भुरा - शरद बाविस्कर - मयूरेश चव्हाण कृत परिचय

Submitted by भरत. on 19 March, 2024 - 08:41

.‘व्यवस्था सगळ्यांना समान संधी देत नाही, ती कधीच शंभर टक्के न्याय्य वा पारदर्शक नसते.’ किंवा ‘व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे मात्र तिचे निरंकुश होणे म्हणजे स्वातंत्र्यावर टाच’ या केवळ लेखकाची उक्ती अथवा कथन नसून अनुभव आहे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शिक्षणाबाबतची उदासीनता भुरा या पुस्तकातील काळाशी तुलना करता सध्याला अधिक गंभीर आहे. आजही यातून कोणी अग्निदिव्य देऊन बाहेर पडला तर तो इतरत्र अडकावा म्हणून अनेक गंड त्याची पाठ सोडू शकणार नाहीत अशा पुढच्या व्यवस्था आहेत. कितीही वाचायची आवड असली तरी तशी व्यवस्था आजही फार कमी नशीबवंतांना उपलब्ध आहे. हे कमी म्हणून की काय स्वाध्याय, बैठका, सत्संग अशा काळाच्या चौकटीवर तावून, सुलाखून पडलेल्या प्रो पद्धती आहेतच. आज कॉन्व्हेन्ट शिकून थोडे आयुष्य बदललेल्या पिढीसाठी न्यू सद्गुरू आलेत तेही यातलेच. मी ही स्वाध्याय नावाच्या कल्ट मागे लागून आयुष्यातली काही वर्षे खर्च करून बसलेलो आहे. बामणी व्यवस्थेचे कसले ना कसले जोखड तुम्हाला सतत वाहावेच लागते. त्यातून सहज सुटका नाही. व्यवस्थेविरुद्ध लिहिताना लेखक यशापयशाची तुलना करीत व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ घटक अशी मांडणी करतो ती अत्यंत योग्य आहे. ‘माणसाने जीवन तर्कानुसार न जगता न्यायानुसार जगायला पाहिजे’ पुस्तकात हे लेखक सांगत असतो तेव्हा व्यवस्थेला तर्कानुसार न चालवता न्यायाने चालवावी लागते याची प्रचिती येते.

भारतात श्रमाला मोल नाहीत कारण श्रमाला दैवी रूप दिले गेले आहे. याचीच जाणीव होऊन लेखक बुध्दीच्या प्रांतात शिरायचा विचार करतो. दहावीची ऑक्टोबर परीक्षा देऊन. हा निर्णायक क्षण असतो. कुणाच्या आयुष्यात चाळिशीत पण येईल.. कुणाच्या कधीच नाही. या प्रांतात जायला तुमच्याकडे दोन गोष्टी हव्यात, एक. जात, जी बहुसंख्यांकडे नसते. दोन. शिक्षण, जे बहुसंख्यांना सोपे नसते. लेखकाला तेव्हा शिक्षणाचा मार्ग उपलब्ध होता. तो खूपच खडतर होता. आता त्याहून अधिक खडतर झाला आहे. तो दिवसेंदिवस अजून कसा अरुंद होत जाईल यावरच काम सुरू आहे.

शिवाय या अठरविश्र्वे दारिद्र्य असणाऱ्या घरांत देवधर्माच्या नावाने काही गंड बाळगणे स्वाभाविक आहेत. बरेचदा ते जातीय असतात, प्रांतीय, भाषिक असतात. म्हणजे इंग्रजी कशी परकीय भाषा. केवळ संस्कृत महान. हिंदीच खरी राष्ट्रभाषा. अशी बरीच उदाहरणे देता येतील. लेखकाचा शाळेच्या सुरुवातीचा इंग्रजीबाबतचा इग्नोरंस अगदी रिलेट होण्यासारखा आहे. लेखक वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच अंतर्मुख होतो, स्वः’चा अधिक शोध घेतो, सलग काही तास वाचन, लेखन करायची ताकद कमावतो ते वाचून लेखकाबाबत आपला आदर दुणावतो.

“अन्यायाची भावना आणि अन्यायाचं आकलन यातील अंतर शिक्षणाने कापता येतं!” पुस्तकातील हे वाक्य फारच भावले आहे. कदाचित ज्यांच्या आयुष्यात कधी लहानपण आले नसेल अशांना फार लवकर समजत असावं हे वाक्य. शिवाय हे अंतर कापायला शिक्षण आणि अनुभव हेच टूल नेहमी उपयोगी पडतात. तुम्ही स्वतःला जितके स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजत, तपासत राहता तितका हा भेद जास्त कळू लागतो. त्याने नोकरी आणि धंद्यात बरीच गणिते सोपी होत जातात. एकूणच जगण्यातील निरर्थकता उमगुनही ध्येनिश्चिती आखता येते असं मलाही वाटतं.

‘वयाच्या तिशीत पोहोचून हे घोडे अजूनही शिक्षण करीत आहेत?’ असे कुजकट शेरे JNU प्रकरणानंतर जोमाने पसरू लागले होते. तसे त्यात नावीन्य नाही, मात्र त्याचा मारा इतका होता की गंड जोपासून जगणाऱ्यांची असूया त्यावेळी भयंकर टोकावर होती. याच दरिद्री विचारसरणीला सणसणीत चपराक लावायचे काम भुरा करतं!

भुरा वाचावी. अनंत अमुची ध्येयासक्ती किंवा प्रयत्न वाळूचे कण रगडीता या गोष्टी फार बेगडी लेबल वाटतात. भुरा ते शरद हा सोपा प्रवास नाही, अवघड आहे अशक्य नाही. या प्रवासाला केवळ प्रयत्नवादी, आशावादी लेबल लावून टाकणे मला तरी योग्य वाटत नाही. हा प्रवास व्यवस्थेविरुद्ध केलेले बंड म्हणून पहावा. तेव्हाच त्यातला ज्वलंत संघर्ष आपल्याला दिसू शकेल. त्यासाठी आपल्यालाही हे जगणं, समाज, भूतकाळ अशा सगळ्याचीच जाण हवी.

जेएनयू प्रकरण एव्हाना सगळ्यांना बऱ्यापैकी ठाऊक झाले आहे. लेखकाने त्या हल्ल्याचे अधिक वार्तांकन न करता तेथपर्यंत परिस्थित का पोहोचली आणि मुळात जेएनयू का आहे? यावर जास्त भर दिलेला आहे, ते अधिक भावलं. जेएनयू शोषित, वंचितांसाठीच नाही तर बाई’साठी अधिक आहे. अशा वटवृक्षाच्या असंख्य फांद्या फुटाव्यात नवे वट जोमाने उभे व्हावेत या ऐवजी त्यांना छाटायाचे काम जोमाने चालू आहे. नुकतेच एका प्रोपागंडा चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. दुर्दैवाने हा केवळ योगायोग नाही.

भुरा वाचून संपली आणि एक फेसबुक पोस्ट नजरेसमोर आली. रेल्वेत फेरीचा व्यवसाय करणारी एक वयस्कर बाई मुलाला नीट शिकवता आलं नाही म्हणून नातवांना शिकवते आहे. एक नातू शिकून हाताशी येईल अशा परिस्थितीत आहे. तिचं तत्वज्ञान साधं आहे. “माझ्याकडे शिक्षण नाही, ठीक आहे. लेकाला शिकवीन, नातवांना शिकवीन, कुणालातरी शिकवीन. माझा बाप बाबासाहेब जे बोलला ते खरं करून दाखवीन!” आणि या जिद्दीने ती आयुष्यभर काबाडकष्ट करीत ध्येयापासून हटत नाही. बरं ही एकटीच आहे अशी? तर नाही! असंख्य आहेत. त्यांची संख्या जास्त असावी की कमी हा प्रश्न हृदयावर वस्तरा फिरावा इतका गहन आहे. बाबासाहेब समाजाच्या तळात भिनलेच या अशा बायांमुळे. यांच्यामुळेच समाज अजूनही किमान जागेवर आहे. यांनी घडवलेल्या पिढ्या सध्याला कस्पटं असतीलही पण तोच या बामणी व्यवस्थेतून सुटण्याचा राजमार्ग आखणार आहे.

