सगळं वेगळं आणि विशेष!मग
पुण्यात परत आल्यावर झपाटल्यासारखं नर्मदा परिक्रमेवर वाचलं, बघितलं,ऐकलं..हिंदी, मराठी!नकाशे बघितले,परिक्रमा मार्गाचे, नर्मदा खंडाचे,
कुण्या एकाची भ्रमणगाथा , नर्मदे हर, प्रतिभाताई चितळे ,प्रशांत कुलकर्णी अशा अनेकांच्या दृक्श्राव्य फिती मला एक वेगळं विश्व देऊन गेले.क्षितिजाजवळ काही अज्ञात खुणावत असताना माणसं ही शारीरिक आणि मानसिक कस लागणारी परिक्रमा करत असतात, हे कळल्यावर त्या मातेच्या सगळ्या रुपांबद्दल फार आतून काही हृद्य वाटायला लागलं.. नुकतंच तिचं दर्शन घेऊन आल्यामुळे ती परत परत मनासमोर यायला लागली,ती पवित्र सलिला... ओंकारेश्वरची मैय्या वेगळी आणि माहेश्वरची वेगळी..माहेश्वरची मागच्या वेळपेक्षा ह्यावेळी जास्त स्वच्छ, नितळ जाणवली, न भीती वाटता पायऱ्यांवर उतरता आलं,तो स्पर्श अगदी कायम जपून ठेवावा इतका सुंदर....नितळ..सुखद गारवा..शांत राहून पलीकडच्या तीरापर्यंत बघत राहावं असं वाटलं, Sometimes you have to be just silent because no words can explain whats going in your heart and mind..ह्याचा प्रत्यक्ष प्रत्यय!
किंचित ढगांआडचा सूर्य आणि नर्मदामाईवर पडलेले किरण, हे ऐश्वर्य बघायला दोन डोळे अपुरे पडत होते.मन मात्र शांत स्थिर होत होतं.मुळात त्या पाण्यात जी पारदर्शकता होती, स्वच्छ नितळता होती ती अलौकिक आणि असामान्य होती........
काही वर्षांपूर्वी जवळच्या नात्यात एका खेडेगावी गेले होते, घरची कर्ती एक बाई होती, अतीव प्रेमळ, कर्तृत्ववान , कामाला वाघ , अगत्यशील, वयाची ऐंशी कधीच उलटून गेली होती तरी स्वभाव मोकळा आणि विस्तीर्ण.. त्यांच्या संसारातल्या कडू गोड आठवणींचं आणि अनुभवाचं भांडार माझ्यापुढे खुलं करत त्या माझ्याशेजारी माजघरात पहुडल्या होत्या ..त्यात त्यांची एक जखम भळभळली,घरात एक व्यसनी व्यक्ती..सगळं असून बाई कष्टी होत होत्या..माझं मनही झरायला लागलं.एका जवळच्या व्यक्तीचं सोन्यासारख्या आयुष्य मातीमोल झाल्याची माझी जखम आतल्या आत उकलली.त्यांना हे न सांगता ,परतीच्या वाटेवर मी माझी मैत्रीण आणि तिचा नवरा जे व्यसनमुक्तीसाठी काम आणि मदत करतात त्यांना फोन केला, पुढच्या काहीच दिवसांत त्या व्यक्तीची मुक्तांगणमध्ये अडमिशन झाली.पुण्यातलं कोणी संदर्भ म्हणून माझं नाव घालण्यात आलं आणि अचानक माझ्या डोक्यावर मणाचं ओझं आलं, ह्यातून चांगलं होईल हा विश्वास असतानाच, घरुन विरोध नाही पण काळजीपोटी,का तू अशा फंदात पडतेस असा सूक्ष्म सूर ऐकू आला, चांगलं झालं तर कोणी काही बोलणार नाही पण काही वेगळं झालं तर मी अपराधाची धनी होऊ शकते असं आस्थेनं सांगत होते.पण माझ्या मनात माझा हेतू चांगला आहे हे पक्कं माहिती होतं. त्या कागदपत्रांवर सह्या केल्या..त्यांची बुजलेली बायको, जरा साशंक पण धीर करुन आलेली आणि त्यांची ढासळलेली तब्बेत सगळं मला हलवून गेलं, खडबडून जागं करुन गेलं.. हे सगळं मनात ठेवून घरी परतले,खरंतर मी त्यांना पहिल्यांदाच पाह्यलं होतं. शारीरिक आणि मानसिक परिस्थिती बिकट दिसत होती.आपण उगाच ह्या फंदात पडलो की काय असं वाटलं क्षणभर पण त्यांच्या बायकोच्या चेहऱ्यावर एक निर्धार दिसला, खराखुरा. त्यामुळे चांगलं घडेल असं वाटलं नक्की..
