सुजित नोकरीनिमित्त त्या शहरात आला तेव्हापासून तो एका पीजीमध्ये राहतो. पीजी म्हणजे जिथं नोकरी शिक्षणानिमित्त एखाद्या शहरात आलेली माणसं राहतात. जिथं तुम्ही चार जुजबी ओळखीच्या माणसांबरोबर राहणं जमवता.
माणसं येतात, राहतात काही काळ. मग निघून जातात. त्यांच्या जागी दुसरे येतात. जगण्याची ही अशी एक टेंपररी अवस्था असते. सुजितची दहा वर्षांपासून तशी ती आहे. गावाची आणि शहराची अशा दोन्ही पार्श्वभूमी असलेल्या त्याला कशाबद्दलही स्ट्रॉंगली काय वाटत नाही. पुस्तकांबद्दल वाटतं. पण तो ही सवयीचा भाग.
त्याचा विवाहसंस्थेवरचा विश्वास उडून किती वर्षं झाली? आणि आईबापाचा संसार बघूनच ते तसं झालंय का ? की पौगंडावस्थेत पेठे-महाजन वगैरे वाचून त्यानं डोक्यावर परिणाम करून घेतलाय? असे प्रश्न यासंबंधाने पडू शकतील परंतु ते गैरलागू आहेत. ज्या टप्प्यावर लोक घाईला येतात आणि काही कळेनासं झालं की पटकन लग्न करून टाकतात, त्या टप्प्यावर त्याला ते परवडत नव्हतं. आणि नंतर तर मग तो हळूहळू विसरूनच गेला. त्यानंतर मग स्वतःला म्हातारं होत जाताना बघण्याचा एक पर्याय उरलेला असतो, तो निवडतो माणूस.
पीजीमध्ये एकटेपणा ही तशी दुर्मिळच गोष्ट. सतत अनावश्यक आवाज निर्माण करण्याची सवय, हा या युगाचा धर्म झालेला आहे. त्यामुळे संध्याकाळ सुजित बाहेरच घालवतो बऱ्याचदा. एकटेपणातल्या एकटेपणाच्या गरजेपोटी तो हे करतो. त्याच्यामध्ये एकप्रकारची लंडफकीरी असावी असं मला वाटतं. दचकलात ना? हो म्हणा. उगाच खोटं वगैरे बोलू नका प्लीज. काहीच गरज नाही त्याची. ही जी दचकण्याची घटना नुकतीच घडून गेली आहे, ती तुमच्या-माझ्यातच राहिल, भरोसा ठेवा.
मी नाही सांगणार कुणाला. धंद्याचे उसूल पाळणारा मनुष्य आहे मी. ग्राहकांची गुपितं सुरक्षित राहतात माझ्यापाशी.
अर्थात सुजित हा काही माझा ग्राहक नाही. ते माझं पात्र आहे. मी त्याला हवा तसा घेऊ शकतो. नाही नाही, गैरसमज नका करून घेऊ. मी काही गे नाहीये. मी आपला असाच एक साधासुधा बायसेक्शुअल मनुष्य आहे. म्हणजे माझी रेंज तुमच्यापेक्षा जरा विस्तृत आहे. नैसर्गिकरीत्याच ते तसं आहे. इलाज नाही. खरं सांगायचं तर फायदाच आहे. मौजा ही मौजा, गाणं ऐकलंयत का? अगदी तसंच. जीवनात मौजच मौज असते. पर्यायांची विपुलता राहते.
म्हणजे पुरूष समजा फावल्या वेळात फेसबुकवर वगैरे जुन्या मैत्रीणींचं काय चाललंय याची चाचपणी करत असतील. किंवा स्त्रिया समजा अधूनमधून जुन्या बॉयफ्रेंड्सचा अदमास घेऊन बघत असतील. परंतु मी अशा वेळी कन्फ्युज होऊन स्क्रीनकडे बघत राहतो. की बाबा आता काय टाकायचं सर्चमध्ये? एकेकाळच्या त्या भयानक हॅंडसम मुलांची नावं टाकावी की मग चहुअंगांनी मस्त डवरलेल्या असण्याची शक्यता असलेल्या मुलींची?
देखा लापरवाही का नतीजा? तुम्ही आपले एवढ्या बिनधोकपणे हे वाचत चाललाय. आणि मी एखाद्या सोकावलेल्या बदमाशाप्रमाणे तुमचा गैरफायदा घेतो आहे. तुमच्या सौम्य कलात्मक जाणीवांशी छेडछाड करण्याचं पाप करतो आहे. अर्थात तसा स्कोप तुम्ही आपणहून मला देताहात, असा माझा नम्र दावा आहे.
अर्थात, तुम्ही समजा तो स्कोप मला दिलात तरी मी तो घ्यावा का? काय मला अधिकार? आणि घेतला तो घेतला, पुन्हा तोंड वर करून तुम्हालाच हे विचारतो आहे, म्हणजे मी काय तिय्यम दर्जाचा तोतया असू शकेन? याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून एक आपली सावधगिरीची सूचना नम्रपणे नोंदवून ठेवतो की कुठलाही मजकूर जपूनच वाचलेला बरा.
अर्थात तुम्ही नेट धरून इथपर्यंत वाचत आला आहात म्हणजे तुम्ही फारच चिवट आहात, हे दिसतंच आहे. आपल्या महान मातृभाषेत जे काही फुटकळ पाव टक्के वगैरे लोक वाचणारे उरले आहेत. त्यातले तुम्ही एक आहात. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. तुम्हीही माझं अभिनंदन करा. बाकी उर्वरित नव्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के लोकांना असंही कशाचं काही पडलेलं नाही.
तर नेहमीसारखाच संध्याकाळी सुजित बाहेर पडला.
"एवढी वर्षें गोरगरीबांची गांड मारल्याबद्दल धन्यवाद सुदानीजी" हा फ्लेक्स बघत बघत कॉफी शॉपमध्ये जाऊन बसला.
आजूबाजूचे टेबल्स बऱ्यापैकी कपल्सनी भरलेले दिसल्यावर त्याच्या लक्षात आलं की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. त्याचा अर्थातच अशा दिवसांचा काही संबंध उरलेला नाही.
त्यामुळे कोपऱ्यात तो आपापला बसलाय. थोड्या वेळाने एक मुलगी त्याच्या टेबलशी येते. आणि विचारते की मी इथं बसलं तर चालेल का?
तो किंडलमधून नजर वरती न काढताच बसा म्हणतो. तरीही आतल्या आत काहीतरी सळसळ झालेली असतेच. हे असं होतंच म्हणजे. नाकारण्यात अर्थ नाही. ती मोबाईलमध्ये रील्स बघतेय. बहुदा सायली राऊतचे रील्स असावेत.
या युगात यू ट्यूबर्स, कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स, इन्स्टाग्राम स्टार्स यांची लाट उसळून ओहोटीला लागली. परंतु यापैकी कशाचाही स्पर्श सुजितने स्वतःला होऊ दिलेला नाही. पंधरा सेकंदाच्या रीलमध्ये शेवटी किती आणि काय सांगणार माणूस? म्हणून सुजित ब्लॉग लिहितो. आणि तो स्वतःच ते वाचतो. काळं कुत्रं फिरकत नाही तिकडे.
कॉफी संपल्यावर तो उठायला लागतो. उठताना एक चोरटा कटाक्ष टाकतो. तिला ते कळणार नाही, अशा बेताने. परंतु अंदाज चुकतो. ती त्याच्याकडेच बघत असते. आरपार. एकदम दर्जा आहे. वादच नाही.
"डेंजर दिसतेय ना मी ?"- ती विचारते.
'मला काही म्हणालात काय?' - तो दचकून विचारतो. जणू आपला काही संबंधच नाही अशा स्वरात.
'इथे दुसरं कुणी आहे का?'- ती शांत स्वरात.
च्यायला काय्ये हे? तो मनातल्या मनात हडबडलेला.
"आवडलं तर सरळ बघावं. चोरून कशाला बघायचं?"- ती.
'नाही. नाही. खरंच तसं काही नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला तसं वाटलं असेल तर सॉरी.' - तो.
"मी नजरा ओळखते."- ती.
'तुम्ही कशाबद्दल बोलताय मला कळत नाही.' - तो.
"हे तुम्ही-तुम्ही म्हणायचं बंद कर. एवढीही काही मोठी नाहीये मी"- ती.
'मला हे झेपत नाहीये. काय प्रॅंक वगैरे चाललाय का इथे? काय पाहिजे तुम्हाला?'- तो.
"मी एक प्यासी डायन आहे. व्हॅलेंटाईन-डे ला मी शिकारीसाठी निघते. एकटे बसलेले पुरूष हेरते. तुझ्यासारखे कोवळे पुरुष तर मला फारच आवडतात."- ती डोळे बारीक करत.
'हे असं तुम्ही बोलू नाही शकत इथं.'- तो.
''मी कुठेही काहीही बोलू शकते. आणि तुलाही लाजायची काही गरज नाहीये. मी काही लगेच इथे तुझ्या पॅंटचा बेल्ट काढणार नाहीये." ती.
'अरे देवा..! तुम्ही जरा हळू बोलाल का प्लीज? '- तो.
'याउपर काहीही ऐकणं अशक्य आहे..! मी जातोय आता'
हे वरचं वाक्य मी बोलतोय. मी वरती सांगितलं होतं तुम्हाला की माझे काही उसूल आहेत. परंतु तुम्ही काही चावटपणा सोडायला तयारच नाही आहात. कमाल ए.
''अरे गोष्टी अशाच असतात रेss'' - ती म्हणते.
'असतीलही. पण मुळात तुझं भांडवलच तुटपुंजं आहे. त्यावर किती फुलवणार ना गोष्ट? आणि लव्हस्टोऱ्या लिहायला काय लहान आहेस का तू आता?
अगं, स्टोरीचा मूड कसा एकदम भकास असला पाहिजे. वाचून चांगलं नाही वाटलं पाहिजे. सगळा दिवस खराब गेला पाहिजे.
आणि उरली सुरली वाचणारी जनताही कायमची परागंदा झाली पाहिजे. ते आपलं अंतिम ध्येय आहे, हे विसरू नकोस.'
हाहाहा कठीण आहे. चावट
हाहाहा कठीण आहे. चावट वाचकांचे
परत एकदा वाचावी लागेल मला. पण
परत एकदा वाचावी लागेल मला. पण भारी वाटतेय
मस्त. शेवट संदिग्ध वाटला का
मस्त. शेवट संदिग्ध वाटला का मुद्दाम ठेवला आहे! असो. आवडली. हा नायक बायसेक्शुअल आहे तर याचा 'पार्ट टू' एखाद्या पुरुषासोबत येऊ शकतो. 'स्कोप' आहे.
तुमचं लेखन कळलं असं वाटतं पण
तुमचं लेखन कळलं असं वाटतं पण खात्रीने सांगता येत नाही खरचं कळलय म्हणून.
मस्त आहे!
मस्त आहे!
असे लिहीणार्यांना पुलंच्या संदर्भाचा खरे तर तिटकारा असलेला पाहिला आहे पण पहिल्या भागातील वर्णनावरून 'नाथा कामत' आठवला - त्याचे मुलींच्या मागे जाण्याचे वय उलटल्यावरचा.
भारी आहे - केव्हढा स्कोप आहे
भारी आहे - केव्हढा स्कोप आहे लिखाणाच्या रेंजचा !
फार वेगळ्या प्रकारची, छान
फार वेगळ्या प्रकारची, छान रंगवलेली कथा! आवडली.
धमाल लिहीलिये.
धमाल लिहीलिये.
सुदानी....
समजली नाही. त्यामुळे
समजली नाही. त्यामुळे तोंडदेखलं 'छान आहे' म्हणणार नाही.
(तुमचा नाथा कामत तर आमचा लखू रिसबूड )