पाणीच पाणी..
चार दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत होता. मध्ये मध्ये पाऊस जर्रा कमी झाल्यासारखा वाटला, तेव्हा चंदाने बाहेर डोकवायचा प्रयत्न केला, पण पावसाची रिपरिप अखंड चालूच होती. बाहेर सगळा चिखल झाला होता. खिडकीच्या एवढ्याशा फटीतून सगळीकडे वहाणारं पाणी दिसत होतं.
बाहेरच कशाला, आता खोलीतही पाणीच पाणी दिसत होतं, आणी ते कसं आवरावं हे तिला कळत नव्हतं. तिचं घर म्हणजे होतंच काय..? तर जेमतेम दहा बाय दहा ची ही एवढीशी खोली.
चार दिवसांपूर्वी ती घराबाहेर पडली, तेव्हाच सुरवात झाली होती पावसाला. तिची सगळी कामं नदी पलीकडच्या घरातली होती. नदीच्या ह्या बाजूला नवीन इमारतींचं बांधकाम सुरू झालं होतं. काही वर्षांनी इकडेही लोकं येतील रहायला. पण तो पर्यंत मात्र ती आणी तिच्या सारखे कामकरी लोकंच रहायचे इकडे, बसक्या तात्पुरत्या घरांमध्ये. आणी कामाला मात्र नदी पलीकडे जायचे.
मराठवड्यातल्या एका छोट्याशा दुष्काळी खेड्यातून, नाशिक मध्ये चंदा लग्न करून आली होती. घरा पासून जवळच वाहणारी गोदावरी बघून केव्हढं अप्रूप वाटलं होतं तिला.
रोज चार घरची कामं करायला जातांना त्या नदीवरूनच जावं लागायचं. गेले चार दिवस त्याच नदीने तिचा जाण्या-येण्याचा रस्ता बंद केला होता.
त्या दिवशी दुपारी ती कामावरून परत आली, तेव्हाच पुलाला पाणी लागायला आलं होतं. आणि मग संध्याकाळ पासून, पाणी पुलावरून जायला लागलं.
तिचा नवरा पलीकडेच अडकला होता. तो तिकडे त्याच्या दोस्ताकडे राहात होता चार दिवसांपासून. तो रोज फोन करायचा तिची चौकशी करायला.
एवढा पाऊस खूप वर्षात पडला नव्हता. तिचं तर कामावर जाणं बंदच झालं होतं.
ही एकच छोटीशी खोली होती तिची. खोलीत एका कोपऱ्यात स्वयंपाकाचं सामान तिथेच एवढीशी मोरी अन् दुसऱ्या कोपऱ्यात एक लोखंडी कॉट. कॉट जवळच लहानशी खिडकी होती. पावसामुळे खिडकी बंदच ठेवायला लागली होती. पण त्या फटीतूनच बाहेरच्या पावसाचा अंदाज येत होता.
नुसता खिडकीच्या फटीतूनच कशाला.. बंद दारा खालच्या जागे खालून पण घरात शिरत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे, बाहेरचा पाऊस कळत होताच. घरात असलेल्या रिकाम्या गोण्या.. चिरगुटं.. सगळं लावून तिने आत शिरणारं पाणी अडवायचा प्रयत्न केला.. पण धो धो कोसळणाऱ्या पावसा पूढे काहीच टिकत नव्हतं. सगळच भिजून चिंब झालं होतं. शेवटी थोड्या थोड्या वेळाने उठून ती दाराला लावलेल्या पोतेऱ्यांच सगळं पाणी बादलीत पिळून घेत होती अन् भरलेल्या बादलीतलं पाणी कोपऱ्यातल्या मोरीत फेकत होती. अजून हे असं कीती दिवस चालणार कुणास ठाऊक...
तिचा नवरा नदी पलिकडूनच कामावर जात होता. ती मात्र घरीच बसली होती. तिला एकदम भीती वाटली.., दोन तीन दिवस कामावर नाही गेली, तर कामं जातात की काय..? एवढे दिवस घरी काम करत नाही कुणी.. लगेच दुसरी बाई शोधतात.. बायका टपूनच असतात नवीन काम मिळवायला..
परवा तिने कळवलं होतं, काही घरी.. पावसामुळे येत नाही असं.. पण त्यालाही आता दोन दिवस होऊन गेलेत.. सगळ्या ताई चिडल्या असतील.. वाटलं होतं रात्रीतून पाऊस कमी झाला.., पूर ओसरला.. तर जाता येईल कामावर.. पण अजूनही पावसात काही बदल नव्हता.. पूलावरचं पाणी तर वाढतच होतं.
घरात शिरलेलं पाणी तिने परत फडक्याने बादलीत पिळलं. आधीच्याच ओल्या पदराला हात पुसले.. अन् मोबाईल हातात घेतला.., कामावर कळवून टाकू.., ‘पाणी ओसारलं, की येतेच.. कामं राहू द्या तशीच..’.
तिने सारिकाताईंना फोन लावला....
पाचव्या मजल्यावरच्या घरातल्या गॅलरीतून सारिका पाऊस बघत होती. जरा लांबवर दुथडी भरून वाहणारी नदी दिसत होती. आपल्या सुरक्षित घरात बसून पाऊस कसा निवांत उपभोगता येतो.. गरम चहाचा कप घेऊन, ती गॅलरीत बसली होती निवांतपणे धो-धो कोसळणाऱ्या पावसाकडे बघत.
गेले चार दिवस सगळंच ठप्प झाल्या सारखं झालं होतं. पाऊस सतत कोसळतच होता. नवरा तर सकाळीच कंपनीत गेला.. तो आता एकदम रात्रीच येईल. चार दिवसापासून तिचं मात्र बाहेर जाणं एकदमच बंद झालं होतं. अती पावसामुळे शाळेलापण ह्या आठवड्यात सुट्टी मिळाली होती.
फ्रीज मधल्या सगळ्या भाज्या संपल्या होत्या.. त्या आणायच्या होत्या.. शाळा.. संध्याकाळचा योगा क्लास.. गाण्याचा क्लास.. सगळंच बंद पडलं होतं. पाऊसच एवढा होता..
आज तर घरातली कामही अजून तशीच पडली होती.. सगळ्या घरावरच एक ओशटपणा आला होता.. रोज ती शाळेतून यायच्या आधीच चंदा येऊन, शेजारून किल्ली घेऊन सगळं काम करून जायची. आल्यावर तिला तिचं घर कसं लखलखीत मिळायचं.
कामवाली बाई एखाद्या दिवस नाही आली, तर निभतं. पण लागोपाठ दोन तीन दिवस म्हणजे.., खूपच होऊन जातात.. पण मधला पूल पाण्याखाली गेलाय म्हणे.. केव्हा येतेय ही चंदा कामाला, कुणास ठाऊक..! जरा पावसाने उसंत दिली असती, तर पूर बघायला तरी जाता आलं असतं..
कालपासूनची भांडी तशीच पडली होती सिंक मध्ये.. आता सकाळच्या चहा नाश्ताच्या भांड्यांची त्यात भरच पडली होती. किमान आज तरी झाडू फरशी पण करायला हवी होती.. किती दिवस घर तसच ठेवायचं..? एखाद दूसरा दिवस असेल, तर जातं निभावून.. कपडे पण लावायला हवे होते मशीन मध्ये..
सारिका ओटा आवरायला गेली. एकदा भांडी घासायला सुरवात केल्यानंतर, तिचा अर्धा पाऊण तास कसा गेला ते कळलंच नाही. मन लावून भांडी घासल्यावर तिला स्वत:लाच खूप छान वाटलं. भांडी रोजच्या पेक्षा जास्तच लखलखीत दिसत होती. आता तिला उत्साह आला. सगळी भांडी पुसून जागच्या जागी ठेवली.. ओटा लखलखीत केला आणी सारिकाने झाडू हातात घेतला. रेडियोवर मस्त जुनी गाणी लागली होती. गाणी ऐकत ऐकतच केव्हा झाडू फरशी अन् डस्टींग झालं, तिला कळलही नाही. ‘खरच.. अगदी रोज जरी नाही, तरी असं अधून मधून घरकाम करायला काही हरकत नाही.. रोज तसा वेळही नसतो..’ तिच्या मनात आलं..
मशीन मध्ये कपडे टाकून सारिकाने मशीन चालू केलं अन् ती आयपॅड घेऊन निवांतपणे मस्त आंघोळ करायला गेली. बाहेर पाऊस कोसळतच होता. बाथरूम मध्ये तिने मोठ्या आवाजात गाणी लावली, अन् आता मस्त वाटतच आहे, तर बाथरूम पण छान चकचकीत करून टाकुया म्हणत ब्रश हातात घेतला.
मस्त आंघोळ करून, फ्रेश होऊन गुणगुणत सारिका बाहेर आली.. आणी बघते तर काय..? घरभर पाणीच पाणी झालं होतं... मधल्या अरुंद जागेत असलेल्या, वॉशिंग मशीन चा एक्सॉस्ट पाइप निसटला होता अन् ते साबणाचं पाणी घरभर पसरलं होतं.. सरिकाला एकदम रडुच फुटलं..
