जे वेड मजला लागले... (भाग दोन)

Submitted by Abuva on 22 January, 2024 - 23:13
temple environment (generated by DALL-E)

आणखी दोन आठवड्यानंतर:

"प्रियांका, ही पूनम का आली‌ नाही आज? गेल्या आठवड्यात येणार होती ना?”
"मॅडम, मी बोलले नैये तिच्याशी. विचारून सांगते.”
...
"मॅडम, पूनमला फोन केलावता. पुढच्या आठवड्यात येईल म्हणलीये.”
"का?”
"तिच्या सासरचे म्हन्ले की देवदर्शन झाल्याशिवाय जायचं नाई.”
"काय चाललंय हे! कशानं कसं काम होईल? जर ट्रेनिंग झालं नाही तर काम काय करणार ही? तिला सांग नको येऊन म्हणून”
"मॅडम, असं नका करू. तिचं लई नुकसान होईल.”
"ह्याचा विचार तिनं करायला नको का?”
"मॅडम, तुमाला काय सांगायचं, लग्नानंतर सासरचे म्हणतील ते ऐकावं लागतं ना...”
"बरं, बरं. तुझं झालय का लग्न मला वर तोंड करून सांगते आहेस ते.. मला माहिती आहे गं. पण अशानं कामं कशी होणार? आधीच आपला हा एक प्रयोग आहे. ग्रामीण भागात परदेशातले सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रॉजेक्ट आजपर्यंत कुणी केले आहेत का? मला तरी माहिती नाही.‌ आणि आपण करतोय तर लोकांना आपल्याविषयी, आपल्या कुवतीविषयी विश्वास निर्माण झाला पाहिजे ना? मग वेळेवर आणि अचूक डिलीव्हरी देणे हे आपलं कर्तव्य आहे. अशी जर नवी मंडळी कच्ची निघाली तर? कस्टमरचा आपल्यावरच्या विश्वास ढळायला वेळ लागणार नाही.”

आणखी तीन आठवड्यानंतर, एका शनिवारी:

"कोमल, जरा इकडे ये.”
"हं त्या पूनमचा ह्या टेस्टमध्येही परफॉर्मन्स काही फार बरा नाहीये. प्रियांकालाही बोलाव.”
"मॅडम, ती टेस्टमधे मार खाती. पण काम चांगलं करन.”
"पण या टेस्टमध्ये सरळ दिसतंय की तिला कन्सेप्ट कळले नाहीयेत. मग?”
"मॅडम, आमी तिला मदत करतो. ती करल तुम्ही काय म्हणाताल ते.”
"पण तुम्ही इतकी का तिची बाजू घेताय? काय, कारण काय आहे?”
"मॅडम, तिला जॉबची गरज आहे.”
"ती सगळ्यांनाच आहे. पण आत्ताच लग्न झालंय ना तिचं?”
"मॅडम, आता काय सांगायचं. तिचं लव मॅरेज हाय. त्यामुळं जितका वेळ भायेर राहील तितकं बरं.
का?”
...
"हो, पण ही काही‌ धर्मशाळा नाहीये!”
"नाही मॅडम, तसं नाही. पण मला, आम्हाला माहितेय ती काय काम करू शकेल ते. तुम्ही तीन म्हैने तिला बिगरपगारी ठेवा आन बघा.”
"खरं तर प्रोफेशनली विचारलंत तर मला अजिबात इच्छा नाहीये तिला ठेवण्याची. आपण काही पाळणाघर चालवत नाहीयोत. का धर्मादाय उद्योग वाटला हा? पण तुम्ही म्हणताच आहात तर... आणि झाली कोणाच्या नव्या संसाराला मदत तर... पण तीन महिनेच हं... आपल्या गणेशला बोलवं जरा... गणेश, माझं मत आहे की पूनमला तुझ्या टीम मध्ये टाकावं. तिची पूर्ण तयारी झाली नाहिये. थोडंसं ट्रेनिंग आवश्यक आहे. ते तुझ्या हाताखाली होईल. पण... तिला फक्त तीन महिन्याची‌ सूट आहे. तीन महिन्यांत जर तयार झाली नाही तर तिला‌ जायला सांगू. मी बोलते तिच्याशी.”
"ओके मॅडम”

तीन महिन्यांनंतर एका शनिवारी, सकाळी अकराच्या सुमारास:

