डंकी - बात मेरे मन की
डंकी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा त्यात ठळक अक्षरात एक फलक होता,
From the director of
Munna Bhai
3 Idiots
PK
मला देखील चित्रपट बघायची उत्सुकता याचसाठी होती की वरील सर्व चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिराणी आता काय नवीन घेऊन येतोय.
आणि उत्सुकता यासाठी दुप्पट होती की यावेळी तो शाहरुखसोबत येत होता.
चित्रपट बघितला. आवडला. आणि शाहरुखबाबत काय म्हणावे... इतकेच म्हणू शकतो की जाहीरातीत अजून एक फलक हवा होता,
From the actor of
DDLJ
Chak De
My Name Is Khan
Dear Zindagi
Chennai Express
Jawan...
कारण या सर्व चित्रपटात दिसणारी त्याची रुपे या चित्रपटात दिसून आली, वापरली गेली.
चित्रपटाचे परीक्षण द्यायचे झाल्यास त्याचे ढळढळीतपणे दोन तुकडे करू शकतो.
मनोरंजक पहिला भाग
इमोशनल करणारा दुसरा भाग
फर्स्ट हाफ -
पहिल्या भागातील बरेच सीन ट्रेलर आणि गाण्यांमधून उघड झाले होते. पण ते पाहून वाटले होते की खरेच असे काही जग असते का? की हि निव्वळ सिनेमॅटीक लिबर्टी घेतली आहे?
पण मग शाहरूख आणि राजकुमार हिराणी यांची चित्रपटावरील चर्चा युट्यूब वर पाहीली. त्यात त्यांनी काही रिअल व्हिडिओ दाखवले होते.
उदाहरणार्थ …
ट्रेलर मध्ये जे बोमन इराणी नाच गात इंग्लिश शिकवताना दाखवला आहे ते जगाच्या या भागात खरेच तसे शिकवले जाते. आणि त्याहीपेक्षा फनी स्टाईलने शिकवले जाते..
प्रत्यक्षात एक गुरुद्वारा आहे त्याचे नावच व्हिसा गुरुद्वारा आहे जिथे हजारो लोकं येऊन देवाला खेळण्यातले विमान अर्पण करतात..
ज्या घरातील कोणी परदेशात जातात ते घराच्या गच्चीवर खरोखरच टेचात विमानाची प्रतिकृती बनवतात.
म्हणजे खरोखर एक सिली जाग अस्तित्वात आहे, किंवा चित्रपट ज्या काळात घडतो तेव्हा तरी होते..
आणि मग तिथे लीगल तसेच ईल्लीगल पद्धतीने परदेशात जायच्या जाहिराती देणारे एजंट... त्यातून होणारी फसवणूक.. आणि सरतेशेवटी सगळीकडे तोंड पोळले की मग डंकी मार्गाचा वापर.. हे सगळेच खरे होते. खरे आहे.
त्यामुळे चित्रपट बघायला जाताना आपण काही दिग्दर्शकाचा कल्पनाविलास बघायला आलेलो नाहीये, तर हे सत्य परीस्थितीचेच राजकुमार हिराणी स्टाईल ड्रामाटायझेशन आहे ईतके डोक्यात पक्के होते.
असो,
तर पिक्चर सुरू होतो ते थ्री ईडियट्सची आठवण करून देणार्या एका सीन ने.. आणि पहिल्या अर्ध्या पाऊण तासात अजून दोनचार सीन आपल्याला त्या मास्टरपीसची आठवण करून देतात. यामुळे जर रसभंग होऊ दिला नाही तर चित्रपट आपले पुरेसे मनोरंजन करत पुढे सरकतो. पण जर आपण खूप जास्तीच्या अपेक्षा ठेवून गेलो असू तर आपल्याला सतत काहीतरी मिसिंग आहे असे वाटण्याची पुरेपूर शक्यता आहे. माझे तरी सुरुवातीला असे होत होते.
आजूबाजूची पब्लिक एंजॉय करत होती. त्यात मुंबईची पब्लिक जरा धमालच असते. वयस्कर आणि जवान अश्या शाहरुखच्या दोन्ही एंट्रीना टाळ्या शिट्ट्या आरोळ्या आल्या. पण तरी हे बघायला मी आज ईथे आलो नाही असे मला वाटत होते. कारण हे माझे जवान मध्ये एंजॉय करून झाले होते.
पण हळूहळू थ्री ईडियट्सच्या प्रभावाबाहेर येत काही ओरिजिनल सीन येऊ लागले आणि मजा वाढू लागली. पण तितक्यात एका इमोशनल सीनवर पहिल्या भागाचा द एण्ड झाला. ईटरव्हलची पाटी झळकली.
यात एक नमूद करावे लागेल, चित्रपट जेव्हा शाहरुखचा असतो तेव्हा तो शाहरुखचाच असतो. त्याचे आमीरसारखे नसते, जसे की सब के साथ, अपना विकास. यात पडदा व्यापून शाहरुखच असतो. पण तरी विकी कौशल आपली छाप पाडून जातो. हे चित्रपट बघायला जायच्या आधीही मी ऐकून गेलो होतो की त्याचे काम खूप छान झाले आहे. आणि खरेच कमाल आहे तो माणूस. त्याने वाढलेल्या अपेक्षा सुद्धा पुर्ण केल्या.
बोमन इराणीला मुन्नाभाईमधील डॉ. अस्थाना आणि थ्री ईडियट्स मधील वायरस या भुमिकांनी ज्या चबुतर्यावर नेऊन बसवले आहे की आता त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याशी तुलना होऊन मला त्याचे या पठडीतील नवीन काम किंचित खुजेच वाटते. पंण यात त्याचा दोष नाही, त्याने आपले काम चोख बजावले आहे. त्याला मोजकेच प्रसंग आहेत, पण त्याने पाडलेली छाप लक्षात राहते.
अजून एक नमूद करायचे म्हणजे ट्रेलरमध्ये शाहरूखचा लूक बघून त्याला जे फॅन चित्रपटातून उचलून आणल्यासारखे वाटत होते ते चित्रपटात कुठेच तसे वाटले नाही. फॅन मी पाहिला आहे. त्यात तो एक दिल्लीचा सडाफटिंग लौंडा दाखवला होता. यात तो आर्मी ऑफिसर दाखवला आहे. आणि त्याचा आब राखणारेच त्याचे बेअरींग आहे.
पण त्या लाल शर्टचा सीन काही समजला नाही. जवान चित्रपटातील गाण्यात सुद्धा ते होते. यातही आहे. सेमच आहे का कल्पना नाही. पण अगदी डोळ्यात बदाम बदाम बदाम लेडी किलर लूक आहे. एखादे मी सुद्धा घ्यायचा विचार करतोय. पण सावळ्या रंगाकडे पाहून स्वताला आवरलेय.
तर ते एक असो,
दुसरा भाग मात्र हळूहळू चित्रपटाला वेगळ्या ऊंचीवर नेऊ लागतो.
गैरमार्गाने ईंग्लडला जाण्यासाठी जीव धोक्यात, महिला असेल तर जीवासोबत अब्रू धोक्यात, कधी किळस वाटावी तर कधी गुदमरून जावे अश्या परीस्थितीत घडणारा प्रवास, जो बघताना आपल्या अंगावर कधी शिसारी यावी तर कधी शहारा..
आणि ईतके सारे करून जे मिळवणार आहोत ते खरेच आपल्या मनाजोगते आहे का याची खात्री नसणे...
नसल्यास परतीचे सारे मार्ग बंद!
ईथे एका क्षणाला मला सैराट आठवला. एका मोठ्या घरातली मुलगी एका छोट्या घरातील मुलाच्या प्रेमात पडते. राजाराणीच्या गुलाबी संसाराची स्वप्ने बघत त्यासोबत पळून जाते आणि झोपडपट्टीत राहायची वेळ येते तेव्हा सत्य परीस्थितीचे भान येते... पण तो चित्रपट पुढे वेगळ्या अंगाने गेला, हा मात्र जिथून सुरू झाला तिथेच पुन्हा येऊन संपला. एक वर्तुळ पुर्ण झाले. कसे ते चित्रपटातच बघा.
पण एक नक्की, हा चित्रपट जो बघेल तो अश्याप्रकारे आपला देश सोडून जाताना शंभर नाही तर हजार वेळ विचार करेल.
पहिल्या भागात तापसी पन्नूला पाहून इथे आपली नेहमीची काजोल चालली असती, शाहरुखसोबत छान केमिस्ट्री जमली असती असे वाटून गेले. पण दुसर्या भागात तापसीने छान काम केले आहे. आणि क्लायमॅक्सला एखादी काजोल, प्रिती, राणी, करीना असती तर उगाच पुन्हा आपले ते वीरझारा झाले असते म्हणून मग तापसीच बरी असेही वाटले.
शाहरुख डोळ्यांनी छान अभिनय करतो असे मला आपले लहानपणापासून उगीचच वाटत आलेय. यात एका तापसीबरोबरच्या द्रुश्यात मात्र त्याने खरेच कमाल केली आहे. तापसी त्याच्याकडे प्रेमाने धावत येताना त्याच्या डोळ्यात उमलणारी आनंदाश्रूंची फुले, आणि क्षणात तो गैरसमज दूर होताच त्या फुलांचे होणारे काटे.. निव्वळ लाजवाब! मी राजाबाबू असतो तर थिएटरमध्ये तो सीन रिवाईंड करून बघितला असता.
पहिल्या भागातील ईंग्लिशच्या परीक्षा आणि दुसर्या भागातील कोर्टकचेरी हे छान जमलेले सीन.
पण पिक्चर त्याची ऊंची क्लायमॅक्सला गाठतो.
आपल्या मातृभुमीशी ज्याची नाळ जोडली गेली नाही अशी व्यक्ती अपवादानेच. सोबत सोनूचा आवाज. त्यात जिथे रोमान्सची वेळ येते तेव्हा तरुण शाहरूखला मागे टाकत म्हातारपणाचा शाहरूख सहज बाजी मारतो. पुर्ण चित्रपटातून साधला जाणारा परीणाम एकत्रितपणे क्लायमॅक्सला आपले काम चोख बजावतो. आणि आपल्याला खुर्ची सोडताना विचार करायला भाग पाडतो.. डंकीचा जो अर्थ शेवटी शाहरूखने तापसीला सांगताना दाखवले आहे तो या चित्रपटाचे सार ठरतो.
जे मी सुरुवातीपासून मिस करत होतो ते अखेरीस अचानक गवसल्यासारखे झाले. अन्यथा हे परीक्षण सुद्धा माझ्याकडून लिहिणे झाले नसते.
पिक्चर आवडल्यावर भारावलेल्या स्थितीत घरी येऊन त्यातील गाणी ऐकायची एक पद्धत असते. भले चित्रपट बघण्याआधी आवडलेले गाणे कुठलेही असो, पण जे गाणे चित्रपटाचा आत्मा असते ते चित्रपट बघून आल्यावर पुन्हा पुन्हा ऐकले जाते. थ्री ईडियट्स वेळी चित्रपट बघण्याआधी ऑल इज वेल आवडलेले. पण घरी आल्यावर मात्र "Give me some sunshine, Give me some rain" हेच शब्द सारखे गुणगुणत होतो. यावेळी आधी "लुटपुट गया" हे गाणे आवडले होते. पण चित्रपट बघून आल्यावर तो मान "निकले थे कभी हम घर से" या गाण्याने पटकावला. ते गाणे आधीही ऐकताना असे वाटले होते की याची खरी मजा चित्रपटातच येईल. आणि तसेच झाले. शब्द न शब्द ऊतरत जातात. आणि त्या गाण्याची शेवटची ओळ आपल्याला सुन्न करून जाते. का ते चित्रपट बघितल्यावरच समजेल. आता स्पॉईलर ठरेल..
हे गाणे ऐकून मन भरल्यावर "चल वे वतना" हे गाणे रीपीट मोडवर लावले गेले.. आणि आता ते आत उतरायला सुरुवात झाली आहे. पुन्हा चित्रपटातील ती द्रुश्ये आठवायला लागली आहेत.
