व्ही फॉर - भाग चार - अंतिम

Submitted by बिपिनसांगळे on 13 February, 2024 - 21:51

व्ही फॉर - भाग चार - अंतिम

--------------------------------

त्यांच्या गॅंगमध्ये एक उत्तमसिंग नावाचा पोरगा होता. मध्य प्रदेशातला. त्याच्या सहाय्याने तिकडून भारीभारी शस्त्रास्त्रं यायची . थातूरमातूर गुन्हेगारीपण आता काळाबरोबर बदलली होती .

दिप्या आणि आणखी चार पोरं पळाली . आधी नाशिक , गुजरात आणि मग तिथून मध्यप्रदेशांत एके ठिकाणी .

नर्मदामैय्याच्या काठावर एक छोटं गाव होतं ते. मस्त मोकळी हवा ,मुबलक खायलाप्यायला. डोक्याला शॉट नव्हता . शेतावरच्या त्या घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध होत होत्या . सगळ्या ... सगळ्यांचं वजन वाढलं होतं. त्यांच्यावर हल्ला झाला असता तर पळणं मुश्किल होतं जाड्यांचं !

तिथे दिप्याला गांजाचं व्यसन लागलं. त्याच्या कडू वासात तो त्याच्या कडू आठवणी फुंकू पहायचा; पण त्या धुरांच्या वलयातही त्याला रियाच दिसायची .

एके दिवशी विचारांनी दिप्याची नशाच उतरवली .. किती दिवस इथं लपून राहायचं ? त्याला घराची , छोट्या बहिणीची . आई -बापाची आठवण यायला लागली . त्याला स्वतःच्या शहराची आणि त्यांच्या एरियाची आठवण यायला लागली .

आणि एके दिवशी खबर आली - मोठी धक्कादायक खबर ! मोठा भाईला उडवण्यात खुद्द बापूसाहेबांचा हात होता.

दिप्या बिथरला. चवताळला. पोरं भंजाळली .

दिप्याने घरी परत जायची सुरुवात केली. आता पुढचं टार्गेट अर्थातच बापूसाहेब होतं .

पण एकेक गोष्टी असतात जगात . भानगडीच म्हणा हवं तर .

बापूसाहेबांचे वर्चस्व पुन्हा वाढलं होतं . त्यासाठी त्यांनी गुंड टोळ्यांना हाताशी धरलं होतं. जो त्यांना आडवा येईल त्याचा एन्काऊंटर ! त्यासाठी त्यांनी शहरात एक खास एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणला होता- इन्स्पेक्टर रवी.

दिप्या शहरात परतला . त्याने पोरांना त्या नवीन इन्स्पेक्टरची कुंडली काढायला सांगितली.

शहराच्या उपनगरी भागात एक नवीन मॉल झाला होता. त्यामध्ये एक नवीन दागिन्यांचं दालन झालं होतं - ऑल ज्वेल्स . त्याचं उद्घाटन बापूसाहेबांच्या हस्ते होणार होतं . गर्दी असणार होती ;पण फार नाही.

दिप्याने रिस्क घ्यायची ठरवली होती . आर या पार !

XXX

तो दिवस उजाडला . सकाळी अकराची वेळ होती . दिप्या मात्र अस्वस्थ होता . ते गाडीतून कामगिरीवर निघाले . वाटेत त्यांचं कॉलेज लागलं . पुन्हा त्याला तिची तीव्रतेने आठवण आली. कॉलेजच्या आसपास पोरापोरींची गर्दी होती . त्याने खंड्याला विचारलं,' काय आहे रे आज ? '

तो हसत म्हणाला ,'भाई , आज वॅलेंटाईन डे आहे ! विसरला का तू ? ... टेन्शनमध्ये आहेस का ? '

' नाही रे ! ' दिप्याने त्याला झटकलं आणि 'अस्सं होय ? ' तो कडवटपणे स्वतःशीच म्हणाला . त्याच्या काळजात कळ आली . आजच्या गेमच्या नादात तो दिवसही विसरला होता. त्याने पहिल्यांदा रियाला विचारलं होतं तो हाच तर दिवस होता.

थांबायचा प्रश्न नव्हता . थांबायला वेळ नव्हता.

गाडी मॉलच्या पार्किंगमध्ये घुसली . ते कार तशीच थांबवून आतमध्येच बसून राहिले.

