अमेय - भाग १

Submitted by हौशीलेखक on 19 March, 2024 - 21:59

'नेहमीचं आहे हे हिचं. फालतू गोष्टींवरून कटकट करत बसायचं, आईचं डोकं खायचं आणि मग निघायला उशीर होतो. धावत धावत जाऊन कशीतरी बस गाठायची.' घरातून बाहेर पडतांनाच अमेयच्या डोक्यात विचार चालले होते. त्याची धाकटी बहीण मेघा आज काही नाही तर लंच बॉक्स कुठच्या रंगाचा न्यायचा ह्यावरून हट्ट करत बसली होती. 'जेमतेम शाळेत जायला लागली नाही तर एवढे नखरे तिचे, उद्या मोठी झाली की काय ताप देईल' - उगाच नाही आई-बाबा बारा वर्षाच्या अमेयला आजोबा म्हणत! असलेच काही तरी खुळ्यासारखे विचार करत तंद्री लागलेली असते त्याची. त्याच्या वर्गातली मुलं सुद्धा त्याची टिंगलच करत, शिक्षक खोचकपणे टोमणे मारत. आता सुद्धा तो वर्गात जाऊन बसला खरा, पण डोक्यात चक्रं चालूच. पहिलाच तास फिजिक्सचा - मास्तर काहीतरी रटाळ बडबडत असतात - गतिमान वस्तूबद्दल.

गती म्हणजे स्पीड, नाही? अमेय विचार करायला लागतो, एकातून दुसरा... खोल खोल जायला लागतो. गरगरा गोल फिरत असावं आणि थांबताच येऊ नये असा. मेघाच्या शाळेची बस कोपऱ्यावर थांबते, आपल्या घरातून तिथे पोचायला एक छोटा रस्ता, कॉलनीतलाच झाला तरी काय, क्रॉस करावा लागतो. मेघा धावत सुटलीय, रस्ता क्रॉस करतांना नीट बघत सुद्धा नाही - सगळं लक्ष त्या उभ्या असलेल्या बसवर, चुकली तर शाळा बुडणार, आई-बाबा रागावणार. बाजूच्या रस्त्यावरून तो नुकताच गाडी चालवायला शिकलेला मुलगा, बापानी एवढी छान नवी गाडी घेऊन दिल्येय. ती थेट इंडी ५०० मध्ये चालवायला निघाल्यासारखा सुसाट येतोय. त्याच तरी लक्ष आहे कुठे. ही कॉलनी आहे, लहान मुलं असतात - कशाचं काही नाही त्याला. तो आणि त्याचा तो भन्नाट रेडिओ! बस थांबल्येय. ड्राइव्हर मेघाला खूण करतोय 'चला लवकर' म्हणून. मेघा आणि बस, यांच्यामध्ये फक्त तो एक छोटा रस्ता - ती फुटपाथवरून उडी मारते, गाडी भलतीच वेगात येते आहे. अमेय डोळ्यापुढचं हे दृष्य बघत थिजून गेला आहे, त्याचा श्वास रोधलेला... नकळत त्याचे हात डोकं गच्च दाबून धरतात. त्याची किंकाळी त्या गाडीच्या ब्रेक्सचा आवाज खाऊन टाकतो.

' वा वा वा!, आमचे न्यूटन साहेब आज शरीराने तरी वर्गात आहेत! मनाने बहुतेक अजून सफरचंदाच्या बागेत असतील, डोक्यावरचं टेंगूळ चाचपत - ह्या: ह्या: ह्या:' त्याच्याजवळ येऊन बोलणाऱ्या मास्तरांचा चिरका उपरोधी स्वर सुद्धा अमेयला सुखावह वाटतो, भानावर आणणारा दिलासा देतो. आजूबाजूची मुलं फिदीफिदी हसत असली तरी त्याला त्याचं काही वाटत नाही, तोही अर्धवट आनंदानी हसतो. चला, हाही भासच होता तर! मेघा काय खरोखर त्या गाडीखाली येणारबिणार नव्हती हे महत्वाचं. उगाचच काहीतरी डोकं भरकटत बसतं आपलं.

शाळा सुटल्यावर घरी जातो, तर चार बायका जमवून त्याची आई मोठ्ठाले डोळे करून आणि हातवारे करून काहीतरी कहाण्या सांगत असते '... मी म्हणते, एवढ्या महागातल्या गाड्या द्याव्यात कशाला अशा तरुण पोरांना!'. त्याला बघितल्यावर एकदम थांबते, आणि विचारते 'काय रे? आज उशिरा गेलास वाटतं शाळेत?'. त्याला काहीच कळत नाही, गोंधळून तो म्हणतो 'नाही! उशिरा का, अगदी वेळेत गेलो.' आई म्हणते 'हुं:! मेघा म्हणाली ती बससाठी धावत असतांना तिनी तुला बघितलं... असं तिला वाटलं.' आणि परत त्या बायकांकडे वळून बोलायला लागते.

त्या दिवशी सकाळी, झाडावर आदळलेल्या गाडीच्या शेजारी, रुपेश प्रधान त्याच्या बाबांना आणि पोलिसाला पुन्हा पुन्हा एवढंच सांगत होता 'नाही हो, खरंच सांगतोय! मी अगदी व्यवस्थित चालवत होतो, स्पीड लिमिटमध्येच; पण त्या लहान मुलाची ती किंकाळी एवढ्या जोरात ऐकू आली ना, की मी पार दचकलो आणि कंट्रोलच गेला माझा गाडीवरचा... ब्रेक्स दाबले मी जोरात, पण कदाचित स्किड झाली असेल गाडी. नाही, मुलीचा नाही, आवाज नक्की मुलाचाच होता. हो माहित्येय, ती लहान मुलगी येत होती रस्त्यात, पण ती थांबली वेळेतच. कदाचित त्या स्कुलबसमधला एखादा पोरगा असेल!'.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान