सोबत ३

Submitted by ती पुन्हा गाईल on 19 January, 2024 - 10:33

मागचा भाग वाचण्यासाठी
https://www.maayboli.com/node/84563

कॉफी खूप गरम नव्हती.
खरं सांगायचं तर थर्मास असो किंवा गाडीत चहा कॉफी गरम करायचं उपकरण असो..
तिला ताज्या चहा कॉफीची चव येत नाही.
उलट एक विशिष्ट वास येतो फ्लास्क कोटिंगचा.
ज्याला गरमागरम पेय प्यायची सवय आहे त्याला कोमट झालेल्या चहा कॉफीची मजा येत नाही.
तरी पण पावसाळी वातावरणात हे सुद्धा अमृतच.

आता सहप्रवासी बाई आहे कि पुरूष याच्याशी घेणं देणं नव्हतं.
तिनेही ही कोमट कम गरम कॉफी घ्यायला हवी होती, बरं झालं असतं असं मनापासून वाटलं.
" नक्की नको का तुला कॉफी ?"
तिने केवळ मानेची सूक्ष्म हालचाल करून नको असल्याचे सांगितले.
"मी चहा ,कॉफी घेत नाही"
" कबूल आहे. पण पावसाळी वातावरण आहे.गरम काही पोटात गेलं कि तरतरी येते"
" मला गरज नाही"

थोडा राग आलाच. हेच उलट असतं तर तिचं मन राखायला का होईना टिक ट्वेन्टी पण घेतलं असतं.

" इकडे कुठे आला होतास ?"
" कोण मी ?"
" मग आणखी कोण आहे का इथे आपल्याशिवाय ?"
काढलाच बोचकारा.
हिचा मायबोली,फेसबुक आयडी शोधून काढून फेक प्रोफाईलने सणसणीत उत्तर द्यायला पाहीजे.
" हा हा हा, अच्छा मी ना ? आधी तुझं सांग. लेडीज फर्स्ट "
" मी आधी विचारलंय"
आता जर मीच आधी विचारलं होतं म्हटलं कि तुला वाद घालायची सवय आहे असं हीच म्हणणार. चोउबा सिच्युएशन झाली असती.
पडतं घ्यावं लागणार होतं. ( पुरूषाचा जन्म म्हणजे ना ! किती तडजोडी, किती अपमान गिळावे लागतात आणि तरी वरून ऐकावं लागतं.. बायकांचा जन्म घेतल्याशिवाय समजणार नाही"
" इथे खाली काही ओळखीचे लोक राहतात. त्यांना सोडून पुढच्या राज्यात जायचंय "
" कुठे ?"
" गिरपूरला "
" गिरपूरला ? काय काम ?"
" खास काही नाही. तिकडेही काही ओळखीचे लोक आहेत "
" प्रेशस स्टोन्स ला पैलू पाडणे, देशाबाहेर स्मगलकरून विकणे असे उद्योग चालतात गिरपूरला "
मी चमकलो.
यार आहे कोण ही ?

" असेल. काही ठाऊक नाही".
" ठीक आहे, नको सांगूस "
तिने पर्समधून एक छोटी आकर्षक डबी काढली.
तिची बोटं लांबसडक आणि नाजूक होती. खूप सुंदर होती.
ही सुद्धा अशीच सुंदर असेल.
बोटांचा हलकासा दाब देऊन नजाकतीने तिने डबी उघडली.