सारिकाचा फोन वाजला. फोन वर चंदा होती..
“ताई.. अजून नदीला खूप पानी हाये.. मलं यायचं हाये कामावर.. पन येताच येत न्हाई.. घरभर पन पानीच पानी हाये....” बोलता बोलता चंदाचा आवाज रडवेला झाला. चार दिवस घरात ती एकटीच होती.. आता बोलतांना ते जाणवलं, अन् तिला एकदम रडूच आलं.., परत पसरलेल्या पाण्याकडे पाहून..
सारिका पण हातात फोन घेऊन, तिच्या घरभर पसरलेल्या पाण्याकडे पहात होती..
******
@छन्दिफन्दि
@छन्दिफन्दि
चित्रावरून लिखाण : एक ( सुचविलेला) उपक्रम !
छान लिहिलंय
छान लिहिलंय
आवडलं लेखन.
आवडलं लेखन.
सुरेख. तुम्ही पात्रामध्ये
सुरेख. तुम्ही पात्रामध्ये प्रवेश करता शर्मिला. ते गोणपाट, चिरगुट सर्वच ....!!! इथेच मला पाऊस पडत असल्याचा फील आला.
खूप छान जमलेय कथा!
खूप छान जमलेय कथा!
मस्त लिहिलंय शर्मिला!
मस्त लिहिलंय शर्मिला!
खूपच मस्त, दोन्ही कडचं पाणी
खूपच मस्त, दोन्ही कडचं पाणी पाणी, पण किती फरक आहे दोन्ही घटनांमध्ये. सामो म्हणतेय ते खरं आहे, तुम्ही शिरताच त्या त्या पात्रांमध्ये.
मस्त लिहिलंय शर्मिला!
मस्त लिहिलंय शर्मिला! मंजुळेंच्या ‘पावसाचा निबंध' ची आठवण आली.
मन लावून भांडी घासल्यावर तिला
मन लावून भांडी घासल्यावर तिला स्वत:लाच खूप छान वाटलं.>> सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या की त्या बुडत्याला असल्या काड्यांचा आधारच तारतो.
चित्राच्या अनुषंगाने मर्यादित परिघात छान जमली आहे कथा.
किती सुंदर जमलीय..
किती सुंदर जमलीय..
तुम्ही मनावर घेऊन उपक्रमाला सुरुवात केल्या बद्दल धन्यवाद!
>>>>>>>तुम्ही मनावर घेऊन
>>>>>>>तुम्ही मनावर घेऊन उपक्रमाला सुरुवात केल्या बद्दल धन्यवाद!
+१
मस्त जमलीय...! आवडलीच
मस्त जमलीय...!
आवडलीच
छान कथा.
छान कथा.
धन्यवाद उर्मिलास, आबा, सामो,
धन्यवाद उर्मिलास, आबा, सामो, स्वाती, वावे, धनुडी, आस्वाद, अबुवा, छन्दिफन्दि, ऋन्मेऽऽष, भरत.
तुम्ही पात्रामध्ये प्रवेश करता शर्मिला. ते गोणपाट, चिरगुट सर्वच ....!!! इथेच मला पाऊस पडत असल्याचा फील आला.>> ही फारच मोठी कॉम्प्लेमेंट झाली, सामो.
छान आहे कथा. पाऊस पण या
छान आहे कथा. पाऊस पण या कथेतले एक जिवंत पात्र आहे, वाचताना वाटत होतं.
धन्यवाद शर्वरी.
धन्यवाद शर्वरी.
छान लिहिलं आहे. आवडलं
छान लिहिलं आहे. आवडलं
तुम्ही पात्रामध्ये प्रवेश
तुम्ही पात्रामध्ये प्रवेश करता +१
एखाद्या चित्रपटातील प्रसंग शोभेल इतके जिवंत वर्णन केलंय सर्व. सगळं काही डोळ्यांदेखत घडतंय असेच वाटत राहिले
धन्यवाद ऋतुराज. अज्ञानी.
धन्यवाद ऋतुराज. अज्ञानी.
एखाद्या चित्रपटातील प्रसंग शोभेल इतके जिवंत वर्णन केलंय सर्व. सगळं काही डोळ्यांदेखत घडतंय असेच वाटत राहिले>> धन्यवाद. माझ्या शेजारून गोदामाई वहाते. त्यामुळे पावसाळ्यात पूर बघत असते.
.
.
छान!
छान!
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
धन्यवाद हौशीलेखक, सहज.
धन्यवाद हौशीलेखक, सहज.