ही बाईपण भारी देवा

Submitted by बिपिनसांगळे on 16 February, 2024 - 11:37

ही बाईपण भारी देवा

-------------------------------------------------------------------------------------------------------------
सन २०३३.
सुनीतच्या दारावरची बेल वाजली. त्याचा फ्लॅट अत्याधुनिक होता. ई-उपकरणांनी सुसज्ज. त्याने दारावरच्या स्क्रीनवर पाहिलं. बाहेर एक तरुणी उभी होती.
तो म्हणाला,“ मी काही मागवलेलं नाहीये.”
दाराबाहेरच्या ध्वनीयंत्रातून तो आवाज बाहेर पोचला. त्यावर बाहेरून आवाज आला, “ ए शहाण्या,दार उघड. मी आले आहे.“
हा त्याच्या आईचा आवाज होता. ती त्या तरुणीमागे लपली होती. त्याने दार उघडलं. आई त्याला ढकलून आत आली. तिच्यामागे ती तरुणी.
तो आईला म्हणाला,” हे काय गं ? अजून असल्या खोड्या काढतेस ? “
“ते राहू दे. आता हीच काढेल तुझ्या खोड्या !”
“ही कोण ?” तो आलेल्या तरुणीकडे संशयाने पाहू लागला.
“ही ?” आई हसत म्हणाली,“ ही तुझी लिव्ह इन पार्टनर !”
“काय ?” तो भूत पाहिल्यासारखा किंचाळला. “ पण मला कशाला पार्टनर ? तुला माहितीये ना मला असं काही नकोय. मला असलं काही आवडत नाही. त्यात त्या पार्टनरचे नखरे, कटकटी आणि कुरबुरी... तुझ्यावरून पाहतोय ना मी.”
“हं ! असं काही होऊ नये म्हणूनच मी हिला आणलंय. ही माणूस नाही,तर रोबो आहे. एआयचा एक उत्तम अविष्कार ! ही आहे तर यंत्रमानव; पण कोणाला कळणारच नाही की ही रोबो आहे. म्हणूनच मी तुझ्यासाठी हिला सिलेक्ट केलं आहे ! वर डोळे मिचकावून ती पुढे म्हणाली “ ही सगळी म्हणजे - सगळी कामं करते बरं !”
ती रोबोललना चक्क खरी वाटत होती.
तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं मात्र त्याने डोळेच फिरवले. त्याला गरगरलं आणि तो सोफ्यावर पडला .
सन २०३३ मध्ये माणसाची प्रचंड प्रगती झाली होती. तंत्रज्ञान कुठल्या कुठं पोचलं होतं. एआयने तर जगात आणि माणसाच्या आयुष्यात धुमाकूळ घातला होता. ए आय - आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. कृत्रिम बुद्धिमत्ता ! जीवनाचं प्रत्येक क्षेत्र त्या ए आयने व्यापलं होतं. फक्त - माणूसपण तेवढं कमी झालं होतं.
जुलै २०२३ च्या पहिल्या आठवड्यात, जिनिव्हामध्ये ए आयवर आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. विषय होता, ए आयचा उपयोग अन माणसावर होणारे परिणाम. तेव्हाच दहा वर्षांपूर्वी ए आयच्या अतिक्रमणाचा धोका मानवाने ओळखला होता ; पण त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं होतं .
सुनीतला बाबा नव्हते, तरीही तो आणि त्याची आई वेगळे रहात होते. बदलत्या काळाप्रमाणे एकटेच. पण काळ बदलला तरी माणसाच्या मूलभूत सवयी, त्या काही बदलत नाहीत. तसंच चालू होतं. त्यातलीच एक सवय म्हणजे आळशीपणा. आता एआयने माणसाला पहिल्यापेक्षा खूप आळशी बनवलं होतं ! आणि सुनीत त्याचा एक उत्तम नमुना होता. आणखी एक गोष्ट अशी की एकूणच माणसाला संसार, पोरंबाळं वगैरे गोष्टींचा कंटाळा आला होता. तसंच सुनीतचंही होतं. अशा गोष्टींमध्ये त्याला रस नव्हता. एवढंच नाही तर पोरींमध्येही. तो बरा आणि त्याचं काम बरं आणि त्याचे मारधाडीचे गेम्स बरे. साऱ्या जगाप्रमाणे त्यालाही त्या आभासी जगाचं ॲडिक्शन झालं होतं. बाकी बाबतीत… मात्र तो इतर पोरांसारखा नव्हता.
त्याची आई बिनधास्त असली ,फॉरवर्ड असली,अतरंगी असली, तरी प्रेमळ मनाची होती. तिच्या आत तिने माणूसपण जपलेलं होतं. शेवटी जुन्या काळातली बाई ती. जुना काळ म्हणजे तिचा जन्म १९८० चा होता. तिचा एक पाय मागच्या काळात अन एक पाय वर्तमानात असं होतं. नव्या - जुन्याचा संगम साधताना तिची गडबड होत राही.
एकटी असल्याने तिने लिव्ह इनमध्ये रहायचं ठरवलं. पण त्याचीही गंमतच होती. आभासी जग सारं ! दिसतं तसं नसतंच ! आभासी जग म्हणजे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे ! पोकळ ! प्रोफाईलमधलं व्यक्तिमत्व म्हणजे क्या कहने ! आणि प्रत्यक्षात म्हणजे नकली गहने !
एकेक पार्टनरची एकेक कथा. तिला एका डेटिंग ॲपवर पहिला पार्टनर मिळाला, तो जाम थापा मारायचा. पण तो पैसे काढण्यासाठी जेव्हा थापा मारायला लागला, तेव्हा तिने ब्रेकअप केलं. मग तिने डेटिंग ॲप बदललं.
ॲप बदलल्याने माणसं बदलत नाहीत.
दुसरा जो होता तो सारखा अंगचटीलाच यायचा. आता तिचं तिसऱ्या पार्टनरबरोबर लिव्ह इन चालू होतं.
तिला वाटायचं की माणसाला माणसाची गरज असते. म्हणून तिला कम्पॅनियनची गरज वाटत रहायची.
पण तेच तिला असंही वाटायचं की आपल्या पोराने मात्र रीतसर संसार थाटावा. छान एक तरी नातवंड जन्माला घालावं. म्हणजे त्या नातवाबरोबर खेळता येईल. पुन्हा मुलाशी जुने बंध जुळतील. एकत्र राहता येईल. आजकालच्या पोरांना लग्न नको, बंधन नको. तरी अजूनही पूर्ण कुटुंबव्यवस्था बदललेली नाही. तिला पोराची काळजी वाटत राही.
अजूनही सुनीत भानावर आला नव्हता.
आलेकाशीने, त्या रोबोने त्याच्या बुडाला एक चिमटा काढला. काही उपयोग झाला नाही. मग त्याच्या आईने त्याच्या तोंडावर पाणी मारलं. तेव्हा त्याने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर आलेकाशीचं तोंड होतं. ती वाकून त्याचं निरीक्षण करत होती. त्याचे डोळे प्रचंड विस्फारले. इतक्या जवळून एखादी तरुणी त्याचं निरीक्षण करतीये ... म्हणजे ? त्याच्यासाठी भयंकरच प्रसंग ! तो एकदम दचकला व उठूनच बसला. तो ओरडला,अन आईला म्हणाला “ ए आSय ! “
त्या घाईमध्ये त्याचं नाक तिच्या हनुवटीला आपटलं. बापरे ! चांगलीच टणक होती तिची हनुवटी ! तीपण “ आई “ म्हणून नाजूक किंचाळली.
चक्क मराठी शब्द. ए आय म्हणजे ना - खरंच ! ए आयने दखल घेतलेली मराठी भाषेची - म्हणजे गौरवच की ! अजून काय पाहिजे ?
मग तो आईकडे वळला आणि रागाने म्हणाला,” तू स्वतः लिव्ह इनमध्ये रहातेस आणि माझ्या का मागे लागतेस ? सून आण म्हणून .”
त्यावर ती म्हणाली ,”अरे, माणसाने लग्न केलंच पाहिजे. तुझं वय आहे. माझं आता लग्नाचं वय आहे का ? तुझ्या बाबांबरोबर एवढी वर्षं संसारच केला ना. पण आता नवऱ्याची नाही रे, तर जोडीदाराची गरज भासते...आणि एक - तुला लग्न नाही करायचं तर ठीक आहे. पण आता लिव्ह इनमध्ये तरी रहा.”
“आई, आता तुझा कितवा लिव्ह इन पार्टनर आहे गं ? तिसरा ना ! प्रत्येकाचा नवीन प्रॉब्लेम असतो . आता ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेलच ना.”
“हे मात्र खरंय ,” ती म्हणाली,”आत्ताचा जो पार्टनर आहे ना, तो रोज रात्री पितो. पण पितो कमी आणि फरसाण जास्त खातो.”
“मग खाऊ दे की ! कमी पितोय ते बरं नाही का ?”
“तसं नाही. पण फरसाण सोसत नाही. मग तो ढमढमपुरचा राजा होतो. त्याच्या ढमढमवर लाथ मारून त्याला हाकलून देणार आहे मी आता !”
त्यावर सुनीतला हसावं की रडावं तेच कळेना.
“एवढ्याशा कारणासाठी ?” त्याने विचारलं.
“तसं नाही. पिल्यानंतर त्याची बडबड सुरु होते. मी झोपले तरी याची भणभण चालूच असते. वैताग आलाय रे मला.”
सरतेशेवटी, त्याच्या आईला वाटत होतं की पोराने लग्न करावं, किंवा लिव्ह इनमध्ये तरी रहावं. किती दिवस तेच आभासी गेम खेळणार? किती दिवस एकटं राहणार ? येडं ! पण पोरगं त्यालाही तयार नव्हतं म्हणून तिने आलेकाशीला आणलं होतं. लिव्ह इनसाठी .
“ ती एखाद्या खऱ्या मुलीपेक्षा कुठेही कमी नाही, कळलं ? खऱ्या मुलीपेक्षा ! ... “ असं म्हणून आईने डोळे मिचकावले.” ती सगळी कामं करू शकते - सगळी !”
ही सारखी तेचतेच काय सांगते ? त्याच्या मनात आलं. ही आईपण ना वात्रटच आहे...
“ अन तिला काही प्रमाणात भावना देखील आहेत.“ आई पुढे म्हणाली.
“ अगं, पण हिला आणलीस कुठून ? “ त्याने विचारलं.
“ हिचा निर्माता एक जिनिअस आहे. हिला मी खास बनवून घेतली आहे. तुझ्यासाठी ! मेड टू ऑर्डर ! तीन दिवसांच्या ट्रायलवर आणलं आहे. तू बघ अन ठरव. “
“ काय बघू ? “
“काय बघायचं ते तू ठरव, शहाण्या ! का ते पण मी सांगू ? जरा तुझ्या वयाच्या तरुण पोरांसारखं वाग रे !”
