सुंदोपसुंदी - एक काॅर्पोरेट आवृत्ती

Submitted by Abuva on 28 January, 2024 - 07:41
मीटिंग (Generated by DALL-E)

सुंदोपसुंदांबरोबर मीटिंग होती.
तर सुंद म्हणजे सीटीओ, यूएसहून आलाय.
उपसुंद म्हणजे व्हीपी प्रॉडक्ट. त्याचं तळ्यात-मळ्यात असतं. जास्त दिवस अमेरिकेत, उरलेले इथे.
इथे जे काही घडतं त्याचे कर्तेकरविते हेच दोघे होते.
आणि मी, इथला जनरल मॅनेजर, सगळी डेव्हलपमेंट बघणारा

सीटीओनं सकाळी आल्याआल्या स्टॅटस रिव्ह्यू मीटिंग बोलावली होती. खरं तर त्याचा आणि व्हीपी प्रॉडक्टचा छत्तीसचा आकडा. एके काळी दोघेही खांद्याला खांदा लावून काम करायचे. पण पुढे जबाबदाऱ्या वेगळ्या झाल्या आणि तेढ वाढली.
आता उपसुंद सुंदाच्या टेक्निकल इनपुट्सना कोलतो. आणि सुंद एक अख्खा प्रॉडक्ट बळकावून बसलाय. बसलेत एकमेकांना शह-काटशह देत.
माझं काम या दोघांच्याही भारतातल्या टीम्स चालवायच्या आणि प्रॉडक्ट्स डेव्हलप करायची. त्यामुळे या सुंद-उपसुंदांच्या साठमारीचा मी प्रमुख बळी!

आज दोघंही सुंद आणि उपसुंद इथे मीटिंगला येऊन बसले होते. आणि उपसुंदानं आपली भारतातल्या टीम ची को-ऑर्डिनेटर आणून बसवली होती.
ही या मीटिंग मध्ये का आहे? डेव्हलपमेंट को-ऑर्डिनेटर आहे म्हणून? आणि किती बोलते आहे... च्यायला, तीन वर्षंच झाली असतील. आपण सीडॅकच्या इंटरव्ह्यू मधून हिला सिलेक्ट केली होती. हिंदी-भाषक होती, गावाकडची होती. पर्सनल इंटरव्ह्यू यथातथाच झाला होता. पण टेक्निकल इंटरव्ह्यू क्रॅक केला होता. ॲप्टिट्यूड मध्ये काही विशेष दिसलं नव्हतं. पण ह्या फ्लॅगशिप प्रॉडक्टसाठी चांगली टेक्निकल मंडळी लागणार होती. त्यामुळे हिला घेतलं होतं.

ही आता तक्रारींचा पाढा वाचते आहे. टीम मिळत नाही. टारगेट्स मीट होत नाहीत कारण इथल्या लीडरशिपचा सपोर्ट नसतो.

म्हणजे माझा!
डायरेक्ट माझी तक्रार करण्यापर्यंत मजल? आयची जय हिच्या...

हिला कंपनीत आल्यावर लगेच बिट्सियन्सच्या ग्रुपमध्ये टाकला होता. त्यातल्या दोघी तिघी मुली एकदम चटपटीत होत्या. दिल्ली -चंदीगडच्या होत्या. त्यांच्यासमोर ही अगदीच गावंढळ भासायची. एकदा तिचा पाणउताराही त्यांनी टीम मीटिंगमध्ये केला होता. मग मी त्या चंदीगडवालीला वेगळं बोलवून एचआरसमोर वाजवला होता. एचआरवालीला सांगितलं होतं हिच्याकडे पर्सनली लक्ष दे. तेव्हा सगळ्यांचं मत झालं होतं की मी हिला फेव्हर करतो! बोंबला... एवढं सगळं केलं तेंव्हा कुठे ते ध्यान आज माॅडर्न झालं होतं. बीजनेस सूट काय अन तोंडावर रंगरंगोटी. च्यायला, या सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं लक्षातंच आलं नाही! पण तेच चावतंय आता...

उपसुंदाची कळी खुलली. हिला माझ्यावर सोडायची आयडिया नामी होती. लहान पोरीकडून वाजवायची. मग परस्पर माझी ठासली गेली, की हा नामानिराळा! साप मरे और लाठीभी न टूटे!

हिच्या तक्रारी चालूच होत्या. संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये तेलकट पदार्थ जास्त असतात. कॉफीचे स्टरर संपलेले असतात. कॅबमध्ये रात्री एसी लावत नाहीत.

च्यायला, यांना गूगलसारख्या सोयी पाहिजेत. काम एक शतांश करायचं. पगार इतरांच्या दसपट मागायचा. आणि तीन प्रकारची सॅलडं हवीत लंचला. नखरे साले... आम्ही कंपनी वाढवली तेंव्हा वडापाव आणि भज्यांवर दिवस काढले होते. तेव्हा हाच उपसुंद आमचा मॅनेजर होता की! बसल्या बैठकीला तीन तीन वडापाव आणि किटलीभर चहा ढोसायचा! आणि आज याला न्युट्रीशिअस व्हिक्चुअल्स हवेत. नानाची टांग ...