निळ्या वेल्वेटच्या कापडावर काही खडे होते. माणिक !
एक खूप मोठा होता.
" हे चुकीचं आहे "
"काय ?"
"अनोळखी व्यक्तीबरोबर प्रवास करताना अशा मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन करणं "
ती हसली.
" म्हणजे मी नाही ?"
" काय ?"
पुन्हा तेच ते किणकिणाणारे गोड पण काळजाचा ठोका चुकवणारे हास्य.
" तू बुद्धू आहेस कि सोंग करतोहेस ?"
मी समोर बघत म्हणालो
" बरोबर. तुझ्यापुढे यांचे काय मोल ?'
खूष झाली बहुतेक ती.
" किती किंमत असेल यांची ?"
" असं कसं सांगता येईल ?"
" तरी पण अंदाज ?"
" तो मोठा आहे त्याची असेल पंचवीस लाखापर्यंत. ते बाकीचे छोटे खडे सांगता नाहीत येणार "
" याची पंचवीस लाख कशी किंमत ठरवलीस ?"
" नॅचरल बर्मा रूबी आहे. ब्लड रेड ! किमान दहा कॅरटच्या पुढे असेल"
"पंचवीस लाख स्वस्त नाही होत ?"
" किमान पंचवीस गं. यापेक्षा किंचित मोठा ३ कोटी डॉलरला विकला गेलाय. पण तो आफ्रिकन असेल. तुला कुठे मिळाला हा ?"
" मी बर्मन आहे "
" बंगाली ?"
" नो. म्यानमार. बर्मा "
" ओह.मग इतकं छान मराठी ?"
" मी कुठे म्हणाले कि मी तिथून आलेय म्हणून ?"
" अरेच्चा ! आत्ताच तर म्हणालीस ना ?"
" हो.माझे पूर्वज आलेले असू शकतात ना ?"

मी वळून पाहिलं.
केस मागे घेतलेले होते. चांदण्यांचा शीतल प्रकाश काचेतून चेहर्‍यावर आलेला होता.
एक तिरीप गुरूदत्तच्या सिनेमातल्या प्रकाशयोजनेप्रमाणे आलेली होती.
हेलन आणखी सुंदर असती तर जशी दिसली असती तसा तिचा चेहरा होता.
पौर्वात्य महिलांच्या चेहर्‍यावर गोडवा असतो. डोळे बारीक असले तरी काही काही युरोपियन सौंदर्याला मात देतात.
पण ही थोडी वेगळी होती.
" तू ईस्ट एशियन वाटत नाहीस "
"हम्म. माझी पूर्वज एका ब्रिटीश अधिकार्‍यासोबत आली होती भारतात"
" म्हणजे तू अँग्लो - बर्मी आहेस ?"
" नाही. त्या वेळीमी कशी असेन ?'
" मग ?"
" त्यांची जी मुलगी होती तिने एका पंजाब्याशी लग्न केलं "
"ओह ! म्हणजे अँग्लो बर्मन इंडीयन आहेस "
ती तोंडावर हात ठेवून खळखळून हसली.
"ती माझी आई "
" अरेच्चा ! आणि तू ?"
" अरे मी मराठी नाही का बोलत ?"
" म्हणजे...."
" बरोबर.पक्की पुणेकर आहे"

अबब्बबब ! एक तर पुणेकर त्यात बारा गावचं पाणी प्यायलेली. हिला उतरवून पुढे जावं का ?
" ओ मिस्टर ? काय झालं ?"
" काही नाही. तुझी हडप्पापासूनची हिस्ट्री सांग ना "

आता मात्र ती मला न हसता माझ्या विनोदाला हसली.
ते पण विनोद तिच्यावर होता.तिला महत्व देणारा होता म्हणून.
"ये खुशी कि हसी है, चिनॉयशेट , जब गम के आसू रूलाएगी ना तब बोलना " अर्थात हे मनात म्हणून घेतलं.

"इकडे का आली होतीस ?"
" ते मी का सांगू ? तू अजून नाहीस सांगितलेलं "

बायका विसरत नाहीत. तारखा लक्षात ठेवणे हे एक त्यांच्या मेंदूच्या बायसचे वैशिष्ट्य असते. आणि पुरूषांकडून पण त्या तीच अपेक्षा ठेवतात.

" मला काही इच्छा नाही "
" कशाची ?"
"हेच कि,तू इथं का आलेला ते जाणून घेण्याची "
" अरेच्चा ! त्यात काय एव्हढं . मी सांगितलं ना खालची काही लोकं ओळखीची आहेत "
" नेहमी येतोस ?"
" नाही गं "
" मग ते लोक ओळखीचे कसे ?"
" तू ओळखतेस त्यांना ?"
" मी कशाला कुणाला लक्षात ठेवू ?"
" मग कसं विचारलंस ?"
" अरे ! खालचं गाव म्हणालास तर अंदाज नाही का येत ?"
" हम्म.बरोबर "
" ते डोंगरातनं चमकते दगड काढून देतात ना ?"
" अं .... ?"
" काही नाही "

काही वेळ शांततेत गेला.
शांततेने डोक्याला चालना दिली.

