जरा उशीरच झाला होता. चिनू उठायच्या आत सुप्रियाला अंघोळ आटपून घ्यायला हवी होती. लगबगीनं ती उठली.
आज तिनं सुट्टी काढली होती. अर्चनाच्या प्रीस्कूल म्हणा नर्सरी म्हणा वा डेकेअर, त्याला सुट्टी होती. डे-केअर वाल्या मावशी अचानक आजारी पडल्यामुळे जरा प्रश्नच होता. नशीब, आज शुक्रवार होता. शनिवार-रविवार पर्यंत होतील बऱ्या! चला, त्यायोगे लॉन्ग वीकेंड मिळालाय. सुट्टी काढलीच आहे तर दुपारी बरेच दिवस रेंगाळलेली घरची सफाई आणि इतर आवराआवर आटोपून घ्यायची असा तिचा मानस होता. चिनूचं वय आता असं होतं की हाती लागेल ते कपाट उघडायचं आणि मग मनसोक्त उचकापाचक करायची! जरा लक्ष नसलं की ती धावायची आणि कशात तरी हात घालायची. तिच्या या खोडीनं घर अस्ताव्यस्त असायचं.
नेहमी प्रमाणं उठून तिनं डब्याची भाजी करून ठेवली. पोळीवाल्या बाई त्यांच्या वेळेला येऊन गेल्या. पाठोपाठ मिलिंद डबा घेऊन कामावर गेला. मग तिनं चिनूला खेळवता खेळवता वरची शेल्फं आवरून घेतली होती. झाडूपोछावाली बाई यायच्या आत हा कार्यक्रम आटपणे महत्त्वाचं होतं. चला, त्यात बरीच घाण निघून गेली. आता जास्तीकरून आवराआवरच होती. मग चिनूचं आटपून घेतलं. चिनूला पाण्यात खेळत बसायला भारी आवडायचं. नेहमी सुप्रियाला घाई असायची. पण आज दोघींनी चिनूची अंघोळ खूप एन्जॉय केली!
ही वेळ चिनूची खेळण्याची होती. त्यामुळे ती फुल फॉर्मात होती. घरभर तिनं गोड हैदोस घातला. आज तिला अचानक आई मिळाली होती खेळायला. खेळण्यांचा कप्पा धडामकन ओढून अनेक खेळणी सांडली. मग या सगळ्यांशी खेळून झालं. या खोलीतून त्या खोलीत शिवाशिवी खेळून झाली. मग लपाछपी झाली. गादीवर, कोचावर उड्या मारून झाल्या. उशांचा घोडा घोडा करून झालं. ओरडाआरडी चालली होती नुस्ती... सुप्रियाही त्या खेळात मग्न झाली होती.
त्या दोघीच अशी वेळ कमीच यायची. कारण सासूबाई असायच्या घरी. दोन-एक महिने झाले असतील त्या नणंदेकडे होत्या, तिच्या बाळंतपणासाठी. त्यामुळे डे-केअर मागे लागलं, आणि आता अंगवळणी पडलं होतं. तशाही त्या एकट्या कंटाळायच्या. शेजारपाजार सगळा नोकरदार वर्ग. एकदा सकाळी आटपून कामाला गेले, की मग संध्याकाळी उशीराच उगवणार. दिवसभर मग शांतता... त्यांची मोठीच्या मोठी बिल्डिंग नवीनच झाली होती. बाराव्या मजल्यावर घर. गॅलरीसमोर अजून तरी काही नव्हतं. रस्ता ओलांडला की पाणथळ जागा आणि मग दूरवर खाडी. चांगलंच लांब पडायचं पण या दृष्यासाठी म्हणून तर हे घर घेतलं होतं!
खेळून खेळून चिनू थकली. आता थोडी फेकाफेक, रडणं सुरू झालं. तशीही तिची खायची वेळ झाली होती. मग बोबडगाणी गात, टीव्हीवर बालगीतांची सीडी लावून सुप्रियानं चिनूला भरवलं. खाताखाताच चिनूचे डोळे जड व्हायला लागले. मग तिला गादीवर आडवं केलं. उन्हाळा वाढतोय, एक पातळ चादर पुरावी.
पसारा आवरता आवरता तिला नुकतंच घेतलेलं कवितांचं पुस्तक सापडलं. कविवर्यांची या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यामुळे त्यांची पुस्तकं आता पुन्हा प्रकाशित झाली होती! चला, चहा घ्यावा. रोज सकाळी ऑफिसात एक चहा व्हायचा. आज या खेळात राहूनच गेलं होतं. मग तिनं चहा बनवला. पंखा सोडला, अन् गॅलरी जवळ तिच्या लाडक्या जागी पुस्तक घेऊन विसावली.
सुप्रियाची तंद्री लागली होती. उन्हानं तापलेल्या दलदली अन् खाडीवर एक धुरा-धुक्याचा थर साचला होता. खाडीपलिकडे दूरवर मुंबईचे टोलेजंग टॉवर त्या धुक्यातूनही डोकं वर काढून बघत होते. गॅलरीच्या लोखंडी जाळीवर कुणा चुकार पक्षाच्या चाहूलीनं तिनं डोकं वर काढलं.
जरा उशीरच झाला होता. चिनू उठायच्या आत तिला अंघोळ आटपून घ्यायला हवी होती. लगबगीनं ती उठली. भराभर उरलेला पसारा आवरून मग ती पटकन बाथरूममध्ये शिरली.
इकडे चिनूची चुळबूळ सुरू झाली होती. मिनिटाभरातच तिला जाग आली. आजी, आजी अशा दोन चार हाका तिनं सवयीनं दिल्या. आज आजी नाहीये, आई आहे याची तिला जाणीव झाली बहुतेक. मग तिनं आई आई अशी हाक मारली. बादलीत सोडलेल्या पाण्याच्या आवाजात सुप्रियाला ते कदाचित नसेल ऐकू आलं. आई दिसली नाही तशी चिनू गादीवरून उतरली. आता तिला सहजपणे बेडवर चढता आणि उतरता येतं हं. मग बाथरूममधून येणाऱ्या आवाजावरून ती बाथरूमच्या दरवाज्यावर थापटू लागली. हा आवाज मात्र सुप्रियाला ऐकू आला. तिनं पाणी बंद केलं आणि आतूनच आवाज दिला, "चिनू, थांब हां जरा, मी अंघोळ करते आहे नं, येतेच हां"
तो आवाज चिनूला ऐकू आला पण सुप्रिया काय म्हणते आहे ते बहुतेक लक्षात आलं नसावं. ती दरवाजा वाजवतच होती, आई-आई करत होती. आता तिच्या हातात दरवाज्याची कडी आली. ती वाजवायला लागली. मग सुप्रियानं हळूच दरवाजा उघडून तोंड बाहेर काढलं, आणि चिनूला सांगितलं, "चिनू, बेटा, बाहेर जाऊन बस आणि खेळ हं, मी आलेच एका मिनिटात.." चिनूनं आई कडे बघितलं, मान हलवली, आणि ती बाहेरच्या खोलीत गेली. सुप्रिया परत दार लावून अंघोळ आटपायला लागली. चिनूला दूध हवं असेल याची तिला जाणीव झाली.
चिनू परत आतल्या खोलीत आली, आणि दार वाजवायला लागली. तिला बहुतेक कडीचा आवाज आवडला असावा! आता त्याला लोंबून ती वाजवत होती. सुप्रियानं आतनंच आवाज दिला, "चिनू, बाहेर बस बाळा, मी आलेच...".
आणि, चिनूच्या हातून अभावितपणे कडी सरकली. कडी लागली. दरवाजा बाहेरून बंद झाला. चिनू आईनं सांगितल्याप्रमाणे पुन्हा बाहेरच्या खोलीत गेली.
सुप्रियानं चटचट अंघोळ आटोपली. भरकन कपडे चढवले आणि, धुण्याचा पिळा खांद्यावर घेऊन तिनं आतली कडी सरकवली. दुसऱ्या हातानं दरवाजा ओढला तर... पुन्हा ओढला.. आणि तिला ब्रह्मांड आठवलं
जिवाच्या आकांताने तिनं हाक दिली, "चिनूऽऽ, चिनू ऽऽ"
दरवाजा उघड चिनू...
चिनू हाक ऐकून आली. दरवाज्याबाहेरून ती आई आई करत होती. दरवाज्यावर थापा देत होती.
सुप्रियाला थरकाप सुटला. आवाजावर शक्य तेवढा कंट्रोल ठेवता ती चिनूला म्हणाली, "चिनू बेटा, तुला कडी उघडता येईल का?"
ती फक्त आई, आई करत होती. तिला कळत नव्हतं की आपल्या एका हाकेत येणारी आई, इतक्या हाकांनंतरही का दार उघडत नाहीये. आई.. ये,आई.. ये... तिच्या चिमुकल्या मेंदूत अजून कडीचा उपयोग शिरला नव्हता.
सुप्रिया धीर सुटून खाली बसली. तिला चिनूच्या हाका ऐकू येत होत्या.
नवरा संध्याकाळी घरी येणार. त्यानं फोन केला तरी आम्ही उपयोग नाही. मी फोन घेतला नाही तर त्याला काही तरी गोंधळ आहे हे कळेल का? हे कळायला किती वेळ लागेल? आणि तिथून तो करणार तरी काय? आला तरी कधी येईल?
तिनं दरवाजाला धडका द्यायला सुरुवात केली. पण चांगल्यापैकी लाकडी दार होतं ते. आणि कडीही दाराच्या लाकडी मजबूत फ्रेममध्ये अडकली होती.
पण हाच उपाय आहे असं सुप्रियाच्या मनानं घेतलं. ती अंगात आल्यासारखी दरवाज्याला धडका देत होती. आतलं हॅंडल ओढत होती. पाच दहा मिनिटे वात ओसरे पर्यंत ती हे करत होती. जेव्हा खांद्यातून कळ आली तेव्हा थकून ती थांबली. मटकन खाली बसली.
आतून दरवाजावर धडका ऐकून चिनू बावचळली. तिला कळेना आई असं काय करते आहे.
चिनूचा आवाज रडवेला झाला होता. तो ऐकून सुप्रिया कावरीबावरी झाली.
चिनू बाळा रडू नको हं, मी येतेय मी येतेय, हे म्हणताना तिलाच हुंदका फुटला. तोंड दाबून ती ढसाढसा रडू लागली.
रडण्याचे कढ आवरत नव्हते.
आता चिनू बाहेर रडायला लागली होती.
चिनू, चिनू रडू नको हं बाळा
बाथरूमच्या दरवाज्याला वरच्या बाजूला एक काच होती. पायाखाली एक बादली घेऊन ती त्या काचेपाशी पोहोचली. पण ती काही पारदर्शक काच नव्हती. चांगली जाड, अपारदर्शक काच होती. पण त्यातून धडपड करून तिला चिनूची आकृती दिसली. पुन्हा तिला हुंदका फुटला.
चिनू गादीवर जाऊन पड बाळा, मी येतेच. ती सांगत होती.
चिनू आता खाली बसून दरवाजा वाजवत होती.
थकली असेल चिनू. किती वेळ रडते आहे.
आता सुप्रियानं देवाचा धावा सुरू केला.
चिनूचं दरवाजा वाजवणं बंद झालं होतं बहुतेक ती बाहेरच्या खोलीत गेलेली असावी. परत एकदा वर चढून सुप्रियानं अंदाज घेतला. तिला चिनू दिसली नाही.
काय करेल ही मुलगी, काही उचकापाचक तर नाही करणार? लागलं बिगलं तर? पुन्हा सुप्रियाला भिती वाटली. चिनू चिनू असा तिनं आवाज दिला. आईच्या हाकेबरोबर रडत रडत चिनू परत आली. दरवाजा वाजवायला लागली.
