बंगाली माणूषटी : सुजन वाचमन

Submitted by ASHOK BHEKE on 13 March, 2024 - 10:03

बंगाली माणूषटी : सुजन वाचमन
तळेगांव निलया सोसायटीच्या प्रांगणात गप्पा मारीत बसलो असताना नव्या वाचमेन वर नजर खिळली. त्याला न्याहाळीत राहिलो. कपाळाला ढिगभर आठ्या. काटकुळा आणि खप्पड गालाचा. चेहरा ओबडधोबड म्हटल्यावर, हसणं दूरपर्यन्त सबंधित नसलेली एकूण स्थिती पाहता हा माणूस चिडखोर आणि आमार बांगला सोनार बांगला असावा अशी डोक्यात टिमकी वाजली. खरोखर तो पश्चिम बंगालच्या शांतिपूर मधला मानुषटी अर्थात एक भला माणूस. नांव त्याचं सुजन. मनात आले हा बंगालच्या वाघिणीचा भक्त असावा. म्हणून सहज ममताविषयी गौरवाचे शब्द त्याच्यापूढे फेकले. सोबत दहाव्या माळ्यावरचे श्री पारंगे देखील होते. ममताचे गौरव शब्द ऐकून त्याच्या अंगात वीज संचारल्याप्रमाणे बंगाली बोलीत “नोही” म्हणत खिंकाळला. ममतादीदी वर भलताच नाराज होता.आमचा फावला वेळ कुणाला उपद्रव देण्याच्या हेतूने नव्हता. पण त्याने नोही या शब्दावर अकारण दिलेला भर पाहता सुजन हा भूतकाळात दडलेल्या गहन विषयाला वाचा फोडावी म्हणून प्रश्नांची सरबत्ती करून भंडावून सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. मग वाटले ममताविरोधी सीतराम येंचुरीचा नाहीतर अधीररंजन चौधरीचा समर्थक असावा किंबहुना बाबूल सुप्रियो पसंतीत उतरेल म्हणून त्यांची नांवे घेतली तरी तो आणखी चिडला. आतापर्यंत congress जनता दल भाजप या राष्ट्रीय पक्षांनी राजकीय स्वार्‍या करून देखील कधीही कब्जात न आलेले पश्चिम बंगाल आपली बंगाली अस्मिता जपणारे बंगाली लोक. पण सुजन हा कोणत्याना कोणत्या कारणास्तव नाराज होता॰ घरदार सोडून दूरवर त्याला पोटाची खाचखळगी भरायला यावं लागल्याने कदाचित त्यांच्या यंत्रणेवर नाराज होता. हा माणूस म्हणजे मिष्टी दोई सारखा अर्थात गोड दह्याप्रमाणे. मातीच्या मडकयामध्ये गूळ आणि दुधापासून तयार झालेल्या दहयाला मिष्टी दोई बंगाल मध्ये म्हटले जाते. बिगरबंगाली देखील अस्सल बंगाली बल्लव्वाचार्याच्या मुदपाकखाण्यात तयार झालेले रोशोगुल्ला किंवा रसमलाई मिठाई आणि मसालेदार, तिखट माश्याच्या कालवणाचे हौशी खवय्ये आहेत. गोलगब्बा म्हणजे पाणीपुरी हे कोलकत्यात खावे. बंगाली खाद्यसंस्कृतीला पूर्ण भारतात पसंती दिलेली आहे.
ही बंगाली माणसं म्हणजे घड्याळातील तासाच्या ठोक्याला कितीतरी वेळ पाहत राहून गेलेल्या तासाच्या आणि उरलेल्या तासाची गोळाबेरीज करणारी. वेळेवर येतील तसे वेळेवर जाणार हे ठरलेले असते. रोजगाराची वाणवा म्हणून निरुत्साही मनात नसताना कुटुंबाच्या खातर पश्चिम बंगाल मधून बाहेर पडून पोटाची खाचखळगी भरण्याला महाराष्ट्र हा कामधेनु प्रमाणे त्यांचे पोषण करतो हे त्यांना ठाऊक आहे. कष्टकरी असला आणि त्याला कामाची लाज नसेल तर छत्रपती शिवरायांच्या दख्खन भूमीच्या कुशीत कोणीही उपाशी झोपत नाही. बंगाली माणूस मुळात कष्टकरी आणि काटक आहेत. कोणत्याही कामाला ना नाही. श्रीरामास मानणार नाहीत पण दुर्गापूजा केल्याशिवाय अन्न भक्षण करणार नाहीत. जन गण मन राष्ट्रगीताचे जननायक रविंद्रनाथ टागोर, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आझाद हिंद सेनानायक नेताजी सुभाषबाबू बोस, आणि बंकिमचंद्र, सुकान्त भट्टाचार्य आदि साहित्यकांची छाप पूर्ण भारतभूमीवर पडलेली आहे. त्या पश्चिम बंगाल प्रदेशातून आलेला सुजनचे बंगाली बोलीतले ते शब्द लवकर कळत नाहीत पण त्या शब्दातील गोडवा अगदी मराठी भाषेशी कमालीचे साधर्म्य आहे. आपल्या राज्यापासून दुरावल्याचे दू:ख मनात साठवून दिवसभर एका जागी बसून येणार्‍या जाणार्‍या माणसाकडे पाहत अबोला धरून बसलेल्या बोलक्या माणसाला अगदी नळ गळल्याप्रमाणे आम्ही बोलका करून सोडला. अगदी निर्मळ मनाचा माणूस नव्हे बंगलीत मानुषटी म्हणतात. अडचणी आणि अपयश सर्वांच्या वाट्याला येते. पण धैर्याने जो उभा ठाकतो तो माणूस बंगालचा सुजन का असेना....
अशोक भेके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं……
बंगालची पाणीपुरी = पुचका