"गणेश, प्रोजेक्ट मागे पडलं आहे. आता दोन आठवडे झाले काहीच प्रगती नाहीये. नशीब आपलं की आण्णासाहेबांचाच प्रॉजेक्ट आहे. पण ते काही बोलत नाहीत याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा गैरफायदा घ्यावा. काय कारण आहे डिलेचं?”
"मॅडम, ती स्प्लिट डिस्पॅच नोट कठीण आहे.”
"हो, कठीण आहे हे मान्य आहे.. पण तुम्हाला त्याचं पूर्ण डिझाईन दिलं आहे. मी ते कसं तुकड्या-तुकड्यात बनवायचं ते सांगितलं आहे. आता त्यात कठीण काय आहे? कोण काम करतंय त्यावर?”
"पूनम करतेय, मॅडम”
"पूनम!? तिला येईल का हे इतकं?”
"मी मदत करतोय नं तिला, मॅडम”
"म्हणजे थोडक्यात तू तुझं काम सोडून तिचं काम करतो आहेस, बरोबर? कारण तुझं इन्व्हॉइसिंगचं कामही झालं नाहिये. काय चाललंय काय?”
"मॅडम..”
"मॅडम काय? त्या पूनमला तीन महिने ऑब्झर्व्ह करायचं आणि मग ठरवायचं असं बोलणं झालं होतं ना? मग काय म्हणणं आहे आता?”
"मॅडम, पूनम करतीये काम. तुम्ही प्रियांकाला विचारा ना.”
"प्रियांकाला कशाला मधे आणतोस? ती काय तुझ्या टीम मध्ये आहे काय? का तीपण आपलं काम सोडून पूनमला मदत करते? काय बाई चाललेलं असतं मी इथे नसताना कळत नाही... जाऊ दे. आता लंच करून या. आपण सगळ्यांची मिळून एक मीटींग घेऊ.”

त्याच दिवशी दुपारची मीटींग:

"चला जरा स्टेटस रिव्ह्यू करू. आज आपण दहा जणं झालो आहोत. आपल्याकडे एक गावातल्याच इंडस्ट्रीयल इस्टेट मधला एक ईआरपी, एक पुण्यातली एचआर रिलेटेड सिस्टिम आणि एक कॅलिफोर्नियातील रिक्रूटमेंट सिस्टीम असे तीन महत्त्वाचे प्रोजेक्ट चालले आहेत. पण गेल्या महिन्याभरात आपली डिलीव्हरी खूप मागे पडली आहे. आज त्याविषयी मला बोलायचं आहे. चार वर्षं प्रयत्न केल्यावर आज हे युनिट इथवर पोहोचलो आहे. तुम्ही सांगा - अशा पद्धतीच्या प्रोजेक्टचं डेव्हलपमेंट या भागात किंवा इतर कुठल्याही अशा ग्रामीण भागात चालले आहेत का?”
"नाही, मॅडम”
"ओके. आणि हीच संधी आहे, तुम्हाला आपल्या गावात राहून आयटी रिव्होल्यूशनचा फायदा घ्यायची. जर आपला हे यशस्वी‌ ठरलं तर बघा एक नवी सुरुवात होते की नाही ते.
आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती कोणती? स्वप्न पहायची, आणि ती सत्यात आणण्याची. आहे ना तुमचं स्वप्न आयटीत काम करून भरपूर पैसे मिळवण्याचं, देशापरदेशात जाऊन मजा करण्याचं, एका सुखी संसाराचं? मग ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी कठोर परिश्रमांची गरज आहे. जर तुम्ही शेतीतले, ग्रामीण भागातले कष्ट टाळण्यासाठी इथे आला असाल, तर लक्षात ठेवा. कष्ट इथंही आहेत. कदाचित शरीरकष्ट नसतील. पण आपली पातळी कमालीची उंचावली तरच, आणि तरच यश आपल्या हाती लागेल. त्यासाठी अपरिमित कष्ट सोसावे लागतील. आपण ग्रामीण भागात हा प्रयत्न चालवला आहे, म्हणून सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका. या प्रयत्नात अपयश येणं शक्य आहे. पण जर यश हाती लागलं तर तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या तरुण आणि तरुणींचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद या माॅडेलमध्ये आहे.
आपण हा उपक्रम हाती घेतला तेव्हा एक व्रतस्थ विचारवंत व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आठवण करून दिली होती की स्वराज्याची मूहूर्तमेढ याच भागात शिवाजीमहाराजांनी केली होती! ती जाज्वल्य परंपरा या भागाला लाभली आहे. महाराजांची थोरवीच वेगळी. आपण सान, आपले प्रश्न छोटे. पण यशासाठी लागणारे आदर्श सदैव सामोरे ठेवावे. असो.
हे मॉडेल यशस्वी करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांची गरज आहे. मी आठवड्यातून एक वा दोन दिवस इथे असते. बाकी दिवस मी फोनवर ॲव्हलेबल असते. त्यावेळी तुमची जबाबदारी आहे की पूर्ण लक्षपूर्वक‌ काम करायचं. गणेश, कोमल, प्रियांका हे सिनीअर मेंबर्स आहेत. ते प्रोजेक्ट लीडही आहेत. तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सगळे मन लावून, टाईमपास न करता काम करताहेत. आज हे जे डिले झाले आहेत ते आपल्याला भरून काढायचे आहेत. त्यादृष्टीने काम करण्याची तयारी आहे का तुमची सगळ्यांची?”
"होऽ मॅडम.”
"ठीक आहे. आता आपण प्रत्येक प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊ...”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults