दुपारचं ऊन सरून संध्याकाळ होत आलेली होती. दत्त नगरजवळील वस्तीमध्ये आतल्या गल्ल्यांमध्ये माणसांची जरा वर्दळच होती. उन कमी झाल्याने लहान मुले गल्ल्यांमध्ये खेळत होती, वयोवृद्ध लोकं घराच्या बाहेर उभी राहून शेजारच्यांशी चकाट्या पिटत उभी होती. घरातल्या कर्त्या पुरुषांची कामावरून येण्याची वेळ झाल्याने त्यांच्या बायका स्वयंपाकाची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. दत्तनगरच्या आसपासच संध्याकाळच्या सुमारासच हे नेहमीचच वातावरण होतं. वस्तीमध्ये बरीच छोटी मोठी घरे होती. आता म्हणायला वस्ती असली तरी तेथील घरे हि पक्क्या स्वरूपाचीच होती. तिथली लोकं पोटापुरत कमावत होती. आणी दोन खोल्यांचा घरात निवांत राहत होती. गल्ल्यांचा पुढे मुख्य रस्त्याला चिटकून काही दुकाने आणी छोट्याश्या टपऱ्या पण होत्या.
त्यातल्याच एका टपरीजवळ उभं राहून रॉबिन शांतपणे सिगारेट ओढत टपरीवाल्याशी गप्पा मारत उभा होता. आत्ताच टपरीवाल्याला त्याचे हात ओले करून त्याने माहिती मिळवली होती कि कमलाबाई ह्या आतमधल्या गल्ल्यांच्या रांगेत शेवटच्या दोन खोल्यांमध्ये आपल्या नवरा आणी लहान मुलीसोबत राहतात. नवरा एका छोट्या कंपनीत गेटवर वॉचमन म्हणून रात्रपाळीत काम करत होता आणी छोटी मुलगी शाळेत शिकत होती. काही वेळातच कमलाबाई देसाई वाड्यावरची कामं आटोपून घरी येतील असा रॉबिनचा कयास होता आणी त्यांचीच वाट पाहत मुख्य रस्त्याकडे नजर ठेवून रॉबिन उभा होता.
मालतीबाईचा मृत्यू झाला, तेव्हा कमलाबाई वाड्यामध्येच होत्या एवढचं न्हवे तर मालतीताई जमिनीवर पडलेल्या कमलाबाई यांनीच आधी पाहिलं होतं. वाड्यावर कमलाबाईची चौकशी करण रॉबिनला रास्त वाटलं नाही. कारण कदाचित अविनाश समोर त्यांना जास्त बोलता आला नसतं. त्यामुळेच कमलाबाई यांची चौकशी त्यांच्याच घरात जाऊन करणे रॉबिनला क्रमप्राप्त वाटत होतं. संध्याकाळी कमलाबाई यांचा नवरा घरात नसतो, कमलाबाई आणी त्यांची मुलगीच असते त्यामुळे त्यांच्या घरात जाऊन चौकशी केल्याने कमलाबाई कोणतेही दडपण न घेता सगळ्या गोष्टी इत्यंभूत सांगतील असा रॉबिनचा अंदाज होता. वाड्यावर कमलाबाईनी रॉबिनला पाहिलं असल्याने त्या लगेचच ओळखतील असा विश्वास रॉबिनला वाटत होता. रॉबिन आपल्याच विचारांमध्ये मग्न होऊन सिगारेट ओढत शांतपणे उभा असतानाच त्याचं लक्ष मुख्य रस्त्याकडे गेलं.
हातातली कापडी पिशवी सांभाळत डोक्यावर पदर घेऊन काष्टा घातलेली कमलाबाई लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून आतमधल्या गल्ल्यांमध्ये प्रवेश करत होती. तिला असं येताना पाहताच रॉबिन जरा टपरीच्या आडोशाला सरकला आणी कमलाबाई गल्लीतून पुढे जाण्याची वाट पाहू लागला. काही वेळातच कमलाबाई लगबगीने टपरीपुढून समोरच्या गल्लीत निघून गेली. ती लगबगीने घरी जात असल्याने तिने रॉबिनला पाहण्याचा प्रश्नच न्हवता. कमलाबाई पुढे गेली आहे याची खातरजमा करून रॉबिनने हातातली सिगारेट खाली टाकून विझवली आणी ठराविक अंतर ठेवून कमलाबाईच्या मागोमाग जाऊ लागला. असा प्रसंग येणार हे रॉबिनला ठावूक होतं म्हणूनच रॉबिनने आज त्याची मोटारसायकल न आणता चालतच तो या ठिकाणी आला होता. जेणेकरून कोणाचही लक्ष त्याचाकडेन न जाता त्याला सावकाशपणे कमलाबाईच्या मागे जाता यावं. काही वेळातच कमलाबाई आपल्या दोन खोल्यांचा घरापाशी येऊन ठेपली आणी दरवाजा लोटून आतमध्ये निघून गेली. रॉबिन अगदी शांतपणे चालत येत होता. काही वेळातच तोही कमलाबाईच्या घराजवळ येऊन पोहोचला. थोडा थांबून त्याने दारावर टकटक केली. आणी तसा आतून आवाज आला- “ कोन हाये”
“ मी गुप्तहेर रॉबिन, आपण देसाईच्या वाड्यावर भेटलो होतो. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ” रॉबिनने बाहेरूनच आवाज दिला. यावर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. पण थोड्या वेळातच दरवाजा उघडला गेला आणी डोक्यावर पदर घेऊन कमलाबाई दरवाजा उघडून उभी राहिली.
“ नमस्कार मला ओळखलंत ना तुम्ही “ रॉबिन हात जोडून थोडसं स्मित करत म्हणाला.
कमलाबाई काहीशी भांबावलेल्या स्थितीत उभी होती. कारण अचानक रॉबिन आपल्या घरापाशी येऊन उभा ठाकेल असं तिला वाटलं न्हवत. आणी तसंही आपल्याकडे रॉबिनचं काय काम असेल याने ती गोंधळली होती. तिच्या चेहऱ्यावरचे हे सगळे भाव रॉबिनने भराभर टिपले आणी कमलाबाईला विश्वासात घेत म्हणाला.
“ कमलाबाई काळजी करू नका, वाड्यामधल्या नुकत्याच घडलेल्या प्रकरणाबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती. तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या मालकीणबाईना न्याय मिळवून देण्यासाठीच पोलिसांच्या सांगण्यावरूनच तपास करतोय.” रॉबिन मनमोकळ हास्य करत म्हणाला.
रॉबिनचा हसरा चेहरा पाहून कमलाबाई जरा निश्चिंत झाल्या कारण नाही म्हटलं तरी पोलिसांच्या प्रकरणात नसती ब्याद ओढवून घेण्यात त्यांना काहीही स्वारस्य न्हवत. बाहेर जरा अंधार पडू लागला होता. कमलाबाईनी रॉबिनला आत बोलावून घेतल. रॉबिन घराच्या आतमध्ये आला आणी दाराजवळच्याच लाकडी खुर्चीवर विसावला. कमलाबाई आत स्वयंपाक घरात गेली. समोरच लोखंडी कॉटवर कमलाबाईची मुलगी अभ्यास करत बसली होती, रॉबिन आत येताच ती किलकिल्या डोळ्यांनी रॉबिनकडे पाहू लागली. रॉबिनने तिच्याकडे पाहून हलकेच स्मितहास्य केलं आणी घराचं निरीक्षण करू लागला. ते दोन खोल्यांचं पक्क घर होत. पुढे एक खोली आणी मागे स्वयंपाकघर. पुढच्या खोलीत एकाच दिवा होता त्याचा मिणमिणता प्रकाश पसरला होता. घरात कपडे कोपर्यामध्ये ढीग करून ठेवले होते आणी त्याच्या बाजुलाच २ लोखंडी ट्रंका एकावर एक ठेवलेल्या होत्या.
“ चाह घेणार न..” कमलाबाई ने आतून डोकावून विचारलं. तसं रॉबिनने होकारार्थी मान डोलावली.
काही वेळातच चहा घेऊन कमलाबाई रॉबिनच्या पुढे आली आणी पुढच्या लोखंडी कॉटवर विसावली. पदराने घाम पुसत आता रॉबिन काय विचारणार याचाच विचार करत चेहऱ्यावर दडपणाचे भाव घेऊन बसली होती. रॉबिनला ते कमलाबाईकडे न पाहताच समजलं होतं. त्यामुळे एकदम प्रश्नांची सरबत्ती न करता खेळीमेळीच्या वातावरणातूनच कमलाबाईची चौकशी करावी लागणार हे रॉबिनने ताडलं. तसंही समोरची व्यक्ती पाहून त्याचाकडून माहिती कशी काढून घ्यावी हे रॉबिनला चांगलंच समजत होतं. चहाचा एक घोट घेऊन आणी कमलाबाईकडे न पाहताच रॉबिन स्मितहास्य करत म्हणाला “ वाह चहा फक्कड झालाय कमलाबाई “
यावर कमलाबाई कसनुस हसल्या.
“ तुमच्या हाताला चांगलीच चव आहे कमलाबाई” कमलाबाईकडे पाहत तृप्तीचे भाव आणत रॉबिन म्हणाला.
या स्तुतीने कमलाबाई नुसताच हा हा असं म्हणल्या पण त्यांच्या मनावर आलेला ताण थोडा हलका झाला हे रॉबिनने टिपले आणी काहीही न बोलता चहा पिऊ लागला. काही वेळ असाच शांततेत गेला.
“ कमलाबाई वाड्यावर जे काही झालं ते खूप दुर्दैवी होतं. असं कोणाच्याही बाबतीत घडू नये. हा पण आता काय करणार आम्हाला कर्तव्यापोटी सगळ्यांचीच चौकशी करावी लागते. आमचं कामच आहे ते, त्याशिवाय आमचं पोट कस चालणार नाही का “ चेहऱ्यावर हसरे भाव आणत आणी शक्य तितके वातावरण खेळीमेळीचे ठेवत रॉबिन म्हणाला. कमलाबाई रॉबिनच्या या गोड बोलण्याने आता बर्यापैकी तणावरहित होऊ लागली होती आणी जरा आरामात कॉटवर बसली होती.
“ कमलाबाई तुम्ही आम्हाला तपास कामात मदत करणार का? म्हणजे देसाई वाड्यावरचे लोक स्वभावाने कसे आहेत. तुमचाशी नीट वागतात का? पगारपाणी वेळेवर देतात का? वगेरे वगेरे माहिती हवी होती” चहाचा घोट घेत रॉबिन म्हणाला. आपला संशय हा तिच्यावर नसून तिला वाड्यावर कशी वागणूक मिळते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असं रॉबिन भासवत होता.
कमलाबाई सुद्धा आता जरा एक पाय वर घेऊन निवांत बसली आणी सांगू लागली – “मानस लय चांगली हायती बगा. माजी आन माज्या घरातल्या माणसांची खूप काळजी घेत्यात”
“ अस्स.. ते कस काय “रॉबिन उगाचच चहाचा कप हातात घेत प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.
“ मला पगार देत्यात येळेवर, माज्या पोरीची चौकशीबी करत्यात. माज्या मालकाला समजावून सांगत्यात सगळं” कमलाबाई बोलून गेल्या.
“ मालकाला काय समजून सांगत असतात” न समजून रॉबिन म्हनला. कमलाबाईच्या नवर्याला देसाई कुटुंबीय कशाबाबतीत समजावून सांगत असावेत याचा त्याला प्रश्न पडला.
तसं थोडासा खाली पाहत कमलाबाई म्हणाल्या “ आता काय सांगू साहेब तुम्हास्नी, आमचे मालक चांगल्या कंपनीत कामास्नी होते पण मित्राच्या नादाला लागून दारूच्या येसनाला लागले. आन त्या येसनापायी लयं भिकेकंगाल झाले होते. हातातली चांगली कंपनीतील नोकरी होती ती पण सोडून दिली. आन मलाबी घरात तरास देऊ लागले. म्या देसाई वाड्यावर काम करायचे तवा आणि अजून २-३ घरात धुनी भांडी बी करायचे. हि पोरगी शाळत शिकाय होती, तिच्या फी ला बी पैसा हातात गावत न्हवता. हे अविनास साहेबास्नी कळल तेव्हा तेनी हित येऊन आमच्या मालकाची समजूत घातली आणी मोठ्या बाईसाहेबांच्या ओळखीन एका ठिकाणी आमच्या मालकाला वाचमनची नौकरी देऊ केली.”