मग ती पुढे म्हणाली ,” लिव्ह इनसाठी आलेकाशी तुला चालेल की नाही ते ठरव. अकरा वाजले आहेत. मी निघते. “
बोलता बोलता एका नवीन डेटिंग ऍपवर तिचं स्क्रोलिंग चालूच होतं. मग ती गेली. तो जाणाऱ्या आईकडे पहातच राहिला - अंगात निऑन गुलाबी रंगाचा टी शर्ट घातलेली ती एक मॉड म्हातारी होती.
XXX
गेल्या काही वर्षांत रोबोटिक्स कमालीचं प्रगत झालं होतं, त्याचाच हा परिणाम होता.
आलेकाशी ही एक अतिप्रगत रोबो होती. रोबो असली तरी ती एखाद्या तरुणीसारखीच होती. खरी वाटणारी. मानवी. पण तिची फिगर एखाद्या बार्बी डॉलसारखी नव्हती किंवा ती फॉरिनर वाटणारीही नव्हती. अगदी अस्सल देशी वाण होतं ते. एकदम मराठी मुलगी. पण आधुनिक अन स्मार्ट. एकदा ती यंत्रमानव आहे म्हणल्यावर तो बिनधास्त झाला होता. तो तिचं निरीक्षण करू लागला. कुठल्याशा जाहिरातीमधल्या, त्याला आवडणाऱ्या मॉडेलसारखी ती दिसत होती. म्हणून तो आनंदला व तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. त्यावर ती लाजली.
तो तिच्या लाजण्याकडे पाहतच राहिला.
ओह ! हिला भावनाही आहेत. हं ! आई म्हणाली होती खरी.
खरं तर तो नवीन जगातला तरुण होता. त्याला या एआयचं आश्चर्य वाटायचं काहीच कारण नव्हतं. कितीतरी ठिकाणी अशा यंत्रयुवतींची भरताड झालेली होती. विविध क्षेत्रांत.
पण ही कमालीची होती ! मानव अन यंत्रमानव यांचं कमालीचं मिश्रण होतं ते. असं मॉडेल त्याने कधी पाहिलं नव्हतं अन इतक्या जवळून तर नाहीच.
ती उंचीने मध्यम होती. रंग गोरा पण अगदी गोरीपान नाही. स्मार्ट, आत्मविश्वासपूर्ण चेहरा. टपोरे काळेभोर डोळे. रसरशीत ओठ. हलकी लिपस्टिक लावल्यासारखे गुलाबी. हसरा चेहरा. एक फिकट पिवळा टीशर्ट अन खाली गडद निळी जिन्स. केस काळेभोर रेशमी अन त्यांची मागे बांधलेली सुळसुळणारी पोनी.
तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती मानवच वाटत होती. खरीखुरी !
तसा पोरींकडे पहायला तो लाजतच असे. बोलायलाही. पण आता त्याची भीड चेपली होती. कारण ती खरी नव्हती. हळूहळू गूळ पाघळायला लागला होता.
“ मी सगळी कामं करू शकते. तुम्ही सांगाल ती. घर आवरणं, पुसणं, स्वैपाक वगैरे. बाहेरचीसुद्धा . मी तुमच्या सगळ्या कमांड्स स्वीकारू शकते. अर्थात ते ऍसिमोव्हचे तीन मुख्य नियम पाळूनच. तुम्ही बोललेलं सगळं मला समजतं .”
“अरे वा ! व्हेरी गुड ! मग मी काही चावट बोललं तर तुला कळेल का ? “
त्यावर ती लाजून ’हो’ म्हणाली.
“ अन बाकी कामं ?”
“असं नाही चालणार, स्पेसिफिक कमांड पाहिजे ना.”
त्यावर तोच लाजून म्हणाला ,”म्हणजे रात्री …? ... “
“ डोन्ट वरी ! रात्री खिडक्या लावणं, पडदे ओढून घेणं , बेड तयार करणं, डास मारणं, आणि वर त्यांच्यासाठी रॅकेटची तलवारबाजी, हे सारं मी करू शकते.”
च्या मारी ! जे पाहिजे ते सोडून सारं बोलते ही काशी हां. का मुद्दाम करते ? पण तिच्या बोलण्यावर तो गप्पच बसला. आणखी खोलात जाऊन बोलणं त्याच्यासाठी अवघड काम होतं.
पण तिचा वावर, एक्सप्रेशन्स, तिचा आवाज त्याला सारं छानच वाटत होतं.
XXX
आलेकाशी आली त्या दिवशी शनिवार होता. ट्रायल तीन दिवस होती. आई गेल्यावर थोड्या वेळाने सुनीत तिला म्हणाला, “ आलेकाशी, मी माझं काम करीन, तुला काय करायचं असेल ते कर.”
“ माझं नाव आलेकाशी नाही. ओके ? माझं नाव आलेकशी आहे. “
त्याने प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं.
त्यावर ती पुढे म्हणाली, “ तुमची आई मला आलेकाशी म्हणते. गावंढळ वाटतं ते ! “
हे भलतंच स्मार्ट काम दिसतंय, तो मनात म्हणाला.
त्यावेळी तिने जणू त्याला स्कॅन केलं. त्याने अंगात एक ढगळा,मळका मातकट टीशर्ट आणि खाली ट्रॅक पॅन्ट घातली होती. तो एक दिसायला साधा अन वागायलाही साधा पण गोड असा तरुण होता.
खरं तर त्याला त्या दिवशी काही काम नव्हतं. पण ती जणू एखादी खरी व्यक्ती असावी असा त्याला मध्येच संकोच वाटत होता. एके क्षणी तो तिच्याशी बिनधास्त वागत होता; तर दुसऱ्या क्षणाला तो स्वातंत्र्य हरवल्यासारखा स्वतःला मिटून घेत होता. त्याने स्वतःच्या बेडरूमचं दार लावलं. मग तो लॅपटॉप घेऊन बसला. त्याने सोमवारचं कामांचं शेड्युल पाहिलं. दिवसभर मिटींग्स होत्या. एक झाली की एक. मग त्याने लॅपटॉपवरच एक सायफाय चित्रपट लावला ‘हाय हाय ए आय’. त्याची आवड अशीच होती.
पण आलेकशीची एकूण स्पेसिफिकेशन्स पाहता ... तो वेडाच झाला होता. खूप कमाल तंत्रज्ञान होतं तिचं. त्याला सिनेमातल्या रोबोच्या जागी आलेकशीच दिसू लागली. त्याचं मन सिनेमात लागेना. त्याला पुनीत आठवला.
त्याच्या शेजारच्या एका अति उंच टॉवरमध्ये त्याचा तो मित्र राहत होता. त्याच्याच वयाचा. तोही असाच सडाफटिंग होता. पण गुलछबू ! त्याने असाच एक स्त्री यंत्रमानव घेतला होता - रोमा . जी सारं घरकाम तर करायचीच पण रात्रीचीही धमाल गंमत … असं त्याने सांगितलं होतं खरं. आता सुनीतच्या मनात गुलाबी विचारचक्रं फिरू लागली होती.
आता त्याच्या मनातल्या नाजूक भावना जागृत होऊ लागल्या होत्या. खरी पोरगी असती तर त्याने डेरिंग केली नसती. पण आता मोसम होता, मोका होता अन मनात गुदगुल्या करणाऱ्या भावनाही .
XXX
आलेकशी सोफ्यावर नुसतीच बसली होती.
तो म्हणाला,”अगं नुसतीच काय बसतेस ?”
“तुम्हीच म्हणाला ना तुला हवं ते कर. मला असं नुसतं बसायला खूप आवडतं, तेही पाय हलवत.”
“हो? म्हशीसारखं फतकल मारून ? जरा घर तरी आवर.”
“आवरते हो ! नाहीतरी घाणेरडं दिसतंच आहे.”
“मालकाला नावं ठेवतेस ? गप घर आवर, कोनमारी पद्धतीप्रमाणे आवर.”
“कोण मारी ?”
“मी ! आता काम केलं नाहीस तर मी तुला मारीन. च्या मारी ! कोनमारी ही आवरण्याची जपानी पद्धत आहे ”.
ती जागेवरून उठत म्हणाली,”तुम्हाला ती पद्धत माहिती आहे, मग आवरायची माहिती नाही का? ती पद्धत मला फीड केलेली नाहीये.”
त्याचं घर अस्वच्छ होतं. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या.
तिने आवराआवरीला,साफसफाईला सुरवात केली. आधी किचनपासून. रोबो असली तरी ती स्त्री होती. आधी तिने किचनओटा वगैरे साफ केला. पण किचनच्या ओट्याखाली - अरे देवा ! मरणाचा कचरा होता. तिने ते बघून डोक्याला हात लावला. या भावना पण तिच्यामध्ये अपलोड केलेल्या होत्या बहुतेक.
मग तिने फडकं शोधायची सुरवात केली. जे मिळालं त्याचा झारा झाला होता, बिळबिळाचा. मग तिने नवीन शोधलं. बेडरूमच्या एका कपाटात तिला एका बॉक्समध्ये दोन फडकी मिळाली. एक पांढरंशुभ्र तर एक मरून. तिने ओट्याखालच्या सफाईला सुरवात केली.
सुनीत किचनमध्ये आला आणि त्याने तर डोक्यालाच हात लावला.
“ए बाई...”
“बाई नाही आलेकशी.”
“आलेकाशी का आलेकशी ? ए आय जाणे . काशी घालायला आली आहेस,का आले कशी इथे ? असं वाटतंय. का मुद्दाम आली आहेस मला त्रास द्यायला? “तो खूप चिडला होता,” माझे आतले कपडे घेतलेस पुसायला ? तेही नवी जोडी - इनर आणि बनियन?”
“ ओट्याच्या आतलं - आतलं पुसायचं होतं म्हणून आतले कपडे घेतले ... त्या एका फडक्यात दोन्ही हात घालून छान पुसता येतं हां.” असं म्हणत तिने मरून रंगाच्या इनरमध्ये दोन्ही हात घालून ती वर करून,दोन्ही हाताची बोटं गंमतीशीरपणे हलवून दाखवली.
“च्यामारी ! आय ----- गेलं ते ए आय !” तो वैतागून म्हणाला.
“अंहं ! ए आयचा असा अपमान चालणार नाही “ त्यावर तीही बाणेदारपणे म्हणाली.
“ए, तुलापण अशी लाथ घालीन ना जाशील माझ्या आयकडं आय ओय करत !”
त्यावर तिला रडू फुटेलसं वाटू लागलं, तसा तो एकदम गप्प आला.
XXX
ती किचनमध्ये गेली.
तिने बटाट्याची भाजी, भात अन फोडणीचं वरण केलं. मस्त वास सुटला होता. मग ती सुनीतची वाट पाहत बसली. तो दार लावून बसला होता.
मग तिने स्मार्ट टीव्ही लावला. एक सिनेमा तिचा अगोदर अर्धाच पाहून झाला होता. तिच्या मोबाईलवरून तिने तो पुन्हा लावला. जुनाच होता. पण मस्त.’ मिस रोबो ’. तो रॉबकॉम होता - रोबोची कॉमेडी. ही नवीन काळाची ट्रेंडिंग डेव्हलपमेंट होती.
अन सिनेमा पाहताना ती खिदळायला लागली. ते ऐकून सुनीत बाहेर आला. ही शहाणी रोबो आहे का व्हॅम्प ? त्याला कळेना.