-मयूरेश चव्हाण, मुंबई.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> “अन्यायाची भावना आणि अन्यायाचं आकलन यातील अंतर शिक्षणाने कापता येतं!”
हे वाक्य आता माझ्यापाशी सदैव राहील.
पुस्तकही विशलिस्टमध्ये टाकते आहे.

काही वाक्यं नीट कळली नाहीत, उदा. :
>>> जेएनयू शोषित, वंचितांसाठीच नाही तर बाई’साठी अधिक आहे

>>> (मयुरेश चव्हाण यांनी लिहिलेला आहे का हा परिचय?)
हो - मलाही ते शेवटी लक्षात आलं - तसा उल्लेख शीर्षकातच करता येईल का?

चांगलं आहे हे पुस्तक. मागे आलं तेव्हा वाचलं होतं. फारशी कुणी दखल न घेता अनंत काळासाठी दुकानांत, गोदामांत, लायब्रऱ्यांत पडून राहिलसं वाटलेलं. पण राहिलेलं दिसतंय बऱ्यापैकी सर्क्युलेशन मध्ये/चर्चेमध्ये. लेखकाचा उत्तम ॲकेडमिक प्रवास हे एक लक्ष वेधून घेण्याचं कारण असावं.
अवांतर :
अर्थात, हे ज्या भाषेत लिहिलं गेलंय, त्या भाषेमध्ये सगळी मिळून वाचकसंख्याच पाव टक्के अशी अफाट असल्यामुळे, ह्यावर ज्या काही चर्चा झाल्या असतील/नसतील, त्यातर ०.०१ टक्क्यांमध्येच झाल्या असण्याची जाणीव होऊन बॅक टू नॉर्मल आलो.
बाकी, लेखकाची जी वैचारिक लाईन आहे, ती माझ्या ओळखीची आहे, कारण त्याअंगाने आजवर काही कमी लिहिलं गेलेलं नाही.
हे आत्मकथन आहे म्हटल्यावर क्रिएटिव्ह लिहिण्याला मर्यादा येत असणार.‌ पण त्यामुळे होतं असं की ह्यात जी वैचारिक लाईन मांडलेलीय, ती वाचताना मॅनिप्युलेटिव्ह वाटण्याची शक्यता निर्माण होते. तसं वाटण्यात लेखकाचा दोष किती आणि या काळाचा दोष किती, हा मुद्दा अजून वेगळाच.

अलीकडे हिंदीमध्ये मिथिलेश प्रियदर्शीचं 'लोहे का बक्सा और बंदुक', शशिभूषण द्विवेदीचं 'कहीं कुछ नहीं', आशुतोष भारद्वाज यांचं 'द डेथस्क्रिप्ट', अविनाश मिश्र यांचं 'नये शेखर की जीवनी', चंदन पांडेय यांचं 'वैधानिक गल्प', पुरूषोत्तम अग्रवाल यांचं 'नाकोहस' ;
तसंच मराठीमध्ये मृद्गंधा दिक्षित यांचं 'करुणापटो', संग्राम गायकवाड यांचं 'मनसमझावन' अशी काही पुस्तके आली आहेत. हे लेखक बाविस्कर यांच्यासारखेच आजच्या पिढीतले आहेत. पण वरील लेखकांनी आपापल्या पुस्तकांत वैचारिक लाईन मांडण्यासाठी जे भन्नाट प्रयोग केले आहेत, ज्या अफलातून स्ट्रटेजी वापरल्या आहेत, त्यामुळे ही पुस्तकं सरस वाटली मला. अतिशय आवडली.
बाकी, बाविस्कर यांच्या विरुद्धची जी वैचारिक लाईन आहे, त्याअंगानं लिहिलेल्या पुस्तकांबद्दलही हे लागू पडावं अशी आशा आहे, म्हणजे मॅनिप्युलेटिव्ह नसावं, लेखकांनी मन थोडं विशाल करावं वगैरे. कारण ते एक चांगल्या लेखकाचं लक्षण आहे.‌
पण सध्या तर ती फक्त आशाच आहे. कारण टायटलच एवढी भडक असतात, टारगेटेड वाचकांसाठी असतात, अंतिम सत्य गवसल्याच्या घोषणेसारखी असतात की आत काय आनंदीआनंद असणार हे कळतंच म्हणजे.‌ असो.

