त्याच दिवशी, हॉस्पिटलमध्ये:
"काका, काका, काय झालंय, कशी आहे पूनम?”
"ती आत्ता आत आहे. डॉक्टर तिचं स्टमक वॉश करून ते सगळं काढायचा प्रयत्न करताहेत. तू जरा इकडे ये-”
...
"स्वाती, तू आत्ता इथे थांबू नकोस. ते योग्य नाही. तू तडक माझ्या घरी जा. मी हिला सांगून ठेवलं आहे. आज तू इथेच थांब. मी इथे हॉस्पिटलमध्ये काय होतं आहे ते तुला कळवत रहातो. पण तू इथे थांबणं योग्य नाही. आलं का लक्षात? लगेच नीघ.”
त्याच दिवशी संध्याकाळी, काकांच्या घरी:
"स्वाती, आता काळजी करू नकोस. पूनम वाचेल. डॉक्टरांनी खात्री दिली आहे.”
"चला, बरंय! काय भलतंच घडलंय, काका!”
"हो. आणखी पण एक गोष्ट चांगली झाली, की ती वाचते आहे म्हटल्यावर आता ही पोलीस केस होणार नाही, ती दाबली जाईल. सासरकडच्यांना परवडणार नाही ती केस उभी राहिलेली. त्यामुळे केस होणार नाही हे पक्कं. ती जर गेली असती, तर मात्र कठीण होतं. आणि आता ते पोलिस इन्क्वायरी वगैरे काही होणार नाही! त्यामुळे तुला आता शांत झोपायला हरकत नाही!”
"काय शांत झोपायला सांगताय काका!”
"डॉक्टर म्हणत होते, तिला माहित असलं पाहिजे की ती कुठलं औषध घेते आहे. आणि तिनं मुद्दाम कमी मात्रा घेतली असावी.”
"काय सांगताय, बापरे!”
"खरं आहे. या शेतकरी घरातल्या मुलींना, म्हणजे सगळ्यांनाच, विषारी कीटकनाशकं, तणनाशकं यांची ओळख असतेच. सगळ्यांच्या घरात साठा असतो. ते सोडून ही औषधांच्या दुकानातून हे औषध घेऊन आली, म्हणजे समजून घ्या!”
"काका, नका सांगू. आधीच डोकं भणभणतंय. माझ्या ऑफिसात हे असं काही तरी घडलंय याचंच टेन्शन आलंय मला.”
"आता तू काकूच्या हातचा वरणभात खा आणि शांत झोप! बाकी उद्या पाहू. मी रात्री उशीरानं एक चक्कर मारीन तिकडे.”
उशीराने, काकांकडे:
"काय ग, झोपला नाहीत तुम्हा अजून?”
"हो, अहो झोपच येत नव्हती स्वातीला. म्हणून मग तिला कॉफी करून दिली. तुम्हाला हवी आहे का?”
"असेल शिल्लक तर दे.”
"काका, कशी आहे तिकडे परिस्थिती?”
"ठीक आहे आता सगळं. तिच्या माहेरचे अन् सासरचे लोकं आहेत तिथे.”
"काळजीचं कारण नाही ना?”
"नाही, आता काहीच नाही. ती शुद्धीवर पण आली आहे. मी भेटलो नाही. पण बाहेरच मला तिचा नवरा भेटला. त्यानंच सांगितलं.”
"काय झालं होतं तिला औषध घ्यायला? कसली रोड अन् बारकुडी आहे, फुंकर मारली तर उडेल. सारखी रडतच असते जातायेता. मग कुठनं येते ही हिंमत?”
"गावाकडची गणितं वेगळी असतात, स्वाती.”
"मला भिती आहे ती कामाचं कारण सांगतेय का? गेल्याच आठवड्यात मी तिला दुसऱ्या टीम मध्ये पाठवणार म्हणून सांगितलं होतं. तिला काही जमतं नाहीये हे तर स्पष्ट होतं. तुम्ही मला जेव्हा सांगितलं की तासंतास फोनवर असते, भांडते काय, रडते काय, तेव्हाच मी ठरवलं होतं की थोड्या दिवसांत तिला काढायचं. पण एक शेवटची संधी द्यावी म्हणून तिच्याच मैत्रिणीच्या प्रॉजेक्टवर शिफ्ट केलं होतं.”
"तू अजिबात काळजी करू नकोस या बाबतीत. तो नवरा सांगत होता, की वेगळं व्हायचं म्हणून खूप कटकट करत होती. दोन चार दिवसांपूर्वी तिला खतांच्या अन् पेस्टीसाईडच्या खोलीजवळ घुटमळताना तिच्या सासूनं पाहिलं होतं. तेव्हापासून त्या खोलीला कुलूप लावून ठेवलं होतं. अगं, त्यावरचढ म्हणजे आज दुपारी लंच टाईमला तिच्या सासऱ्यांनी तिला औषधांच्या दुकानाजवळ पाहिलं होतं! काय करते आहेस विचारलं तर ती म्हणाली मेडिकलच्या दुकानात आले आहे म्हणाली.”
"काय हा अविचार!”
"आणि सांगतो. संध्याकाळी तो तुमचा मनोज होता तो सांगत होता, म्हणे दिवसभर ती मैत्रिणींना सांगत होती मी औषध घेणार म्हणून. “
"काऽय?”
"त्या तिला समजवायचा प्रयत्न करत होत्या म्हणे. पण तो म्हणतो की त्यांना पत्ताच लागला नाही की ती जाऊन औषध घेऊन कधी आली ते!”
...
"स्वाती,स्वाती, तू शांत हो पाहू. अगं, काही झालं नाहीये.”
"काकू, रडू नको तर काय करू? आज मी इथे आहे. दुपारी कस्टमर कडे इम्प्लिमेंटेशनसाठी गेले आणि हे घडलं. त्या मूर्ख मुलीचं एक सोडा, पण या महामूर्ख मुलींनी मला अगोदर एक फोन जरी केला असता, तरी हा सगळा तमाशा वाचला असता ना. आज मी इथे नसते तर केवढा गहजब झाला असता. आणि माझं विसरा क्षणभर. मी बाहेरगावची. तुमच्यावर केवढी आफत ओढावली असती, हिनं जर इथे सुईसाईड केली असती तर... मला कल्पनाच करवत नाहीये! पोलीसपार्टी, पंचनामा, हे सगळं झालं असतं तर शेण घातलं असतं तोंडात, तुमच्या अन् माझ्या. तुमच्या आधाराने, तुमच्या पुढाकाराने हे युनिट उभं राहीलं. आपण काही तरी वेगळं, काही तरी युनिक करत होतो. जीव पणाला लाऊन धडपड करत होतो. आणि ज्या लोकांसाठी म्हणून केलं त्यांना याची चाड नाही! त्यांनी पुण्यामुंबईला जाऊ नये, ती वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी ही तडफड. पण यांना मात्र हे सोडून तिकडे पळताना एक सेकंदही विचार करावासा वाटत नाही. ठीक आहे, ते एकवेळ कळतं मला. पण आता हे? ऑफिसमध्ये हे.. हे.. औषध घ्यायचं? काका, काय करायचं आता?”
"स्वाती, तुम्हा पांढरपेशांना शेतकरी कळणं कठीण आहे. हे गावाकडचं जीवन तुम्हा शहरातल्यांना नाही कळणार. म्हटलं तर सोपं, पण म्हटलं तर कर्मकठीण. मळलेली वाट धरली ना, तरी त्या पायवाटेवर जनावरं, किरडू कधी निघेल नेम नाही. मग त्या सावधपणाला तुम्ही बिलंदरपणा म्हणता. येनकेनप्रकारेण प्रत्येक गोष्टीतून फायदा काढला तरच त्यांचं जीवन सुसह्य होतं गं. त्यात तुम्ही क्रांतीच्या वल्गना करत इथे येता. ती क्रांती बळी घेतल्याशिवाय घडेल होय? जाऊ द्या. सगळं मार्गी लागलंय. झोपा आता.”
सहा महिन्यांनंतर:
"मॅडम?"
"हं, कोमल, बोल"
"मॅडम, माझं लग्न ठरलं"
"अरे वा, काॅन्ग्रॅच्युलेशन्स"
"थॅन्क्यू मॅडम"
"कुठला आहे मुलगा?”
"इथलाच आहे मॅडम, पण आता नोकरीला मुंबईला असतो.”
"मग?”
"हो मॅडम, मी मुंबईला जाईल.”
"कधी आहे लग्न?"
"पुढच्या महिन्यात आहे"
"बरं मग आपल्याला हॅन्डोव्हरची तयारी करावी लागेल. ठीक आहे. दुपारी मीटिंग घेऊन बोलू या.”
"मॅडम, एक विचारू का?”
"विचार की"
"नै मंजे रागावू नका मॅडम, पन पूनमचा फोन आलावता. आता मी जातेय ना, तर एक जागा मोकळी होईल. तर त्या जागी परत घ्याल का म्हणून विचारत होती!”
...
...
...
अवाक्
(समाप्त)
अरे.. छान कथा
अरे..
छान कथा
"गावाकडची गणितं वेगळी असतात,
"गावाकडची गणितं वेगळी असतात, स्वाती.”
हे अगदी खरं आहे.
कितीतरी उत्तम प्रोजेक्ट अशा लोकांमुळे केरात गेलेत.
आणि त्याबद्दल बोलणे हे दंगल सुरू करण्यासारखेच आहे.
गौरी देशपांडे यांचे विंचुर्णीचे दिवस हे पुस्तक अशाच अनुभवावर आहे.
कथा चांगली जमलीय.
हम्म! गावाकडची गणितं खरेच
हम्म! गावाकडची गणितं खरेच वेगळीच असतात. कथा छान जमलेय!
छान आहे कथा.
छान आहे कथा.
मला शीर्षक आणि कथेचा संबंध
मला शीर्षक आणि कथेचा संबंध काय ते कळलं नाही.
एखादी रोमँटिक कथा असेल असं शीर्षकावरून वाटतं पण तसं नाहीये.. बहुतेक ते शब्दश वेड असेल.
छान आहे कथा.
छान आहे कथा.