नाक

Submitted by sarika choudhari on 21 December, 2023 - 06:57

अमृता धावत घरी आली. खूप चिडलेली दिसत होती. पाय आदळआपट करत ती तिच्या खोलीत गेली. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी मी तिच्या खोलीत गेले . तर अमृता पायामध्ये डोकं खुपसून बसलेली होती.

अमृता ,अगं काय झाल? खेळायला गेली होतीस ना?

अमृता, “ आता मी जाणार नाही खेळायला .”

“का गं, काय झालं?”

“अगं, श्रेया व तिच्या त्या दोन अगाऊ मैत्रिणी आहेत ना .”

“अगं, पण तुझ्या पण मैत्रिणी आहेत ना. असं बोलायचं का ?”

“ हो आहेत ना, पण त्या मला चिडवतात चपट्या नाकाची, चपट्या नाकाची असं सारखे म्हणत असतात.”

असं होय ... (हा..हा .).

“तू पण हसतेस, जा मी बोलणारच नाही तुझ्यासोबत .”

“ माझ्या बाळा मी तुला नाही हसले . ज्या कारणावरून तू चिडली ना त्याला हसले. मला सांग नाकाचा उपयोग काय आहे.”

“ श्वास घेण्यासाठी.”

“ बरोबर, मग मला सांग तुझ्या दादाचं नाक चिरेदार आहे व तुझं चपटं आहे . तर त्याला श्वास घेता येतो आणि तुला घेता येत नाही असं काही आहे का?”

“नाही आई”

“ नाही ना .मग का चिडतेस. नाक लहान असो, चपटं असो, असो चिरेदार असो, की धारदार असो, अगदी पोपटासारखे नाक असेल तरी त्याचं काम ते करतच ना. मग आपण का चिडायचं बाळा. तुला माहित आहे मी जेव्हा लग्न करून या घरी आले तेव्हा तुझी आजी सारखं म्हणायची “ माझ्या मुलाचं नाक एकदम सरळ आहे बरं., अगदी माझ्यासारखा. पण सूनेच नाक नाही तसं.”

मला सुरुवातीला वाईट वाटायचं. पण आता नाक तर काही बदलून मिळणार नाही ना. मग सारखा उदास होण्यापेक्षा मी त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केला .

नंतर तुझा दादा झाला. तुझ्या दादाचं नाक एकदम चिरेदार. त्याच्या नाकाचं सर्वजण कौतुक करायचे .तुझी आजी म्हणायची “ माझ्या नातवांनी माझ्यासारखंच चिरेदार नाक घेतलं. बरं झालं बाई.”

तेव्हा मला त्यांचा राग यायचा. पण त्या मोठ्या असल्यामुळे मी काही बोलायचे नाही. मग तू आलीस छोटीशी परी. पण तू माझ्यासारखंच चपटं नाक घेऊन आलीस.

तेव्हा आजी म्हणाली “ माझ्या नातवा सारखा नाक नाही हीच. ”

कधीकधी तुला चपट्या नाकाची म्हणायची. मी एक-दोनदा ऐकलं आणि आईला म्हटलं “ आई नाकाचं काम हे श्वास घेणे आहे आणि माझ्या मुलीला व मला ते उत्तम घेता येतं . त्यामुळे ते चपटं काय किंवा चिरेदार काय याचा काहीही फरक पडणार नाही. चिरेदार नाकासाठी काही कोणी बक्षीस देत नाही की त्यासाठी विशेष सवलतही नाही . मग उगाच कशाला त्याचा अट्टाहास करायचं .” आजीला ते पटलं.

अगं आपण कसे दिसतो त्यापेक्षा आपण कसे वागतो यावर भर द्यायचा बरं. शारीरिक सौंदर्यापेक्षा आंतर्गत सौंदर्य महत्त्वाचं आहे. तशी अमृता मला बिलगली.

अमृता आपण एक गंमत करु या. आपली मराठी भाषा खुप समृध्द आहे. मराठी भाषेत नाकाला महत्त्व आहे . नाकावर जितके वाक्प्रचार आहेत ते आपण आठवूया. तू पण तुला येत असतील ते वाक्प्रचार सांग आणि मी पण तुला सांगते. आपण या आताच्या प्रसंगाला धरून बोलुया. अमृता आजही तुला कारल्याची भाजी दिली की तू नाक मुरडते.

