जे वेड मजला लागले... (भाग एक)

Submitted by Abuva on 22 January, 2024 - 09:38
Garage Startup (DALL-E generated)

एका शनिवारी:

"स्वाती मॅडम, एक विचारायचवतं”
"हं”
"मॅडम, ते पुनमच्या टेस्टचं काय झालं?”
"कोण पूनम? हां, ती तुझी मैत्रिण... पूनमचा परफॉर्मन्स काही फार भारी‌ नाहीये. तिला २० मार्क कसेबसे आहेत टेस्टमध्ये. मला काही इच्छा नाहीये तिला घ्यायची.”
"मॅडम, माझी शाळेपास्नची मैत्रिण हाय ती. हुशार आहे वो. जमतंय तिला. कोमल आणि मी आम्ही दोघीपन तिच्या बरोबरच हौतो कॉलेजला”.
"अगं पण एक वर्ष पुण्यात नोकरी करून आली आहे ना? मग टेस्टमध्ये रिझल्ट दिसायला नको?”
"मॅडम, तिथे पुण्यात काय आपल्या लोकांना कोनी किंमत देतात व्हय? कोणी शिकवलं नाईन्काहीनायी. नुस्ता पैसा गेला. तुम्ही एक चान्स द्या तिला. आम्ही तिला मदत करू.”
"बघा हं. तुम्ही म्हणताय म्हणून मी तिला एक संधी देते.”
"हो मॅडम, हुशारै ती. तुम्ही शिकवाल तर शिकल ती. मी नाही का शिकले प्रोग्रामिंग?”
"तुम्ही दोघींनी खरचं चांगली प्रगती दाखवली आहे. सांग तिला सोमवारपासून यायला. गणेश? गणेश, यावेळी सगळे मिळून पाच जणं सोमवारी ट्रेनिंग सुरू करतील. बाकी चार तुला माहित आहेत. ती पूनम आली होती ना? तर ती पूनम पाचवी.”
"बर मॅडम"
"नेहमीसारखंच दोन आठवडे पीएचपी, दोन आठवडे एसक्यूएल. बाकी एचटीएमएल आणि सीएसएस त्यांनी त्यांचं करायचं. एक महिन्यात तयारी झाली पाहीजे. ठीक आहे? मग कोर्स संपला की टेस्ट घ्यायची. ठीक आहे?”
"हो मॅडम”
"बरं, प्रियांका तू घेते आहेस नं ह्या पूनमची जबाबदारी?”
"हो मॅडम”
"मग तू आणि‌ कोमल, तुम्ही दोघी गणेशला ट्रेनिंग मध्ये मदत यावेळी करा. दिवसातले दोन तास, सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर वापरायचे. त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, लॉजिक क्लिअर करायचं. ओके? पण याचा तुमच्या प्रोजेक्टवर फार परिणाम होऊ द्यायचा नाही. माहिती आहे मला की जरा कठीण जाईल. पण हे करणं आवश्यक आहे. बरोबर का?”
"हो मॅडम”
"बरं गणेश, नवीन मुलींना दोघी दोघींना मिळून एक मशिन दे. आणि पूनमला वेगळं मशिन दे. आहेत ना तीन मशिन ॲव्हलेबल?”
"हो आहेत मॅडम!”

पुढचा सोमवार:

"हॅलो मॅडम?”
"हं हॅलो गणेश बोल!”
"मॅडम, आज क्लास सुरू केलाय.”
"आले होते सगळे?”
"हो मॅडम.”
"ती पूनम आली होती‌ का?”
"हो मॅडम.”
"मशिनं दिली?”
"हो.”
"काय वाटतंय?”
"बऱ्या आहेत मुली.”
"ओके.आता तू आणि प्रियांका अन् कोमल ट्रेनिंगची कामं वाटून घ्या. तुमच्या तिघांचेही प्रोजेक्ट्स सफर व्हायला नकोत. पण मुख्य जबाबदारी‌ तुझी आहे. करेक्ट?”
"हो मॅडम.”

सुमारे दोन आठवड्यानंतर:

"म्याडम, मी पूनम बोलतीए”
"हं बोल.”
"म्याडम, मला एक आठवडा सुट्टी हवी आहे.”
"आं? कशासाठी? ट्रेनिंग चालू आहे ना तुझं?”
"हो म्याडम. माझं लग्न हाए पुढच्या शनिवारी. तुम्हाला पण बोलावनं द्यायचंय”
"अगं पण आत्ताचं जॉईन झालीस ना तू? तेव्हा माहिती नव्हतं का तुला की लग्न आहे? तेंव्हाच का नाही सांगितलंस?”
"ते म्याडम, मुलाच्यांनी घाई केली. या सीजनलाच उरकून टाकू म्हन्ले.”
"काहीही! गावाकडची लग्नं काय अशी होतात का?”
"मी माझ्या वडीलांना तुम्हाला फोन करायला सांगू?”
"नको. आता लग्नाची तारीख आहे म्हटल्यावर मी काय म्हणणार? बरं किती दिवस सुट्टी घेणार?”
"येते म्याडम पुढच्या गुरूवारी, पूजा झाली की.”
"ठीक आहे. आणि हे सांग... सासरकडच्यांना चालणार आहे नं तू नोकरी केलेली?”
"हो म्याडम, त्यांना चालणार आहे.”
"बरं कुठला मुलगा आहे? इथलाच आहे का?”
"हो म्याडम, वडगावचा हाए.”
"म्हणजे फार अंतर नाहीये. ठीक आहे.”
"थॅंक्यू म्याडम. तुम्ही यायचं लग्नाला. मी पाठवते पत्रिका.”
"कधी आहे लग्न?”
"पुढच्या शनिवारी.”
"बरं ठीक आहे. पण आता तुझं ट्रेनिंग बुडणार. त्याचं काय?”
"नाई म्याडम, मी भरून काढंल”
"हं... कठीण आहे. ठीक आहे. घे तू सुट्टी. गणेशला दे बरं फोन...”
"म्याडम एक आणखी गोष्ट हाय.”
"हं बोल.”
"आपल्या इथल्या सगळ्यांना लग्नाला बलावलय आहे. त्या दिवशी सुट्टी मिळल का?”
"बाप रे! ते कठीण आहे. मी बोलते कोमलशी. आत्ता तू गणेशला दे फोन. आणि बरं... कॉन्ग्रॅच्युलेशन!”
"थॅंक्यू म्याडम!”
"हॅलो मॅडम?”
"गणेश, तुला ह्या पूनमने लग्नाचं सांगितलं असेलच ना?”
"हो मॅडम, कालच बोलली ती मला.”
"मी तिला परमिशन दिली आहे. ती म्हणाली आहे की जे बुडेल ते भरून काढीन म्हणून. कसं करणार आहे माहित नाही.”
"मॅडम, आपला पण ट्रेनिंगचा एक आठवडा वाढेल आणखी. असं वाटतंय.”
"का रे?”
"नाही संपतोय पोर्शन. लै वेळ लागतो आहे.”
"पण मुलींना कळतंय का?”
"हो मॅडम, पण थोडा वेळ लागतोय.”
"ठीक आहे. मी या शनिवारी येऊन बघते. बरं कोमलला दे फोन..”
"हॅलो मॅडम!”
"हॅलो, त्या पूनमचं लग्न आहे नं पुढच्या शनिवारी?”
"हो.”
"ती म्हणत होती सगळ्यांना सुट्टी हवी म्हणून?”
"हो मॅडम!”
"हो काय? ट्रेनिंगला उशीर होतोय. प्रॉजेक्ट डिले होताहेत. सुट्टी कुठून देणार? बरं, किती वाजता आहे लग्न?”
"मॅडम चार वाजता आहे. पण अगोदर जेवण आहे.”
"बरं, मग बारा पर्यंत काम करून लग्नाला जा. कुठे आहे लग्न?”
"गावातचै मॅडम!”
"मग ठीक आहे. पण सकाळी काम करायचंय असं सगळ्यांना बजावून सांग.”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults