चित्रावरून लिखाण- मुखवटा

Submitted by अतरंगी on 4 March, 2024 - 15:37

माझ्या स्वतःच्या नजरेत मी कायमच उच्च स्थानावर राहिलेलो आहे. मी कायम सर्वांना समान वागविणारा आणि कोणतेही भेदभाव न मानणारा आहे, मी कोणालाही त्यांच्या आर्थिक परिस्थिती वरुन, रंगरुपावरुन, राहणीमानावरुन जज करत नाही, ते बघून त्यांच्याशी मैत्री करत नाही, संबंध ठेवत नाही, माझ्या साठी सगळे समान आहेत वगैरे वगैरे. पण आपणच स्वतःला ओळखण्यात अनेकदा कमी पडतो. एखाद्या प्रसंगात आपल्याकडून अशी कृती घडून जाते की ती घडून गेल्यावर आपल्याला वाटतं की शी: मी हा असा कसा वागलो. मी माझी एक छान प्रतिमा माझ्या मनात उभी केलेली आहे आणि स्वतःला मखरामधे बसवून ठेवलेले आहे. पण हे असे काही प्रसंग की त्या प्रतिमेला चांगलाच तडा गेला.

माझा मुखवटा गळून पडला……

हे प्रसंग मी वारंवार आठवत राहतो, स्वतःचा अहंगंड कमी करायचा प्रयत्न करत राहतो.

प्रसंग १.

हा माझ्या आयुष्यातला सर्वात नाआवडता आणि लाजिरवाणा प्रसंग.

मला कायमच गरिबांविषयी कणव वाटत आलेली आहे. आपल्या परिने जेवढे होते आहे ते गरिब अशिक्षित लोकांसाठी करावे, त्यांनी शिक्षणाच्या, करियरच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करायला हवे वगैरे माझी मते आहेत. जसे जमेल तसे यथाशक्ती मी असे काम करणार्‍या संस्थांना मदत पण केलेली आहे. अशा देणग्या दिल्यावर त्याचा क्वचित कधीतरी आडवळणाने उल्लेख करुन स्वतःची प्रतिमा ऊंचवायचा प्रयत्न/ शो ऑफ पण केलेला आहे. सगळ्या मुला मुलींमधे पोटेन्शीअल असते पण आपल्याला जी संधी मिळाली, जे पोषक वातावरण मिळाले ते काहींना मिळत नाही, त्यामुळे ते मागे राहतात. त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक नाही, आपण कोणापेक्षा वरचढ नाही, उच्च नाही. फरक फक्त संधी आणि परिस्थितीचा आहे. आपण सगळे समान आहोत. यासंस्थांना देणग्या देऊन आपण महत्वाचे कार्य करत आहोत, पिडीतांना/ शोषितांना पुढे आणायला, त्यांना समान संधी मिळ्वून द्यायला काही ना काही हातभार लावत आहोत, हे बरे वाटते.

आमच्या कडे घरकाम करायला एक मावशी यायच्या. जवळ जवळ पाच एक वर्षे तरी त्या आमच्याकडे कामाला होत्या. मी त्यांच्याशी कामापुरतेच बोलत असे. ते पण पत्नी घरी नसेल आणि त्याच वेळेत त्या आल्या तर. बाकी मी माझ्या कामात किंवा मोबाईलवर. एकदा दुपारच्या वेळी कधी नव्हे ते घरी होतो आणि डायनिंग टेबलवर बसून जेवत होतो. जेवता जेवता मोबाईलवर काही तरी वाचत की पहात होतो. पत्नी घरातच होती पण त्यावेळेस तिथे नव्हती. मावशी आता आल्या आणि त्यांच्या मागे त्यांचा दहा-बारा वर्षांचा मुलगा पण आला. कोण आलं ते पहायला मी मोबाईलमधुन मान वर केली. मावशी त्यांची पिशवी ठेवता ठेवता " आज घरी कोणी नव्हतं, म्हणून संगट घ्येऊन आले" म्हणाल्या. मी नुस्ताच हं म्हणून त्या मुलाला एक स्माईल दिली आणि मोबाईल मधे मान घातली. मावशी त्याला "तिकडं बस" म्हणाल्या आणि किचन ओट्याकडे वळाल्या. तो मुलगा डायनिंग टेबलच्या दुसर्‍या बाजुला एक खुर्ची ओढून बसला. तो खुर्चीवर बसला हे बघून मी आश्चर्याने मान वर केली आणि लगोलग पुढच्या क्षणी शरमेने माझी मान खाली गेली. मी सहजतेने गृहित धरले होते की काम झाले की त्याची आई जशी खाली बसून पाणी/चहा पिते, तसेच तो पण कामगारणीचा मुलगा आहे तर अर्थातच त्यानेही खालीच बसावे. भयानक लाज वाटली स्वतःच्या विचारांची. समता, समानतेच्या गप्पा मारतो नुस्ता मी, एक शतांश तरी आहे का ती अंतरात?

मोलकरणीला महिन्याला चार पगारी सुट्ट्या दिल्या, तिला आईने/ पत्नीने चहा टाकला, घरातलेच पितात त्या कप मध चहा दिला की बास. आम्ही तर बाबा आमच्या कामवाल्या मावशींना चांगले वागवतो. आम्ही नाही भेदभाव करत. पण तिने चहा मात्र खाली बसुन प्यायचा, खुर्चीवर नाही, ती पायरी मात्र नाही ओलांडायची. तिचा दहा बारा वर्षांचा कोवळा निरागस मुलगा घरी आला तरी त्याने फरशीवरच बसावे ही माझी अपेक्षा.