काय करता येईल? तिनं बाथरूमच्या खिडकीच्या ग्रिल्समधून बाहेर नजर टाकली. जाळी लावली होती, पण त्यातून अथांग आकाश दिसत होतं. पण तरीही तिनं आवाज दिला, कोई है? कोई है? हेल्प, हेल्प, हेल्प मी प्लीज.. देतच राहिली...
बाराव्या मजल्यावरून आवाज तरी कोणाला देणार, कोणाला ऐकू जाणार?
काच! काच फोडता येईल!
आणि मग काठी घेऊन काही तरी करून हात बाहेर काढून कडी उघडता येईल!
मला काच फोडलीच पाहिजे.
पण संध्याकाळी मिलिंद येईपर्यंत नाही का थांबता येणार?
त्याला यायला सहा तास आहेत अजून. आई आहेस का कोण आहेस?
मग चला फोडू या. काय आहे बाथरूम मधे ती काच फोडता येईल असं?
सुप्रियानं नजर फिरवली. सगळं प्लास्टिकचं... धुण्याचे ब्रश, त्या बादल्या, यानं ते दणकट तावदान काय फुटणार आहे?
प्रयत्न तर करू.
हाताला येईल ते घेऊन सुप्रिया त्या तावदानावर मारत होती. पण त्याला ढिम्म नव्हतं.
मग त्या लाकडी फ्रेममधून ती काच उचकटता येईल का याचा ती प्रयास करू लागली. त्यातही तिला काही करता आलं नाही.
तेव्हढ्यात तिला फोनची रिंग ऐकू आली. पुन्हा तिचं अवसान गळालं. हताशपणाची भावना तिला हतबल करून गेली.
उतरली आणि डोकं हातात गच्च धरून ती बादलीवर बसली. तिला समोर कमोडचं सिरॅमिकचं झाकण दिसलं. हां, हे मारलं तर फुटेल काच! ती झटक्यात उठली आणि तिनं ते जड झाकण हातात घेतलं. आता काचेवर मारणार तोच तिला लक्षात आलं, चिनू बाहेर आहे! ही काच फुटली तर तिच्या अंगावर काचा पडतील, तिला दुखापत होईल. आता?
कसंही करून चिनूला झोपवावं लागेल. तसंही चिनूचं रडणं मी झालं होतं. थकली असेल. आता झोपेलच. झोप गं माझ्या राणी.. आई येतेच आहे बाहेर.
तिनं आतूनच अंगाई म्हणायला सुरुवात केली.
गुणी बाळ असा, जागसी का रे राया...
नीज माझ्या नंदलाला...
मधून मधून वर चढून ती अंदाज घेत होती. चिनू झोपली का ते बघत होती.
दहा-पंधरा मिनिटांच्या शांततेनंतर तिला खात्री झाली की आता चिनू झोपली. खरं तर ती दरवाज्यासमोर झोपली होती, पण आता पर्याय नव्हता.
तिनं परत हातात ते जड झाकण घेतलं. विचार केला. एखादा तडा जाईल इतकंच मारावं. मग जास्त तुकडे उडणार नाहीत. हळूहळू एकएक काढून घेता येईल. पायाखाली बादली उपडी टाकली. तोल सांभाळत त्यावर चढली. ते जड झाकण तिनं अल्लाद काचेवर मारलं. काही नाही.
परत मारलं. अं हं
परत मारलं
परत मारलं
परत..
आता तिचा संयम सुटला. तिनं जीव खाऊन तडाखा दिला. खळ्ळखळाळ आवाज करत काच वेडी वाकडी तडकली आणि हजार तुकडे होत काच फुटली. तिला आनंद होतो तोच बाहेरून चिनूचा आकांत ऐकू आला. तिनं चवड्यावर उभं राहून फुटलेल्या काचेतून बाहेर पाहिलं तर काय? चिनूच्याही अंगावर काही तुकडे उडले होते. तिच्या आसपास काचा पडल्या होत्या. आई गं, तो कोवळा जीव... सुप्रिया कळवळली.