'‘माणसाने जीवन तर्कानुसार न जगता न्यायानुसार जगायला पाहिजे'
“अन्यायाची भावना आणि अन्यायाचं आकलन यातील अंतर शिक्षणाने कापता येतं!” >> ही दोन्ही वाक्यं फार आवडली. सदैव डोक्यात ठेवली पाहिजेत.
परिचय थोडा विस्कळीत आहे, पण तो रॉ नेस, भावनांचा ओघ फार आवडला. पुस्तक मिळवुन नक्की वाचेन. ओळखीसाठी धन्यवाद.

पुस्तक वाचून केलेल विचारमंथन, रोचक वाटले.
-----------------
बाप रे! आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली, शरद बाविस्कर यांची मुलाखत मस्त वाटली.
- One is relevant so long as one thinks
- झिजुन मरेन पण थिजुन मरणार नाही
- आयुष्य हे एक आव्हान आहे, जितके लवकर स्वीकाराल, तितके चांगले.
- झिजायचे तर आहे, संघर्ष तर आहे पण त्या श्रमाला, दिशा हवी.
- आपल्या आयुष्यातून आपणच एक सुघड लेणं कोरायचं असतं.
- भाषा शिकण्याची सुरुवात असते अंत नसतो! Language is an aesthetic object. .................................. क्या बात है!!
- शब्दकोषामधले हडकुळे, कुपोषित शब्द जेव्हा साहित्यकृतीमध्ये येतात तेव्हा ते धष्टपुष्ट बनतात. ...........................अति सुंदर!!!
- We are not perfect, but we are perfectable, and perfectability is more than perfection.
- शिक्षणाला फक्त उपयुक्ततामूल्य नसतं तर त्या शिक्षणातून आपल्या मेंदूची काय जडणघडण झाली की मी समाजात relevent राहू शकलो ... अर्थपूर्ण रहाणे.

समृद्धी म्हटली की - Cultual capital, linguistic capital अर्थात सांस्कॄतिक , भाषिक भांडवल जे की इतिहासदत्त घटक झाले , काही काही व्यवस्थादत्त घटक झाले, काही व्यक्तीनिष्ठ घटक (उदा - निसर्गदत्त चैतन्य, व्हायटॅलिटी) ....... असे काही मुद्दे, या मुलाखतीत आलेले आहे. निदान, उभे रहायला जागा देणे अथवा नाकारणे हा झाला व्यवस्थादत्त घटक आणि एकदा तशी जागा मिळाल्यानंतर, स्वतःला, जगाला पालटवुन टाकणे हा झाला व्यक्तीनिष्ठ घटक.
-------------------------
प्रचंड वैचारिक झेप आहे. नाडकर्णी यांनी इतकी सुंदर facilitate केलेली आहे ही चर्चा.

अवांतर -

संप्रति इथे पुस्तकांची यादी दिल्याबद्दल आभारी आहे.

नाकोहस की कहानी मुख़्तसर सी है. एक कॉलेज के अलग अलग धर्मों के तीन प्रोफ़ेसर दोस्त जो धर्मनिरपेक्ष हैं, मुखर हैं और लगातार साम्प्रदायिक ताक़तों के ख़िलाफ़ हैं, सत्ता के एक गोपनीय संगठन नाकोहस यानी नेशनल कमीशन फॉर हर्ट सेंटीमेंट्स द्वारा गिरफ़्तार किये जाते हैं, उनका उत्पीड़न होता है और फिर उन्हीं हालात में चेतावनी के साथ उन्हें वापस छोड़ दिया जाता है.

