लागोपाठ तीन दारुण पराभवानंतर, “मुंबई इंडियन्स” टीमच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी मला पाचारण करण्यात आल्याची वार्ता, एखाद्या वणव्यासारखी, हा हा म्हणता सबंध चाळीत पसरली!
ज्या मित्रमंडळीला ऑफिसच्या लँडलाईन चा वापर करण्याची परवानगी होती, त्यांनी त्या सुविधेचा फायदा घेत, माझ्यावर अभिनंदनाची पुष्पवर्षा केली. ज्या मोजक्या लोकांच्या नशिबात हे योग नव्हते, त्यांनी मिस कॉल वर मिस कॉल मारून ; मला कॉल बॅक करायला भाग पाडले आणि नंतर माझ्याशी मनमुराद गप्पा मारल्या. काही उच्च विचारसरणीच्या बहादरांनी रेल्वे स्टेशन, मॉल वा तत्सम ठिकाणच्या फ्री वायर सुविधेचा बिनदिक्कत वापर करून सोमीवरच्या ; माझ्या किमान अर्धा डझन खात्यांच्या एकाकी माळरानावर शुभेच्छांचा कृत्रिम पाऊस पाडला आणि इमोजींची बाग फुलवली. काही चाणाक्ष महाभाग , अभिनंदनाचे निमित्त पुढे करत , घरी येऊन कांदा-पोहे हादडून गेले.
शेजारच्या देशपांडे काकूंनी, आमचा चिंटू काय भारी गल्ली क्रिकेट खेळतोय एकदा बघाच तुम्ही. म्हणजे पुढे-मागे त्याला एखाद्या संघात घुसवता आले तर तुम्ही काय नाही थोडेच म्हणणार आहात , अशी फील्डिंग लावायला सुरुवात केली.
.....काल सकाळची घटना.
कुणीतरी आपल्या नावाचा पुकारा करतोय म्हणताना त्रासिक चेहर्याने मी बाहेर आलो. तर कळकट कपड्यातील मळकट चेहर्याचा पोस्टमन हातातले पाकिट नाचवत मला बोलवत होता. त्याच्या प्रश्नार्थक चेहर्याकडे साफ दुर्लक्ष करून, लिफाफा घेऊन मी वर आलो.
उघडण्यापूर्वी तीन तीनदा तो लखोटा उलटसुलट करून पाहीला. ‘अँटिलिया’ चा इन्सिगनिया बघताच क्षणभरासाठी का होईना परंतु , अनंत-राधिकाच्या प्री - वेडिंग फंक्शन ची निमंत्रण पत्रिका पोस्ट खात्याच्या दफ्तरदिरंगाईमुळे आपल्याला उशिरा मिळतेय, असा प्रथमदर्शनी समज होऊन मी काही मिनिटे खूप म्हणजे खूपच हळहळलो.
मग कापऱ्या हातांनी आणि धडधडत्या हृदयानी तो जादुई लखोटा उघडला. आतील मजकूर वाचून माझी भंबेरी उडाली. खात्री करून घेण्यासाठी; मी पुन्हा पुन्हा ‘प्रेषक-प्रति-मायना’....’मायना-प्रति-प्रेषक’ चा पाढा तीन तीनदा वाचला. मात्र, पत्ता ‘अँटिलिया’ चाच होता. आणि पत्र मलाच उद्देशून लिहिले गेले होते. त्यामधेही कुठलीच चूक झालेली नव्हती...
आणि अशा प्रकारे - “मुंबई इंडियन्स” टीमच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी मला पाचारण करण्यात आल्याची वार्ता, हा हा म्हणता; एखाद्या वणव्यासारखी सबंध चाळीत पसरली होती !
खरे पाहता , मला ह्या ‘कलोनिअल’ खेळामधले ओ की ठो कळत नाही.
तुम्हाला म्हणून सांगतो; अगदी काल परवापर्यंत – ‘गुगली’ आणि ‘गुगल’ हे, “ आजसे बीस साल पहले...” कृत; मनमोहन देसाई नावाच्या सद्गृहस्थाच्या गावच्या यात्रेत हरवलेले जुळे बहिणभाऊ आहेत असाच माझा पक्का समज होता.
नंतर नंतर ऐकीव गोष्टी आणि आंतरजालावरून जुजबी माहिती गोळा केल्यानंतर, शंकासमाधान होण्याऐवजी, या खेळाविषयी माझ्या मनातल्या प्रश्नांचा गुंता आणखीनच वाढत गेला.
उदाहरणार्थ: दृकश्राव्य माध्यमाच्या विविध वाहिन्यांवरून या खेळाचे धावते समालोचन केले जाते हे ऐकल्यानंतर मी हातभार उडालोच! धावता धावता समालोचन करायचे म्हटल्यावर, या वाहिन्यांनी स्पायडरमॅन, बॅटमॅन , आयर्नमॅन किंवा शक्तिमानशी करार केलाय की काय अशी मला दाट शंका यायला लागली.
आजही; फिल्डिंग संदर्भात कुणी पोटतिडकीने लाँग लेग, फाइन लेग, शॉर्ट लेग असे असंबद्ध बडबडायला लागला की, माझ्या डोळ्यांसमोर ‘चायनीजच्या’ हातगाड्या नाचू लागतात. अन् शुद्ध शाकाहारी मी, पायात पाय अडकण्याआधीच, शहाण्यासारखा तेथून लगेचच काढता पाय घेतो.
चाहत्यांमध्ये ‘कॅरम बॉल’ आणि ‘चाइना मॅन’ अशी विक्षिप्त जुगलबंदी सुरू झाली की, मला लोकांच्या अज्ञानाची प्रचंड कीव येते. एक तर कॅरम बद्दल बोला नाहीतर बॉलविषयी आपले मत मांडा ना ! दोन खेळांची अशी सरमिसळ कुणी करते का? आणि तो जो कुणी ‘चायना मॅन’ आहे तो; त्याचा राष्ट्रीय गेम – ‘पिंग पाँग’ सोडून, केवळ तुमच्या समाधानासाठी दुसरे खेळ का बरे खेळेल? पण आपल्या अशा रॅशनल अन् लॉजिकल बोलण्याने उगाच कुणाचे मन दुखायला नको म्हणताना मी गप्प बसतो.
माझ्या अफाट अज्ञानाचे पारडे असे भुईजड असताना, मला एम. आय. च्या मालकांचे बोलावणे यायचे नेमके कारण म्हणजे, कवडीचेही डोके नसताना, नको त्या विषयांत बिनदिक्कतपणे नाक खुपसून, स्वत:ची नसलेली अक्कल पाजळत आपलेच घोडे पुढे दामटण्याची माझी वाईट खोड!
कदाचित ह्या एका कारणामुळे माझी (अप) कीर्ति ‘अँटिलिया’ पर्यंत पोहोचली असेल आणि ढेपाळणाऱ्या आपल्या संघाची दशा सुधारून त्याला सुयोग्य दिशा दाखविण्यासाठी मला पाचारण करण्यात आले असेल, असा माझा आपला एक प्राथमिक अंदाज आहे.
आपण होऊन ओढवून घेतलेल्या ह्या अस्मानी सुलतानी मधून स्वत:ची सहीसलामत सुटका कशी करून घ्यायची ह्या विवंचनेत असतानाच, पत्रकारांचे एक शिष्टमंडळ घरी येऊन धडकले.
हार-तुरे, पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आदि सोपस्कार उरकल्यानंतर; प्रत्येकजण जमेल तसा, जमेल तितका माझ्या आठ बाय दहाच्या खुराड्यात स्थानापन्न झाला.
‘आता संघाची धुरा आपण सांभाळणार म्हणताना, व्हाइट वॉश टळेल असा आपणास विश्वास आहे का?’, एका बेरकी पत्रकाराने सरळ सरळ मुद्द्याला हात घातला.
एरवी, मोडकळीस आलेल्या माझ्या चंद्रमौळी घरावर कुणी अशी चिखलफेक केलेली मी निश्चितच खपवून घेतली नसती, परंतु ‘ अतिथी देवो भव..’ संस्कारात वाढल्याने मी निमूट राग गिळला आणि नम्रपणे म्हणालो, ‘माझ्या मते; आधी युद्ध पातळीवर जिर्णोध्दाराचे कार्य हाती घ्यावे लागेल आणि नंतरच व्हाइट वॉश चे काय ते पाहता येईल.’
‘ म्हणजे संघातली जी काही जुनी खोडं असतील त्यांना बाहेर काढून नव्या दमाच्या, सळसळत्या रक्ताला वाव द्यावा लागेल, असेच सुचवायचे ना तुम्हाला?’, नुकतेच मिसरूड फुटलेला एक अतिउत्साही, शिकाऊ पत्रकार गदगदला.
‘ संघात खांदेपालट झाल्यानंतर, फॅन्सनी असहकार पुकारला तर नव्या शिलेदारांचे मानसिक खच्चीकरण होणे स्वाभाविक आहे. या दुष्प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण काय उपाय योजना कराल ?’ आणखी एका पत्रकाराने शंका काढली.
पार्किन्सन्सच्या रोग्यासारखी लुकुलुकू मान हलवणाऱ्या, कोपऱ्यामधल्या टेबल फॅन कडे एक जळजळीत कटाक्ष टाकून मी गंभीरपणे म्हणालो, ‘ या पृथ्वीतलावर फॅन शिवाय साधे गवताचे पानही हलत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आपण स्वीकारलं म्हणजे पुढचा सगळा मनस्ताप टाळता येतो. मग तो फॅन पेडेस्टल असोत की सीलिंग..’
‘ स ऽऽ र ऽऽ, किती गहन, किती गूढ गंभीर बोलता आपण..,’ शिकाऊ पत्रकार पुन्हा पिळकला. ‘ ह्याचा मतितार्थ असाच की, हा तळागाळातला किंवा तो उच्चभ्रू असा वर्गवार, वंशवार भेदभाव न ठेवता, स्टेडियमवर हजेरी लावणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या भावनांचा आपण मनापासून आदर केला पाहिजे. व्वा! क्या बात है!!’
‘ उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडखानी ही संघासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरतेय, असे वारंवार निदर्शनास आले आहे. याबद्दल आपण खेळाडूंना कुठला सल्ला द्याल?’ तिसर्या पत्रकाराने दुसरा टाकला.
‘ एस. टी. मधे, उजवा हात बाहेर काढल्यास घातपात होणारच ! तो टाळायचा असेल तर प्रत्येकाने संधी मिळेल तेव्हा छेडछाडीची आपली आदिम प्रवृत्ती समूळ उपटून फेकायला हवी , असे माझे स्पष्ट मत आहे.’ प्रत्येक शब्दावर कमालीचा जोर देत मी निग्रहाने बोललो.
‘ गहजब..!!’ एव्हाना शिऊ भलताच चेकाळला होता. ‘ ह्याचा अर्थ, उजव्या यष्टी बाहेरच्या चेंडूकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करायचे. दैटस ऑल! सर, आपण..आपण महान आहात. आय. पी. एल. सोडाच; उद्या भारतीय क्रिकेट संघाच्या केंद्रस्थानी आपण विराजमान झालात तर आम्हाला मुळीच आश्चर्य वाटणार नाही.’
परत मला आणि माझ्या भावी संघाला भरघोस शुभेच्छा देऊन पत्रकार परिषद संपली आणि माझा जीव भांड्यात पडला.
अखेर तो सोनियाचा दिवस उजाडला!
तोरणे, पताका आणि चायना मेड दिव्यांच्या लखलखीत झगझगाटात, आमची अख्खी चाळ न्हाऊन निघाली होती. शेजारच्या चाळीतून उसनवारीवर आणलेल्या डी. जे. वर, ‘चक दे’ पासून...’शाब्बास मिथू’ पर्यंत आणि ‘विजेता’ पासून... ‘सूर सपाटा’ पर्यंत प्रत्येक हिंदी-मराठी स्पोर्ट्स मूव्हीज च्या साँग्ज अँड डायलॉग्ज नी, कानाच्या ठिकऱ्या उडवायचा सपाटा लावला होता.
मग; भटजींनी तिथी, नक्षत्र, योग आदि पाहून ठरवून दिलेल्या शुभ मुहूर्तावर, चाळी मधल्या शे - दिडशे बाया-माणसांच्या साक्षीने ; आमच्या अर्धांगिनीने कुंकुम तिलक करून माझे औक्षण केले. कशा कोण जाणे पण त्यावेळी; बालभारतीच्या पुस्तकातल्या- “ बाळ चाललासे रणा घरा बांधते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण ” कवितेच्या ओळी माझ्या कानात रुंजी घालू लागल्या.
लगेचच, तरुण तडफदार मित्र मंडळाच्या हौशी पदाधिकार्यांनी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी – “ हम होंगे कामयाब... हम होंगे कामयाब.. हम होंगे कामयाब एक दिन “ च्या तालावर फेर धरला. आणि पाहता पाहता त्या उत्साहा-उन्मादात सबंध चाळ सामील झाली.
पांढर्या रंगाच्या मळकट ट्राऊझरवर, काळ्या रंगाचा तेलकट कोट घातलेला एक हडकुळा इसम चाळीत शिरला. आणि सवयीनुरूप व गरजेनुरूप ‘दोन मिनिटे मौन’ पाळण्यात पटाईत आमची चाळ, म्यूट केल्यासारखी क्षणार्धात शांत झाली.
आपल्या जाडजूड भिंगाच्या चष्म्यातून एकेक चेहरा स्कॅन करत , त्या अनोळख्या इसमाची करडी नजर माझ्यावर स्थिरावली.
हातामध्यल्या फाइलीमधून एक पांढरा लिफाफा काढून, माझ्या डोळ्यांपुढे नाचवत तो म्हणाला: ‘मी कोर्टाकडून आलोय. तुमच्या टोटली अन्कॉल्ड अँड अन्-वॉरंटेड डेरॉगेटरी रिमार्कमुळे क्रिकेट खेळाचे आणि पर्यायाने खेळाडूंचे मनोधैर्य खचते आहे, अशा तुमच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. संधी मिळेल तेव्हा बेजबाबदार विधाने करून, विघटनकारी कृत्यास खतपाणी घालण्याचा हा तुमचा मानस निश्चितच लोकशाहीपूरक नाही. तेव्हा या सगळ्या आक्षेपार्ह कृत्त्यास तुम्हाला सर्वस्वी जबाबदार धरून , तुमच्यावर कायदेशीर खटला का चालवण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी ही शो कॉज नोटीस आहे.’
तक्षणी; हर्षातिरेकाने किंचाळण्याची एक अनावर ऊर्मी मोठ्या मुश्कीलीने दाबून टाकत , महत्प्रयासाने चेहरा निर्विकार ठेवून मी मनातल्या मनात नाचू-बागडू लागलो.
आता फक्त - कोर्ट-कचेरीच्या अचानक पाठी लागलेल्या ससेमिर्यामुळे , तूर्तास संघाच्या नेतृत्वपदाची धुरा सांभाळण्यास मी असमर्थ असल्याचे पत्र संघमालकांस पाठवले म्हणजे झाले !
मी लिहणार असलेल्या पत्राच्या पहिल्या खर्ड्याची मनात जुळवाजुळव करत असतानाच, माझ्या हाताला धरून, मला बाजूला घेऊन तो सरकारी मनुष्य खाजगी सुरात कुजबुजला ,
‘ उर्फी नावाची कुणी अतरंगी षोडशा इथे कुठे तुमच्याच आसपास राहते का? एक समन्स त्यांच्यासाठीही आहे!’
***
पॅडी षटकारावर षटकार
पॅडी षटकारावर षटकार
कसली रावडी मॅच...मी तर क्लीन बोल्डच...सगळ्या यष्टया सपशेल आडव्याच...
शेवटीं एवढेच...
करील मनोरंजन जो थोरांचे
जडेल नाते प्रभूशी तयाचे
द सा - हौसला अफ़ज़ाई के लिए
द सा - हौसला अफ़ज़ाई के लिए बहोत बहोत शुक्रिया...!! प्रणाम!!
>>>> करील मनोरंजन जो थोरांचे
>>>> करील मनोरंजन जो थोरांचे
जडेल नाते प्रभूशी तयाचे... नमन !!