“ ओह्ह.. म्हणजे अविनाश यांनी मालतीबाई यांचा ओळखीने तुमच्या मालकांना नोकरी देऊ केली तर “रॉबिन चहाचा घोट घेत बोलला.
“ हा ते तर हायेच पन दर दिवाळीला आम्हा सगळ्यासनी कापड बी घेऊन दित्यात, वर बोनस बी. मला अविनास साहेबांनी फक्त आमच्या इथे कामाला या चांगला पगार देऊ असं सांगितलं. त्यांना वाडा सांभाळणारा कोणी बाईमाणूस पण पाहिजे हुतं. मोठ्या बाईसाहेबांकडे माणसांची लयं रीघ लागायची. आन वाहिनीसाहेबांना पण घरकामात मदतीला कोणीतरी हवंच होतं. आता ती मानस एवढं अमचासाठी करत्यात अजून काय पाईजे म्हनून मीबी हा म्हटलं.” कमलाबाईने एका दमात सगळं सांगून टाकलं.
एवढी माहिती कळताच आता मूळ मुद्द्याला हात घालायला हवा असं रॉबिनला वाटून गेल. हातातला चहा संपला असल्याची जाणीव त्याला झाली.
“ वाहः असा फक्कड चहा बऱ्याच दिवसात पिला बघा. अजून मिळेल का”? चेहऱ्यावर तेच समाधान मिळाल्याचे भाव आणत रॉबिन म्हणाला.
“ हाये कि अजून आनते हा.. असं म्हणत कमलाबाई उठली आणी पटकन स्वयंपाक घरात जाऊन तिने अजून एक चहाचा कप रॉबिनच्या हातात ठेवला.
“ आहाह.. कमलाबाई तुमचा हातचा चहा पिऊन अगदीच पोट भरल्यासारख वाटतय बघा” रॉबिन अतिशय मंदपणे स्मितहास्य करत चहाचा घुटका घेत म्हणाला.
“ आयो एवढा आवडला वय चाह तुम्हास्नी” कमलाबाई हलक्याच लाजत बोलल्या. त्या आता आरामात बसून बोलू लागल्या होत्या. याचाच फायदा घेत रॉबिनने पुढचा प्रश्न केला.
“ बऱ मला एक सांगा कमलाबाई, तुमच्या मोठ्या मालकीणबाई म्हणजेच मालतीबाई स्वभावाने कशा होत्या “रॉबिन मान खालुन चहा पीत उत्तराची वाट पाहू लागल्या. मालतीबाई विषयी बोलायचं म्हटल्यावर कमलाबाईचा चेहरा जरा सुकल्यासारखा झाला. तरीही त्या पुढे बोलू लागल्या – “मोठ्या बाईसाहेब स्वभावाला लयं कडक होत्या बगा. कामात जराबी कुचराई झालेली अजिबात खपत न्हवती त्यासनी. जरा सुदिक चूक झाली कि वसकन कावायचा. मला तर लय भीती वाटायची बगा त्यांची.
“ अच्छा घरातल्या सगळ्यांशीच तसं वागायचा कि फक्त तुमचाबरोबरच” रॉबिन हलकं हसत म्हणाला.
“ सगळ्यानशीच ओ..कोणाला सुदिक सोडत नसायचा.. आबासाहेब बरे होते तेव्हा ते सांभाळून घ्यायचे समद, पर आबासाहेबांचा डोक्याचा अपघात झाल्यापासन ते खाटेवर पडून होते मगतर बाईसाहेबांना कोणीबी आवरणार न्हवत.” मान खाली घालत कमलाबाई बोलली.
“ आणी त्यांची दोन्ही मुलं आणी सून त्यांचाशी सुद्धा असंच कडकपणे वागणं होतं का? “ प्रश्नार्थक मुद्रा करत चहाचा कप धरून रॉबिन म्हणाला.
“ अर्रर..ते तर इचारुच नका तुम्ही ...” कपाळावर हात ठेवत कमलाबाई म्हणाली. तसा रॉबिन जरा खुर्चीत नीट बसला आणी म्हणाला”
का हो काय झाला एवढ कपाळावर हात मारण्यासारख? रॉबिनच्या या प्रश्नासरशी कमलाबाई सुद्धा सावरून बसत थोडं पुढे झुकत बोलू लागली.
“ अवो अविनास साहेबास्नी आन वाहिनीसाहेबास्नी तर लयच कावायच्या. कुटबी चूक झाली तर लय झापायचा दोघांना. आन बिचारी दोघबी निमुटपनी ऐकायचे सगळं. आबासाहेबांना सांभाळायला दवाखान्यातून नर्स ठिवली होती तर तिलाबी काडून टाकली आन या दोघास्नीच आबासाहेबांच सगळं बागाय लावलं” कमलाबाई दुखी स्वरात म्हणाल्या.
“ आणि त्यांचा दुसरा मुलगा आशुतोष त्याला काही बोलायचा कि नाही” रॉबिनने विचारलं
“ हम्म.. असं म्हणत आणी ओठ मुडपत नाराजीचा स्वर काढत कमलाबाई म्हणाली.. तर तर तेला कशाला काही बोलतील बाबा. लाडाचा गोळा न तेंचा तो. आपल्या पोटच्या पोराला कशाला काय बोलतील त्या”
“ आपल्या पोटच्या पोराला म्हणजे...न समजून रॉबिनने विचारलं “
“ अवो आशुतोष तेंचा स्वतःचा पोरगा ना..अविनास साहेब हे आबासाहेबांच्या पहिल्या बायकोचे पोर, म्हंजी सावत्र मुलगा मोठ्या बाईसाहेबांचा.” कमलाबाईने एका दमात सांगून टाकलं.
“ काय सांगताय काय.. “ हातातला चहाचा कप तसाच ठेवून कमलाबाई यांचाकडे आश्चर्याने पाहत रॉबिन बोलला.
“ हो, आबासाहेबांची दोन लग्न झाली हायेत. पहिली बायकू आजारात मेली तिचा पोरगा म्हणजे अविनास साहेब. ते लहान असतानाच तेंची आई गेली. मग लहान पोराची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हनून आबांनी दुसरं लगीन केलं ते मोठ्या बाईसाहेबासंग, तेंना जो पोरगा झाला त्यो आशुतोस” कमलाबाई ने माहिती पुरवली. रॉबिनला हि माहिती नवीन असल्याने तो विचारात पडला कि इ. देशमुखांनी त्याला हि माहिती कशी काय सांगितली नाही कि त्यांनाच या बाबत काही माहिती नाहीये. खुनाच्या प्रकरणात सर्व प्रकारची सर्व अंगाने माहिती घेणे गरजेचे असताना देशमुखांना हि माहिती कशी नसावी. रॉबिनला भराभर प्रश्न पडत गेले. कदाचित पोलिसांच्या चौकशीत पोलिसांनी या अनुषंगाने चौकशी केली नसावी आणी वाड्यावर सगळ्यांची चौकशी होत असताना हि माहिती देण्यासारखं महत्व वाड्यावरील कोणत्याच सदस्याला देखील कोणाला वाटलं नसेल. असो आता आपल्याला हि माहिती मिळाली हे महत्वाचं आहे. एकंदरीत कमलाबाईला घरी भेटण्याचा निर्णय आपल्याला चांगलाच फळला.
“ चाह देऊ का अजून साहेब” रॉबिनची विचारांची तंद्री भंग करत कमलाबाईने विचारलं
“ न..नाही नको एवढा पुरे आहे... एवढं बोलून रॉबिनने आता थोडसं गंभीरपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली-
“ अविनाश सोबत मालतीताई यांचं वागण कस असायचं” रॉबिन ने विचारलं.
“ अवो काय सांगू लयच हाड्तुड करत वागणूक द्यायचा तेस्नी तर, आन वहिनिसाहेबास्नी पण अशीच वागणूक देयाचे. बिचारी दोग मात्र शांतपणे त्यांची सगळी कामा निमुटपणे करायची. कवा कवा वहिनिसाहेबास्नी अविनास साहेब इचारायला पण येयाचे कि काही मदत करू का कामात म्हणून, पण वहिनीसाहेब नाई नाको म्हणून सगळी कामा एकटी करायचा. तरीबी येळ मिळेल तसं अविनास साहेब घरकामात वाहिनिसाहेबांना मदत करू लागायचे. दोघांचा एकमेकांवर लाय जीव बगा. कवा कवा मला वाटायचं माझीच दृष्ट नको लागाय या जोडप्याला.” कमलाबाई हलकेच हसत वर पाहत म्हणाल्या.
“ कमलाबाई त्या दिवशी जेव्हा मालतीबाई जमिनीवर कोसळल्या तेव्हा नक्की काय झालं होतं मला सविस्तर सांगाल का? रॉबिन गंभीर चेहरा करत म्हणाला.
“ हो सांगती कि असं म्हणत कमलाबाईनी पदर कमरेला खोचला दोन्ही पाय खाटेवर घेतले आणी सांगायला सुरुवात केली- “ त्या दिशी बगा वाड्यावर मला खूप कामा होती. सकाळपासून मी आणि वहिनीसाहेब कामातच हुतो, सगळी जुनी भांडी काढून धुवून पुसून ठिवली, समदा वाडा झाडून पुसून साफ केला. संध्याकाळी झाल्यावर मी आन वहिनीसाहेब गप्पा मारत स्वयंपाकघरात भाज्या निवडत बसलो हुतो, अचानक मोठ्या बाईसाहेब तनतनत स्वयंपाकघरात आल्य. आन मोठ्या बाईसाहेबांनी ४-५ साड्या आन २-३ चादरी आमच्या समोर आणून टाकल्या. आन म्हणाल्या हि कापड का धुतली न्हाईत. अमी दोगी त्यांचा तोंडाकड बघतच राहिलो, घटकाभराने वहिनिसाहेबांनी सांगितलं कि मागच्याच हप्त्यात धुतली हायती हि. तवा बाईसाहेब म्हणाल्या या साड्या खराब झाल्यात, चादरींवर कळकट डाग पडलेत परत आताच्या आत्ता धुवा हि कापड, मला अंघोळीला जायचंय. असं म्हणून त्या अंघोळीला निघून गेल्या आम्ही दोगी आदीच दिवसभराच्या कामाने थकून गेलू होतु. परत हे कपडे धुवाचे म्हटल्यावर मला तर लय आंग मोडून आल्यावानी झालं. पर बोलणार काई, माझी तर घरी जायची येळ झाली हुती कारण पोरगी घरी एकटी असते सांच्याला. कारण माझं मालक रात्रपाळीला जातो. मला लगबग घरी याचं हुतं. वहिनीसाहेबांस्नी हे माहित हुत म्हनून त्या म्हणाल्या “कमलाबाई तुमी जावा मी समदी कापड धुते. वाहिनीसाहेबांना एकट्याला एवढ कपडं धुवायला लावायला लावून घरी जायचं, मला लय वंगाळ वाटलं बगा. बिचाऱ्या वाहिनीसा मोठ्या बाईसाहेबांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही तेनी. त्यांना असं एकट्याला कामा कराया सोडून जावा वाटना. तवा मी पन थांबले आन म्हनले मी पन थांबते दोगीबी मिळून कापड धु. आन आम्ही दोगी वाड्याच्या मागच्या बाजूला हिरीवर कापड घेऊन गेलू.
