जुनाच खेळ: नवे राज्य

Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 March, 2024 - 07:11

आधीचा भाग: नवा गडी- १.
https://www.maayboli.com/node/84733
विस्तीर्ण पसरलेलं जंगल, जंगलातच उगम पावलेली आणि गावाला वेढा देणारी, आजूबाजूच्या डोंगरांना हिरवाई देणारी वाघई नदी, एका बाजूला जंगल तर बाकी तीन बाजूंना नदी आणि डोंगरदऱ्यांनी वेढलेलं टुमदार गाव- वाघदरा. पूर्वी मुबलक असणाऱ्या वाघांच्या संख्येमुळे हे नाव या नदीला आणि गावाला लाभलं होतं. गावात एक प्राथमिक शाळा, एक पोस्टाची पेटी. बाकी सारे व्यवहार करायला गावकऱ्यांना २० किमी लांब जावं लागत असे. दादाराव पाटील आल्यापासून तशी गरज जास्त उरली नव्हती हेही खरं. फोन वरून बरच कामे होत, शिवाय वाड्यावर कॉम्प्युटरवर होण्यासारखी सारी सरकारी कामे होऊन जात होती. वाड्यावर म्हणजे दादाराव पाटलांच्या वाड्यावर..

जंगलाला लागून असलेला हा वाडा म्हणजे एक कोडं होतं. वाड्याचा पसारा मोठा म्हणजे जवळपास एकर भर.. नदी आणि जंगलाच्या आडोशाला जागा पाहून चाऱ्ही बाजूला पुरुषभर उंचीच्या दगडी भिंती जंगलाच्या बाजूला बांधलेला दोन मजली चौसोपी टुमदार वाडा. त्याच्यापुढं दगडी कुंपणाच्या बरोबरीनेच बांधलेला मोठाच्या मोठा गोठा, तबेला, कुत्र्यांसाठीची जाळीदार खोली. आणि अजून ८ खोल्या.. वाड्याच्या मुख्य दारापाशी दोन्ही बाजूला बैठकीच्या खोल्या. बाहेरून येणार जाणार सारे लोक आधी इथे थांबत आणि प्राथमिक चर्चा इथे होई, आणि मगच पुढं एन्ट्री. अर्थात गावाच्या कोणत्याही रहिवाश्याला वाड्यात बिनधोक प्रवेश होता. वाड्याच्या ह्या बैठकीत बसणारा बबन माने म्हणजे गावाचंच नाहीतर पंचक्रोशीचं चालतं बोलतं दप्तर.. खेडं असलं तरी गावात तरुण भरपूर होते आणि सारे शेती आणि त्याला पूरक व्यवसाय सांभाळून होते. बबन माने त्यातलाच एक हुन्नरी कलाकार.. पण याचं डोकं शेती ऐवजी इतर गोष्टीत जास्त, म्हणजे शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अनेक योजना शोधण्यापासून गावातल्या पोरापोरीची सोयरीक जुळवण्यापर्यंत, गावात येणाऱ्या प्रत्येक माणसाची जुजबी माहिती त्याच्यापर्यंत पोचायची, आणि वाड्यात येणार्यांची कुंडली.. आणि हे सगळं व्हायचं ते येणाऱ्या माणसाच्या नकळत. दादाराव पाटलांच्या वाड्यात वर्दळ कायम असायची. खरंतर दादाराव पाटलांचं आणि पाटलीणबाईंचं गावावर निःसीम प्रेम होतं. गाव तस बऱ्यापैकी लहानच होतं. जंगल आणि नदीमुळे गावात यायला जायला एकच रस्ता.. मुख्य हायवे पासून २५ किलोमीटर आत असलेलं हे एकुलतं एक गाव त्या रस्त्यावर होतं. फाट्यावर कायम एक रिक्षा किंवा जीप उभी असायची. त्यासोबत असलेली बबन्याच्या वडलांची चहा पानसुपारीची बारकी झोपडी, सोबतीला गावातलाच एखादा पोरगा दिवसभर आळीपाळीने असायचा.. तो आणि बबन्याचा बा सोडता माणसाचा मागमूस नाही. बबन्याचा बाप तसा सतत व्यस्त असायचा.. काथ्याचा दोर वळण्यात त्याचा हात कुणीच धरायचं नाही. बसल्या बसल्या दोर बनवायचा तर फाट्यावर झोपडीत बसून दोर वळ म्हणाला बबन्या. शिवाय एक अस्सल कारवानी उमदं कुत्रं आणून ठेवलं होतं ते एक. जनावर असं कि २००-३०० मीटर पासून जरी अनोळखी वास आला तर न भुकता बबन्याच्या बापाला जाऊन बरोबर सांगायचं. मग येणाऱ्या माणसाला थांबवून, पैसे देत असला तर विकत नाहीतर फुकट चहा पाजून बबन्याचा बाप, आलेला माणूस कोण, कुठला, गावात काय काम, किती दिस राहणार वगैरे बित्तम् बातमी काढायचा.. आपणच रघुला म्हणजे गावच्या रिक्षावाल्याला आवाज द्यायचा आणि गावात धाडायचा.. टोलनाकाच म्हणा ना.. एकुणात गाव आणि गावची माणसं बाकी जगापासून अलिप्तच राहायची..

एका सधन गावातले सधन आदर्श शेतकरी हीच ओळख दादांची जपली गेली त्यात बबनचा हात मोठा होता. दादांच्याकडे येणारी इतर कामे बबनकडून येत. कामाच्या काठिण्य पातळीनुसार माणूस ठरवला जाई. टेक्नॉलॉजिचा भरपूर वापर होत असला तरी तो कुठे करायचा आणि कुठे नाही याची जाणीव दादांना होती. काही कामे पैश्यांसाठी तर काही कामे निव्वळ माणुसकीपोटी केली जात होती.

पुण्यासारख्या मोठ्या शहरात एका गरीब पण होतकरू मुलाच्या घरात दिलेली वाघदर्याची मुलगी सुप्रिया, सुप्रियेच्या कॉलनीतली ती मुलगी जेव्हा रडत रडत घरी आली तेव्हा सुप्रिया वाण्याच्या दुकानात काहीतरी घ्यायला गेलेली. संध्याकाळी वेळ. आणि मुलीची एकंदर अवस्था पाहून सुप्रियेला गलबलून आलं. जेमतेम १७ वर्षाची ती नाजूक पोर, विस्कटलेले केस, ड्रेस पाठीवर फाटलेला, रक्ताळलेला ओठ. वाघदऱ्याच्या सुरक्षित वातावरणात वाढलेली सुप्रियेच्या काळजात चर्रर्र झालं. दोन वर्षांपूर्वी या वस्तीत आली असली तरी ती सगळ्यांना ओळखत होती. सुप्रिया त्या मुलीच्या- आरतीच्या पाठोपाठ घरी गेली. झाला प्रकार सांगायला आरती तयार नव्हती, पण सुप्रियेच्या मायेच्या स्पर्शाने तिला वाचा फुटली. जसजशी आरती सांगत होती, तसतशी सुप्रिया एकाच वेळी दुखावत आणि संतापत होती. सगळं ऐकून घेतल्यावर सुप्रियेने घरचा रस्ता धरला.. मनात साठवून ठेवलेलं सारं काही घरी पोचल्याबरोबर तिने तिच्या आईला भडाभडा सांगून टाकलं.. आणि तिच्या आईने वाड्याचा रस्ता धरला.. 
सुप्रियाच्या आईने जशी सगळी हकीकत बबन्याला वाड्याच्या बैठकीत ऐकवली तशी ती निर्धास्त झाली. नाही म्हणायला तिलाही वाटलं होतंच कि असल्या गुंड असलेल्या वस्तीत आपली मुलगी कशी राहील.. पण वाड्यावर एकदा विषय पोहचला कि गावातलं कुणीही असो, ते निर्धास्त व्हायचे. बबन्याने लगोलग दादाराव पाटलांना वर्दी दिली. दादांनी सगळ्यात आधी आपला हुकमी एक्का जॉनीला परस्पर पुण्याला पाठवलं. जॉनी म्हणजे कोण तर गर्दीतला अनोळखी, लक्षात न राहणारा चेहरा. याचं खरं नाव कुणालाही माहित नव्हतं. जॉनीला ज्यांनी एकदा पाहिलं असेल ते दुसऱ्यांदा त्याला पाहिल्यावर ओळ्खतीलच अशी खात्री नव्हती इतका तो गर्दीत मिसळून जायचा. जॉनी पुण्याला पोहचला आणि कपडे- वेष बदलत एक दिवस मोन्याच्या मागोमाग फिरत त्याची माहिती काढत राहिला.. इकडे वाड्यावर दादांनी गावातला वैदू, सरकारी दवाखान्यातला डॉक्टर आणि बबन्याला घेऊन मिटिंग घेतली. वैदू वाड्याच्या मागच्या बाजूने जंगलात गेला, डॉक्टर आपल्या दवाखान्यात आणि बबन्याने गावातल्या भूषणला बोलावून घेतलं.. जॉनीने एव्हाना ठरल्या प्रोटोकॉलनुसार पुणे स्टेशनवर जाऊन मुंबई जाणारी गाडी पकडली. साधा कीपॅड मोबाईल असलेलं एक सावज हेरून त्याचा मोबाईल चोरला, आणि बबन्याला फोन करून म्हणाला कि "हैवानानं पोसलेला लांडगा, पिसाळून गेलाय" उत्तरादाखल बबनने फक्त म्हटलं, "पत्र पाठवतो". स्टेशनला उतरताना तो कीपॅड मोबाईल त्याच्या मूळ मालकाच्या पिशवीत पुन्हा पोहचला होता.
दुसऱ्या दिवशी भूषण पुणे स्टेशनजवळ पोस्ट ऑफिसला पोहचला त्याने जॉनीला दुरूनच हेरलं आणि बॅगमधून एक पाकीट काढून ते सहज जॉनीपर्यंत पोचते करून तो आल्यापावली निघून गेला.

पाकिटात एक लहानशी सिरिंज होती, ज्यात वैदूने दिलेला धोत्रा बियांचा विशुद्ध अर्क, आणि डॉक्टरने दिलेले स्ट्रॉंग aphrodisiac होते. लहानात लहान मात्रासुद्धा रक्तदाब वाढवून जीव घेईल असं ते जहाल इंजेक्शन होतं. रात्री चायनीजच्या गाड्याच्या जवळपासच ७ वाजल्यापासूनच जॉनी आपल्या शिकारीची वाट पाहत बसला होता. एक लहानसा धक्का, बारीकशी अगदी मच्छर चावला कि मुंगी अशी वाटावी अशी कळ, आणि थेट मुख्य धमनीत पोहोचलेलं ते जहाल विष.. मोन्याचा विषय आटोपला असला तरी त्याचा मालक अजून बाकी होता..

क्रमश:

आधी वाचले नसल्यास हे धागे देखील वाचून घ्या:
https://www.maayboli.com/node/75337

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults