(या कथेची पूर्वपीठिका कळणं - आवश्यक नाही, पण - हवंच असल्यास
https://www.maayboli.com/node/84612)
(भाग १)
बहुतेकांचा लंच आटपत आला होता. चर्चा येणाऱ्या लॉंग वीकेंडची होती. बरेच जणं लास वेगास, किंवा वॉशिंग्टन डी सी वगैरे ठिकाणी चालले होते. अर्जुन आणि चित्रांगदा हे नवखे होते. ते आपले सगळ्यांच्या गप्पा इंटरेस्ट घेऊन ऐकत होते. काय की या सुट्टीत नाही जमलं, तरी पुढच्या सुट्ट्यांसाठी माहिती गोळा करून ठेवलेली बरी!
उदयन शेजारच्या टेबलावर होता. इथला विषय ऐकून तो उठला, इकडे आला आणि अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, " लॉंग वीकेंडला वेळ आहे. या वीकेंडला कोण येतंय माझ्याबरोबर कॅंपिंगला?"
क्षणमात्र न गमावता चित्रांगदाचं उत्तर होतं, "येस, येस, मी येणार!"
कुणी सिनिअर म्हणाला, "जरा स्प्रिंग सुरू होत नाही तर याचं कॅंपिंग अन् फोटोग्राफी सुरू. अरे बर्फ तर वितळू दे जरा.."
"वितळला रे, केंव्हाच वितळला. पांघरूणातून तुम्ही बाहेर पडत नाही म्हणून तुमची थंडी कमी होत नाहीये. या, चला जरा दहाबारा मैल हाईक करूया, कशी थंडी पळून जाईल बघा!"
"अरे, बायको आली आहे ना तुझी आता, मग गप गादीत पडून रहा की जरा..."
यावर हास्याचे फवारे उडाले. लंच आवरून पब्लिक उठलं.
इकडे अर्जुनाचे हातपाय शिवशिवत होते. च्यायला, इथे कॅंपिंग?! लय खास! जरा कंट्रीसाईडला जाऊन हातपाय मारायची त्याची हौस जागी झाली होती.
पण चित्रांगदाची एक्साईटमेंट लपत नव्हती. तेवढ्यात तिला लक्षात आलं आणि तिनं विचारलं, "तुझ्याबरोबर अवंतिका पण येणार आहे नं?"
"म्हणजे काय? ती येणारच! तिचा पहिलाच कॅंपिंग एक्सपिरिअन्स आहे! चल, येतेस का?" अवंतिका आणि उदयनचं चार-सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. आणि व्हिसा च्या फॉरमॅलिटी पूर्ण करुन ती महिन्याभरापूर्वीच इथे पोहोचलेली होती.
"अर्जुन, तुला काय हरकत आहे यायला? पुणेरी लेका तू.."
"हो पण..."
"अर्जुन, तू आलास ना तरच मी जाईन." चित्रांगदानं जरा सावध पवित्रा घेतला.
"तुला येईन म्हणायचं आहे का?"
"तेच ते रे, पाॅईंट कायै?"
"पण उदयन सर,..."
"तुला या वीकेंडला काम नसेल हे मी बघीन." त्याचं वाक्य अर्धवट तोडत उदयन म्हणाला.
"नाही पण आमच्यामुळे.. आमची अडचण नाही ना होणार?"
"हा, हा... तू बाकीच्या चहाटळांकडे लक्ष देऊ नकोस. तुम्ही दोघं आलात तर आम्हाला तेवढीच कंपनी होईल. हे बघ, अठरा मैलांचा हायकिंग ट्रेल आहे. लूप आहे. म्हणजे कसं की आपण कार पार्किंग पासून सुरवात करतो आणि तिथेच परत येतो. तिथपासून एक-दीड मैलावर कॅंपसाईट आहे! मस्त लेक आहे, स्विमिंगसाठी परफेक्ट आहे."
"पण सर,..."
"ए अर्जुन, कसला बोर आहेस रे तू यार! चल की जाऊ या."
"तू सेट आहेस ना, चित्रांगदा? मग या या बैलाला कानाला, शिंगाला धरून ओढत घेऊन जाऊ. आज-उद्यात प्लॅन फिक्स करू. चलो." असं म्हणून उदयन कामाला गेला.
"अर्जुन्या, कावळ्या, बाकी वेळा इतकी शाईन मारतोस रे, की मी हा ट्रेक केलाय अन् तो ट्रेक केलाय, आणि आता काय ही रडरड?"
"चित्रांगदा, मला जायला काही नाही. हायकिंग, कॅम्पिंग कसली जबरी आयडीयायै. पण तू प्लीज त्या उदयन सरांच्या बायकोशी बोलून घे. उगाच आपली कबाबमें हड्डी कशाला?"
चित्रांगदा फिसफिसली. "बोलते रे मी, पण तू आता बॅक आऊट होऊ नकोस, हां"
बेत ठरला. उदयननं आणखी एक टू-पर्सन टेंट कुठून तरी पैदा केला. कुणी कुणी काय काय बरोबर घ्यायचं याच्या लिस्टा तयार झाल्या. शनिवारी सकाळी लवकर निघायचं. तेही एक वेळचा डबा घेऊन. उदयनकडे एसयूव्ही होती. त्यानं या दोघांना पिकअप करायचं. तिथे पहिल्यांदा हाईक करायचा. त्याला सहा-सात तास लागतील. कुठे तरी थांबून डबा खायचा. मग कॅम्पसाइटला जाऊन टेंट लावायचे. संध्याकाळी मस्त शेकोटी पेटवायची, बारबेक्यू करायचा, आणि गप्पागाणी करत शाम रंगीन करायची. सकाळी ब्रेकफास्ट करायचा आणि लंच पर्यंत घरी परत!
प्लॅन तो बढिया बना था!
----
टू-पर्सन टेंट. हे ऐकल्यापासून अर्जुन अस्वस्थ होता. त्याच्याबरोबर झोपायला उदयन येणार होता का? मुलं एका टेंटमध्ये आणि मुली दुसऱ्या? त्यानं मनाचं असं समाधान करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण ते काही शांत बसत नव्हतं. हा प्रश्न डायरेक्ट विचारण्याची त्याला हिंमत झाली नव्हती. दुसरी पाॅसिबिलिटी म्हणजे चित्रांगदा आणि तो एका टेंटमध्ये, प्रत्येक वेळी हा विचार मनात आला की तो धक्का बसल्यासारखा विचलित व्हायचा. डोकं झटकून तो हा विचार झटकायचा प्रयत्न करायचा. पण तो विचार परत परत त्याला छळायला यायचा.
"एका मुलीबरोबर रात्री एका टेंटमध्ये झोपायचं..."
"एक मुलगी? ती चित्रांगदा आहे. कुणी परकी, अनोळखी नाही."
"नाही. हो. पण म्हणून काय झालं मुलगीच आहे ना ती?"
"मग तुला समज आहे ना?"
"हो. पण..."
"तुझा विश्वास आहे ना स्वतःवर?"
"शंभर टक्के!"
"नीट वागशील ना?"
"दोनशे टक्के"
"मग झालं तर!"
"नाही पण म्हणजे... ती चित्रांगदा जरा हीच आहे."
"ती? ती हीच आहे? ठोंब्या, तू जरा हाच आहेस!"
"म्हणजे?"
"अरे, किती विचार करशील? दिवसातले दहा तास आपण एकत्र असतो. त्यातले चारसहा तास डोक्याला डोकं लावून बसलेले असतो. एका क्युबिकल मध्ये, कधी डिझाइन करत, कधी डिबग करत, कधी उगाच गप्पा छाटत.."
"मग काय झालं?"
"आता सवय झाली आहे आपल्याला एकमेकांच्या असण्याची, जवळकीची"
"आहाहा शहाणाच आहेस! ते ऑफिसमधलं वेगळं"
"हो खरंय, ते वेगळं... पण आपण शंभर वेळा बाहेर गेलोय... खायला, खेळायला, परवा इकडे येण्यापूर्वी खरेदीला.. दहा वेळा ती मागे डबलसीट बसली आहे"
"हो तोच जरा प्राॅब्लेम आहे."
"हं, प्राॅब्लेम आहे खरा! आय लाइक्ड हर रायडिंग विथ मी..."
"तो वारा, तो वेग, तिचे वाऱ्यावर स्वार होऊन उडणारे केस!"
"ते खांद्यावर हात ठेऊन अगदी कानाशी लागून तिचं ते बोलणं.."
"मग काय झालं तेंव्हा?"
"झालं काही नाही, पण..."
"आज मनात भिती उत्पन्न होईल इतपत तर झालंच ना"
"हो. अरे वयच हे आहे..."
"ओ शहाणे, तुम्ही फिलाॅसाॅफीत जाऊ नका. आपल्याला उद्या जायचंय आणि एका टेंटमध्ये झोपायचंय तिच्यासोबत..."
"जाउ दे. उद्या बघू"
"जो भी होगा देखा जायेगा!"
"जो भी?"
"ए भाड्या, झोप नं आता गप. उद्या ऑफिस आहे..."
आज शुक्रवार. त्याच्या वाट्याची सगळी तयारी त्यानं केली. संध्याकाळभर रूम पार्टनरांनी त्याची खेच खेच खेचली. त्यांनाही आता कळलं होतं की हा एका मुली बरोबर रात्र काढणार आहे.
मग आज त्यानं आघाडीच उघडली.
"तुला काय वाटतं तिला काय वाटत असेल?"
"हे तुझ्या लक्षात येतंय ना? तीही याच बोटीत असणार आहे! तिलाही प्रश्न पडला असणार की उद्या काय होईल"
"हा प्रश्न फक्त माझा नाही तिचा पण आहे ना?"
"तुला असं वाटतं का की ती गैरवर्तन करेल?"
"ती तसली मुलगी वाटते का तुला?"
"नाही. मग?"
"तुला असं का वाटतं की ती तू केलेलं गैरवर्तन सहन करेल?"
"दोस्ता तुला ती कशी मुलगी आहे हे माहिती आहे ना? आहे, थोडी फॉरवर्ड आहे, थोड्या वेगळ्या विचारांची, ओपन माईंडेड आहे."
"पण बेफाम आहे का? बेदरकार आहे का?"
"आपण फ्लाईटमधून आलो. आठवतंय ती माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपली होती. एवढेच नाही थोड्या वेळाने तिनं झोपेतच माझा हात ओढून घेतला आणि मग माझी झोप मोडली ना?"
"ह्या सगळ्यातून काय सिद्ध करायचंय तुला?
तुला प्रॉब्लेम वाटतोय की ती कसं वागेल?
पण तुला खरा प्रश्न काय पडलाय माहितीये?
तू कसं वागशील? हा खरा प्रश्न आहे!
तू स्वतःला काय समजतोस ॲज अगेन्स्ट तू काय आहेस हा निवडा होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून तू अस्वस्थ आहेस.”
"जर तू या प्रश्नापासून दूर पळणार असशील तर त्यासाठी एक पर्याय आहे. आत्ताच काहीतरी कारण काढ आणि नाही यायला जमत असं सांग. नाही तर जे घडेल त्याला तोंड द्यायला तयार हो."
अर्जुनाला समोर कुरूक्षेत्र दिसत होतं. पण या लढाईसाठी त्याच्याकडे शस्त्र नव्हती. आपलाच बळी जाईल का याचा अंदाज नव्हता. प्रश्न विचारावेत, मार्गदर्शन घ्यावं असा श्रीकृष्ण नव्हता. आता परिस्थितीच त्याला मार्ग दाखवू शकत होती.
अर्धवट झोपेत त्याची विचारांची गिरमिटं फिरत होती.
तिनं पुढाकार घेतला तर?
काहीही काय? ती असं करूच कसं शकेल?
काय माहिती, या मॉडर्न मुली...
मॉडर्न? मग उद्या चित्रांगदेच्या जागी उलुपी असती तर तिनं काय केलं असतं?
उलुपी!
उलुपीची आठवण झाल्याबरोबर खाडकन झोपच उघडली त्याची.
उलुपी का आठवावी मला आत्ता? तिचा काय संबंध?
तिचा काय संबंध?! भई वाह!
तू मनातल्या मनात किती वेळा उलुपी आणि चित्रांगदेची तुलना केली आहेस? किती वेळा मनातल्या मनात त्यांच्याशी संग केला आहेस?
गप्प बस रे, एकदम गप्प, शट अप, शट द फक अप!
किती वेळा त्यांना मनीमानसी नागवे केले आहेस?
ए माझं डोकं फुटेल आता... नको नको आहेत हे विचार
तेवढ्यात उशाशी ठेवलेला गजर बोंबलायला लागला. तो धडपडून उठला. आता आवरायला पाहिजे.