काय भयानक उन्हाळा आहे! सगळं वातावरण नुसतं कोरडं शुष्क, जरा ओलावा नाही कुठे! काहिली होतेय अंगाची, वारा आला तरी नुसत्या गरम गरम वाफा... बरं तर बरं, शाळेला सुट्टी आहे आत्ता. पण अमेय मात्र संध्याकाळच्या क्लासला जातो, पुढचं वर्ष दहावीचं आहे ना! सगळीकडे सारखा एकच घोष कानावर येतो 'हे वर्ष महत्वाचं', 'मार्क चांगले मिळायलाच हवेत'.
आज केमिस्ट्रीचा क्लास होता, अमेयनी पहिल्यांदाच लॅब बघितली ह्या क्लासमध्ये. शी, काय घाणेरडे वास होते एकेक. कसली कसली ऍसिड म्हणे. त्या काचेच्या भांड्यांमधून मोजूनमापून ओतायची, आणि गरम करायची. टिचरनी शंभर गोष्टी एकदमच डोक्यात कोंबल्या, अमेयच्या सगळंच काही लक्षात नाही राहिलं, काही तर मुळी समजलं सुद्धा नाही. काहीतरी केलं की म्हणे त्या ज्वाळांचा रंगही बदलतो. हा भाग अमेयला सॉलीड भारी वाटला. आज पहिल्यांदा जाणवलं, ज्वाळा काही नुसत्या लाल भडक नसतात तो चित्रकलेच्या वर्गात काढायचा तशा. कधी कधी त्या पिवळ्या, नारिंगी, निळ्या आणि चक्क हिरवट सुद्धा असतात. अमेयला चित्रं काढायची आणि त्याहीपेक्षा रंगवायची खूप आवड आहे. दाखवत नाही तो ही चित्र फारशी कोणाला, शंभर प्रश्नं विचारत बसतात लोक, म्हणून!
अमेयनी मुद्दामच क्लास घरापासून थोडा लांब निवडला आहे. तिथे बस जात नाही आणि रिक्षासाठी अंतर कमी आहे, म्हणजे आपोआपच वीसेक मिनिटं चालायला लागतं. ह्या क्लासमध्ये तो एकटाच जातो. तेच बरं; सारखं त्याला वेड्यात काढायला नको कोणी बाजूला. अमेयला खूप आवडतं, एकटं चालत जायला. रस्त्यात केवढं कायकाय बघण्यासारखं असतं, मनात आलं तर थांबून गंमत बघत जाता येतं. त्या गंमती बघतांना एकेक विचार येतात डोक्यात, कुठची कोण माणसं स्वप्नात बघावी तशी दिसतात. रस्ते आणि गावं सुद्धा अनोळखी असतात, पण आजूबाजूच्या गजबजलेल्या बकाल वस्तीपेक्षा खूपच इंटरेस्टिंग! बकाल म्हणजे काय, सगळ्या पडझड झालेल्या जुन्या बिल्डिंगी, एक जुनाट, वापरात नसलेली लाकडाची वखार आणि बाकी बहुतेक झोपडपट्टीच! वखारीच्या आवारामध्ये जुन्या, मोडक्या लाकडाच्या फळकुट्या, ढलपे, जुनी वर्तमानपत्रं, कापडाच्या चिंध्या अशा अनंत गोष्टी पडलेल्या दिसतात. कधीकधी त्या गोळा करून त्यांच्याचवर माणसं झोपलेली सुद्धा दिसतात. पण किती बकाल असला, तरी हा शॉर्टकट आहे ना, म्हणून कुठे रेंगाळण्यात वेळ गेला, तर अमेय ह्या रस्त्यानी झपाझप चालत जातो. कधीकधी क्लास संपून निघायला आजच्यासारखा उशीर होतो, काळोख झालेला असतो. अशा वेळी अमेयला वाटते थोडीशी भिती ह्या भागामधून जातांना. मोठी माणसं रस्त्यात भेलकांडत चालत असतात, आरडे-ओरडे, शिव्या... लहान मुलं आणि कधीकधी मोठ्या बायका सुद्धा रडत असतात, मग अमेयला अगदी एकटं वाटतं... मग तो मनातल्या मनात विचार करायला लागतो, खोल-खोल, गोलगोल फिरत असावं आणि थांबताच येऊ नये असं… त्याच्या डोळ्यापुढची दृश्यच बदलून जातात!
आज इथे कसला तरी उत्सव दिसतो आहे! काही ना काही असतंच दर दोन दिवसाआड. पण आज फटाके लावण्याएवढं काहीतरी मोठं आहे वाटतं. लहानशी पोरं फुलबाज्या हातात धरून धावताहेत, भुईनळे आणि सुदर्शनचक्र आहेत. काय दिवाळी आहे की काय ह्या लोकांची - भर उन्हाळ्यात? कल्पनेनी सुद्धा अमेयला हसू येतं. मोठमोठे अनार लावले आहेत भर रस्त्यात. अमेयची पावलं एकदम थबकतात. काय मस्त रंग दिसताहेत त्या अनारच्या फुलांचे! सूंss स्स्स्स करून एक बाण आकाशात उंच उडतो, त्याच्या मागोमाग दुसरा... तिसरा मात्र दहा-बारा फुटांवरच तिरपागडा जायला लागतो, त्या वखारीच्या कुंपणावरून पलीकडे जातो आणि जमिनीवर कोसळतो.... जुन्या पेपरांच्या ढिगाऱ्यावर! ते तत्क्षणी पेट घेतात, मोठमोठ्या ज्वाळा वरती झेपावायला लागतात. बाजूच्या काही कोरड्याठाण लाकडाच्या तुकड्यांना गिळंकृत करत.
अमेय त्या ज्वाळांचे बदलते रंग मंत्रमुग्ध होऊन बघतो आहे. पिवळ्या, नारिंगी, केशरी, गुलाबी, लाल मध्येच एखादी दिसता दिसता अदृष्य होणारी निळी किंवा अगदी हिरवट छटा! समोर दिसेल त्या वस्तूला लपेटून, गिळून, भस्मसात करून पुढे झेपावणाऱ्या त्या ज्वाळा. चांगलीच झळ जाणवते आहे. धूर कोंदतो आहे. अमेयला कळत नाही, हे खरं आहे का हा भास आहे? तो आजूबाजूला बघतो, हे घर तर नाही, शाळाही नाही... एव्हाना कोणीतरी त्याला हसतं, काही तरी टोमणे मारतं, टिंगल करतं... तसं का नाही होत अजून? म्हणजे हे खरं असणार, नाही? मग बाजूची फटाके लावणारी मुलं कुठे गेली? रस्त्यात स्वैपाक करणाऱ्या बायका, जथ्यांनी उभं राहून विडी फुंकत असणारी माणसं... सगळे गेले कुठे? आहे कुठे तो? सगळीकडे नुसता काळा-करडा धूर, आणि मोठमोठ्या ज्वाळा! त्याला चांगलीच धग जाणवते आहे. सगळीकडे नुसता रंगांचा कल्लोळ, त्याच्या अंगावर चाल करून येतो आहे, आणि तो एकटा! आता मात्र अनावर होऊन तो जोरात ओरडायला तोंड उघडतो, पण आतून आवाज बाहेर येण्याऐवजी बाहेरचा धूर घशात जातो आणि जोरजोरात खोकत तो खाली पडतो.
हे काय... आगीच्या बंबाच्या सायरनचा आवाज? का नुसताच भास? खरंच येत असेल बंब? वेळेत पोचेल? त्यांना दिसेन मी? माझा आवाज जाईल ऐकू त्यांना?
कोणीतरी वेड्यात तरी का काढत नाही अजून?
(समाप्त)
आईशप्पथ
आईशप्पथ
किती टचिंग!
.
लिखाण छान
आई ग्ग... एकदम अनपेक्षित शेवट
आई ग्ग...
एकदम अनपेक्षित शेवट
अनपेक्षित शेवट !
अनपेक्षित शेवट !
शेवट नाही आवडला..
शेवट नाही आवडला..
ओह!
ओह!
अनेक धन्यवाद! शेवट 'अनपेक्षित
अनेक धन्यवाद! शेवट 'अनपेक्षित', किंवा 'आवडला नाही' प्रतिक्रियांसाठी, केवळ कुतूहलापोटी - मग कसा अपेक्षित होता? किंवा काय आवडलं नाही ह्याचीही चर्चा आवडेल
नवीन हौशीलेखक
नवीन हौशीलेखक
४ भाग एकदम वाचले, खूप छान लिहिली आहे.
शेवट थोडा अस्वस्थ करणारा होता (inception सारखा )
Sixth sense ची पण थोडीशी आठवण झाली
अमेय ला कुणीतरी समजावून सांगणार भेटायला हवं होत
बापरे!!!
बापरे!!!
अनपेक्षित शेवट.
अमेय मधे काहीतरी शक्ती आहे, ती जाणून त्याचा आणखींन कुठेतरी उपयोग होईल असं वाटलं होतं.
अगदी, आणि म्हणूनच शेवट आवडला
अगदी, आणि म्हणूनच शेवट आवडला नाही.
अरे रे
अरे रे
बिचारा. शक्तीची जाणीव देखील झाली नाही.
मला वाटले जाणीव होईल, एखादा गुरू लाभेल त्याला.
शक्ती ताब्यात ठेवून कशी वापरायची हे कळेल.
अर्थात सुखांत हवा ही आपली इच्छा, नियती च्या मनात वेगळीच चक्रे.
प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद!
प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद! हो, जादुई सकारात्मक करता आली असती; पण माझ्या मनात सुरुवातीपासून ती इन्सेप्शन सारखी फॅंटसीच होती.
आवडला नाही' प्रतिक्रियांसाठी,
आवडला नाही' प्रतिक्रियांसाठी, केवळ कुतूहलापोटी - मग कसा अपेक्षित होता>>
मला क्लायमॅक्स laa अशोक समर्थांची entry आवडली असती..
त्याने त्यांची टीम जॉईन केलेली पण
जबरदस्त रंगवली आहे. मी चौथा
जबरदस्त रंगवली आहे. मी चौथा भाग शेवटचा आहे हे आधी पाहिलेले होते त्यामूळे पहिले तीन भाग वाचल्यावर पुढचा भाग शेवटचा असल्यामूळे शेवट काय असण्याची शक्यता आहे ह्याची कल्पना अंधुकशी आली होती. (प्रसंग नाही तर कसा असू शकेल ह्याची) पण त्याला इलाज नाही.
अजून वेगळा शेवट केला असता तर हा भाग शेवटचा ठरला नसता
नानबा, अशोक समर्थ काय करणार ह्यात कथेमधे ? अशा प्रकारच्या घ्टनेमधे त्यांचा हस्तक्षेप असलेले पटकन आठवत नाही.