खरे तर डंकीची गाणी जमली नाही असा एक सूर होता. मी सुद्धा त्यात सामील होतो. पण चित्रपट बघितल्यावर मत पुर्णपणे बदलले आहे. शब्द आणि सूर, दोन्हीही चित्रपटाचे इमोशन्स पकडून येतात. मै तेरा रस्ता देखूंगा हे गाणे सुद्धा सुटे ऐकायला तितके भारी वाटत नसले तरी चित्रपटात हेच काम करते.
या वर्षी शाहरुखचे तीन चित्रपट आले. तिन्ही ब्लॉकबस्टर झाले. मला तिन्ही चढत्या क्रमाने आवडले. तिन्ही मी पहिल्याच आठवड्यात थिएटरला पाहिले. तिन्हींचे परीक्षण मी सिनेमागल्लीवर लिहिले. आणि तिन्ही पोस्टना भरघोस प्रतिसाद मिळाला, म्हणजे मिळेल आता... तर आणखी काय पाहिजे आयुष्यात, आणि नवीन वर्षात प्रवेश करताना
अरे हो, परीक्षण संपले इथे. पण मला एक प्रश्न पडला आहे,
शाहरूखला जेव्हा कुठल्या चित्रपटात म्हातारा दाखवतात तेव्हा त्याचे केस पिकलेले आणि तो स्वतः पाठीत वाकलेला का बरे दाखवतात? आताही प्रत्यक्षात तो त्याच वयाचा आहे ना, आणि कुठे आहे तसा?
बाकी तुम्हाला सुद्धा एक प्रश्न पडला असेल,
रिव्यू डंकीचा आहे तर फोटोमध्ये अॅनिमलचा पोस्टरबॉय का?
तर ज्यांनी पुर्ण पोस्ट वाचली त्यांनाच आता शेवटी याचे उत्तर मिळेल
त्याचे झाले असे, की मला शाहरूखसोबत फोटो काढून घ्यायला थिएटरबाहेर कुठे डंकीचा पोस्टरच सापडेना. मग या संजूबाबाचा, सॉरी रणबीर कपूरचा पोस्टर दिसला तर आठवणीसाठी म्हणून यासोबतच फोटो काढून घेतला.
ता.क. - अॅनिमल चित्रपट पाहिला नाहीये, तर अॅनिमल टिकाकारांनी प्लीज टारगेट करू नये
पण तरीही हा फोटो या रिव्यू सोबत टाकायचा खोडसाळपणा केला याचे कारण एवढेच, की शाहरूखचा चित्रपट असला की त्याला एक्स्ट्रा स्क्रीन मिळतात असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते... पण कुठचे काय, त्याच्या साध्या पोस्टरला सुद्धा जागा मिळत नाही ईतकेच दाखवून द्यायचे होते
डंकी ईतकाच जमलाय वाटते रिव्ह्यू.. राजकुमार हिराणीला असिस्ट करायला सुरुवात करतो मी पुढच्यावेळी...
असे मला आपले उगाचच वाटतेय
धन्यवाद,
तुमचा अभिषेक
पिच्चर भारीच आहे. तुम्हीही
पिच्चर भारीच आहे. तुम्हीही बरंच डिटेलमधी लिहिलंय.
रिवाईंड वरून एक आठवलं, शारूक जी चादर घेऊन विकी कौशलची आग विझवायला जातो, ती 'सोलापूरी' होती का हे मला नीट दिसलं नाय, तिथं रिवाईंड करून बघायचा विचार आलता
तापसी त्याच्याकडे प्रेमाने
तापसी त्याच्याकडे प्रेमाने धावत येताना त्याच्या डोळ्यात उमलणारी आनंदाश्रूंची फुले, आणि क्षणात तो गैरसमज दूर होताच त्या फुलांचे होणारे काटे.. निव्वळ लाजवाब! >>> अगदी अगदी परफेक्ट!
संप्रति
संप्रति
थिएटरात खरेच ही सोय हवी, पॉज रिवाईड ढकलपंची करायची...
रमड,
त्यानंतरचे गाण्यातले शब्दसुद्धा त्याच सीनमुळे भिडतात..
"यात तो आर्मी ऑफिसर दाखवला
"यात तो आर्मी ऑफिसर दाखवला आहे." - त्या पात्राची आर्मीची रँक कधी दाखवली? त्याला इंग्लिश अजिबात येत नसतं ह्यावरून तर ते पात्र आर्मीमधे कुठल्याही अधिकाराच्या हुद्द्यावर नसावं असं ध्वनित होतं.
सिनेमात केलेली इल्लीगल इमिग्रेशनची भलामण नाही पटली.
त्याला इंग्लिश अजिबात येत
त्याला इंग्लिश अजिबात येत नसतं ह्यावरून तर ते पात्र आर्मीमधे कुठल्याही अधिकाराच्या हुद्द्यावर नसावं
>>>>>
मी व्हिजेटीआय या नावाजलेल्या कॉलेजमधून इंजिनीअरिंग डिग्री मिळवली आहे. मलाही इंग्लिश बोलता येत नाही. तरी माझे काम चालते. काही अडत नाही.
भारतीय आर्मी मध्ये चांगले पद मिळवायला इंग्लिश येणे इतकेच गरजेचे असेल तर आपला देश खरेच इंग्रजांपासून स्वतंत्र झाला आहे का प्रश्न पडतो.
पण ते एक असो, असतील काही निकष.. त्यात नको पडूया
पण मोठ्या हुद्द्यावर नाहीये तरी त्याला सैनिक म्हणून मान द्यायला काय हरकत आहे असा विचार मी केला.. आणि आर्मी रँक बद्दल माझे सामान्य ज्ञान फारसे नसल्याने आदराने त्याला आर्मी ऑफिसर म्हटले इतकेच .
“ मी व्हिजेटीआय या
“ मी व्हिजेटीआय या नावाजलेल्या कॉलेजमधून इंजिनीअरिंग डिग्री मिळवली आहे. मलाही इंग्लिश बोलता येत नाही. तरी माझे काम चालते. काही अडत नाही.” - चांगली गोष्ट आहे.
“ भारतीय आर्मी मध्ये चांगले पद मिळवायला इंग्लिश येणे इतकेच गरजेचे असेल तर आपला देश खरेच इंग्रजांपासून स्वतंत्र झाला आहे का प्रश्न पडतो.” - चांगला प्रश्न आहे.
पण ह्या दोन्ही मुद्द्यांचा वस्तुस्थितीशी संबंध नाही. एनडीए च्या प्रवेश-परिक्षेपासून इंग्रजीची निकड सुरू होते. असो.
अनेक लोकांना सिनेमा आवडला. अनेकांना तो ‘राजू हिरानी टच‘ नव्हता असंही वाटलं. पण त्यातल्या इमिग्रेशनच्या मुद्द्यावर जर इतकी चर्चा होत असेल तर ते नक्कीच सिनेमाचं यश आहे.
आज पहिला.प्रेम आणि विनोदाना
आज पहिला.प्रेम आणि विनोदाना खूप फुटेज दिलंय.मुख्य विषयाला थोडा अजून वेळ देऊन जास्त भिडला असता.खूप छोट्या भागात निपटलाय प्रकार.
बेकायदेशीर स्थलांतराचे स्पष्टीकरण पटले नाही.
दोन्ही सहकलाकार, विक्रम कोचर(आश्रम मधला सब इन्स्पेक्टर) आणि अनिल ग्रोव्हर(सुनील ग्रोव्हर चा भाऊ) यांचा अभिनय मस्त.विकी कौशल छोट्या रोल मध्ये परफेक्ट.शाहरुख ने थोडे वयाबरोबरचे रोल करायला हवेत.
अनेक लोकांना सिनेमा आवडला.
अनेक लोकांना सिनेमा आवडला. अनेकांना तो ‘राजू हिरानी टच‘ नव्हता असंही वाटलं.
>>>>
बरेच लोकांना तो राजू हिराणी टच नाही या कारणास्तवच आवडला नसावा.. पण तो असावाच असा हट्ट धरण्यात काही अर्थ नव्हता.
बरेचदा आपण काही अपेक्षा बनवून जातो आणि त्यानुसार चित्रपट त्यात फीट होतो का हे बघतो. ज्याचे चांसेस मग फार कमी असतात.
मुळात चित्रपट ज्याने बनवला आहे तो त्याच्या डोक्यातले मांडणार.. आपण आपली पाटी कोरी ठेवून जाणे जमायला हवे.
माझेही चित्रपटाच्या सुरुवातीला असेच होते होते. नशीब चूक लवकरच लक्षात आली. साधारण ते इंग्लिश परीक्षा सुरू झाल्या तेव्हा.. तिथून डोक्यातले सगळे विचार, तुलना, अपेक्षांशी पडताळून बघणे थांबवून पिक्चर एन्जॉय करू लागलो आणि आवडत गेला.. अर्थात यात राजकुमार हिरानी याचीच चूक आहे. बरेच प्रसंगात थ्री इडियट आठवण येईल अशी तजवीज त्यानेच करून ठेवली होती.
शेवटी खरे तर शाहरूखने त्याला सांभाळला म्हणायला हवे. आमीर असता तर वेगळेपणच संपले असते.
पण त्यातल्या इमिग्रेशनच्या
पण त्यातल्या इमिग्रेशनच्या मुद्द्यावर जर इतकी चर्चा होत असेल तर ते नक्कीच सिनेमाचं यश आहे.
>>>>>
लोकप्रिय चेहरे, सुपरस्टार घेऊन पिक्चर बनवला की त्या विषयावर चर्चा होतेच. तो लोकांपर्यंत पोहोचतोच. त्यातही शाहरूख म्हटले की एक लॉबी पिक्चर बघायच्या आधीच वस्तरा घेऊन तयार असते. ट्रेलर बघूनच कामाला लागते
हे चित्रपट न आवडणाऱ्याबद्दल सरसकट म्हटले नाहीये. गैरसमज नसावा..
पण हो चित्रपट इतका वाईट तरी नाहीये किंवा इतका चांगला तरी आहे की बहुतेक सगळेच जण ओटीटी वर आल्यावर बघतीलच तेव्हा यावर जास्त चर्चा होईल..
+७८६
+७८६
चित्रपट जेवढा मला कळला त्यात हेच दाखवले आहे की काही लोक परदेशाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत, काहींची पैश्याची गरज जास्त आहे त्यांना असे वाटत आहे की तिथे गेल्यास पौंड मध्ये कमवून झटपट परिस्थिती बदलेल, तर काहींना फक्त यात प्रतिष्ठा वाटत आहे..
आता यातले जे तिथे जाऊन पैसे कमावण्यास पात्र आहेत ते लीगल मार्गाने सहज जात आहेत. जे बेकायदेशीर मार्गाने जात आहेत ते मुळात तितके पात्र नसल्याने तिथे जाऊन देखील त्यांचे पैसे कमवायचे वांधे होत आहेत.
चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटात त्यांचे तसेच हाल दाखवले आहेत. एखादी पात्र नसलेली व्यक्ती बेकायदेशीर मार्गाने जाऊन तिथे कोणी मोठी हस्ती झाली असे दाखवले नाहीये.
डंकी : 'स्वप्नांचा देश'
डंकी : 'स्वप्नांचा देश' अमेरिकेला जाण्यासाठी 33 लाख रुपये मोजले, 22 महिने तुरुंगात काढले, पण...
https://www.bbc.com/marathi/articles/cd143ljpj75o?xtor=CS3-33-%5Bwsmarat...
लोकांचे खरे खुरे किस्से बाहेर येऊ लागलेत..
Highest Cumulative Collection
Highest Cumulative Collection in a Year
- #ShahRukhKhan (2023) : 2538Cr+
Highest Cumulative Footfalls in a Year
- #ShahRukhKhan (1995) : 11.89Cr
(Source - IMDB)
King for a Reason!
#Dunki
Top 3 highest rated films of 2023 on IMDb
1) 12th Fail
2) Sam Bahadur
3) Dunki
IMDb ratings are based on people's votes
#ShahRukhKhan #Dunki
छान लिहिले आहे. चित्रपटाटली
छान लिहिले आहे. चित्रपटाटली तरलता जी जाणवली तुम्हाला ती ज्या प्रकारे मांडली आहे ते खूप छान वाटले.
>> प्रत्यक्षात एक गुरुद्वारा आहे त्याचे नावच व्हिसा गुरुद्वारा आहे
हे भन्नाट आहे
>> यातले जे तिथे जाऊन पैसे कमावण्यास पात्र आहेत ते लीगल मार्गाने सहज जात आहेत. जे बेकायदेशीर मार्गाने जात आहेत ते मुळात तितके पात्र नसल्याने तिथे जाऊन देखील त्यांचे पैसे कमवायचे वांधे होत आहेत.
मुद्दे की बात!
>> फुलांचे होणारे काटे.. निव्वळ लाजवाब!
हे पुन्हा एकदा पहायला हवे असे वाटले कारण कदाचित माझी पाटी तितकीशी कोरी नसल्याने हे कदाचित मिस्सले असावे.
धन्यवाद अतुल
धन्यवाद अतुल
हे कदाचित मिस्सले असावे.
>>>>
कोर्टाच्या सीन नंतर शाहरूखची भारतात रवानगी होते तेव्हा तापसी त्याला मिठी मारायला मागून धावायला येते तेव्हा हा सीन आहे.. कुठे दिसला गाण्यात वगैरे तर शेअर करेन
भारतात आणि भारताबाहेर रिलीज
भारतात आणि भारताबाहेर रिलीज होणार्या सिनेमाच्या कॉपीजमधे थोडा फरक असतो. तो फरक देशाप्रमाणे असतो. उदा. आखाती देशांत रिलीज होणार्या कॉपीजमधे हिंदू देव-देवतांचे, पूजा-अर्चेचे सीन्स वगळतात. डंकीच्या भारतातल्या कॉपीमधे तो इमिग्रेशन जज (जे प्रत्यक्ष इतक्या गप्पा/काउन्सिलिंग करत नाहीत) जे बोलतो ते सगळं हिंदीत ट्रान्सलेट केलेलं दाखवलंय जे अमेरिकेत पहिल्या एक-दोन वाक्यांनंतर इंग्लिशमधेच ठेवलंय. भारतात हिंदी सिनेमांना सब-टायटल्स नसतात. भारताबाहेर असतात.
तमिळनाडू मधे आहेत हिंदी
तमिळनाडू मधे आहेत हिंदी सिनेमाला सबटायटल्स..
कदाचित पाहीन हा सिनेमा.
कदाचित पाहीन हा सिनेमा.
ऋन्मेष, फोटो चांगला आलाय.
धन्यवाद सुनिधी
धन्यवाद सुनिधी
आखाती देशांत रिलीज होणार्या कॉपीजमधे हिंदू देव-देवतांचे, पूजा-अर्चेचे सीन्स वगळतात.
>>>>
चित्रपट बघणारी बरीचशी पब्लिक आपलीच असते ना..
आणि असे सीन महत्वाचे असतील तर..
शाहरूखचेच एकेक चित्रपट आठवू लागलेत..
DUNKI नेटफलिक्स वर आला...
DUNKI नेटफलिक्स वर आला...
बघा आणि कसा वाटला जरूर कळवा...
चित्रीकरण अतर्क्य असले तरी
चित्रीकरण अतर्क्य असले तरी (बारिंग ते इराणी का अफगाणी लग्न व त्यातले कॉस्च्युम्स) ‘ओ माही ओ माही’ आवडले.
ओ माही अरीजित स्पेशल आहे..
ओ माही अरीजित स्पेशल आहे.. त्याची गाणी एकसुरी झाली की बोर होते.. पण मध्येच एखादे आवडते.
काल बघायला घेतला Dunki
मुलीने हट्ट केला म्हणून..
झोपताना टीव्ही बंद करताना तिला समजले की Dunki आलाय..
झोपतच होती तरी पाऊण तास बघितला...
मग एक पेन घेऊन ती वेळ भिंतीवर लिहून ठेवली. उद्या तिथून पुढे बघायला
अरिजित फार विव्हळतो.एक दोन
अरिजित फार विव्हळतो.एक दोन गाण्यात ठिके पण अरिजित चा पूर्ण अल्बम ऐकणे बोअर होईल.
शाखाचे एक दोन सीन्स चांगले
शाखाचे एक दोन सीन्स चांगले आहेत. तो इमिग्रेशन कोर्टाबाहेर तापसी पळत येते तो सीन वरती उल्लेख केलेला. बाकी पिक्चर बराचसा बकवास आहे. अजून शेवटची १५-२० मि. बघायचा बाकी आहे.
यातला शाखा पाहून मला लेट ८०ज मधला बच्चन आठवतो. वाढलेले वय सहज दिसणारा. अगदी फालतू स्क्रिप्ट व संवाद सिन्सियरली सादर करून पिक्चर पेलायचा प्रयत्न करणारा. डेस्परेट.
हा रोल सुद्धा आमिर खानसाठी असलेला टेलर मेड रोल वाटतो. एखाद्या सिस्टीम मधले तथाकथित अन्याय आपल्याला उलगडून सांगणारे त्याचे सीन्स पीके, थ्री इडियट्स ई जमले होते. इथे जमले नाहीत.
यातला शाखा पाहून मला लेट ८०ज
यातला शाखा पाहून मला लेट ८०ज मधला बच्चन आठवतो. वाढलेले वय सहज दिसणारा. अगदी फालतू स्क्रिप्ट व संवाद सिन्सियरली सादर करून पिक्चर पेलायचा प्रयत्न करणारा. डेस्परेट.>>> अरेरे कीव येण्यासारखी परिस्थिती. हेच एक्स्पेक्ट केले होते आणि तेच निघाले.
आशू तुम्ही पाहिला आहे का हा
आशू तुम्ही पाहिला आहे का हा चित्रपट.. की प्रतिसादावरून निष्कर्ष काढत आहात?
बाकी मला त्या पोस्टमध्ये शाहरूखचे एक कलाकार म्हणून कौतुकच दिसत आहे
अरिजित फार विव्हळतो.एक दोन
अरिजित फार विव्हळतो.एक दोन गाण्यात ठिके पण अरिजित चा पूर्ण अल्बम ऐकणे बोअर होईल. >>> खरंय खरंय अगदी
या पिक्चर मधले ते सोनू चे आणि पंजाबी गायकाचे गाणे चांगले आहे. ते पहिल्यांदा प्रवासाला निघताना आहे ते
हा चित्रपट अगदींच नाही आवडला.
हा चित्रपट अगदींच नाही आवडला. सगळ्या बाबतीत सामान्य वाटला. शाहरुख खान प्लास्टिकचा वाटतो.
अभिनय , कथा , चित्रिकरण सगळंच
अभिनय , कथा , चित्रिकरण सगळंच बालिश...
डंकी अर्धा पाहीला. आवडतो आहे.
डंकी अर्धा पाहीला. आवडतो आहे.
शाह रुख फार वयस्कर दिसतो.
अरिजित बद्दल +७८६
अरिजित बद्दल +७८६
पण त्याचे गाणे अरिजित फॅन ना आवडेल असे आहे.
आम्ही संपवला डंकी दोन भागात.
मुलीला आवडला बरेपैकी. स्पेशली जी आयडिया लढवून शाहरूख त्यांना परत आणतो त्याचे तिला कौतुक वाटले.
एक गाणे आम्ही पुढे ढकलले. बाकी गाण्यात स्टोरी पुढे सरकत असल्याने राहू दिली.
कंटेनरमधील एक किळसवाणा सीन मी आधीच कल्पना असल्याने पुढे ढकलला. तरी मुलीला मी काय पुढे ढकलले याचे कुतुहल पडल्याने तिला तोंडी वर्णन करून सांगितला. तिने माझे आभारच मानले.
शेवटचे फोटो बघताना तिला बरेच प्रश्न पडले. पहिलाच प्रश्न - म्हणजे अशी डंकी फ्लाईट खरोखर असते?
मग मी माझ्याकडची जुजबी माहिती तिला पुरवली. तोपर्यंत पिक्चर बघताना तिला वाटतच नव्हते की खरेच ईतके लोकं असे जीवावर उदार होऊन दुसर्या देशात जातात. तिला काल्पनिक कथाच वाटत होती.
Pages