तुझे पंख घेऊन - स्फुट

Submitted by रघू आचार्य on 11 March, 2024 - 14:46

शिखरावरून कोसळणार्‍या जलप्रपाताला
विचारलेस का कधी
तू इतका उनाड का?
आणि कोसळ झेलणार्‍या प्रवाहाला
विचारलेस का कधी
तू असा गंभीर का ?

कधी विचारलेस
जंगलच्या राजाला
सुमारांच्या झुंडीपुढे
असा शांतावलेला कसा ?

आणि कळवंड दुभंगल्यावर
पुन्हा गरजतोस कसा ?

जंगलात आताशा श्वानांच्या
झुंडीच फिरतात बहुमताने
बेशिस्तीच्या थव्याने
जंगलचे कायदे हाती घेऊन

कोसळणारा प्रपात थबकतो
नदी धीरगंभीर होऊन किनार्‍यास येते
आणि सोनेरी गवताचे भाले
पिंजारतात जंगलची गात्रं न गात्रं
रानवारा थबकून शीळ विसरतो

जंगलचा राजा शांत असतो
माहिती असतं त्याला कदाचित
सुमारझुंडी विरून जातील
प्रपात पुन्हा झेपावेल
सोनेरी रेशीमवारा
मोरपीस होईल

आणि गवतांच्या तारा होऊन
स्वर्गीय सूरांच्या ताना
दिडदा दिडदा घुमत राहतील

तेव्हां तू वीजा घेऊन
उभा असशील मजसाठी
क्षितीज किंचितसे उसवून
अज्ञाताकडे झेपावण्यासाठी
पंख देशील मला
बाहू फैलावून
अनंताचे गाणे होऊन
अनंत होण्यासाठी
जगणे सैलावून
तुझ्याच प्रमाणे !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामोजी,
खटक्यावर बोट ठेवले आहे. त्याबद्दल आभार.
बदल केला. विपू करतोय.

खूप सुंदर कविता..... किंवा मुक्तक.. जे काय आहे ते!! Happy
जे अगदी मनाच्या आत आत वाटत असतं, पण शब्दांत व्यक्त करता येत नसतं...ते काहीतरी गवसल्याचा आनंद झाला हे वाचून!

सुरेख अभिव्यक्ती!

सर्व प्रतिसाददात्यांचे मनःपूर्वक आभार.

..ते काहीतरी गवसल्याचा आनंद झाला हे वाचून! >> __/\__

कलवड/ कळवंड म्हणजे कुत्र्या मांजरांचे आपसातील गमतीगमतीची कुस्ती, खेळ. हा नवा शब्द कळला. धन्यवाद.
आता हा शब्द शोधला की ही कविता सापडतेय Happy