“ हो आई, मला नाही आवडत कारल्याची भाजी . ”

“ अमृता, तुला मैत्रिणीनीं चिडवलं तर तुझ्या नाकाला मिरच्या झोंबल्या. आणि तू तरातरा घरी आलीस . आमच्या लाडोबा च्या नाकावर राग आहे. ”

“ आई, मी काय करू त्या सारख्या चिडवतात. मग माझ्या नाकीनऊ येत. ”

“पण बाळा त्या जरी तुला चिडवत असतील तरी आपण नाही बरं लक्ष द्यायचं . उलट त्यांना समजायचं की असं कोणाला चिडवायच नाही. ”

“ हो आई, मी सांगेल त्यांना व हे पण सांगेल की माझं नाक मला प्रिय आहे. आणि आता येवु दे नाक घासत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझी मदत मागायला. ”

“ अमृता असं नाही बोलायचं आणि तू प्रकल्प प्रकल्प छान करतेस. तुझ्याकडे छान छान कल्पना असतात त्यामुळे तुझ्याकडे येतात त्या. आपल्या हुशारी चा वापर दुसऱ्यांना पण व्हायला हवा ना. ”

“ हो आई, पण त्या मला चिडवतात ना.”

“ अमृता, आपण आपल्या वागण्याने सर्वांना जिंकायचं . मला सांग आजीची लाडकी तूच आहेस ना, दादा पेक्षाही जास्त लाड तुझाच होतो. आता तुझं चपटं नाक मध्ये येत का ?”

“ नाही , उलट आजी तर माझी एकदम जवळची मैत्रीण आहे. ”

“ बाळा, नेहमी लक्षात ठेवायचं दुसऱ्यांना चिडवायचं म्हणजे कसं असतं बघ जो हसे लोकांना शेंबूड त्याच्या नाकाला . असं त्या लोकांचं होतं. ”

तेवढ्यात दादा आला .

दादा ,“काय चालू आहे दोघींचं .”

दादा, “ आमच्या बोलण्यात नाक खुपसू नकोस.”

दादा , “ असं ,नाक खुपसू नको काय .”

अरे दादा, “ आमचं नाकावर कोणकोणते वाक्प्रचार आहेत त्यावर बोलणं चालु आहे. ”

दादा, “ अच्छा चालु द्या तुमचं.”

अमृता, “ तूला पण नाकावरचे बरेच वाक्प्रचार येतात . आता मला एक सांगा त्या वाक्प्रचारमध्ये चपट्या नाकाचा उल्लेख आहे का ?”

“ नाही .”

“ म्हणजे तुला कळलं का नाक महत्त्वाचा आहे. ते चपटं आहे की चिरेदार हे महत्वाचं नाही.”

“हो आई, मी आता नाक वर करून मैत्रिणींना सांगते की मला माझ्या नाकाचा अभिमान आहे.

शाब्बास बेटा.

Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह मस्तच आहे ही गोष्ट..
मुलांना वाचायला छान आहे.
एखाद्या वर्तमानपत्रात पाठवा ही.. मी असतो संपादक तर छापली असती नक्की.

किती गोड कथा लिहिलीय.
नकटीच्या लग्नाला विघ्नं फ़ार असली तरीही कोणासमोर नाक न रगड़ता एकदम नाकासमोर चालण्याचा धडा शिकवला.

सर्वाच्या प्रतिक्रीयांसाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या सकारात्मक प्रतिक्रीया वाचून आनंद झाला व प्रात्साहन पण मिळाले.परमेश्वर आपले भले करो.

छान कथा..!
प्रिया तेंडुलकरांचा अभ्यासात एक धडा होता.. त्यांना त्यांच्या नाकावरुन चिडवलं असता त्यांनी 'माझ्या नाकाने मला जगण्यासाठी श्वास घेता येतो तेवढं पुरेसं आहे मला..!" असं सणसणीत उत्तर दिलं होतं.. ते आठवलं.