समता, समानतेच्या गप्पा हाणणे आणि ती मनात रुजलेली असणे यात किती मोठे अंतर आहे हे मला त्या दिवशी कळले.

प्रसंग २.

बाप झाल्यापासून अनेक कठोर कामे करावी लागतात त्यातलंच एक म्हणजे मुलांना झोपेतून ऊठवून शाळेत पाठवणे….. त्या दिवशी त्याने फारच वेळ घालवला…. त्याचं आवरून होई पर्यंत त्याची व्हॅन निघून गेली. मग जरा रमत गमत आवरलं आणि टू व्हिलरवर शाळेत सोडायला निघालो. घरापासून थोडं पुढं आलो आणि मुलाने जोरात “काका” अशी हाक मारून कोणाकडे तरी बघून हाय केलं….. मी तिकडे बघितलं तर तिथे माझ्या अपेक्षेप्रमाणे भाऊ नव्हता, दुधवाले काका होते….
भाऊ तर कधीचाच ॲाफिसला गेला होता. मुलाने जेव्हा काका म्हणून हाक मारून हाय केलं तेव्हा मला वाटलं की भाऊच असणार. दुधवाले काका मलाही दिसलेच असणार, माझ्या मेंदूने त्यांची नोंदच घेतली नाही….. येता जाता दुधवाले काका, ईस्त्रीचे कपडे न्यायला येणारा मुलगा, कचऱ्याचे डबे नेणाऱ्या मावशी, कामवाल्या मावशी, सोसायटी मधे साफसफाई करायला येणारे काका, गाड्या धुवायला येणारा मुलगा, सिक्युरिटी गार्डस असे कित्येक जण क्रॅास होतात. त्यांना हाय बाय करणं सोडा. साधं ओळखीचं स्मितपण देत नाही मी. मुळात अनेकदा ते क्रॅास झाले की मेंदू त्यांची नोंदच घेत नाही….. त्यांच्याकडे काही काम असेल तर ते कोणत्यावेळी कुठे भेटतील हे मला ठाऊक आहे. याचाच अर्थ ते मला दिसतात. पण त्यांना ओळख दिली जात नाही.

पालक म्हणून मला वाटतं की मला मुलांपेक्षा जास्त कळतं. मुलांवर संस्कार करायची, त्यांना घडवायची, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवायची , जबाबदारी माझी आहे.

त्यादिवशी एका चार वर्षाच्या मुलाने बापावर चांगले संस्कार केले, त्याला दोन चांगल्या गोष्टी शिकवल्या…..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंयत!
त्यादिवशी एका चार वर्षाच्या मुलाने बापावर चांगले संस्कार केले,>> खर आहे कधी कधी मुलं मोठ्यांपेक्षा शहण्यासरखी वागतात.

तुम्ही उपक्रमात सहभागी झालात यासाठी धन्यवाद!

किती सुंदर आणि प्रामाणिक लिहिलय. असे कित्येक प्रसंग आपल्या सर्वांच्याच आयुष्यात घडतात. पण आपण त्याची दखल घेउच असं नाही.

छान लिहिलंय.

असे कित्येक प्रसंग आपल्या सर्वांच्याच आयुष्यात घडतात. पण आपण त्याची दखल घेउच असं नाही. >>+11

छान लिहिलंय
खरंच अश्या छोट्या गोष्टी जाणवणे बंद झालंय हे असं अचानक जाणीव होते

अतरंगी फार छान आणि प्रामाणिक लिहिले आहे.
आधीच वाचले होते, पण घाईत प्रतिसाद द्यायचे टाळले कारण हे वाचून डोक्यात बरेच विचार आले. ते शांतपणे येऊ दिले.

खरेच असे बरेचदा होते ज्यात आपले मुखवटे स्वतासाठी गळून पडतात आणि आपलाच चेहरा आपल्याला नव्याने दिसतो.

एक किस्सा याचा लिहायला घेतला.. पण लिहिताना बरेच आणि सविस्तर लिहावेसे वाटत असल्याने आवरता घेतला, नंतर वेळ मिळेल तेव्हा लिहून ईथेच किंवा फार मोठा झाल्यास नवीन धाग्यात टाकतो.

तुमच्या किश्यांबद्दल सांगायचे झाल्यास,
तुम्हाला काहीतरी आपले चुकले याची जाणीव होणे हे तरी कुठे सगळ्यांना जमते. या जाणीवाच स्टेप बाय स्टेप आपले विचार प्रगल्भ करतात. अन्यथा संपुर्ण आदर्शवादी म्हणून एखादा महापुरुषच जन्माला येतो.

कालच वाचली होती, कथा असूनही स्वानुभवाइतकीच भिडली. आवडली. आपली मुलं खरंच आपल्यापेक्षा सहृदयी असतात.

सर्वांना धन्यवाद.

दोन दिवस प्रवासात असल्याने प्रतिसाद देता आला नाही.

वरचे लिखाण हे काल्पनिक नाही. सत्यकथन आहे.

.