“ तू सिनेमा काय पाहतेस ? “
“ का बरं ? त्यात काय प्रॉब्लेम आहे ? त्यामधून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मीही तशी शिकते. माझा प्रोग्राम तसा बनवलेला आहेच.”
तिने सिनेमा बंद करून त्याला जेवण वाढलं.
“हे काय ? पोळ्या नाहीत ?” त्याने विचारलं.
“नाहीत ! मला लाटायला येत नाही.”
“मग ते लाटणं काय तुझ्या डोक्यात घालू का?”
"लाटणं कुठे घालतात याची मला कल्पना नाही. नो फीड.सॉरी ! " ती म्हणाली.
तो बिचारा कावराबावरा झाला.
शेवटी ताट घेऊन तो बेडरूममध्ये गेला अन दार लावून बसला.
पोळ्या नसल्या तरी जेवण रुचकर होतं. किती रेसिपीज तिला फीड केलेल्या होत्या , कोणास ठाऊक?
XXX
संध्याकाळपर्यंत त्याचा राग कमी झाला होता आणि त्याची मनातून धिटाई भलतीच वाढली होती. तो तिला म्हणाला, “ मला तुला हात लावून पाहायचं आहे.”
त्यावर तिने तिचा हात पुढे केला. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तो गरम लागला.
“ तुझा हात गरम कसा काय ?”
“काम करून आतली सर्किट्स तापली आहेत.”
" मग उडू दे भडका !” असं म्हणत त्याने आणखी धिटाई करून तिला जवळच ओढलं. पण ती त्याच्यापेक्षा चपळ होती. ती मागेच पळाली.
तिच्या चेहऱ्यावर आठी होती आणि राग होता. तो पहातच राहिला. याही मूडमध्ये ती खूप छान दिसत होती.
कमाल मॉडेल आहे यार ! ही आपली आयपण ना, खतरनाकच आहे !
“रागवू नकोस. मला फक्त तुझी असेम्ब्ली पाहायची होती.”
“हो ? … कुठली असेम्ब्ली ? “तिने फटकन कपाळावर नाजूक आठी पाडून विचारलं.
च्या मारी ! आई तर म्हणाली होती ही सगळी कामं करते म्हणून.
“ नाही नाही. आणखी काही नाही. पण एवढे नखरे दाखवायला तू माणूस आहेस का?”
त्यावर तिने सोफ्यावरची उशी त्याला मारायला उचलली.
“च्यायला ! तो ओरडला,” ए काशे, ऍसिमोव्हचा नियम विसरलीस का ? माणसावर ऍटॅक करायचा नाही ते ?” ह्यावर तिने उशी खाली ठेवली.
बापरे ! हे ए आय प्रकरण माणसाला कुठे घेऊन जाणार आहे? कोणास ठाऊक ? सुनीत मनात म्हणाला.
xxx
रात्र झाली. आलेकशीने विचारलं,”जेवायला वाढू ?”
तो जरा लाडात आला होता. तो म्हणाला,” तू नाही जेवणार माझ्याबरोबर ?”
त्यावर ती उत्तरली ,”काय चेष्टा करता मालक गरीबाची ?”
“च्यामारी ! हे भयंकरच आहे. नशीब आका म्हणाली नाहीस ते. नाहीतर मी अल्लाउद्दीनच झालो असतो ; पण त्याला दिवा तरी घासता येतो. मी काय घासू ? “
“तुम्ही काय घासता आता? आणू ती इनर परत ?”
“ए परत , मी तुलाच परत देणार आहे,कळलं ? “
“का ?”
“मग काय तर? माझी इनर खराब केली. वापरायची तर स्वतःची वापर ना.पण तुम्हा रोबोना बनवताना घातलेली असते की नाही? कोणास ठाऊक. त्यावर ती लाजली.त्यालाही हसू आलं.ह्या आलियाकाशीला जोकही कळतात तर,त्याच्या मनात आलं.
“मला परत देणार ? " तिने पुन्हा लाडीकपणे विचारलं.
" हो. देणार आहे . ते जाऊ दे. बरं काय केलं जेवायला ?”
“काही नाही. सकाळचं उरलंय तेच आहे .“
“ सकाळचं म्हणजे ?” तो ओरडला.
“म्हणजे - ते वाया जाईल ना. संपायला पाहिजे. माझा प्रोग्रॅमच तसा आहे. की काही वाया घालवायचं नाही म्हणून.”
त्यावर सुनीत संतापाने बाहेर गेला. ती किचनमध्ये डायनिंग टेबलवर बसून राहिली.
त्याने खावोमोटो ॲपवरून पिझा मागवला. मस्त वाईन काढली. मादक अन गुंगवणारी वाईन होती ती, आलेकशीसारखी.
रात्रीचा माहौल छान होता. प्लेझंट !...
काही वाया घालवायचं नाही म्हणते, मग हे धुंद क्षण तरी का वाया घालवते ही घालेकाशी ?
सुनीतचं जेवण झालं. तो एक विनोदी सायफाय सिनेमा लावून बसला होता. आलेकशी बाहेर येऊन बसली त्याच्याजवळ. तिने आता एक पिस्ता रंगाचा गाऊन घातला होता. त्यावर ‘ ए हाय ! ‘असं लिहिलेलं होतं. तो तिच्याकडे पहातच राहिला. ही काशी कपडे कशी बदलते ? काय कातिल दिसतीये !
त्याचं सिनेमातलं एकदम लक्षच उडालं. पण तिने त्याला सिनेमा पहायला खुणावलं. सिनेमामध्ये हिरो -हिरोईन आणि ए आयच्या गंमतीजंमती होत्या. मध्येच रोमँटिक सिन सुरु झाला... ती मन लावून पहात होती. हे जरा अतीच होतं.
तसा तो तिच्याजवळ सरकला. त्याला पुनीतची रोबो आठवली. त्याने तिला जवळ घेतलं.
“अरे, तुझी आतली सगळी सर्किट्स तापली आहेत.!....” ती म्हणाली.
“अगं आले, कशी ते माहिती नाही पण आतले आयसी न आयसी तापले आहेत गं ! …”
“ओहो! अस्सं? पण आज काही नाही”, त्याला ढकलून देत, त्याच्यापासून लांब जात ती म्हणाली,” माझं खूप डोकं दुखतंय !”
डोकं दुखतंय ? त्याला याचा अर्थच कळला नाही .”आणि तुला डोकं कुठलं गं?” असं म्हणेपर्यंत तिने बेडरूममध्ये प्रवेश केला व दाराला आतून कडी घातली.
“ए , दार उघड !” तो म्हणाला.
त्यावर तिने एक नाजुकसं - उंहु ! - केलं.
"हा काय प्रकार आहे ? " त्याने विचारलं.
" ट्रायलमध्ये हे सगळं अलाऊड नाहीये !"असं म्हणून ती खुद्कन हसली.
तो बाहेर येऊन गप्प बसला.
त्याला आठवलं, पुनीत नेहमी खुश दिसायचा. एकदा त्याला कारण विचारल्यावर त्याने त्याचं रहस्य सांगितलं होतं,“ लग्न नको अन रिलेशनशिप नको. ती रोबो सगळं घरकाम करते. अन यांची एक गंमत काय माहितीये ? यांच्या कुठल्या मागण्या नसतात. यांचं वजन वाढत नाही, कायम तरुण ! कायम अन या कधी - अं - कशालाच नाही म्हणत नाहीत. रात्रीलाही गंमत ! धम्माल !“
“गंमत ?”
“ यार सुन्या,ऐक. तूपण एक घेऊन टाक.”
“मला काही इंटरेस्ट नाही यार. छोडो !”
पण आता अशावेळी त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. असं म्हणून सुनीतने त्याला व्हिडिओकॉल केला. पुनीतने फोन घेतला. तो आणि रोमा, त्याची रोबो दोघे अर्ध्या कपड्यांत दिसत होते. आणि - ते दोघे भांडत होते.
“अरे माझ्या आईने माझ्यासाठी एक रोबो आणलीये. हायएंड मॉडेल आहे. रादर डिझाइनर ! “सुनीत त्याला म्हणाला.
“अरे वा ! मस्त.”
“ए ते जाऊ दे ! पण आता ती माझ्या जवळ येत नाही.”
“जवळ येत नाही ? काय सांगतोस ? असं कसं ?” पुनीतला तर आश्चर्यच वाटलं.
“अरे, माझं डोकं दुखतंय म्हणाली.”
“हाहा !” तो शहाणा गडगडाटी हसला. अरे रोबो असं कधी म्हणतात का ? ते तर बायकांचं काम असतं. राजा, तुझ्या आईने चुकीचं मॉडेल आणलंय. माझी रोमा बघ कशी आहे. उफाड्याची ! मादक मदालसा !.... आता ती माझ्याशी का भांडतीये माहितीये ? कारण तिला फक्त ८४ आसनंच फीड केलेली आहेत. यापेक्षा वेगळं काही म्हणलं तर ती रिजेक्ट करते ! ”
त्याने मोबाईल रोमाकडे केला, तर ती दिसायला खरंच खलास होती.
ती ओरडली,”ए आय ...., तो कॅमेरा हटव. माझा ऍक्सेस फक्त तुला दिलाय ना !”
त्यावर पुनीतचा हसण्याचा आवाज आला आणि त्याने फोन बंद केला.
च्यायला ! ती रोबो शिव्यापण देते ? ... सुनीत हबकलाच. हे सुद्धा - हे सुद्धा फीड केलंय ?
मग त्याचा केव्हातरी डोळा लागला. झोपेत त्याला घाटदार स्वप्न पडत होतं. रोमाचं. पण मध्येच तिची आलेकशी झाली.
xxx
सुनीत बाहेर हॉलमध्ये त्याच्या कोचवर झोपला होता.सूर्याची किरणं अजून आत शिरायची होती.
पण आलेकशी बाहेर आली. तिने सुनीतकडे पाहिलं. त्याला हलवून जागं केलं. ती त्याच्याकडे पाहून हसली. त्याला लय भारी वाटलं ! जणू सूर्याची किरणं हलके स्पर्शून गेली. पण लगेच त्याचा चेहरा बदलला.
“चहा घेणार ?”
त्याने नाराजीने हो म्हणून सांगितलं. ती आत गेली.
त्याने आईला फोन केला. त्याला ही ब्याद नकोच होती . काय उपयोग हिचा ? हाकलून द्यावं हिला. त्यापेक्षा ती शिव्या देणारी रासवट, दणकट रोमा त्याला बरी वाटत होती. जे काही आहे ते धाडधाड, थेट ! पुनीतला विचारावं त्याने तिला कुठून आणलीये ते.
“आई “तो नाराजीने म्हणाला.
“काय रे ? कशासाठी फोन केलास? तेही सकाळ सकाळ ? मला डिस्टर्ब् केलंस. मी डेटिंग ॲप बघत होते ना ! अगदी महत्वाचं.” ती पोराची फिरकी घेत होती.
“ए आई, ते ॲप राहू दे . आधी माझं बोलणं ऐक - हिला घेऊन जा. डोकेदुखी नुसती.”
“डोकेदुखी ? कोणाला रे ? तुला की तिला ?” आईने मिश्कीलपणे विचारलं.
तो चमकला. या शहाणीमध्ये सगळा डेटा फीड होऊन तो पलीकडे आईला पोचतोय की काय ? त्याला शंका आली.