शेजारी एक पोरगा टेम्पोतून काही सामान उतरवत होता . वॅलेंटाईन डेच्या सजावटीचं तें सामान होतं. दिप्या त्याकडे बघत होता. त्यामध्ये एक मोठा बदाम होता. व्ही लिहिलेला .

बापूसाहेबांची गाडी आली आणि त्यांच्या मागे पोलिसांची गाडी . आता सगळंच अवघड होतं.

बापूसाहेब उतरले आणि गेले.

पोलिसांच्या गाडीतून पोलीस खाली उतरले अन इन्स्पेक्टर रवी . पण त्यांनी पटापट आडोसा घेतला , पोझिशन घेतली. त्यांनी दिप्याच्या गाडीवर , विशेषतः काचांवर गोळीबार सुरू केला.

त्यांना टीप होतीच...

दिप्याचा ड्रायव्हर जागेवरच गेला . तो आणि आणखी दोन पोरं खाली उतरली . त्यांनी आडोसा घेतला व फायरिंगला सुरुवात केली . दोन्ही पोरंही गेली . आता दिप्या एकटाच होता .

रवी एका खांबामागे होता . एक क्षण असा आला की रवी दिप्याच्या रेंजमध्ये आला . एक गोळी आणि काम तमाम ! पण दिप्याने त्याचं नेम धरलेलं ग्लॉक पिस्तूल खाली केलं ... त्याने सरळसरळ ... पण रवीने ती संधी वाया घालवली नाही . त्याच्या गोळीने दिप्याच्या हृदयाचा वेध घेतला .

दिप्या खाली पडला . पडताना त्याचा हात शेजारच्या सामानाला लागलं . तेही त्याच्या अंगावर पडलं. आणि व्ही लिहिलेला तो बदाम त्याच्या छातीवर .

रवीने दोन बोटं उंच करून त्याच्या टीमला व्ही करून दाखवला .

दिप्याने ते पाहिलं . त्यानेही त्याच्या बोटांचा अस्पष्टसा व्ही करून दाखवला ; पण तो कोणी पहिला नाही .

रवीचा व्ही फॉर व्हिक्टरी होता .

आणि - दिप्याचा व्ही फॉर वॅलेंटाईन होता .

आज वॅलेंटाईन डे होता आणि रिया ...

और उसके किये इतना तो बनताही था ! ...

दिप्याला कळलं होतं - रवी हा रियाचा नवरा होता ...

त्याच्या छातीवरचा बदाम आता रक्ताने पूर्ण भरला होता .
----------------------------------------------------
समाप्त
-----------------------------------------------
कॉपीराईट - बिपीन सांगळे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दिप्याची अधुरी कहाणी वाचून वाईट वाटलं... कथा छान लिहिली आहे.. तुम्ही अजून जास्त भागात फुलवू शकला असता.. बिपिनजी..!

विषय छान होता कथेचा.. अंडरवर्ल्ड आणि प्रेमप्रकरण..!

आबा
पिनी
सामो
प्रथमेश
किल्ली
रुपाली
खूपच आभारी आहे तुमचा
आणि साऱ्या वाचकांचा

व्हॅलेंटाईन डे ची कथा लिहायची होती .तो मुहूर्त गाठायचा होता . ही कल्पना सगळ्यात पहिल्यांदा सुचली .इतर कल्पनांवर विचार केला त्या मला तेवढ्या शा पटल्या नाहीत .त्यामुळे ठरवलं की याच कथेवर लिहूया आणि सुरुवात केल्या केल्या मला लक्षात आलं. कथेचा आवाका मोठा आहे .ही कथा अशी लिहून लोकांच्या मनावर ठसणार नाही आणि तसंच झालं
माझी नेहमीची शैली आली नाही .
लेखन फसलं असं वाटतंय .
असो
वाचक मायबाप ! ...

आपला खूप आभारी आहे

फारच घाईत उरकली तुम्हाला मुहूर्त साधायचा होता म्हणून. कल्पना विस्तार अजून केला तरी चालेल की.

गटगमध्ये विषय निघाला होता - तुम्ही अलीकडे कमी पोस्ट करता .

तर मी लिहितो खूप पण पोस्ट फार करत नाही , कारण लोकांचा प्रतिसाद नसेल तर आपण थांबणं योग्य , असं मला वाटतं
तरी खूप नाही पण थोडंफार तरी पोस्ट करायलाच हवं , नाहीतर मलाच चैन पडणार नाही

पण आभार तर खूपच आहेत साऱ्यांचे

पुसणारं कोणी असेल
तर डोळे भरून यायला अर्थ आहे

तसं
वाचणारं कोणी असेल
तर लिहायला अर्थ आहे

आवडली कथा.

मी वाचते तुमचे लेखन आणि आवडतं सुद्धा.
पण प्रतिक्रिया दर वेळेस देईनच, असं होत नाही.

ही कथा अशी लिहून लोकांच्या मनावर ठसणार नाही आणि तसंच झालं > बिपीन जी असा विचार अजिबात करू नका. कथा छानच झाली आहे.

वाचणारं कोणी असेल
तर लिहायला अर्थ आहे> वाचणारे खूप जण आहेत फक्त प्रतिसाद देणं राहून जात खूपवेळा. हे चुकतंय हे जाणवतं Sad

तुम्ही लिहिता ते पोस्ट करत जा इथे. तुमचे नाव वाचूनच कथा पटकन वाचली जाते.

छान .....चारही भाग मस्त

गटगमध्ये विषय निघाला होता - तुम्ही अलीकडे कमी पोस्ट करता .

तर मी लिहितो खूप पण पोस्ट फार करत नाही , कारण लोकांचा प्रतिसाद नसेल तर आपण थांबणं योग्य , असं मला वाटतं
तरी खूप नाही पण थोडंफार तरी पोस्ट करायलाच हवं , नाहीतर मलाच चैन पडणार नाही

पण आभार तर खूपच आहेत साऱ्यांचे

पुसणारं कोणी असेल
तर डोळे भरून यायला अर्थ आहे

तसं
वाचणारं कोणी असेल
तर लिहायला अर्थ आहे >>>

क्या बात.

तुम्ही पोस्ट करत राहा बिपिनजी. वाचक भरपूर असतील / आहेत. कधी तरी दाद द्यायला वेळ होत नसेल. Happy

सर्व वाचक मंडळी -

मी आपला खूपच आभारी आहे

आणखी प्रतिसाद देण्यासाठी थोडा वेळ घेतो .

तुमचं नाव बघून अपेक्षा आपसूक वाढतात.
आता पर्यंत च्या सर्व कथा आवडल्या पण खोटं बोलणार नाही. ही कथा नाही आवडली, टिपिकल होती & घाईत उरकली. पण प्लीज पुढिल लेखनास शुभेच्छा!

आशू

तुमचं नाव बघून अपेक्षा आपसूक वाढतात.
आता पर्यंत च्या सर्व कथा आवडल्या पण खोटं बोलणार नाही. ही कथा नाही आवडली, टिपिकल होती & घाईत उरकली. पण प्लीज पुढिल लेखनास शुभेच्छा!

या स्पस्ट प्रतिसादाबद्दल आभारी आहे
ही कमेंट मला सरळ वाटली . नाहीतर काही लोकांच्या शंकांना जळकट वास येतो

मंडळी

माझा अजून माझ्याशी झगडा चालू असतो . कथा कशी असावी ?

कथा ही कथाच असते . फक्त ती मांडली कशी आहे ? हे महत्त्वाचं . तरीही काही विषय नावडीचे असू शकतात . किंवा काही उल्लेख, वर्णनं नको वाटू शकतात .

काही विषय दमदार असतात . काहींची पार्श्वभूमी मुळात भव्य असते . खूप पैलू असतात

या कथेबद्दल माझं स्वतःच मत - ही कथा चांगली झाली असती . फक्त ती विस्ताराने लिहावी लागली असती , असं मला वाटतं .

इतर मंडळींची चर्चा स्वागतार्ह आहे - कथा या विषयावर

प्रतिसाद म्हणजे अगदी कथेखाली येणाऱ्या प्रतिक्रिया , नं ऑफ प्रतिक्रिया असंच नाही तर एकूण प्रतिसाद असं मला म्हणायचं आहे . पण वाचणाऱ्या आणि प्रतिसाद देणाऱ्या साऱ्याच वाचकांचा मी नेहमीच आभारी आहे

काही जणांना मी विपू केलेली आहे . काही जणांना संपर्क साधला आहे . त्यांचा प्रतिसादाची प्रतीक्षा