नाकोहस सापडली.
वाचते आहे. जबरदस्त प्रतिकांमधुन लेखक व्यक्त झालेला आहे. पण अगदी नीट वाचावी लागेल.

मयूरेश चव्हाण यांनी 'भूरा' पुस्तकाच्या शेवटच्या जेएनयू भागाबद्दल लिहिलं आहे तो भाग संपूर्ण पुस्तकांतून वाचला पाहिजे. शरद बाविस्करांनी इंग्रजीत एमए आणि फ्रेंच तत्वज्ञानात एमए हे पुस्तकं वाचून साध्य कसं केलं हा भाग वाचनीय आहे. ( एकूण सहा विषयांत एमए). नोव्हेंबर २०२३ मध्ये मी वाचलेलं पुस्तकमध्ये लिहिलं होतं.
(पुस्तक वाचल्यावर शरदना इमेल केला होता त्याला त्यांनी उत्तरही पाठवलं होतं.)

लेख आवडला.
शेवटचे दोन परिच्छेद आवडले संप्रति.

माणसाने जीवन तर्कानुसार न जगता न्यायानुसार जगायला पाहिजे'>>>> रोजच्या वैयक्तिक आयुष्यात तर्क आणि सामाजिक आयुष्यात न्याय असं वर्गीकरण जास्त ॲप्ट वाटतं.

“अन्यायाची भावना आणि अन्यायाचं आकलन यातील अंतर शिक्षणाने कापता येतं!” >> स्वतः बाबत हे खरं आहे पण इतरांवर होणाऱ्या अन्यायाबाबत शिक्षणाला मर्यादा येतात. तिथं संवेदनशीलताच लागते. हे अर्थातच इथं लागू होत नाही.

तुम्ही स्वतःला जितके स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजत, तपासत राहता तितका हा भेद जास्त कळू लागतो.>>>>

कुठेतरी वाचले होते. Everybody is a little bit of homophobic , gay, racist, nationalist, castist, ethnocentric etc. ते अगदी मार्मिक वाटलं होतं/ पटलं होतं. आपला 'सेन्स ऑफ बिलॉंगिग' (किंवा आपल्या सारख्या लोकांनाच आपलं मानणं/ सतत साम्य शोधणं ) कदाचित उत्क्रांतीसाठी/ 'सेन्स ऑफ सेक्युरिटी'साठी आपल्याला आवश्यक असेलही पण नंतर तो वर्चस्ववाद किंवा गंडाच्या रूपातच केवळ उरल्याने आता त्याचं काय करायचं कळत नाही. तो मुळापासून जातही नाही, पर्यायाने संपूर्ण निर्व्याज स्विकार वगैरे करताच येत नाही. आपण आपले प्रिव्हिलेजही सरळपणे कबूल करत नाही. याच्यावर विचार करूनही उत्तर सापडले नाही.

स्वाती, जेएनयू शोषित, वंचितांसाठीच नाही तर बाई’साठी अधिक आहे ; म्हणजे ते शोषित , वंचितांसाठी जितकं आहे, त्यापेक्षा काकणभर अधिक बायकांसाठी आहे.
जे एन यू मध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेत मुलींना सरसकट ५ deprivation points मिळत. मागास जिल्ह्यांतून येणार्‍या इच्छुकांना ३ ते ५ पॉईंट्स असत. मध्ये ही पद्धत बंद झाली होती. पुन्हा सुरू होणार होती.

Jnu विषयी किती जणांना अद्ययावत माहिती असते? आपण सर्व कुणी जेएनयू वरचे लेख वाचून मत बनवत असतो.
पुस्तकातल्या किस्सा चांगला आहे. ( एसटी बसमधल्या कंडक्टर आणि बाविस्कर यांचे संभाषण.)