हा चेहरा बघितल्यासारख वाटतोय.
मला चेहरे लक्षात राहत नाहीत. एक दोनदा पाहिलेला चेहरा तर नाहीच नाही.
अचानक समोर आला तर ओळखीनच याची काही ग्यारण्टी नाही.

क्राईम पॅट्रोल मधले लोक स्केच बनवतात तेव्हां नेहमी वाटतं , आपण यांच्या जागी असतो तर कसं बनवलं असतं स्केच ?
एकदा तक्रार द्यायला गेलेलो तेव्हां असंच झालेलं.

" गिरपूरला पोलीस कमिशनरेटमधे चाललाहेस का ?"

अचानक शांततेचा भंग करत तिने बाँबच टाकला.

अंधारात तिचे चमकते निळे डोळे माझा वेध घेत होते हे न बघता ही जाणवत होतं.
जणू काही लेसर रेजने शरीराला जखमा होत होत्या.

" असं का विचारलंस ?"
"काही नाही असंच"
" तरी पण "

" काल पॅट्रोलिंग टीम आली होती. कसली तरी चौकशी करत होते "

मी काहीच बोललो नाही.

अरे यार , कोण आहे ही ?

" ए, घाबरलास ?"
" काहीही काय ? मी कशाला घाबरू ?"
"ते ही खरंच म्हणा.कर नाही त्याला डर कशाला ?"

च्यायला, पुणेरी ब्रिटीश ! नुसता ब्रिटीश कमी असतो का ? त्यातून बर्मन.
पंंजाबी पण. सगळे गुण आलेत.

" खरंच नाही आलेला इथे कधी ?"
" मी असं कधी म्हणालो ?"
" म्हणजे आलेलास"
" हो"
" कधी ?"
" तुला कुठे उतरायचंय ?"
" अरे ! लगेच उतरवायला बघतोहेस ?"
" अगं, तसं नाही. त्याप्रमाणे गाडी हाकायला "
" हाकायला ?"
" मी पण पुणेरीच आहे गं बाळे" अर्थात हे ही मनातच.
" चालवायला "
ती मजा घेत होती.

"हा डब्बा चालतो कि उगीच शो ला बसवलाय ?"
एव्हढ्या हाय फाय डेकला डब्बा बोलते ही ?
"चालतो कि"
" मग गाणी लावायची ना ?"
" इथे कुठलेही स्टेशन पकडत नाही. रेंज नाही "
" पेन ड्राईव्ह असेल ना ?"
"आहे पण, माझ्या आवडीची गाणी आहेत"
" बरं राहू देत. ब्ल्यूटूथ आहे ना ?"
" हो "
" पेअर करू ? होईल ?"
" आरामात. "
" नाही म्हणजे तुझा मोबाईल ऑलरेडी पेअर्ड असेल "
" हरकत नाही. अजून पाच सहा मोबाईल होतील "
" हाय फाय सेट दिसतोय "

तिचं मोबाईल पेअर करून झालं.
स्कॅनिंग झालं. ब्ल्युटूथ म्युझिक वर मेन्यू गेला.

" नक्की लावू ना ?"
परत तेच. खुंटा बळकट प्रत्येक वेळी करायला कंटाळा येत नाही का यांना ?
पण लगेच हसून म्हणालो
" अरे विचारायचं काय त्यात ? बघू तरी तुझी आवड"
" बघ हं "
" मी लावली असती तर तू नसतीस का ऐकली ?"
" नाही"
आणि ती जोरात हसली. खूप जोरात. आणि हसतच राहिली.
बहुतेक माझा चेहरा पडला असणार.
"सॉरी सॉरी, मला दुसर्‍यांची आवड नाही आवडत. म्हणून तर मोबाईल काढला. सॉरी हं "
" नाही आला राग "
" मी कुठे काय म्हणाले ?"
" विचारणार होतीस ना ?"
" मी कशाला विचारू ? आला तर आला "
ती आता कंट्रोल करून हसत होती बहुतेक,

इतक्यात लताचा आवाज कानी पडला.
आलाप होता.
आरोह
सा रे ग म प ध नि सा
प आणि ध च्या मधे लताबाईंनी कमालची मुरकी घेतली.
गाणं ओळखीच नाही पण तसं वाटतंय.
सा वर व्हिब्राटो... वीणा किणकिणल्यासारखा आवाज.
पुन्हा अवरोह

कैसे जाऊं जमना के तीर..

ऐकल्यासारखे वाटतेय.
सेमी क्लासिकल ठीक आहे.

शास्त्रीय नको वाटलं असतं.

सोशल मिडीयावर फक्त "कुठले गाणे ऐकताय " असा धागा काढायची खोटी..
शास्त्रीय गाण्यांची लाईनच लागेल,

जब तक रहेगा समोसे मे आलू रिपीट मोड वर ठेवणारा पण बाबू़जींचं अमकं तमक ऐकतोय म्हणणार.
गुगल हाताशी असलं आणि थोडं युट्यूबमधे डुबकी मारली कि काय वाटेल ते ठोकून देता येतं.

ही पण तशीच का ? नसावी.

" मला आवडतात जुनी गाणी "
ऐकू येतं का हिला मनातलं ?

सांग कुठला राग आहे ?
"मला नाही कळत त्यातलं "
" अरे पण अंदाज "
" ठुमरी आहे ना ?"
" ठुमरी जाय राग आहे का ? वेड पांघरू नकोस"
" अरे नाही ओळखता येत मला "
" मघाशी आरोहाच्या वेळी लिपसिंग करताना चक्क नोटेशन्स होते ओठावर तुझ्या "
अंधारात एव्हढं दिसलं ?"
" ते होय ? कधी कधी अगदी सोपं असतं. मी शिकलेलो नाही. हार्मोनियम वाजवतो म्हणून असं वाटलं"
" अरे मग सांग कि राग "
" मला शिवरंजनी सोडून एक पण ओळखता येत नाही "
ती फिस्सकन हसली.
मलाही हसायला आलं.

"रे ग ध नि कोमल आहेत "
" आणि तू ?"
जरा फ्लर्ट करायची हुक्की आलेली,
ती गोरीमोरी झाली असेल. होईनाका.
" ट्राय तर कर "

" मालकंस ?"
"अंहं "
" यमन कल्याण ?"
" काहीही "
" अगं नाही सांगता येत असं "
" हुं "
" तूच सांग "
" काय ?"
" अगं राग कुठलाय ते "

तिने जरा वेळ विचार केला.

"भैरवी "
अचानक मी करकच्चून ब्रेक मारला.
नशीब मागून वाहन नव्हतं...

" काय ?"
" अरे दचकतोस कशाला ?"
" अं ?"
" अरे रागाचं नाव नाही का ?"
" ओह ! खरंच कि"

मी कसानुसा हसलो.
तिच्या चेहर्‍यावर गूढ गहीरं हास्य होतं...

हा चेहरा .....

कुठे पाहिलाय ?

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे जण काहीतरी कलाटणी मिळेल, महान लोचा होइल या आशेने बसू नका. जर्नी एन्जॉय करा Wink डेस्टिनेशन काही का असेना. बरोबर? Happy

तिचे निळे दात इकडे जोडले गेले म्हणजे नक्कीच मानवप्राणेतर जीव अजीव असण्याची शक्यता निकालात निघाली हे एक बरे झाले. आता खऱ्या अर्थाने रोमांटिक सस्पेंस थ्रिलरच्या प्रतिक्षेत !!

मस्त भाग.. अगदीच अनपेक्षित..!
आम्ही आपले अंदाज लावत बसलोयं आणि कथेने वेगळेच वळण घेतलेयं...
दोघांनी एकत्र सोबतीने केलेला प्रवास पुढे वाचायला आवडेल.

लेखक महोदय,
जमल्यास कथा लवकर पूर्ण करा..!
पुभाप्र..!