
(भाग १ - https://www.maayboli.com/node/84650 )
(भाग २ - https://www.maayboli.com/node/84653)
इथले बहुतांश ट्रेल्स हे नीट मार्क केलेले असतात. तुम्ही कुठे आहात, कुठे जायचंय, किती अंतर लिहिलंय, समदं काही बयजवार! आता दोन-अडीच मैल अंतर उरलं होतं. ट्रेलच्या सगळ्यात उंच पॉइंटवरून आता मोस्टली उतार होता. पण आकाश काळवंडायला सुरुवात झाली होती. पावसाची लक्षणं होती. दोघंही पावलं झपाझप उचलत होते. जवळजवळ धावतच उतरत होते म्हणा ना. चित्रांगदा पुढे, अर्जुन मागे. त्यांच्यातला संवाद थिजला होता. अर्जुन सतरा वेळा स्वतःलाच शिव्या देत होता. आता उरलेल्या ट्रीपचं भजं, ते सुद्धा शिळं आणि भिजलेलं, होणार हे त्याला जाणवत होतं.
पण पावसानं गाठलंच. धाडधाड येणाऱ्या पावसाच्या पहिल्या सपाटेदार थेंबांबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याच्या झोतानं चित्रांगदेच्या छत्रीची त्रेधा उडवली. आता त्यांना थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. चित्रांगदेची उलटीपालटी झालेली छत्री अर्जुननं सरळ करायला मदत केली. अर्जुननं थंडीचंच जॅकेट सॅकमध्ये कोंबून आणलं होतं. त्यानं जॅकेट काढलं. दोघंही त्या गार वाऱ्यात अन् त्याहून गार तडतडणाऱ्या पावसात भिजत होते, कुडकुडत होते. चित्रांगदेनं दोघांच्या डोक्यावर छत्री धरली. अर्जुननं त्याचं जॅकेट दोघांभोवती जमेल तसं लपेटून घेतलं. चित्रांगदा म्हणाली, "थांब, सॅक काढू या". तरीही दोघांना पुरेल एवढा त्या जॅकेटचा आकारच नव्हता. मग अर्जुनानं झटकन निर्णय घेतला. चित्रांगदेला जॅकेट दिलं.
"घाल तू."
ती नाही म्हणायच्या आत तो म्हणाला "एक मिनिट, तू घाल."
त्यानं झटकन कानाला रुमाल बांधला. पाठीवर स्वतःची सॅक घातली आणि चित्रांगदेनं घातलेल्या जॅकेटमध्ये घुसून म्हणाला "मला मिठी मार, आणि छत्री डोक्यावर धर!" अचंबित झालेल्या चित्रांगदेला त्याचा प्लॅन लक्षात आला. दोघंही प्रयत्नपूर्वक पावसापासून बचाव करायची पराकाष्ठा करत होते. चित्रांगदा म्हणाली, "लंब्या, तुझ्या हातांची अडचण होतेय. असे लोंबत ठेऊ नकोस. माझ्या कमरेभोवती लपेट." आता दोघंही प्रॉपर एकमेकांच्या मिठीत होते! चित्रांगदेला रहावलं नाही. तिच्या चेहेऱ्यावर एक दुष्ट हसू उमललं आणि ती म्हणाली, "हाऊ रोमॅन्टिक!" अर्जुन लाजून लालबुंद झाला आणि हताश आवाजात म्हणाला, "आता काही पर्याय आहे का?!" आणि मग तोही चित्रांगदेच्या हसण्यात सामील झाला.
पाऊस पडतच होता. यांचेही पाय भिजतच होते, पण वरचं अंग तरी कोरडे होतं. थोडीशी उब आली. पण भिजल्यानं त्याचा फायदा नव्हता. चित्रांगदेला आठवलं. "तुझ्याकडे एक सॅन्डविच आहे ना? खायचा का? उब यायला मदत होईल." मग तिनं अर्जुनच्या पाठीवरच्या सॅकमधून ते काढलं. एका हातानंच कसाबसं उघडलं. मग एक घास ती खायची, आणि एक अर्जुनला! संपला एकदाचा. दोघंही त्या अवस्थेत अवघडून उभे होते. शरीराचे ते स्पर्श टाळण्याचे प्रयत्न केले तरीही शक्य नव्हतं.
अर्जुन म्हणाला, "पाऊस जर चालूच राहिला तर आपल्याला काही तरी अल्टरनेटिव्ह शोधावा लागेल"
चित्रांगदा बहुतेक तोच विचार करत होती. "हो. वारा पण कमी झालाय. एखाद-दीड मैल राहिलं असेल. धावत गेलो तर पंधरा मिनिटांत पोचू."
इकडेतिकडे बघत ती म्हणाली, "तिकडे बघ. आकाश क्लिअर होतंय."
कोलंबसाच्या जहाजावर पक्षी बसल्यावर जेवढा आनंद त्याला झाला असेल, तेवढा आनंद अर्जुनाला या बातमीनं झाला.
"आत्ता उलुपी असती तर?" चित्रांगदेनं विचारलं. तिच्या आवाजात एक खोडकरपणा होता.
अर्जुनानं मान वळवून तिच्याकडे पाहिलं. त्याला प्रश्नातली खोच लक्षात आली. पण त्यानं वेड पांघरून पेडगावला जाणं पसंत केलं. "म्हणजे?"
"तू मला वाचवलं असतंस का तिला?"
"तो निर्णय उलुपीनं स्वतःच घेतला असता!"
चित्रांगदेनं तिच्या मोकळ्या हातानं त्याला टपली मारली, "तिथेही तुला तिचीच मदत घ्यावी लागली असती ना?"
यावर अर्जुन शांत राहिला. पण त्यानं चित्रांगदाची नजर चुकवली. कदाचित म्हणूनच तिच्या डोळ्यांतली खंत त्याला दिसली नाही.
मग चित्रांगदा म्हणाली, "आणि तिनं ही वेळ येऊच दिली नसती. तिची तयारी म्हणजे पाऊस, बर्फ, आग, अर्थक्वेक या सगळ्याची तयारी तिनं करून आणली असती!" दोघंही हसले. अर्जुन म्हणाला, "आणि आपण ओझ्याचे गाढव झालो असतो."
बोलता बोलता त्यानं चित्रांगदेच्या कमरेभोवतीचे हात सोडवून घेतले. तो आता दूर होणार हे लक्षात येताच चित्रांगदेनं हलकेच त्याच्या गालावर ओठ टेकले आणि ती आवेगानं बाजूला झाली. अर्जुन एक क्षण चपापला. सावरून तोही परत झुकला. पण तो जादुई क्षण निसटून गेला होता.
आता पाऊस जवळजवळ थांबला होता. चित्रांगदेनं बावचळलेल्या अर्जुनाच्या हातात छत्री दिली. मागच्या झाडाच्या तुटक्या फांदीवर अडकवलेली तिची सॅक उतरवली अन पाठीला लावली. आणि अर्जुनच्या हातात हात गुंतवून उतरायला लागली.
डोंगराच्या कडेच्या झाडोऱ्यातून आता खालचा लेक दिसायला लागला होता. एक वळण गेलं अन् त्यांना खाली कॅम्पसाईट दिसली. उदयनचा टेंट लागला होता. हे दोघं बघत असताना उदयन आणि पाठोपाठ अवंतिका टेंट मधून बाहेर आले. चित्रांगदेनं "यू हूSS" अशी हाळी दिली. तिचा आवाज ऐकून दोघांनीही डोंगर स्कॅन केला. हे दोघे दिसल्यावर अवंतिकेनं हात हलवून "कम क्विकली" असा प्रतिसाद दिला. "ऑन अवर वे" असं ओरडून चित्रांगदा वळली. अर्जुन म्हणाला "ह्याना बराय टेंट होता पाऊस आला तेंव्हा!"
चित्रांगदा फुसफुसली, "एकांतात चान्स मारून घेतला असेल.."
अर्जुन अभावितपणे उद्गारला, "जंगल में मंगल!" आणि त्यानं जीभ चावली.
चित्रांगदा खिदळली, "म्हणजे बरंच कळतं की रे तुला! मला वाटलं तू अगदीच हा आहेस.."
"ॲहॅ, आम्ही काय शाळा-कॉलेजात गेलो नाही काय? पोरं कसली टारगट असतात तुला माहीत नाही!"
"मला काय सांगतोस? तुम्हा मुलांची सगळी टारगेटं आम्ही मुलीच तर असतो. व्हेरेव्हर वी टर्न मेन आर ऑग्लिंग अस, वेटिंग फॉर अ चान्स.."
अर्जुन गप्पच राहिला.
"पण दम नसतो कुणाच्यात. नुस्तं बघायचं, झालंच तर त्रास द्यायचा अन् लाळ गाळायची"
अर्जुननं अस्वस्थपणे विषय बदलायचा प्रयत्न केला. "एनी वे, खालती पोहोचल्यावर आपल्यालाही टेंट लावावा लागेल. गाडीतून सामान आणावं लागेल."
चित्रांगदेनं नाद सोडला. "ती सगळी तुझी कामं. मी मात्र या रोमॅन्टिक सेटिंगचा पूर्ण आनंद घेणार..."
शेवटचा टप्पा ते धावतच उतरले.
(क्रमशः)