लिखाण असे घडले

Submitted by SharmilaR on 28 February, 2024 - 01:30

लिखाण असे घडले

खरंतर लेखन कसे घडले/घडते ह्या सांगण्याचा मला काहीच अधिकार नाहीय. कारण माझी ‘लेखनसंपदा’ ती कित्ती.. तर चार-सहा कथा अन् तितपतच कविता! पण कुणीसं काहीतरी म्हटलंय नं, ‘हंसाचे चालणे.. म्हणोनी कोणी..’

तर मला लहानपणापासून वाचनाची आत्यंतिक आवड. म्हणजे आठवतंय तेव्हापासून वाचतेच आहे. अक्षरओळख केव्हा झाली, ते सुद्धा आठवत नाही, पण अगदी लहान असल्यापासून, बाबांचं बोट धरून रस्त्याने चालतांना माझं लक्ष मात्र दुकानांवरच्या पाट्यांकडे असायचं.

आमच्या घरात तसं वाचायला काहीच नसायचं. रोजचा पेपर पण शेजाऱ्यांकडून तासाभराकरता मागून आणलेला असायचा. अर्थात तो घरात असता तरी, कितपत समजला असता त्या वयात, शंकाच आहे. सांगायचा मुद्दा हा की, रोजचा पेपर पण जेव्हा जिथे वस्तू होती. तिथे लहान मुलांच्या आवडीकडे कोण लक्ष देणार?

मी मात्र बकरीसारखी जे दिसेल ते भराभर चरत होते. हो, अक्षरश: बकरीसारखंच. ती जसे काटे काटे सोडून पाने खाते नं.. तसं मी ऱ्हस्व.. दीर्घ.. शब्दांचं सौन्दर्य .. काही काही नं बघता फक्त वाचनाचा अर्थ तेवढा डोक्यात घेत होते. कारण आमच्याकडे वाचनाचा वेळ हा आईच्या चोरून लपून काढायला लागायचा. वाचणाऱ्याला (त्यातल्या त्यात मुलींना जास्त) ‘एकलकोंडा..’ ‘जास्तच शहाणा../ शहाणी..’, ‘कामात अंग चोरणारी..’ असली दूषणं मिळायची. कुठल्या क्षणी घरकामाकरिता आईचा आवाज येईल ह्याचा नेम नसायचा. मग मिळेल ते घ्या, कसं बसं भराभर पदरात पाडून. (त्यामुळे अजूनही माझ्या लिखाणात मराठी व्याकरण, शब्द लेखन.. आणी इंग्रजी स्पेलिंगच्या चुका खूप होतात. पण सुदैवाने आता मदतीला कॉम्प्युटर आहे.).
थोडी मोठी होत गेले, तेव्हा घरातलं माझं आवडीचं (एकमेव) काम म्हणजे, महिन्याचं वाणसमान यायचं, तेव्हा त्या पुड्या सोडायला आईला मदत करायची. कारण तेव्हा किरणामाल वर्तमानपत्राच्या कागदात बांधून मिळायचा. आणि किराणा सोडता सोडता काहीतरी वाचायला मिळायचं. शेजारी-पाजारी, नातेवाईकांकडे कुठे गेले, की तिथे दिसेल ते पुस्तक/मासिक घेऊन मी एक कोपरा गाठायचे. वाचलेलं मनात झिरपत गेलं...

मग असंच केव्हातरी.., म्हणजे शाळेच्या वयात असतांनाच, मनात काही ओळी यायला लागल्या, तसं लक्षात आलं, आपल्याला कविता होतेय!! मग त्या कुठेतरी लिहून ठेवायला लागले. पण कुठे छापायला वैगेरे द्यायची हिम्मत नव्हती. (आणी लिहिल्यानंतर मला स्वत:लाच त्या तेवढ्या छान वाटत नव्हत्या, कारण यमक बिमक चा पत्ता नव्हता. )

पुढे हॉस्टेलला असतांना माझ्या मैत्रिणींना माझ्या कवितांचा सुगावा लागला, तशा त्या वाचायला लागल्या आणी काहीजणी आपापल्या होणाऱ्या नवऱ्यांना पत्र लेखनात माझ्या कविता वापरायला लागल्या. त्या काळी शिकत असतांना लग्न ठरवणं अगदी समाजमान्य/ मुलगीमान्य होतं. त्यामुळे माझं सार्वजनिक लेखन मैत्रिणीं पुरतच मर्यादित राहिलं.

साधारण वीस वर्षांपूर्वी असेल, सुधा मूर्तींची एक मुलाखत (बहुतेक इंडियन एक्सप्रेस मध्ये होती) वाचनात आली. ती मला आवडली, आणी त्याने मी एवढी प्रभावित झाले.. की लगेच कागद पेन घेऊन त्याचा मराठी अनुवाद करायला बसले.

माझ्या नवऱ्याला तो अनुवाद आवडला. मग तो कुठे तरी प्रसिद्धीला पाठवायला त्यानेच सुचवलं. माझं मराठी लेखन तर दिव्य! आणि हस्ताक्षर तर त्याहून दिव्य! मग भाच्याला बोलावलं लिहायला, आणि त्याच्या कडून चांगल्या सुवाच्य अक्षरात ते लिहून घेतलं. ते घेऊन इथल्याच एका दैनिकात गेले, तर ते जणू कुणी काही आणावं, ह्याची वाटच पहात होते. अशा रीतीने ती एक मुलाखत तीन भागात (अनुवादक म्हणून माझ्या नावाने) प्रसिद्ध झाली. हेच माझं पहिलं प्रसिद्ध झालेलं लिखाण.

अनुवाद प्रसिद्ध झाल्यावर मला जरा आत्मविश्वास आला. मग बरेच दिवस डोक्यात खुपत असलेली एक ‘आठवण’ (पत्र)कथा स्वरूपात लिहिली, आणि ती एका मासिकाकडे (पोस्टाने) पाठवली. तीही लगेच प्रसिद्ध झाली. हे माझं प्रसिद्ध झालेलं पहिलं स्वतंत्र लिखाण.

मी काही लिहिलेलं कुणालाच सांगितलं नव्हतं. पण ती कथा काही ओळखीच्या लोकांच्या चुकून वाचनात आली, आणि आवडली म्हणून मुद्दाम नाव बघून मला फोन केले. ती लोकं ओळखीची तरी होती पण जेव्हा काही अनोळखी लोकांचे फोन आले, तेव्हा मात्र अगदी धन्य धन्य वाटलं.

त्यानंतर मात्र घर.. नोकरी.. मुलाची शाळा.. , अभ्यास.. त्याचे खेळण्याचे क्लाससेस.., सासू-सासरे.. माझं स्वत:चं अनेक नौकऱ्या करणं.. सोडणं.. बदलणं.. ह्या व्यवधानात इतकी गुंतून गेले, की हातात कागद पेन धरायला तेव्हा जमलच नाही. हो.., तेव्हा संगणक फक्त प्रोग्रामिंग.. डेटा प्रोसेसिंग .. ह्या करताच वापरले जायचे. तेही फक्त कामाच्या ठिकाणीच. त्यावर मराठी टायपिंग तर माहीतच नव्हतं. शिवाय तेव्हा फ्लॉपी डिस्क वैगेरे भानगडी होत्या. घरी संगणक घेणं तेव्हा सामान्यांच्या आवाक्यात नव्हतं. त्यामुळे आलं मनात की बसलं आपलं टायपायला.., आणि दिलं पाठवून असं होत नव्हतं. त्या काळात कामं.. ऑफिस सांभाळून, कागदावर लिहून पोस्टणारे धन्य!

माझ्या पहिल्या कथेसंबंधी एक छान (अविश्वसनीय) आठवण आहे. ही कथा प्रसिद्ध झाल्यानंतर मला हैद्राबादहुन एक पत्र आलं. पत्रलेखकाने कथा आवडल्याचं तर कळवलं होतंच पण त्याने त्या कथेवर एक शॉर्ट फिल्म कराण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या संबंधी त्यांना माझी परवानगी/पत्रव्यवहार/भेट हवी होती. मी आपली धक्का.. घाबरणे.. ह्या मोड मध्ये गेले.. छे!.. छे!.. आपल्याला नकोच त्या भानगडी.. कुठे मी.. कुठे हैदराबाद..! हे फिल्म वैगेरे काही आपलं जग नाही. (अशा रितीने जग एका शॉर्टफिल्म ला मुकलं.)

ही घटना मला स्वत:ला पण खोटी/ स्वप्नवत वाटली असती, पण अजूनही ते पत्र मी फॅनलेटर म्हणून जपून ठेवलंय. ह्या पत्रातच कुठे तरी, पुढे लिहिण्याची प्रेरणा दडली असावी.

काही वर्षांपूर्वी (आता इंटरनेट ने बसल्याजागी जग भ्रमण करता येत होतं) मी सहज म्हणून त्या पत्रलेखकाचा शोध घेतला. तर त्यांचं फिल्म प्रॉडक्शन हाऊस आहे, आणि ते स्वत: लेखक पण आहेत. माझ्या हाताशी आत नेट आणि वेळ दोन्ही होतं. मी त्यांच्याशी संपर्क साधला जुनी ओळख द्यायला. ते अर्थातच पार विसरले होते, मला आणी माझ्या कथेला! आता एवढ्या वर्षांनी माझी संधी तर अर्थातच गेली होती, पण ते मात्र बंगलोरहुन औरंगाबादला जातांना सदिच्छा भेट म्हणून (उभ्या उभ्या) चक्क आमच्या घरी येऊन आणि मग तास दोन तास बसून, भरपूर गप्पा पण मारून गेले. (पण माझी फिल्मची गाडी मात्र हुकली होती).

मधे मधे जमेल तेव्हा जमतील तशा मी ‘कुट्टीच्या गोष्टी’ लिहिल्या, आणि त्या इथल्या दैनिकात (तेच ते लिखणाची वाट पहाणारे) क्रमश: प्रसिद्धही झाल्या.

दोन तीन वर्षांपूर्वी मात्र मी नोकरी सोडली आणि चक्क घरी रिकामी बसले (कोरोंना इफेक्ट!). करायला काहीच काम नव्हतं हातात. असंच एकदा जवळच्या मैत्रिणीशी गप्पा मारत असतांना तिला काही किस्से सांगितले.. माझ्या काही अर्ध्या मुरध्या कविता ऐकवल्या. तर ती म्हणाली, ‘तू आत्ता जे बोललीस नं.. ते तसच्या तसं लिहून काढ.’

आता हाताशी वेळ होता आणि घरी संगणकही होता. त्यावर युनिकोड नव्हता, पण तो असतो, हेच तेव्हा महिती नव्हतं. मग कुठल्या तरी प्लॅटफॉर्म वर मराठी टायपिंग शिकले आणी कथा टाइप केली. लिखाण जमतंय, असं वाटल्यावर आणखी एक दोन कथा लिहिल्या आणी एका ऑनलाइन संस्थळावर टाकल्या. (तो पर्यंत मायबोली चांगलंच महित झालं होतं, पण इथे टाइप करता येत नव्हतं. डायरेक्ट मायबोलीवर अजूनही करता येत नाही. दुसरीकडून पेस्टून टाकते. मायबोली वर मला टायपता येत नाही ह्याच्या खुणा अजूनही तिथे आहेत!!!)

मी लिहिलेल्या पहिल्या एक दोन कथा मुलाने वाचल्या. त्याची बोलकी प्रतिक्रिया म्हणजे ‘निशब्द होणं’ ही होती. मग त्यानेच, ‘कुठे त्या जुन्या कॉम्प्युटरवर टाइप करत बसते..’ असं म्हणून एक लॅपटॉप भेट दिला आणि ‘छान लिहितेस’ असे शब्द दिले.

आतापर्यंत मी थोड्या फार कथा, कविता लिहिल्यात. त्या कुठे कुठे प्रकाशितही झाल्या. लोकांचे कधी अचानक मेल/ फोन येतात, लिखाण आवडलं सांगण्याचे. खूप छान वाटतं अशावेळी. कधीतरी फोनवर कुणी तरी अगदी भरभरून बोलतं कथेविषयी. कथा एवढी आत पोहोचली हे ऐकून लिखाणाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.

आता गेल्या वर्ष-सहा महिन्यात मात्र लिहिणं जवळपास बंदच झालंय. (आळस आणि नं सुचणं दोन्ही कारणं आहेत.) तसं छापील वाचणारेही पूर्वीपेक्षा (म्हणजे खूपच पूर्वीपेक्षा) कमीच झालेले दिसताहेत. पूर्वीचा वाचनाचा अधाशीपणा तर आता कुठेच कुणाकडे दिसत नाही. वाचण्यापेक्षा ऐकणं.. आणि वेळ असेल तर ऐकण्यापेक्षाही बघणं ह्यालाच लोकांची पसंती दिसते.

बघू.. लिहायला परत कधी काही सुचेल तेव्हा... पण..
लहानपणी माझी अभ्यासातली आवडीची पुस्तकं, म्हणजे मराठी आणि इतिहासाची असायची. ती मी माझीच काय, पण मोठ्या भावंडाचीही वर्षाच्या सुरवातीलाच वाचून संपवायचे. मराठीच्या पुस्तकात धड्याच्या सुरवातीला लेखकाचा परिचय असायचा. त्यात (माझ्या आवडीचं) एक वाक्य हमखास असायचं, ते म्हणजे, ‘ह्यांनी विविध क्षेत्रात काम केलं आहे...’

बाकी मी आतापर्यंत जेमतेमच काही कथा लिहिल्या असल्या तरी, वरील लेखक परिचयच्या वाक्यामुळे मी स्वत:ला लेखिका म्हणवून घेऊ शकते. (इथे मी लॉजिकची वाट लावलीय. म्हणजे अ->ब, ब->क. तर मी क->अ करून टाकलं).

*******

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर मनोगत !
आपल्याला कविता होतेय!! > > अगदी अगदी Happy

बघू.. लिहायला परत कधी काही सुचेल तेव्हा... पण.. >>>> नक्की सुचेल, शुभेच्छा !

मनोगत आवडलं.
तुम्ही ठरवून लिखाण करत नाही, हे दिसलं.
संख्येपेक्षा तुम्हांला आणि वाचकांना त्यातून काय मिळतं ते महत्त्वाचं.

तुमचा लिखाण प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. कथा छान असतात. कविताही आवडतील वाचायला.. कुट्टी.. मध्ये पण कधीतरी हा संदर्भ वाचलं होता...

छान मनोगत आणि छान लिहिता तुम्ही Happy
जवळपास सर्वच लिखाण वाचले असेल तुमचे कारण बरेचदा ते मला स्वताच्या भावनांशी रिलेट होते असे वाटते.

मग त्यानेच, ‘कुठे त्या जुन्या कॉम्प्युटरवर टाइप करत बसते..’ असं म्हणून एक लॅपटॉप भेट दिला आणि ‘छान लिहितेस’ असे शब्द दिले. >>>>> वाह! तेव्हा कसले भारी वाटले असेल तुम्हाला Happy

धन्यवाद छन्दिफन्दि, ऋन्मेऽऽष.
वाह! तेव्हा कसले भारी वाटले असेल तुम्हाला>> हो खुपच. Specially त्याच्याकडून 'आई' करिता 'छान' हे शब्द काढणं खुपच अवघड असतं. हा.. हा...

Specially त्याच्याकडून 'आई' करिता 'छान' हे शब्द काढणं खुपच अवघड असतं.>>>> Bw समजू शकते..

सुरेख मनोगत. मला माझी आईच आठवली. आई लिहायची नाही, तुमच्या वाणसामानाचे कागद उलगडून वाचण्याच्या सवयीमुळे आठवली. ती पण अशी कुठलाही चिटोरा हाताला लागला की वाचायची. तीच आली डोळ्यासमोर.
तुमची लिहीण्याची शैली मनाला भिडते. कुट्टी तर खासच. लिहीत रहा.

धन्यवाद srd, दत्तात्रय साळुंके, देवकी, अस्मिता, धनुडी, वावे, अश्विनी, उबो.
अजून लिहीत रहा.>> नक्की!

Pages