स्मरणरंजन

Submitted by सामो on 9 January, 2024 - 09:54

हा धागा आपल्या मनात येणारे, स्मरणरंजन मांडण्यासाठी आहे. बरेचदा जसजसे वय वाढत जाईल तसतसा, स्मरणरंजन हा माणसाचा स्थायीभाव होत जातो. काही आठवणी पुन्हा पुन्हा किंवा आवेगाने येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
या धाग्यावरती प्लीज आपापल्या स्मरणरंजनाबद्दल लिहावे. सर्व सदस्यांचे रोचक स्मरणरंजन ऐकायला मिळावे, भाग घेता यावा. आणि वय वाढत जाते तशी स्मरणरंजन शेअर करण्याची इच्छा आणि एकाकीपणा वाढत जातो की काय नकळे. पण मला तरी तसे जाणवते. असो.
____
आत्ता पहाटेचं तांबडं कुठे फुटतय. मगाशी गॅलरीत जाऊन ऊभी राहीले. अतिशय प्रसन्न आणि धूर आदिपासून दूर अशी अनाघ्रात हवा आहे. मला आठवते, मुंबईच्या सिद्धीविनायकला आम्ही (आम्ही दोघे व एक जोडपे) कारने जायचो. देवदर्शनाइतकाच रंजक प्रवास असायचा.काय मस्त हवा असायची. मुंबापुरीला हलके जाग येत असायची, दूधवाले, पेपरवाले, व्यायामोत्सुक यांची लगबग असायची. घाटकोपर ते दादर असा निवांत कार-प्रवास करुन , फुलांचा हार वगैरे घेऊन रांगेत ऊभे रहायचे. पेढे, फुले व सकाळच्या प्रसन्न हवेचा सुगंध. नंतर देवदर्शन झाल्यानंतर उडपी रेस्टॉरंट (शेट्टी) मध्ये इडली-वडा सांबार चापायचा. कदाचित लग्नाला फार वर्षे न झाल्याने असेल, एकमेकांबरोबर, व आमच्या त्या गुजराथी मित्र जोडप्याबरोबर आयुष्यातील क्षण व्यतित करणे प्रचंडच आवडायचे.
आज ती आठवण आली तरी सिद्धीविनायकाची लाल मूर्ती डोळ्यासमोर तरळते, फुलांचा-पेढ्यांचा-अष्टगंधाचा सुगंध येतो आणि गणपती अथर्वशीर्ष कानात गुंजु लागते.
जादूचे, तारुण्याच्या नव्हाळीचे दिवस होते खरं तर कदाचित शास्त्रीयदृष्ट्या ब्रेन सेल्स भराभर तयार होण्याचा काळ असेल पण ते वातावरण मंत्रमुग्ध करे. खूप रसरशीत वाटे तेव्हा Happy

म्हणजे नोकरी करायची तीच याकरता की असे मित्र-मैत्रिणींसमवेत उनाडता यावे मग ते सिद्धीविनायक असो की माथेरान, की लोणावळा, पावसातील माळशेज असो की पावसात केलेली अष्ट-विनायक यात्रा असो. हे सर्व एका फोनवरती. नवर्‍याने शनिवारी सकाळी सकाळी,त्याच्या मित्राचा फोन घेतला की तिकडून काहीतरी बोलणे व्हायचे (अमक्या ठिकाणी जायचे का?) आणि मग नवरा बोलायचा "तू बोल! मै तो रेडी है" हाहाहा ही बंबैय्या हिंदी भाष की मी लग्गेच समजायचे यूहू आज कुठेतरी भटकायचा प्लॅन Happy आणि मग भराभर आंघोळ उरकुन, अगदी पहाटेला बाहेर पडायचे. जर मुंबई बाहेर जात असू तर वाटेत ओह माय गॉड भले मोठ्ठे दूधाचे ट्रक्स लागायचे. वाटेतच अगदी मुद्दाम झाडाखाली गाडी टाकलेल्या चहावाल्याकडून चहा घेऊन प्ययचा. महाबळेश्वरलाही मोठ्या हॉटेलात? ... अरे हट्ट!, झाडाखाली उभ्या गाडीवर ऑमलेट-ब्रेड हाणायचे. अगदी चापायचे. म्ग टीप मात्र त्या गरीब माणसाला/स्त्रीला अगदी नीट द्यायची. तो हॉटेल्सचा माज नको. या गुजराथी जोडप्याने आमच भूतकाळ इतका सुखी केलेला आहे. खरं तर निव्वळ सहवासातून, प्रेमातून आम्हाला समृद्ध केलेले आहे. कुरबुरी अगदी नव्हत्या असे नाही.पण अगदीच नगण्य त्या मानाने प्रेम अलोट आणि एकदम प्युअर, निखळ.
.
कोकणात जाताना एकदा, एका झाडावर जांभळं पाहीली का तुती काहीतरी. आणि ती व्यक्ती (कर्ता पुरुष) आवारातच होता नेमका. या मित्राला अन नवर्‍याला काय हुक्की आली काय की त्याला विचारले "ए, देणार का जांभळ काढून?" तो म्हणाला "हो देऊ की." मग भाव वगैरे विचारला पण तो काही पटला नाही. मग हे दोघे नको म्हणून निघाले. पैकी मित्र उवाच - "जाने दे, जाने दे! शाणा कौआ है! शहरी लोग समझके लूटनेको बैठा है" वगैरे मुक्ताफळं उधळीत गाडीकडे गेले. मला इतकं कसंतरीच वाटलं - अरे गधड्यांनो त्याच्या अंगणातलं झाड. तुम्ही अनाहूत येऊन तो रानमेवा मागताय. वर त्याने जास्त भाव लावला तर या शिव्या. शरम करा. पण मी बोलले काहीच नाही.
.
एकदा कोकणात एक इतकी सुंदर पडकी विष्णुमूर्ती पाहीलेली. आई ग्ग! काहीतरी खणताना मिळालेली होती. मी तशी मूर्तीच पाहीली नाही. पण अगदी पडके देऊळ.
.
माळशेजला धबधब्यात भिजुन नंतर आम्ही बायका कारमध्येच कपडे बदलत असू. मैत्रिणीची मुलगी साडी वगैरे धरुन आडोसा करत असे. हे मी काहीतरी उगाचच बरळते आहे असे समजु नका. सांगायचा मुद्दा हा की यात गंमत एक गंमत होती. मैत्रिणीची मुलगी लहान असतेवेळी नदीचे तपकीरी पाणी लागले की म्हणे "ए चाय देखो चाय :)" मग सगळे हसायचो. तेव्हा आम्ही दोघे सडेफटींग होतो, त्यांना मात्र मुलगी होती.
.
पावसाळ्यातील वीकेंडस खरच रमणीय होते. फार आनंददायक होते. पुण्याचा रिपरिप पण संततधार पाऊस, मुंबईचा धुआंधार, कोकणातील हिरव्या रानोमाळ पडणारा स्फटीकासारखा पाऊस, माळशेजच्या वळणावळणावरुन आणि पावसाळी हवेतील धुक्यातून जाणार्‍या गाडीचा थरार काय नाही अनुभवले. असे समजु नका की स्मरणरंजन हे नेहमी आनंददायीच असते कारण दु:खद, त्रासदायक घटना विसरलेल्या असतात. खरच ते दिवस खूप, अतोनात आनंददायीच होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आठवणी !
*********************************************
सध्या नव्याने काही एकदम आठवत नाही. परंतु चार वर्षांपूर्वी इथे लिहिलेल्या लेखातीलच काही भाग इथे पुन्हा इथे डकवतोय. क्षमस्व !
फारशी हालचाल न झालेला तो धागा होता. त्यामुळे चालून जावे Happy

कोविड१९ ऐन भरात असण्याचा काळ ..

.. सध्या आपण एक विचित्र प्रकारची सामाजिक शांतता अनुभवत आहोत. शहरी जीवनात तर ही अभूतपूर्व अशीच आहे. एरवी सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत आसमंतात असंख्य आवाज चालू असतात. ते मुख्यत्वे वाहनांचे असतात. छोट्या दुचाकीपासून ते ट्रकपर्यंत असंख्य वाहने रस्त्यावरून दौडत असतात. त्यांच्या इंजिनांचा आवाज स्वाभाविक आहे. पण गरज नसताना वाजवले जाणारे कर्कश हॉर्न, सिग्नलला थांबले असताना उगाचच बुंग बुंग करत accelerator ताणणारे वाहनचालक अशा अनेक कृतींतून बरेच ध्वनीप्रदूषण होत असते. रेल्वे आणि विमानांचे आवाजही सभोवतालचा परिसर दणाणून टाकतात. आपल्याकडे कुठे ना कुठे ध्वनिवर्धक लावून खाजगी, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रम नियमित चालूच असतात. .. ..
सध्या आपली कर्कश आवाज आणि प्रदूषण या दोन्ही समस्यांपासून काही काळ तरी सुटका झाली आहे खरी...

.. अजून एक जुनी आठवण लिहितो. अंदाजे २० वर्षांपूर्वीची. प्रा. शिवाजीराव भोसलेंचा एक लेख वाचला होता. त्या दरम्यान औद्योगीकरणाने प्रचंड वेग घेतला होता. ‘नऊ ते पाच’ ही संकल्पना मोडीत निघत होती. काम, काम आणि काम हाच आयुष्याचा मूलमंत्र होत होता. या परिस्थितीवर त्यांनी लिहिलेले काही विचार माझ्या शब्दात लिहितो:

सध्या बघावे तिकडे आणि केव्हाही एकच दृश्य दिसतंय. प्रत्येक जण एकतर कुठून तरी निघालेला आहे, नाहीतर प्रत्येकाला कुठेतरी पोचायची तरी घाई आहे. कोणीही थांबलेला असा नाहीच. सकाळी ७ची वेळ असो अथवा रात्री १०ची, शांतपणे एखाद्याशी आपण फोनवर तरी बोलू शकतोय का? माणसे पळताहेत, वाहने धावताहेत .... वेग, वेग आणि वेग... बस्स हेच आयुष्य झालंय खरं”.

सध्याच्या बंदिवासात आपल्या अशा भरधाव वेगाला एक करकचून ब्रेक लागलाय खरा – एका नैसर्गिक आपत्तीमुळे. इथून पुढे तो वेग नियंत्रित करावा की नाही, यावर आपण शांतपणे विचार करू शकू. स्पर्धा आणि मनःशांती यांचा समतोल साधता आला तर आपण मनापासून आनंदी असू. मग जगातील ‘आनंदी लोकांचा देश’ या सारखी सर्वेक्षणे करायची गरजही संपू शकेल...

आताच्या शांततेत अजून एका महत्वाच्या मुद्द्यावर चिंतन केले. तो म्हणजे आपली जीवनशैली. ..

खूप छान लिहीलेले आहे डॉक्टर.
>>>>>>यावर आपण शांतपणे विचार करू शकू. स्पर्धा आणि मनःशांती यांचा समतोल साधता आला तर आपण मनापासून आनंदी असू.
वाह!!!

माझा एक मित्र नेहमी म्हणतो, जुन्या आठवणींमध्ये रमताना नवीन आठवणी निर्माण करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

>>>>जुन्या आठवणींमध्ये रमताना नवीन आठवणी निर्माण करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
फार मोलाचे वाक्य पशुपत. इथे दिल्याबद्दल, आणि आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.