तेवढ्यात आलेकशी चहा घेऊन आली.
“गरमागरम चहा . आलं घातलेला.”
“तुला गं काय माहिती ? मला आल्याचा चहा लागतो ते ? जादा स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नकोस हां !”
त्यावर पलीकडून आईच्या हसण्याचा आवाज आला व तिने फोन बंद केला.
चहा अफलातून होता. त्याने आलेकशीकडे पाहिलं. तिने डोळे मिचकावले.विचारलं,” कसा आहे चहा ?”
“मस्त ! एक नंबर !” तो उपहासाने म्हणाला.
“अं.. आणि मी ?”
त्यावर तो काही बोललाच नाही. तो आठ्या पाडून चहा पित राहिला.
ती किचनमध्ये गेली. अन आलेकशीची किंकाळी ऐकू आली.
काय झालं कोणास ठाऊक ? का हिचा आलेपाक तर नाही झाला ? त्याला वाटलं.
ए आयला भारी पडलेला एक उंदीरमामा त्याचा उरलेला पिझ्झा खायला आला होता. आलेकशीचं लक्ष त्या उंदराकडे गेलं. म्हणून ती किंचाळली होती. जसा उंदीर तिच्याकडे सरकला, ती मागे पळाली. तिचा पाय अडखळला अन तो आवाज ऐकून किचनमध्ये आत येणाऱ्या सुनीतच्या ती अंगावर पडली. त्याने तिला धरलं. तर तिचा श्वास फुलला… मग तो उष्ण उष्ण होऊ लागला, तिच्या हृदयाची धडधड वाढली, तिचा ऊर धपापू लागला. सुन्याची सुस्तीच पळाली... हे काहीतरी भलतंच होतं ! …
उंदीर पळाला खिडकीतून बाहेर अन अन त्याचे विचार मनातून बाहेर.
तो तिच्याकडे येडा झाल्यासारखा पहात राहिला.
तीपण अशी काही गोड हसली की यंव रे यंव !
मग ती सावरली. पण सुन्याने मिठी काही सोडली नाही. ती पुढे म्हणाली, “ मी काही रोबो नाहीये. मी खरीखुरी आहे. अगदी तुझ्यासारखी. आणि माझं नाव अलका आहे. हा सगळा प्लॅन तुझ्या आईचा आहे.त्या माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तरी आमची मैत्री जुळली ती आमच्या विचारांमुळे. आम्हाला वाटतं, माणसाने माणसासारखं वागावं, मशिन्ससारखं नाही. निसर्गाला धरून रहायला हवं. आपल्या मूळ गोष्टी न सोडता.”
सुनीतच्या डोक्यात प्रश्नचिन्हे फिरत होती. तरी त्याला अधूनमधून वाटतच होतं की ही शहाणी खरी आहे म्हणून.
अलका पुढे बोलत होती “ त्या रोबोचं वजन वाढत नसेल, पण प्रेमही वाढत नाही. आणि आम्हा बायकांचं वजन जसं वाढत जातं तसं नवऱ्यावरचं प्रेमही वाढत जातं ,कळलं ? आणि आम्ही अपशब्द उच्चारू शकतो पण त्या रोमासारखं नाही. मर्यादा पाळतो आम्ही. फक्त मराठी कामापुरती अन संस्कृत कामापुरती नसते ना स्त्री. बायको ही त्या स्त्रीच्या पलीकडे असते.”
त्याला वाटलं, हे बोलणं एका रोबोचं नक्कीच नाहीये तर हे एका आपल्या माणसाचं आहे… अन हिचा निर्माता जिनिअस नसला तरी आपल्यासाठी भारीच म्हणायचा. त्याने मिठी आणखी घट्ट केली. तो तिच्याकडे प्रेमाने पाहतच राहिला. तिचे गाल लाल झाले. या हृदयाची सर्किट्स त्या हृदयाच्या सर्किट्सला खऱ्या अर्थाने जोडली गेली होती. अन याला कुठल्याही ए आयची गरज नव्हती.
तेवढ्यात फोन वाजला. आता आईने फोन केला होता. सुनीतने तो उचलला. तर अलकाने तो त्याच्या हातातून घेतला आणि स्पीकरवर ठेवला.
आईने विचारलं,” अरे कशी आहे अलका ? आवडली की नाही ? कधी उडवायचा बार ? नाहीतर बसा तसेच ! … माझ्याकडे तर एक गुड न्यूज आहे. “
" हंs. नवीन पार्टनर मिळाला असेल. आणखी काय ?" सुनीत म्हणाला.
" अहो, सांगू द्या त्यांना, जरा थांबा, " अलका म्हणाली.
“हो हो ! मिळाला आहे ! मला एक चांगला लिव्ह इन पार्टनर मिळाला आहेच. एकदम साधा. माझ्यासारखा माणसं आवडणारा. आणि तो कुठल्याही डेटिंग ऍपवर नाही तर प्रत्यक्ष भेटीत मिळाला आहे. ऐकायचंय कोण ? “
“कोण ?” अलकाने विचारलं.
“अगं तुझे बाबा ! ... आता तू या शहाण्याकडे आलीस की ते एकटेच की गं !”
त्यावर सुनीत अन अलका दोघेही उडालेच. ते विचारात पडले आणि ते एकमेकांकडे टकामका पाहू लागले.
अलकाच्या मनातला प्रश्न सुनीतने विचारलाच," अगं, काहीपण काय बोलतेस आई ? असं कसं "
" का ? काय झालं ? अरे नवीन जमाना आहे. आता हे नवीन साटंलोटं आहे ! " आई म्हणाली.
दोघांच्याही मनात त्यावेळी एकच विचार होता - ही बाईपण ना भारीच देवा !
XXX

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शेवटी जुन्या काळातली बाई ती. जुना काळ म्हणजे तिचा जन्म १९८० चा होता. तिचा एक पाय मागच्या काळात अन एक पाय वर्तमानात असं>> हे आणि यापुढेही बरेच संदर्भ भारी वाटले. खूप छान कथा. चिंतनीय सुद्धा. बाकी ढमढमपुर शब्द आवडलाय ( अशा राजांचा सूचक उल्लेख करण्यासाठी उपयुक्तता)

भारीच कथा !!
शेवट अपेक्षित होता तरीही..

कथा छान आहे.

त्या रोबोचं वजन वाढत नसेल, पण प्रेमही वाढत नाही. आणि आम्हा बायकांचं वजन जसं वाढत जातं तसं नवऱ्यावरचं प्रेमही वाढत जातं ,कळलं >>
बायकांचे वजन वाढते हा इशु पटला नाही. ह्या पलिकडे मजल जाउ शकत नाही का?

आईची कंप्लेंट पण अगदी स्टिरीओ टिपिकल आहे. पादर्‍या पार्टनरला कोणी एक रात्र पण ठेवुन घेणार नाही. पिरीअड

व इरेक्टाइल डिसफंक्षन असल्याने असा निवड्लेला टिंडर बडी त्या बाई ला सॅटि स्फाय करु शकला नाही तर काय होते? तुरंत जी पे एल. का प्रेम वगैरे नॉनसेन्स ऐकून घ्यावे लागेल. अशी ही एक कथा लिहा. ब्रॅड पिट चा रोबो बनल्यास काय होते ते लिहा. मजा म्हणून.

सर्व वाचक मंडळी -

मी आपला खूपच आभारी आहे

आणखी प्रतिसाद देण्यासाठी थोडा वेळ घेतो .

मस्त च कथा !
वाचताना मनाला पुरुषसुलभ गुदगुल्या होत होत्या.. हेच कथेचे यश

ही बाईपण भारी देवा
ही कथा प्रतिलिपीवर , अनामिका - पेन अँड पेपर , या आय डी ने
ढापून डकवली आहे

पण ती मी नव्हेच !

ही अनामिकाबाई पण भारीच देवा !

पण तिचेही आभार ...

ही गोष्ट - अमोल परब - यांनी निदर्शनास आणून दिली .
यासाठी आणि त्यांच्या जागरुकपणासाठी
त्यांचे मनापासून आभार

ता. क .
अमोलजी हे तुमच्या लक्षात कसं आलं ?

ही कथा प्रतिलिपीवर , अनामिका - पेन अँड पेपर , या आय डी ने ढापून डकवली आहे >> निषेध! त्यांना काही ईमेल वगैरे करायचा असल्यास कळवा, आम्ही पाठीशी आहोत.

हरचंदजी
आपल्या सहकार्यासाठी आपले आभार

धन्यवाद बिपीन जी

खरंतर ही गोष्ट काजल खुडे या लेखिकेने निदर्शनास आणून दिली
त्याचे खरंतर आभार मानायला हवेत
मी फक्त तुमच्या पर्यत पोहचवली

पण तुम्ही copyright करून घ्या

इथे मायबोलीचा हाच प्रॉब्लेम आहे

इथून साहित्य सहज copy करता येत

म्हणून मी इथे आता लिहीत नाही

पण
तुम्ही तुमचे साहित्य copyright करून घ्या

शाळेत कधीतरी विज्ञान कथा (scifi)( आतापर्यंत एकदाच) वाचली होती. तो शास्त्रज्ञ, आणि ती रोबो spy असते, त्याच गुपित चोरायला तिला प्लांट केलेलं असतं.. शेवटपर्यंत त्याला कळत नाही की ती रोबो आहे .
AI, २०३३ ची कथा म्हणून वाचायला घेतली. पण नंतर नंतर अगदीच कंटाळवाणी वाटली.

२०३३ मध्ये जरी Technology पुढे गेली असली तरी कथेतील पुरुष "कार्येषु दासी भोज्येषु माता शय्येषु रंभा... " ह्याच मानसिकतेत अडकलेत ह्याची गंमत वाटली..

गंमत आहे
इतक्या परस्परविरोधी प्रतिक्रिया असू शकतात

विक्रम आणि छंदीफंदी
आभारी आहे