वहिनिसाहेबांनी रहाटाला कळशी लावली आन पानी उपसून काडाय लागल्या. मंग मी आन वहिनीसाहेब कपडे धुवाय लागलो. काही वेळात पानी संपल आन वहिनिसाहेबांनी परत पानी उपसायला कळशी हिरीत टाकली आन पानी उपसणार एवढ्यात दोर तुटला आन कळशी हिरीतच पडली. आत सांच्याला हिरीत उतरून कळशी काढायची म्हटल्यावर आम्हा दोघींना जमणार न्हवत. मंग मीच म्हणाले वहिनीसाहेब आता कळशी राहूदेत आतमध्येच हिरीतच साहेबास्नी सांगून परत काढू. तुमी कापड धुवा तवर म्या आत जाऊन दुसरी कळशी आणते. असं म्हणून मी मागच्या रस्त्याने आतमध्ये परत वाड्यात आले. आन जिन्याने वरच्या मजल्यावर गेले कारण वरल्या मजल्यावर सामानाच्या खुलीत जुन्या सामानांच्या पसाऱ्यात लय समान हुत, तीत कळश्या, बादल्या आन लय कायकाय सामान असतया. तीत इकडतिकड पाहिल्याव मला कोपऱ्यात एक कळशी दिसली ती घेतली आन खाली आली.
तवा खाली येताना म्या पाहिलं कि मोठ्या बाईसाहेबांच्या खोलीचा दरवाजा उघडाच हुता त्या अंघोळ करून खोलीत आल्यावर खोली अशी उघडी ठेवत नसायच्या. म्हणून म्हन्ल आत बगाव आन माझी नजर आतमध्ये गेली. तवा मला लांबून दिसलं कि मोठ्या बाईसाहेबांचे पाय जमिनीवर पालथ दिसल. जणू की उताण्या पडल्यात तसं म्या म्हटलं अशा का पडल्याती जरा जवळून जाऊन बगाव असं म्हनून खोलीच्या समोर आले. तर मोठ्या बाईसाहेब जमिनीवर उताण्या पडलेल्या दिसल्या मी तर घाबरलेच पाहिलं वाटलं चक्कर बिक्कर येऊन पडल्या कि काय म्हणून हाका मारल्या. तर हु नाही कि चू नाही, माजी काय त्यस्नी हात लावायची हिम्मत झाली. आवाज देऊन बी त्या उठानात आन कसली हालचाल बी करानात मंग मात्र मी घाबरले. पळत वाड्याच्या मागी गेले, आन मी मोठ्याने वाहिनिसाहेबास्नी हाका मारल्या तवा त्या घाबरून पळत आल्या. त्यांनीबि हाक मारल्या, जवळ जाऊन हलवलं तरीबी उठानात. शेजारच्या खोलीत आबा खाटेवर आजारी असल्यागत पडलेलं असायचं तवा त्यांना उठवून बी काय फायदा न्हवता कारण आबांना सौताचीच सूद नसायची. मंग मीच वाड्याच्या बाहेर गेले आन बाहेर जाऊन २ लोक बोलावून आणली आन त्यांनी डाक्तरास्नी बोलावून आनल. डाक्टारने तपासून सांगितलं कि हास्पिटलात हलवा. एवढ बोलून कमलाबाई शांत बसली.
रॉबिन शांतपणे हाताची बोटे एकमेकात गुंफवून शांतपणे ऐकत होता. कमलाबाईच्या घराबाहेर आता रात्र पडली होती आणी आजूबाजूला शांतता पसरली होती. घरात कोणी काहीच बोलत न्हवत. कमलाबाईची पोरगी सुदा आमच्याकडे आम्ही काय बोलत आहोत ते ऐकत शांतपणे पाहत बसलेली होती. रॉबिन खुर्चीत जरा मागे टेकून बसला आणी म्हणाला. “ कमलाबाई तुम्ही जेव्हा कळशी आणायला परत आत वाड्यात गेला तेव्हा वाड्यात बाहेरून कोणी आल्याचा तुम्हाला जाणवलं का? किंवा बाहेरून कोणी आतमध्ये येऊन मालतीबाई यांची हत्या केली असेल असं तुम्हाला वाटत का? रॉबिन शांतपणे कमलाबाईकडे पाहत म्हणाला. त्यावर कमलाबाई विचार करत म्हणाल्या.
“ नाई वो असं नाई वाटत मला. कारण अमी धून धुवाय गेलो तवा कोनीबी न्हवत वाड्यात, तसंबी वाड्याच पुढच दार दिवसभर उघडंच असतंय रातच्याला अविनास साहेब आले कि लावून टाकायचे. हा आता अचानक कोन बाहेरून आलं आसन तर आम्ही मागे धून धूत असल्यामुळे आलो असेल तर मला माहित नाई” कमलाबाई ने चेहरा बारीक करत सांगितलं.
“ हम्म..डॉक्टर पाटील हे कसे होते स्वभावाने “ रॉबिनने हनुवटीवर हात ठेवत विचारले.
“ त्यो तर लय डोमकावळ्यावाणी होता बगा... नजर चांगली न्हवती मेल्याची” तोंड वाकड करत कमलाबाई म्हणाल्या.
“ अच्छा ... अजून काही विशेष त्यांचाबद्दल म्हणजे कामाव्यतिरिक्त कधी येणं जाणं त्याचं वाड्यावर “ रॉबिनने विचारलं.
“ आबास्नी बगायला येयाचा तेवढच..पन आला कि आपलं इकडे बघ तिकडे बघ असं करायचा लुथभरयासारखं... हलकट मेला “ दात विचकत कमलाबाई म्हणाला.
“ हम्म... “ असा उद्गार काढून रॉबिन शांत बसला. आता अजून जास्त काही विचारण्यात काही अर्थ न्हवता कारण महत्वाच्या गोष्टी त्याला समजल्या होत्या. कमलाबाईनी बरीच माहिती दिली होती. आता इथे जास्त वेळ बसण्यात काही अर्थ न्हवता.
त्यामुळे रॉबिन खुर्चीतून उठला आणि म्हणाला “ चला कमलाबाई निघतो मी आता खूप वेळ घेतला तुमचा. मस्त चहा पाजलात तुम्ही, आणी तुमची खूप मदत झाली मला.”
कमलाबाईने सुद्धा हसत हसत रॉबिनला निरोप दिला. कमलाबाईच्या घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यावरून रॉबिन खूप शांतपणे चालत चालला होता. रस्त्यावर जास्त वर्दळ न्हवती. बहुतेक घरात निजानीज करण्याची तयारी चालू होती. आज त्याला बरीच महत्वाची माहिती मिळाली होती. आणी तपासकार्यात त्याची खूप मदत होणार होती त्यानुसारच तपासाची पुढची दिशा ठरणार होती. रॉबिनची विचारचक्र वेगाने फिरत होती. कमलाबाई हिने दिलेल्या माहितीनुसार वाड्यात कोणाच्याही अपरोक्ष वाड्यात येऊन घातपाताच कृत्य करता येऊ शकत होत असंच दिसतं होतं पण नक्की कोण असं करू शकेल? आणी केलंच तर त्याने कोणत्या हत्याराच्या सहाय्याने हे कृत्य घडवून आणलं? मालतीबाई यांना अशा विचित्र पद्धतीने मृत्यू देण्यामागे गुन्हेगाराचा काय हेतू असू शकत होता? असे एक न अनेक प्रश्न रॉबिनच्या मनात पिंगा घालत होते. जोपर्यंत गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणी गुन्हा करण्यामागचा हेतू कळणार नाही तोपर्यंत हे कोडं उलगडणार नाही हे रॉबिन जाणून होता. त्यामुळे लवकरात लवकर पाऊले उचलण्याची गरज होती. तसही गुन्हेगार जो कोणी असेल तो आत्तापर्यंत सावध झालेला असू शकतो. त्यामुळे अतिशय सावधपणे पाऊले टाकणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे उद्या काय काय कामं केली पाहिजे याचा एक विशेष आराखडा रॉबिनच्या मनात तयार होऊ लागला होता.
क्रमश:
चांगली सुरू आहे कथा
चांगली सुरू आहे कथा
हं.., पुभाप्र
रंगते आहे! पुभाप्र
मस्त लिखाण...खिळवून ठेवलं आहे
मस्त लिखाण...खिळवून ठेवलं आहे अगदी.
पुभाप्र