धन्यवाद भरत आणि सामो! मला आज हे परीक्षण वाचायची आणि शरद बाविस्कर यांची मुलाखत ऐकण्याची खरोखर गरज होती. हे मराठीत कसे व्यक्त करावे ते न कळल्याने I needed to hear this today याचे शब्दशः भाषांतर केले आहे .

मयूरेश हा एक चांगला लेखक आणि कवी म्हणून मला महिती आहे. तो आता मायबोलीवर का नाही?

भूराबद्दल आणखी लिही मयूरेश, तू जास्त अर्थपूर्ण आणि महत्वाचं लिहू शकतोस.

आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली शरद बावीस्कर यांची मुलाखत बघायला घेतली, मला सलग बघता येत नाहीये, त्यामुळे दोन तीन दिवस थोडी थोडी बघेन . भुरा वाचायला हवं.

इथे दिल्याबद्दल धन्यवाद भरत. छान परिचय.
'भारतात श्रमाला मोल नाहीत कारण श्रमाला दैवी रूप दिले गेले आहे' >> हे कळलं नाही. श्रमाला दैवी रूप म्हणजे?

म्हणजे (बहुधा) श्रम ही service ठरवून ती glorify केली गेली की तिचं वाजवून मोल मागता/घेता येत नाही.
उदाहरणार्थ चूल आणि मूल यांतच बाईच्या जीवनाचं सार्थक आहे असं एकदा बिंबवलं की फुकट आणि thankless राबणाऱ्या बायांच्या पिढ्याच्या पिढ्या तयार करता येतात.

हरचंद पालव, जात्याधारित श्रमविभागणीबद्दलही असं म्हणता येईल. गांधींनी मैला उचलण्याच्या कामाचं ग्लोरिफिकेशन केलं. ( ते सगळ्यांनी करावं अशी त्यांची अपेक्षा होती. )

नसे राउळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी

हे चित्रपटगीत म्हणून त्या प्रसंगात बघायला छान वाटतं ( मूळच्या बड्या घरातल्या नायकाला श्रमाचं महत्त्व पटवायला). पण ते पाठ्यपुस्तकात कविता म्हणून आलं तेव्हा मला फ्रॉड वाटू लागलं.

एकीकडे श्रमाला दैवी करायचे आणि एकीकडे श्रमाला प्रतिष्ठा नाही असा दुटप्पी मामला! एकंदरीत श्रमाचे योग्य मोल देणे टाळून व्यक्तीला आर्थिक पातळीवर दुर्बल करायचे आणि जोडीला परंपरेने करत असलेल्या कामाचे स्वरुप बघत सामाजिक उतरंडीवरचे तुमचे स्थान खालचे हा शिक्काही मारुन टाकायचा. मध्यंतरी फीड मधे एक विडीओ आला होता, मेट्रोत शेतकरी व्यक्तीला पैसे असून तिकीट काढून प्रवासास अटकाव केल्याचा. म्हणजे अन्नदाता म्हणत शेतकर्‍याच्या श्रमाला दैवी करायचे आणि वर सामाजिक पातळीवर धुत्कारायचेही.

मला शरद बाविस्करांचे https://www.youtube.com/watch?v=E-zrV4bJo-o इथे मांडलेले विचार आवडले.
>>दहा वर्षांत पाच भाषा शरद शिकू शकले ते सर्वांनाच जमेल का?>> या बद्दल त्यांनी या वरच्या दुव्यात तेच म्हटले आहे की इतक्या भाषा शिकणे हे अ‍ॅप्टिट्यूडचा भाग झाला, ती प्रत्येकाकडे असेलच असे नाही.

धन्यवाद भरत, पुस्तक परिचयाबद्दलची माहिती दिल्याबद्दल...

सामो तसेच स्वाती२ - मुलाखत बघितली, आवडली. बरेच काही शिकायला मिळाले.