सुंदाला चढायला आयतंच कारण मिळालं. पर्यावरण, प्रोटीन, नित्य व्यायाम, बीएमआय या सगळ्या सात्विक बाबी तो खाजगी कुरण समजतो. त्यामुळे त्यानं वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

खरं तर चांगला दोस्त माझा. आज रात्री घरी जेवायला बोलवावं असं मनात होतं. आता जा, टांगलं तिच्याऐला. गेल्या क्वार्टरला त्याच्या प्राॅडक्टची आख्खी इंप्लिमेंटेशन टीम सोडून गेल्यानं त्याचे महान फांदे झाले होते. पण केली की राव आम्ही महिनाभर मरमर. बाराचौदा तास दिवसाला काम करून त्याची गरज भागवली, अन नवीन टीमही बांधून दिली. पण त्याला खोडी काढायला जागा मिळाली ना, मग घ्या वाजवून...

त्याचं झाल्यावर मग उपसुंदाला वाचा फुटली. त्यानं वेळेची शिस्त, कोडिंगची शिस्त, टेस्टिंगची शिस्त अशी फरडच लावली.

च्यामायला, हा उपसुंद इथे आला की, हिला घेऊन कॅबिनमध्ये नाहीसा होतो. दिवस-दिवस त्याच्या टीम मेंबरना त्यांचं दर्शन होत नाही. हे दोघं, लंचची वेळ सुद्धा टाळतात. उगाचच भलत्या वेळेला येऊन खाऊन जातात. कसली बोडख्याची शिस्त आली आहे? आणि हे असं वागणं इतरांच्या डोळ्यावर येत नाही काय? भलभलते प्रवाद उठताहेत.

तो विषय संपवून उपसुंदानं टीम प्राॅडक्टिव्हिटीत तोंड घातलं. मग तो लाईन्स ऑफ कोड, मेट्रिक्स वगैरे वर घसरला. ते भाषण सुरू झालं. त्यात या कन्यकेनं मधेच तोंड मारून उपसुंदानं कसं नाॅव्हेल आर्किटेक्चर केलं आहे वगैरे सांगून त्याची लाल करणं सुरू केलं.

ज्यायची जय! उपसुंदाच्या मगाशीच खुललेल्या कळीचं आता फुल्लं फूल झालंय! फूलीश, तिच्याहैला... या दोघांचं काय मेतकूट जमलंय कळत नाही. त्या टीममध्ये कोडिंग करणारे खंदे वीर आहेत. जास्त अनुभवी मंडळी आहेत. पण ह्याला हिचीच हौस भारी. पण हिचीही कमाल आहे हां. टेक्नीकली चांगली म्हणून घेतलेली मुलगी, बघताबघता टीम को-ऑर्डिनेट करू लागली आहे. ततपप करत बोलणारी पोरगी, एकदम राणीच्या झग्यातून पडल्यासारखी वा ट्रंपाच्या विजारीतून निघाल्यासारखी अमेरिकन ॲक्सेंटचं विंग्रजी झाडायला लागली आहे. उपसुंदानं कडेवर घेतल्याचा परिणाम म्हणावा की नॅचरल प्रोग्रेशन?

लई ऐकून घेतलं. त्यात आपल्या शिणेच्या लोकांपुढे एका नव्या कन्यकेने लाज काढली होती. हमारी बिल्ली, हमींसे म्यांव?! या चुकीला माफी नाही.

चढाई तर करायची आहे. पण ती कशी करावी? सुंदोपसुंद दोघांना एकाच वेळी झेलणं महागात जाईल. आता नाना पाटेकर ईष्टाईल अंडरप्ले करणं भाग आहे.

मग पहिल्यांदा मी माझा रिपोर्ट दिला. या क्वार्टरला झालेल्या कामांचा हिशेब वाचला. उपसुंदाला हौस आली, मध्येच नाक खुपसायची. पण त्याला परस्पर सुंदानं जामला! आता संधी होती. आता हिचंच मोहीनी अस्त्र करावं अन् उपसुंदावर सोडावं.

तर सुंद साहेब, हिच्या टीमची प्राॅडक्टिव्हिटी कमी आहे. का? तर ही टीम मेंबर्सना वेळेवर काम देत नाही असं रिपोर्ट आहे.

म्हणजे काय? उपसुंद गरजला, अन मोहिनीदेवींचा चेहेरा पडला.

सांगतो. आता उपसुंद साहेब, तुमच्या टीमसाठी एक मॅनेजरही आहे. पण त्यालाही काम कळतं ते मोहिनीदेवींकडून. तो आमच्या लीडरशिप मीटिंगमध्ये बोट दाखवतो तिच्याकडे. ती म्हणते नव्या आर्किटेक्चरचं काम चालू आहे. मग तुमचा मॅनेजर दुष्काळी कामं काढून बसतो. या नादात टारगेट्स बोंबलतात.

यावर उपसुंद फुरंगटला! मोहिनीदेवी करपल्या.

सुंद साहेब, दुसरं सांगतो. तुमच्या नवीन टेक्नाॅलाॅजी फ्रेमवर्कचं आम्ही दोन आठवडे सगळ्या डेव्हलपर्सना ट्रेनिंग दिलं. काय फायदा झाला हो... वा वा वा

शुद्ध लोणकढी! डोंबलाचा फायदा. पण आज उपसुंदायसह मोहिन्याय स्वाहा अशी यज्ञात आहुती द्यायची म्हटल्यावर सत्याचा झाला थोडा अपलाप तर होऊ द्या. पुढच्या क्वार्टरच्या मीटिंगला सुंदाला गर्तेत घालू!

तर हे तुमचं लाडकं फ्रेमवर्क, बरं का सुंद साहेब, ही उपसुंदीय मंडळी वापरतच नाहीत! म्हणजे झाला का वांदा?

आणि इथेच सुंदोपसुंदीचा पुढील अध्याय सुरू जाहला.. आपला‌ कार्यभाग साध्य झाला! उपसुंदावर चढाईची अलगद हाती पडलेली संधी सुंद सोडतो काय?! नाव नको. त्यानं थैमान घातलं. जिथे उपसुंदाची वाट लागली तिथे मोहिनीदेवींची काय पत्रास?
एकूण रागरंग बघून मग उपसुंदाने घूमजाव केले. प्रश्न होता त्याच्या आर्किटेक्चरचा. नवीन फ्रेमवर्क घ्यावं लागलं तर आर्किटेक्चरचा बळी जाणार. मग डेडलाइन्स झोपणार. ते झालं की सेल्स-मार्केटिंगचे राहू-केतू ग्रासतील. तो विचारात पडला होता.

आणि ते आले, तर सुंद काय सुटतो काय? पण आज सुंदाचा ताव दिसत होता की तो कुणाचा तरी बळी घेतल्यावाचून सोडणार नव्हता.

उपसुंदाला सुंदाच्या भुकेची जाणीव झाली. त्यानं धूर्तपणे आर्किटेक्चर वाचवत मोहिनीदेवींना क्वार्टरली मीटिंगच्या बलिवेदीवर चढवले. जिथे देवही दुर्बलांचा घात करतात म्हणतात तिथे या दानवांसमोर मोहिनी किस झाड की पत्ती.. मोहिनीदेवी यांची डेव्ह को-ऑर्डिनेटर या अवैध पदावरून सर्वानुमते तडक गच्छंती झाली! आणि बळी घेऊनच रक्तरंजित मीटिंग संपली.

आता मोहिनीदेवींची खरी कसोटी आहे. उपसुंदाची छत्रछाया गेल्याचं सगळ्यांच्या लक्षात येईलच. मग सगळे हिशोब पूर्ण करतील! बघू या, तरते का डुबते. उपसुंदानं वाऱ्यावर सोडली तिला, आता येईल आता आपल्याच आसऱ्याला! यापुढे ही बरी वागली तर ठीक, नाही तर दाखवू तिला - कात्रजचा घाट...

तात्पर्य:
काॅर्पोरेट जगतात सुंदोपसुंदी हा स्थायीभाव असतो.
मोहिनी हे एक खर्ची घालण्याचं प्यादं असते. तिला आपण फर्जी झाल्याचा उगाचच भास होत असतो.

या पलिकडे तात्पर्य शोधू नका, तिलोत्तमा तर अजिबात शोधू नका. हे सुंदोपसुंद आहेत म्हणून आमची नोकरी चालू आहे. तिथे तिलोत्तमेला आणून पोटावर पाय आणू काय? काय कळले?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भन्नाट! भाषाही मस्त जमली आहे आणि ड्रामाही!

उपसुंदांची छत्रछाया गेल्यानंतरच्या मोहिन्या हा एक दयनीय प्रकार असतो! (इथे मोहिन्या म्हणजे स्त्रियाच असे नाही. अशी कोणतीही व्यक्तिमत्त्वे)

यातले प्रमुख कलाकार भारतातील एकाच भागातले आहेत का वगैरे उल्लेख दिसला नाही. पण अनेकदा ते ही असते व ते प्रमुख कारणही असू शकते Happy

एकदम वेगळा आणि भारी लेख वाचायला मिळाला! अजून लिहा अशा विषयांवर.

भारी आहे हे. अनेकांना ग्रुम केले आहे आणि त्यातले हमारे बिल्ली वाले अनुभवपण घेतले आहेत त्यामुळे भा पो

इतकी हिंमत आमच्यात कधी येणार काय माहित. >>> मीअनु +111

सॉलिड आहे गोष्ट. मजा आली वाचायला.. (अगदी सगळी कळलीच असं नाही पण आमच्या हापिसात ही हळूहळू कॉर्पोरेट कल्चर घुसतय त्यामुळे बरीच कळली.)

झक्कासच एकदम. "यातले प्रमुख कलाकार भारतातील एकाच भागातले आहेत का वगैरे उल्लेख दिसला नाही" फाचे हे पण एकदमच पटले.

मस्त लिहिले आहे
मजा आली वाचताना
आणि नकळत त्यात आपल्या ऑफिसमधील पात्रे शोधू लागलो..