दोन रुळ

Submitted by काव्यधुंद on 12 March, 2024 - 23:13

रेल्वेचे दोन रुळ बरोबर चालतात नेहमी,
कदाचित सोबत वाटत असेल त्यांना एकमेकांची
इतक्या डोंगर दऱ्या, नद्या, वाळवंट एकट्याने पार करायची म्हणजे जरा अवघडच नाही का !!

मग वाटणारच गरज सोबतीची, कुणीतरी जवळ असण्याची
पण नुसता जवळ असून भागत नाही कारण एका रुळावर पडझड झाली तरी दुसऱ्याला त्याची झळ लागत नाही

एक रुळ झिजला तरी दुसरा तिथल्या तिथे असतो आणि एकाची उचलबांगडी होते तेव्हा दुसरा जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात नवीन रुळाला सोबत करायला लागतो

मग हा दुसरा रुळ म्हटला तर जवळ आणि म्हटला तर दूर
म्हटला तर कळवळा आणि म्हटला ते नुसताच धूर

असा हा दुसरा रुळ म्हटला तर जवळ आणि म्हटला ते खूप लांब
पण त्याची सोबत हवी म्हणून मिळत नाही आणि नको म्हणून सुटत नाही !!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults