वेटिंग रूम.

Submitted by केशवकूल on 8 January, 2024 - 08:07

आज हॉस्पिटलचा दिवस. थोडी तयारी केली. एक जुनी फाईल शोधून जवळ घेतली. त्यात कुणा डॉक्टरच्या गिचमिडी हाताने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन होते.
कसलीतरी टेस्ट करायची होती. का? डॉक्टरला काहीतरी संशय आला होता म्हणून.
हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर मला कुणा स्वागतिकेला विचारायची गरज नव्हती मला सगळे प्रोसिजर माहित होते. लिफ्ट पकडून मी ज्या मजल्यावर जायचे होते तेथे गेलो. काऊंटरवर जाऊन पैसे भरले. फी दणदणीत होती. रोग होताच तसा लई भारी. काऊंटरवालीने सांगितले, “ह्या रूममध्ये जाऊन थांबा.”
एकूण चार तास वाट पहावी लागेल म्हणाली.
पाण्याची बाटली आणली आहे?”
“हो ही काय.”
"युरीनचा रिपोर्ट आणि डॉक्टरचा कागद त्याची एक झीरोक्स आणलीय? कोण डॉक्टर? उपाशी पोटी आहात ना?"
"हो. ह्या घ्या रिपोर्टच्या कॉप्या."
“छान. वाट पहा. नर्स बाई येईल आणि सांगेल. तवर थांबायच."
तिथे ज्या रूम मध्ये मी वाट पहात बसलो होतो तेथे एसी जाम रोरावत होता. मी स्वेटरवगैरे काही बरोबर घेतले नव्हते. मग काय मला वाजायला लागली थंडी. कुड कुड कुड...
नर्सबाई सगळ्यांना शिरेत औषध देण्यासाठी सुई लावत होती. माझी वेळ आली तर तिला बिचारीला माझी शीरच मिळेना. वैतागली. म्हणाली, "असे कसे हो तुम्ही? हात नीट ढीला सोडा, थरथरू नका. घाबरलेत कि काय? काय वय आहे?"

मी वय सांगितले.
"बरोबर कुणी आहे?"
"नाही."
"कुणीतरी पाहिजे ना?"
"बरोबरचे लोक पुढे गेले आहेत."
"मग काय एकटेच? खायला कोण घालतं?"
मी बोट वर करून दाखवलं. माझ्या शेजारी एक सुंदरी बसली होती. खुदु खुदु हसत होती. त्यामुळे मला उत्साह आला.
"नर्सबाई, मला एक सांगा. हे तुमचे मशीन अजून किती वर्ष आयुष्य उरलं आहे ते सांगते काय हो? नाही म्हणजे मला सेन्चुरी मारायची आहे."
सगळे हसायला लागले. बाबा जोक करणारा आहे. त्या नंतर नर्सने सगळ्यांच्या पाण्याच्या बाटलीत औषध टाकून दिले.
“हळू हळू एक तासात पिऊन टाकायचे.”
सगळ्याना शिरेतून काहीतरी औधध टोचले.
वातावरणातील तंगी सैल झाली. माझे काम झालं. मग सगळे बोलायला लागले. उत्साहाने एकदुसर्याची विचारपूस करायला लागले.
प्रत्येकाची अलग अलग स्टोरी. थरारक अनुभव. पण प्रत्येकाला विकेटवर जेव्हाढावेळ टिकता येईल तेव्हढा वेळ टिकून खेळायचं होतं.
“तुम्ही कसे इकडे?” मी शेजारी बसलेल्या भिडूला विचारले.
“काय विचारू नकोस बाबा, सोळा पासून इकडे येतो आहे. ही टेस्ट पाचव्यांदा करतो आहे...” त्याला सगळे रोग होते. कुठला नाही असे नाही.
“माझे पाच डॉक्टर आहेत. ह्यासाठी हा, हार्टसाठी हा. स्टेंट बशिवला आहे. शुगर साठी वेगळा. हिप मधून गोळा काढला. ती सर्जरी ह्याने केली. मग लंघ्जमध्ये काहीतरी दिसलं. ती सर्जरी आपल्या ह्या त्याने केली. काय ग त्याचे नाव?” त्याने मुलीला विचारले.
मुलीने नाव सांगितले.
“हा तोच तो. एकदम भारी. छोकरा आहे. पण हुशार! बर का.”
मी सगळी माहिती टिपकागदासारखी टिपून घेत होतो.
“काळजी करू नकाहो. होईल सारं व्यवस्थित.”
“तर काय. हिप मधला गोळा काढला तर डॉक्टर काय म्हणाला माहित आहे?”
“काय म्हणाला?”
“हाडा पासून एक सूतच दूर होता. नाहीतर कमरेपासून सगळा पाय काढावा लागला असता.”
“अरे बापरे!”
“देवानेच वाचवले. त्यानेच गोळा दिला, त्यानेच काढायची बुद्धी दिली. देव अशी लपाछप्पी खेळतो. तवा मी देवाला विसरलो होतो. त्याने इंगा दावला. म्हणाला बच्चमजी... आता नेमाने पारायणे करतो.”
“पण पाच पाच डॉक्टर म्हणजे...”
“हो हो. एक म्हणतो रोज किमान पाच किलो मीटर तरी चालायला पाहिजे तर दुसरा म्हणतो. हार्टवर ताण द्यायचा नाही, जिन्याने जायचे नाही. लिफ्ट वापरायची, मग मी काय करतो, रोज पाच किलो मीटर चालतो आणि सोसायटीमध्ये घरी जायला लिफ्ट वापरतो. ताई तुम्ही कुठून आलात?”
मग ती ताई आपली कर्म कहाणी ऐकवते. सगळे लक्ष देऊन ऐकतात, मध्ये मध्ये प्रश्न करतात.
“त्याचा त्रास होतो काय?”
“तर. भूक कमी होते. केस झडतात. इम्यूनिटी खलास, सारखे टेन्शन. दर महीन्याला चाळीस पन्नास हजारांचा फटका. फायदा काही नाही. म गोळ्या बंद केल्या. पण नवरा आणि मुलाने इमोशनल ब्लाक्मेल केलं. मग वाटलं नाही अशी हार मानायची नाही. पुन्हा आले टेस्ट करायला. पण इथे आले तुम्हा सर्वांना भेटलं कि उत्साह येतो. वाटतं रोज येऊन गप्पा माराव्यात. बॅटरी चार्ज करून घरी जायचं.”
बॅटरी चार्जिंग सगळ्यांना आवडले. सगळ्यांनी मना डोलावल्या.
एका चष्मेवाल्या जेंटलमनने पहिल्यांदाच तोंड उघडले.
“हा हा बॅटरी चार्जिंग. सही आहे. मला देखील इकडे आले कि मनाची मरगळ झटकून टाकल्यासारखी फीलिंग येते. आपण गादी झाडतो न तसच. घरी असलं कि वाटतं आपण सगळ्यांना जड झालो आहोत. वाटतं कि देवानं आपल्यावर अन्याय केला आहे. मीच का बर? सगळं जग कसं मस्त एन्जोय करतय. पण इथं आलं कि कळतं कि सोबत आहे. तो कुत्रा नाही युधिष्ठिरासोबत चालत गेला? तसं माझ्याबरोबरही...”
तोच मोठ्या डॉक्टरांनी एन्ट्री मारली. एकदा सगळ्यांवर नजर फिरवली. एका दोघांची विचारपूस केली. तेव्हढाच दिलासा.
टेस्टिंग सुरु व्हायला वेळ होता. तो पर्यंत औषधी पाण्याची बाटली संपवायची होती.
“खूप त्रास होतो काहो?” कोणी तरी “पहिलटकरीण” आली होती. ती विचारात होती.
“नाही हो. ते मशीन आहे ना ते आईच्या मायेने कुशीत घेतं, अंगावर गोधडी टाकतं आणि म्हणतं, “जा, तुला काहीही झालं नाहीये.””
“बघ है ना. मी तुला सांगत नव्हतो. आमची ही म्हणजे उगीचच घाबरते हो.” नवरा कौतुकाने बोलता झाला, “तरी डॉक्टरांनी हजार वेळा सांगितले. निव्वळ वहम आहे हो तुमचा. पण ही ऐकेल तर शप्पत. शेवटी म्हणाले, जा करून घ्या चेकिंग. नवरा कमावतो आहे ना. घाला पैसे.”
“तसं नाही हो. चेकिंग केलेले केव्हाही चांगलेच की. होऊ दे खर्चा. पण बाईच्या मनाला शांति तर मिळेल.”
डाव्या बाजूला बसलेल्या सुंदरीला, “पोरी तुला काय झालं?” असं विचारायची माझी हिम्मत झाली नाही.
तेव्हढ्यात त्या मल्टीपल रोग्याच्या मुलीने खाली जाऊन सगळ्यांसाठी वडा पाव आणले.
सगळ्यांनी सगळ्या कॉशन पथ्यपाण्याला फाट्यावर मारून वडापाव वर ताव मारला.
आता सगळे वाट पहात राहिले.
नंबर केव्हा येणार ह्याची.
नंबर आला कि जायचं.
तवर म्हणा च्यायला आणि मारा सिक्सर. खेळ पुढे चालू ठेवा..
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही सगळीच एक महाकाय वेटिंग रूम आहे. आणि तिच्यामध्ये आपण कधीतरी जागे होऊन बसलेलो आहोत.‌ आधीचं काही आठवत नाही. इथे कसे आलो माहिती नाही. अपॉइंटमेंट देणारी महामाया फरार आहे. तिचं लास्ट सीन स्टेटस पण अदृश्य आहे.

सबब, सगळं आपल्यावरच आहे. जो काही इलाज करायचा तो आपला आपणच करायचा आहे. आणि तोही झोप यायच्या आधीच करायचा आहे.
नायतर पुन्हा दुसऱ्याच कुठल्यातरी अज्ञात वेटिंग रूममध्ये बावचळून जागे व्हायची पाळी येते, म्हणतात. पुन्हा मग शुन्यातून सुरूवात वगैरे..! Happy

बाकी, पंचेस आवडले तुमचे Happy

You will be fine, best wishes ! /\
जे करताय, ज्यानी आनंद मिळतो ते करत रहा. I totally understand the ambiguity but try not to let the 'Maybe Cancer...' run your life. कठीण आहे, कधीकधी जमलं नाही तर तेही ठीकच आहे. आपली एकट्याचीच लढाई आहे, तेही होतच राहणार. स्पष्टिकरण किंवा गिल्ट काहीही नको.

-हे यातून जाणाऱ्या सगळ्यांनाच लिहिले आहे.