चिनू हलू नकोस. चिनू हलू नकोस, चिनू हलू नकोस गं, तिनं आक्रोश केला.
आज देव तिची परीक्षा पहात होता. पण तो तिची हाक ऐकतही होता. आईच्या आवाजातला बदल म्हणा, तिच्या चेहेऱ्यावरचे भाव म्हणा, काही तरी कळून चिनू होती तिथेच पडून रडत राहीली.
सुप्रिया धोशा लावला होता, चिनू आता मी येतेय हं. थांब हलू नकोस. अगदी हलू नकोस. शहाणं माझं बाळ ते..
तिला लक्षात आलं की तिच्या दोन्ही तळहातांतून भळाभळा रक्त वहातंय. त्या आवेगात तिनं त्या लाकडी फ्रेमला पकडलं होतं. त्याच्या कडांना काचेचे तुकडे अजून शिल्लक होते! आता ते रक्तरंजित झाले होते. तिनं खुंटीवरचा नॅपकिन एका हाताला गुंडाळला. आणि दुसऱ्या हाताला रुमाल.
पण अजून दरवाजा उघडलाच गेला नव्हता.
ती अखंड चिनूशी बोलत होती. जागेवरच पडून रहायला सांगत होती. आता काय करायचं?
चिनूला तर बाहेरची काठी आणायला सांगणं शक्यच नव्हतं. परत तिनं इकडे तिकडे पाहिलं. गोष्ट सोपी नव्हती हे तिच्या लक्षात आलं. कमोड धुण्याचा ब्रश होता. त्याला बाक होता. पण त्या फुटक्या काचेतून होत घालून तिथपर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट नव्हती.
चिनूच्या रडण्याचा आवाज तिच्या कानी येत होता. तिच्या जिवाची तगमग होत होती.
परत एकदा फोन वाजू लागला. चिनू कदाचित उठेल फोन घ्यायला या विचारानं तिनं परत वळून त्या फुटक्या खिडकीत तोंड दाखवून चिनूला पडून रहायला सांगितलं. ती शहाण्या बाळासारखी जागच्या जागी मुसमुसत पडून राहिली. शहाणी गं माझी पोर ती.. परत सुप्रियाला कढ आला.
आता वेळ घालवून चालणार नव्हतं. हातातून रक्त वहातच होतं. चिनूला काही लागलंय का कळायला मार्ग नव्हता. हॉस्पिटलला जावं लागणार होतं. पुढचा मागचा विचार न करता सुप्रिया उतरली, आणि काचांतून चालत जाऊन ब्रश घेऊन पुन्हा बादलीवर उभी राहिली. हाताला गुंडाळलेला नॅपकिन काढून टाकला. हलकेच वाकून पायातल्या काचा काढण्याचा प्रयत्न केला. मग अंग पुसायचा टॉवेल तिनं उजव्या हाताला गुंडाळून घेतला. तिला त्या खिंडाराभोवतीच्या काचांचा प्रताप कळला होता. आणखी जास्त ईजा होणं योग्य नव्हतं, रक्त तसही खूप जात होतं.
ती अखंड वेळ चिनूशी बोलत होती. बडबडगीतं म्हणत होती. चिनूही आता शांत पडून होती.
तिनं नीट अंदाज घेतला. काळजीपूर्वक हात बाहेर काढला. ब्रशचा दांडा हाती धरून तिनं कडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोयंड्याचा बोल्ट खालती आत गेला होता. पहिल्यांदा त्याला उचकटून वर काढणे हे काम होते. तिथे तो ब्रश धड पोहोचत नव्हता. हात हलवताना सगळ्या बाजूंनी काचा बोचत होत्या, ओरबाडत होत्या, रक्त काढत होत्या. पुन्हा सुप्रियाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काय कुणास ठाउक, बऱ्याच वेळानं चिनूनं बारीक आवाजात आई अशी हाक दिली. दातओठ खाऊन, होती नव्हती ती ताकद एकवटून सुप्रियानं जिवाच्या करारानं एक भीमटोला दिला. या वेळी नशीबानं तिची साथ दिली. आणि कडी उघडली!
अचानक दरवाजा उघडला. पण तिच्या भारामुळे ती तोल जाऊन बादलीवरून घसरली. आणि त्या खिडकीत कोपऱ्यात अडकून राहिलेल्या एका काचेच्या तुकड्यानं दंडापासून मनगटापर्यंत त्वचा फाडली. पण, सुप्रियाला आता फक्त चिनू दिसत होती. तिनं खाली पडलेल्या काचा, हातातून वाहणारी रक्ताची धार, कशाकशाची पर्वा न करता, धावत जाऊन चिनूला कवटाळले! आई आणि मुलगी दोघीही ओक्साबोक्शी रडत होत्या.
क्षणार्धात सुप्रिया भानावर आली. आपली अवस्था कठीण आहे हे तिच्या लक्षात आलं. तिनं मिलिंदला फोन लावला. नशिबानं त्यानं लगेच उचलला. त्याला सगळं थोडक्यात सांगितलं. आणि म्हणाली, मी आता कोपऱ्यावरच्या हॉस्पिटलात जाते. तू त्यांना फोन करून ठेव. मिलिंद म्हणत होता ॲम्ब्युलन्स पाठवतो. पण तिनं निक्षून सांगितलं की तेवढा वेळ नाहीये. आणि लवकर ये. हे सांगताना तिला हुंदका फुटला.
पण अवसान सोडून चालणार नव्हते.
तिनं फ्रीजमध्ये होती ती चॉकलेटं कॅडबरी चिंटूच्या हातात दिली. पटकन कापडी हातमोजे चढवले. एक फुल बाह्यांचं जॅकेट चढवलं. शक्य तितक्या वर दंडाला एक ओढणी घट्ट बांधली, म्हणजे हातातून वाहणारं रक्त कमी व्हावं. पर्समध्ये किल्ल्या टाकल्या आणि तशीच बाहेर पडली. एकंदर प्रकारानं घाबरून म्हणा, चिनूही तिला घट्ट पकडून होती.
मिलिंदचा फोन आला. त्यानं कोपऱ्यावरच्या हॉस्पिटलमध्ये कळवलं होतं. चिनूच्या आजीच्या दुखण्यात तो स्टाफ ओळखीचा झाला होता, हा परत नशीबाचा भाग. तो निघालाच होता ऑफिसमधून.
रक्ताने माखलेल्या दोघी जणी गाडीतून जाताना बघून बिल्डींगचे वॉचमनही अवाक झाले. पण त्यांच्या कडे लक्ष न देता सुप्रियानं गाडी पुढे दामटली.
रस्त्यावर गर्दी नव्हतीच. पण आता सुप्रियाला वीकनेस जाणवू लागला होता. गरगरू लागलं होतं. हॉस्पिटल बाहेरच एक नर्स आणि वॉर्डबॉय स्ट्रेचर घेऊन उभेच होते. तिनं हॉस्पिटल सिक्यूरीटीच्या हातात गाडीची किल्ली दिली, नर्सनं चिनूला घेतलं आणि तिच्याच मदतीनं सुप्रिया स्ट्रेचरवर आडवी झाली. आणि तिची शुद्ध हरपली.
--
चिनूला नशिबानं काही ओरखडे सोडले तर काही झालं नव्हतं.
सुप्रियाला परत उभं राहायला दोन आठवडे लागले. उजव्या हाताला नर्व्ह डॅमेज झाला होता, तो ठीक व्हायला वर्ष-दोन वर्षं तरी लागलीच.
भयानक! परंतू आजकाल जवळ जवळ
भयानक! परंतू आजकाल जवळ जवळ सगळ्या सोसायटीमध्ये नॉब असतात टॉयलेट ना. आमच्याकडेही तसेच आहे. ते बाहेरून लॉक होत नाहीत, त्यामुळे असा प्रॉब्लेम होत नाही. कड्यांमुळे लहान मुलांना बोटाला दुखापत पण झाल्याची पाहिलीय.
Pages