पारस....

Submitted by sarika choudhari on 10 January, 2024 - 06:55

पारस....
आज मी खुप आनंदात आहे. जीवनातील खरं मर्म मला आज कळल होत. मी आणि मंदार टि.व्ही वरील “ झेप ” हा आमच्या मुलांचा कार्यक्रम आटपून सर्व मुलांसह घरी जात होतो.
हो घरीच. आमचं घरच ते आणि मुलं म्हणाल तर जवळपास पन्नास ....हो सगळी आमचीचं मुलं. जन्म दिला नसला तरी जीवन मात्र दिल होत. जन्मदात्यापेक्षाही जास्त मोठा पालन कर्ता असतो असं म्हणतात. या मुलांकडे पाहील्यावर खरंच वाटतं. जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला तो माझा मुलगा पारसनी. मला आजही आठवतात ते दिवस. मंदार आणि मी कॉलेजमध्ये शिकत होतो. तिथेच आमची ओळख झाली व प्रेमही. आम्ही ठरवलं होत जोपर्यंत दोघांपैकी एक जण स्वत: च्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत लग्न करायच नाही. आणि तो दिवसही जवळ आला दोघांनाही चांगली नौकरी मिळाली. घरच्याचा विरोध नसल्यामुळे आमच्या लग्नाला संमती मिळाली. सुखी संसाराचे ते गुलाबी दिवस अजूनही आठवणीतून जात नाही. मंदार च्या सहवासात दिवस खुप छान जात होते. आमच्या संसार वेलीवर आता फुल फुलणार होत. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितल्यामुळे मी नौकरी सोडयच ठरवल. प्रत्येक महिन्यागणिक आमच्या प्रेमाचा अंकुर एक वेगळी अनुभुती देत होता. आई होणं हे जगातील सगळयात मोठ सुख हे त्यावेळी कळलं. घरातील वातावरण खुप आनंदी होतं.
मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. सगळे आनंदात होते. बाळाचा जन्म झाल्यावर सगळे मिठाई वाटत होते. बाळाच्या बाळ लिला पाहताना सर्व घर आनंदाने न्हाऊन निघायच. आमच्या जीवनात बाळाच्या आगमनाने सुखमय (सुवर्णमय ) झाल होत म्हणूनच आम्ही त्याच नाव पारस ठेवल. दिवस पुढे जात होते पण पारस चा विकास त्याच्या बरोबरीच्या मुलांच्या मानाने मंद वाटत होता. मी मंदारच्या सारखे मागे लागायचे पण त्याला वाटायच मी उगाचच काळजी करते. तरीही मी मागे लागून पारस ला डॉक्टराकडे नेले. आणि ज्याची भिती होती तेच झाल. पारस इतर मुलाप्रमाणे नॉर्मल नाही हे कळल्यावर पाया खालची जमीनच सरकली. सर्व चांगल सुरू असताना हे काय झाल. आणि आपल्याच नशिबी का म्हणून रडारड झाली. पण पारस या सर्व गोष्टी कडून अनभिन्न होता. त्याची निरागसता सर्व दु:ख विसरायला लावायची. जसजसा तो मोठा व्हायला लागला तसतशी त्याला माझी जास्त गरज भासू लागली. पण एक गोष्ट लक्षात आली तो जरी बुध्दीने मंद होता, पण मनाने त्याची झेप मोठी होती. त्याची चित्रकलेची आवड लक्षात घेता. त्याला मी जास्तीत जास्त चित्र काढायला प्रोत्साहीत करायची. त्याची चित्रं खुप बोलकी होती. अवती भेवती घडणाऱ्या घटनाचे चित्र आणि त्यात तो स्व:ला पाहायचा. लहान वयात इतकी छान चित्र काढतो म्हणून सर्व कौतुक करायचे. एकदा मंदारचे मित्र आणि त्याची बायको घरी आले. पारसचे चित्र पाहुन खुपच कौतुक करायला लागले. आणि जाताना बक्षीस म्हणून १०० रु. पारसला दिले. पारसनी घरकाम करणाऱ्या आमच्या काकूला जवळ बोलावला व आपल्या तोडक्या शब्दात म्हणाला हे पैसे घे. तुझ्या मुलाचा शाळेत नंबर आला ना. माझ्याकडून त्याला बक्षीस दे. मंदारचा मित्र व आम्ही पाहतच राहीलो. एवढया लहान वयात ही प्रगल्भता. मित्रानी जाताना सुचवले की पारसच्या चित्राचे प्रदर्शन भरव. पहीले आम्ही सगळे हसण्यावर नेले पण मग विचार केला काय हरकत आहे प्रयत्न करायला. आणि पहीला प्रयत्न म्हणून सोसायटी हॉल मध्ये चित्राचे प्रदर्शन भरवले. सगळयानी खुप कौतुक केले. काही जणांनी चित्र विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. पारसच्या संमतीने आम्ही काही चित्र विकली. आणि पैसे त्याच्या खाऊच्या डब्यात टाकले.