तिथे पांढरे कपडे घालायचे असतात आणि त्यांनी आणले नव्हते म्हणून विकत घेतले आणि दुसऱ्या दिवशी गावाच्या विरुद्ध टोकाला असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात गेले.त्यांनी मला ओळखलं, डोळ्यात एक कृतज्ञ भाव आले, मला अस्वस्थ झालं, नेहमी होतं कोणी आभार मानायला लागलं की अगदी कानकोंडं होतं तसं.. नंतर पुढच्या आठवड्यात कुठलासा सण आला म्हणून घरुन डबा घेऊन गेले.ही माझी आणि त्यांची उणीपुरी तिसरी भेट.ते खूप भरभरुन बोलत होते , व्यसनाबद्दल, कुटुंबाबद्दल.. आठ दहा दिवसांत फरक दिसत होता.त्यानंतर मात्र एकदम त्यांच्या डिस्चार्जच्या वेळी गेले.. त्यांच्यात प्रचंड फरक होता..त्यांचा भाऊ त्यांना घ्यायला आला होता त्याचा विश्वास बसत नव्हता, त्यांना बघून इतपत प्रगती होती..त्यांच्याशी बोलून निघाले, त्यांना सांगितलं तुम्ही छान रहा आता, मुलं आणि बायकोला सांभाळा..त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, मला भरुन आलं, चटकन बाहेर आले आणि स्कूटरवरून ऑफिसला निघाले.. मन पिसासारखं हलकं झालं होतं, आतून इतकं छान वाटत होतं.अगदी आनंदाचे बुडबुडे येताहेत असं वाटत राहिलं.ते माझ्या भरपूर दूरच्या नात्यातले,तरीही आत्तापर्यंत कधीही न पाहिलेले असे ते!खूप मनापासून प्रयत्न करायची इच्छा असलेली त्यांची बायको,
व्यसनमुक्तीची प्रक्रिया हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी.अत्यंत निरपेक्ष भावनेनं काम करणारी प्रेरित माणसं आणि संस्था ..सगळं वेगळं. सगळं कुठंतरी आता भिडलं होतं..
आपण आपल्या माणसांसाठी नेहमी करतो, जीव तोडून करतो.बहुतेकदा निरपेक्ष,पण कधी तरीही सूक्ष्म अपेक्षा असते, कधी भरपूर असते पण दाखवता येत नाही.किमानपक्षी श्रेयाचे धनी व्हायला नक्कीच आवडतं. मनुष्यस्वभाव आहे तो..
पण अगदी परक्या माणसासाठी तसा काही जवळचा नातेसंबंध पुढे मागे नसताना,कोणताच अपेक्षा भाव न ठेवता करणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा होता. त्यांना काहीतरी मदत केल्याचा आणि त्यांच्यात पडलेला प्रचंड फरक हे बघताना त्यांच्या घरी किती खुशी येणारे ह्या विचारानी मला निखळ आनंद मला अनुभवता आला.मलाच मी ऑफिसात कशी पोचले हे अजिबात आठवत नाही, मी फार आनंदात होते..एक अगदी हलकंफुल मन माझ्याबरोबर होतं, स्वच्छ नितळ भावना मनात खळाळत राहिली..आतून अगदी छान वाटत राहिलं..किती कमी वेळा आपण अशा सच्च्या आनंद भावनांना सामोरे जातो हे जाणवलं.कधी एखादा चार पाय आणि एक शेपूट असलेला जीव जडवून जातो.त्या काळात आपण निखालस,निरपेक्ष असतो.त्या भावना निर्भेळ असतात तसं वाटलं. डॉक्टर,समुपदेशक,शारीर, मानसिक वेदना कमी करणाऱ्यांना,शिक्षकांना , कोणासाठी तरी सुधारणा, प्रगती करणाऱ्यांना वारंवार येत असेल पण हा अनुभव माझ्यासारख्या चारचौघांसारखं आयुष्य घालवणाऱ्या व्यक्तीला फार वेगळी अनुभूती देऊन गेला हे निश्चित..चांगलं माणूस म्हणून जगण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाही आपण नेहमीच पारदर्शक असतो असं नाही,कधीतरी अगदी अपारदर्शक,कधी दोन्ही थोडे थोडे, थोडे आपल्याला परिचित आणि थोडे अपरिचित! मिळणारे सगळे आनंद अगदी निर्मल असतील असंही नाही..मला त्यांना मदत करताना मिळालेला अनुभव हा खूप सुंदर आणि निर्मल होता हे निर्विवाद..
काही दिवस त्या आनंदाच्या क्षणाची आठवण येत राहिली आतून अगदी खुश वाटत राहिलं, नंतर मात्र फार त्या गोष्टीत गुंतले नाही..
माहेश्वरहून आल्यानंतरही ती सामवेदा स्वरुपा पुनः पुन्हा आठवत राहिली.. जिसकी कलकल में संगीत हैं। असं वर्णन असणारी ती, तिच्याकाठी आतून शांतता,एक सुखद भावना मिळून येत होती.
आपण जे मनातून सांगत होतो ते सगळं समजून घेत होती. तिचं ते निवळशंख पाणी.. शुद्ध.. काठावर चालणाऱ्या सगळ्या खेळाकडे साक्षी भावानं बघणारी... pellucid, स्वच्छ, नितळ.....
स्वच्छ नितळ भावना, प्रामाणिक अनुभूती खूप क्वचित येते असं वाटायला लागलं की त्या स्वत्वाच्या आणि सत्वाच्या शोधात माणसं तिचा किनारा गाठत असावी का?होताहोईतो स्वच्छ नितळ जगता यावं म्हणून धडपडत असावीत का?
नात्यांच्या, अपेक्षांच्या दबावाखाली,समाजाला दाखवायच्या नादात,सिद्ध करण्याच्या जीवघेण्या धडपडीत ते विमळ असं आपलेपण, आपलं सच्चेपण आपण कुठंतरी सोडून आलोय हे कळत असतं पण वळत नाही आणि मग कुठल्यातरी वळणावर अवचित नर्मदामैय्या भेटते, स्वच्छ, पारदर्शक, नितळ असण्याचं मूल्य इतकं सहज समोर आणते..Just being fully alive and aware.. "पानी सा निर्मल हो मेरा मन" जमायला हवंय जास्तीत जास्त वेळेला!किती सहज उतरवलं मनात तिनं!
आज इतक्या वर्षानी नर्मदामाईच्या आठवणीबरोबर ती आठवण सहज वर आली इतकंच.. ते क्षण, त्या आठवणी, तिच्या पाण्याइतक्याच खऱ्या, निर्मळ आणि निवळशंख..
@ज्येष्ठागौरी
निवळशंख
Submitted by ज्येष्ठागौरी on 10 April, 2024 - 03:05
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप सुंदर लिहिलंय.
खूप सुंदर लिहिलंय.
नात्यांच्या, अपेक्षांच्या दबावाखाली,समाजाला दाखवायच्या नादात,सिद्ध करण्याच्या जीवघेण्या धडपडीत ते विमळ असं आपलेपण, आपलं सच्चेपण आपण कुठंतरी सोडून आलोय हे कळत असतं पण वळत नाही >> खरंय.
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी.
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी.
निवळशंख.... अगदी तुमच्या
निवळशंख.... अगदी तुमच्या लिखाणासारखे. तुमचे लेख नेहमी एका वेगळ्या जगात नेऊन सोडतात.
निवळशंख.... अगदी तुमच्या
निवळशंख.... अगदी तुमच्या लिखाणासारखे. तुमचे लेख नेहमी एका वेगळ्या जगात नेऊन सोडतात.>>>> +१
SharmilaR , हरचंद पालव, maze
SharmilaR , हरचंद पालव, maze man आणि मंजूताई खूप खूप धन्यवाद!
निवळशंख.... अगदी तुमच्या
निवळशंख.... अगदी तुमच्या लिखाणासारखे. तुमचे लेख नेहमी एका वेगळ्या जगात नेऊन सोडतात.>>> +१
अतिशय सुंदर लिहिलंय, खूप
अतिशय सुंदर लिहिलंय, खूप आवडलं!
तुमच्या हाताला यश आहे
तुमच्या हाताला यश आहे ज्येष्ठागौरी.
अनया, सामो anjalikool
अनया, सामो anjalikool मनःपूर्वक धन्यवाद!
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी.
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी. >>>>+९९९
खूप सुंदर लिहिलंय, असाच कुणा
खूप सुंदर लिहिलंय, असाच कुणा दूरच्या पण ओळखीच्या व्यक्तीच्या व्यसनाचा प्रवास पाहताना होणारी तगमग,त्याच्या व्यसन मुक्तीसाठी केलेली धडपड, त्यातून पोळले गेलेले प्रसंग, पण शेवट गोड झाल्यावर च समाधान सगळं सगळं लेख वाचताना पुन्हा आठवलं. मला लिहिता नाही येत. पण माझ्या अगदी मनातलं तुम्ही लिहिलंत अस वाटलं. खूप छान
तुमच्या सारखीच नर्मदेबद्दल आतून वाटणारी ओढ, पानी सा निर्मल हो हे आवडत गाणं, खूप समान धागे वाटले मला तुमच्या माझ्यात, म्हणून जास्त आवडल लिखाण
फारच सुंदर, मनभावन लेख
फारच सुंदर, मनभावन लेख
आपले लिखाण आवडतेच पण त्याहून आपल्या लेखांची शीर्षके आवडतात. अप्रतिम.
निवळशंख.... अगदी तुमच्या लिखाणासारखे. तुमचे लेख नेहमी एका वेगळ्या जगात नेऊन सोडतात.>>>> +१
नात्यांच्या, अपेक्षांच्या दबावाखाली,समाजाला दाखवायच्या नादात,सिद्ध करण्याच्या जीवघेण्या धडपडीत ते विमळ असं आपलेपण, आपलं सच्चेपण आपण कुठंतरी सोडून आलोय हे कळत असतं पण वळत नाही >> खरंय.>>>+११
एकीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं वैराग्यपूर्ण ऐश्वर्य आणि दुसरीकडे नर्मदामातेचं समृद्ध अस्तित्व..विशेष काहीतरी होतं त्या वातावरणात..>>>>>>काही महिन्यांपूर्वी महेश्वर ला गेलो होतो त्यामुळे हे वाचून अगदी अगदी झालं.
पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांविषयी काही पुस्तके सुचवा. (विषयांतराबद्दल क्षमस्व)
शशांक, बिल्वा आणि ऋतुराज
शशांक, बिल्वा आणि ऋतुराज मनापासून धन्यवाद!
ऋतुराज मला पुण्यश्लोक
ऋतुराज मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्यांच्यावरच्या पुस्तकाची नावं माहिती नाहीत पण विचारते आणि माहिती मिळाली तर कळवते.
सुंदर लिहिलं आहे!
सुंदर लिहिलं आहे!
एकदम मनाला भिडल !
एकदम मनाला भिडल !