दक्षिण मुंबई लोकसभा कोण बाजी मारणार....

Submitted by ASHOK BHEKE on 2 March, 2024 - 00:14

लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. मुंबईतील अत्यंत महत्वाचा भाग असलेला मूळ मुंबईचा श्रमजीवी आणि उच्चभ्रू वस्ती असलेला मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदार संघ ओळखला जातो. कुलाबा ते शिवडी, वरळी भागापर्यंत मराठी, मुस्लिमबहुल आणि गुजराती मतदार असलेला हा भाग. आतापर्यन्त या मतदारसंघावर शिवसेना कॉग्रेस खासदार म्हणून निवडून आणले आहेत. सध्या अरविंद सावंत गेली दहा वर्षे या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या जागेवर अनेकांचा डोळा असून शिवसेना पुन्हा अरविंद सावंत यांना मैदानात उतरविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी घटकात उध्दव ठाकरे यांची शिवसेना सहभागी असल्यामुळे मुस्लिम मतदार यदाकदाचित महाविकास आघाडीच्या बाजूने सरकला तर अरविंद सावंत यांना शिवडी वरळी मराठी भाषिक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मतदार संघावर मदार अवलंबून असणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांना 374649 मते मिळाली होती. तर मिलिंद देवरा यांना 246045 इतकी मते घेतली होती. मनसे उमेदवार श्री बाळा नांदगावकर यांना 84773 इतकी मते मिळाली होती. देवरा आणि नांदगांवकर यांच्या मतांपेक्षा चाळीस हाजाराहून अधिक मते श्री अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडली होती. 51% मते मिळविण्यात अरविंद सावंत यांनी बाजी मारली होती तरी त्यावेळी सेना भाजप यांची युती होती. मोदी करिश्मा होता. बाळकोट पूलवामा मुळे मतदारांचे मत परावर्तीत झाले होते. आता युती नाही. महाविकास आघाडी मध्ये राहुल गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची मोट बांधली गेली आहे. पक्ष आणि चिन्ह बळकावल्यामुळे उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत मतदारांची सहानुभूती नक्कीच दिसून येते. परंतु शिवसेना पक्षाच्या फुटींनंतर राजकीय गणिते बदलली आहेत. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका पाहता काही प्रमाणात शिंदे गटाला मतदारामध्ये नक्कीच मानाचं स्थान नाकारता येणार नाही. परंतु अजितदादाच्या राष्ट्रवादीचे प्राबल्य येथे दिसून येत नाही. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री बाळा नांदगांवकर येथे उभे ठाकले तर मात्र मराठी मतांचे विभाजन होईल, तसेच ओवेसीच्या एमआयएम ने तगडा उमेदवार जर दिला तर मात्र चित्र वेगळे दिसून येईल. ते निश्चितच भाजपाच्या पथ्यावर पडेल.
भाजप, शिंदेगट आणि अजितदादाची राष्ट्रवादी या तिघांची महायुती झाली असून सध्या भाजप या मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभा सभापती श्री राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. गेली पांच दहा वर्षे या मतदारसंघात विविध उपक्रम राबवून उमेदवारी मिळविण्यासाठी सज्ज असलेले श्री मंगलप्रभात लोढा मागे पडलेले आहेत. आता श्री नार्वेकर यांच्या भेटीगाठी, सभा, मेळावे सुरू झाले आहेत. भाजापाने राहुल नार्वेकर यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरविले तर ते बाजी मारतील का ? शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटींनंतर वेळकाढूपणा नार्वेकर यांचा समस्त जनतेला दिसून आला आहे. वेळकाढूपणा हा राजकीय स्वरूपाचा असला तरी ज्यांच्याकडे हा गुण आहे त्यांना जनता लोकसभा प्रतिंनिधी करण्यात स्वारस्य दाखवीतील का? असे अनेक प्रश्न निर्माण होऊन भाजपला त्रासदायक ठरणार, हे राजकीय विश्लेषक नक्कीच सांगतात.किंबहुना भाजपच्या निवडणूक समन्वय समितिने भाषिक समीकरण लक्षात घेऊन निर्णय घेतला असावा. केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल आणि मुंबई उपनगर पालकमंत्री श्री लोढा यांच्या नावाची चर्चा असताना ते मागे पडले आहेत श्री लोढा यांचे विशेष लक्ष मात्र दक्षिण मुंबई वर होते. पक्ष आणि शासकीय कार्यक्रम न चुकविता हजर होणारे श्री लोढा हे दिवाळीमध्ये घरोघर पोहचले होते. दक्षिण मुंबईत अपघात अथवा आगीसारख्या घटनांना भेटी देऊन मदत करणारा मंत्रीमहोदय फारच आस लावून बसले होते. परंतु त्यांच्या वाट्याला निराशा आली आहे. कुलाबा विधानसभा निवडणुकीत श्री राहुल नार्वेकर यांनी फक्त 53.85% मते मिळवून निवडून आले होते. त्यामानाने मलबार हिल मधून मंगलप्रभात लोढा हे 75.47% मते मिळवून निवडून आले होते. त्यामुळे श्री मंगलप्रभात लोढा हे श्री अरविंद सावंत यांच्याशी टक्कर देऊ शकतात, हे सर्वसामान्यांचे मत आहे. काही मते भाजपला कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाहीत ती मते मिळविण्यात शिवसेना शिंदे गटाच्या श्री यशवंत जाधव यांच्या नावाचा विचार केला गेला तर मुस्लिम, राजस्थानी, दक्षिणी मतदारावर त्यांची छाप आहे. त्यात त्यांच्या पत्नी सौ यामिनी जाधव यांच्या सुंदर भायखळा या योजनेचे सर्वच मतदारांनी कौतुक केले आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे असलेले महत्व लक्षात घेता श्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पारड्यात ही जागा टाकून नुकसान करून घेतले आहे. नुकतेच शिंदे गटात प्रवेश घेतलेले श्री मिलिंद देवरा यांनी या मतदारसंघातून दोन वेळा आपल्याकडे राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांची या मतदारसंघात असलेली पकड पाहता शिंदे गटाला ही जागा लाभदायक ठरली असती. किंतु येथील गुजराती मतदारांच्या जिंवावर भाजपा या जागेसाठी आपला उमेदवार उभा करणार आहे. तन मन धन वापरुन भाजप ही जागा जिंकण्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न करणार आहे. मतदार त्यांना कितपत दाद देतात, यावर सारे काही अवलंबून आहे.
दक्षिण मुंबई या बहुभाषिक मतदारसंघात मतदार संघातील उमरखाडी, भायखळा, नागपाडा या वस्तीत मुस्लिम मतदार हा तर कुलाबा, गिरगांव, वरळी परळ लालबाग शिवडी भगत मराठी भाषिक अधिक प्रमाणात आहेत. या भागातील उपकर प्राप्त इमारती आणि मोडकळीस आलेल्या इमारती अरुंद गल्ल्या, गलिच्छ परिसर असे चित्र या मतदारसंघात एकीकडे पाहायला मिळते. या मतदारसंघात सुरू असलेल्या मेट्रो, मोनो आणि कोस्टल रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न तसेच अरुंद रस्ते आणि गल्ल्या यामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीचा प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिनोंमहिने रस्ते खोदून सतत कामे सुरू असल्यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. दक्षिण मुंबईचे मतदार यंदा लोकसभेच्या ही महत्वाची जागा कोणत्या पक्षाच्या गळ्यात घालणार हे मतनिकालानंतर कळेलच.

अशोक भेके
9969017179

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिण मुंबई लोकसभा कोण बाजी मारणार?
उत्तर: राजकारणी

हरणार कोण?
उत्तर : कार्यकर्ते

तटस्थ कोण?
उत्तर : सर्वसामान्य नागरिक