पारस खुश होता त्याला जगण्याची एक नवी दिशा मिळाली होती. चित्रामुळे त्याचा स्वत:चा विकास तर होत होताच पण आम्हालाही आनंद मिळत होता. तो आता छोटा का होईना पण चित्रकार म्हणून लाकप्रिय झाला होता. त्याचे सत्कार व्हायला लागले. बक्षीस मिळायला लागली होती. एक दिवस असेच सत्काराला जात असताना गाडी सिग्नल असल्यामुळे थांबली. तेवढ्यात रस्त्याच्या कडे ला एक मुलगा असाह्य अवस्थेत पडलेला दिसला. मंदार व मी त्याला पाहण्यासाठी खाली उतरलो. पण उगाच पोलीस केस नको म्हणून आम्ही तेथुन जायचे ठरवले. आम्ही गाडी कडे परत जायला निघालो पण पारस गाडीत नव्हता. तो त्या मुलाजवळ जाऊन बसला. काही केल्या तो त्या मुलाला सोडायला तयार नव्हता. शेवटी मंदारने पोलीसांना बोलावून त्या मुलाला हॉस्पीटलला भरती केले. व पारसला समजावले की त्याला उपचाराची गरज आहे. पोलीसांनी आई वडीलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण काही तपास लागला नाही. तो मुलगा ही मतीमंद होता.कदाचित त्यामुळे आई वडीलांनी त्याला असं वाऱ्यावर सोडल असावं. आम्ही अधुनमधुन त्याला भेटायला जात असू. आज त्याला हॉस्पीटलमधून सुट्टी मिळणार होती म्हणून आम्ही भेटायला जायचं ठरवल. पारस तेवढयात खाऊचा डबा घेऊन आला आणि मागेच लागला त्या मुलाला घरी आणू या. त्याला पैसे लागतील तर माझे पैसे घ्या. काय कराव ते सुचेना. आम्ही त्याला समजावयचे म्हणून हो म्हणालो व त्या मुलाला भेटायला निघालो. त्या मुला जवळ जाताच तो मला एकदम बिलगला जणू मी त्याची आईच. मलाही कसं तरी वाटायला लागल. मंदार म्हणाला याचे आई - वडील सापडेपर्यंत आपल्या घरी ठेऊ या. पोलीसाच्या सर्व फॉरमॅलीटी पूर्ण करून आम्ही त्या मुलाला घेऊन घरी आलो. पारसची आणि त्याची मस्त गट्टी जमली होती. आता पारसच्या चित्रात हा मुलगाही यायला लागला. आम्ही त्याचे नाव शरद ठेवले. पण पारसची एक गोष्ट लक्षात आली तो स्वत: हून मदत करायला तयार असायचा. मतीमंद असूनही त्याची ही मदत करण्याची वृत्ती आमच्या सारख्याना लाजवणारी होती. सगळ काही ठीक चालू होत.
पारस व शरद दोघेही परस्परांच्या सहवासात आनंदी होते. पण काळाला ते फार काळ पाहवल नाही. पारस आजारी राहायला लागला. औषधउपचार सुरू होते. पण पारसची जिद्द काही कमी नव्हती आजारी असतानाही त्याची चित्र काढण्याची आवड कायम होती. दिवसेदिवस त्याची तब्येत खालावत होती. डॉक्टरांनी आशा सोडली. आणि पारस आम्हाला सोडून गेला. दु:खातून बाहेर यायला बराच वेळ लागला. शरदला पाहून आपल दु:ख विसरण्याचा प्रयत्न सुरू होता. असचं एकदा पारसची खेाली आवरत असताना एक चित्र सापडले. ते त्याचे शेवटचे चित्र होते. चित्र पाहून मी लगेच मंदारला आवाज दिला. चित्रात त्यांनी त्याच्यासारखीच मुल काढली होती व बाजूला आम्ही दोघ उभी होतो. मंदार म्हणाला याचा अर्थ काय असावा. पारसला मदत करायला आवडत होतं. मग यातून त्यानी अश्या मुलांना मदत करायला तर सांगीतले नसेल ना. जगण्याचा नवा अर्थ पारस देऊन गेला. आम्ही त्याच स्वप्न साकार करायच ठरवल.
“ नव जीवन ” नावाची आश्रम शाळा उघडली. जी मतीमंद मुलांना आधार देत असे आणि पारस गेल्या नंतर जिवनात तरी काय उरल होतं. निदान आपल उरलेल आयुष्य तरी दुसऱ्याच्या उपयोगी पडाव. आणि आज एक दोन नाही तर तब्बल ५० मुलं आश्रमात होती. आज त्याच मुलांच्या कलागुणाचे सादरीकरण व सत्कार समारंभ मुंबईत झाला. हाच कार्यक्रम आटपून आम्ही घरी परत निघालो होतो. पारस गेला पण आम्हाला जगण्याच नव ध्येय देऊन गेला. पारसनी आमच्या जीवनाला स्पर्श करून आमच्या जीवनाच सोनं केल होत.

Group content visibility: 
Use group defaults

फार सुंदर कथा. तुम्ही खूप आदर्शवादी, आशावादी , सकारात्मक लिहीता. वाचून खूप बरे वाटते. Happy लिहीत रहा. तुमचे नाव वाचले की अपेक्षा वाढतात माझ्या तरी.

निःशब्द करायला लावते ही कथा.. समोर अपघात घडलेला दिसुनही ऑफिस वेळेवर पोचता यावे म्हणून दुर्लक्ष करत पुढे जाणाऱ्यांच्या गर्दीत एवढी प्रगल्भ सामाजिक जाण असलेल्या पारसला मतिमंद तरी कसे म्हणावे !!

धनवन्ती, Ajnabi, सामो, अज्ञानी तुम्हा सर्वाचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रीया वाचून आनंद झाला. आपण केलेल्या लिखाणाचा प्रयत्न आवडला की भारी वाटतं. मला हा आनंद दिल्याबद्दल तुम्हा सर्वाचे आभार. परमेश्वर आपणास भरभरुन आनंद देवो.