साडेसात घोड्यांची शर्यत... 5th lap

Submitted by विक्रम मोहिते on 20 December, 2023 - 00:35

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453
४. चौथा भाग https://www.maayboli.com/node/84461

ट्रिंग ट्रिंग...
सकाळी सकाळी बीट नंबर ७० चा फोन खणखणला तेंव्हा फक्त ३ लोक चौकीत जागे होते. रात्रभर बॉम्बच्या शोधात फिरल्यामुळे ते सुद्धा वैतागलेले होते आणि शेवटी फक्त एवढं कळलं कि मिळालेली टीप खोटी आहे. त्याच वैतागामध्ये बक्कल नंबर शंभरने फोन उचलला.
"गुड मॉर्निंग. लेडी लोहार आहेत का?"
"नाही, मॅडम थोड्या वेळापूर्वीच घरी गेल्या. "
"घरी गेल्या? आत्ता सकाळी ९ वाजता? तुमची वेळ काय असते हो कामाची?"
"कसं आहे ना साहेब, अहर्निश सेवामहे जरी पोस्ट खात्याचं ब्रीद असलं तरी पोलिसांची पण काही वेगळी कंडिशन नाही. काल सकाळी ९ वाजता ड्युटीवर आलेल्या मॅडम आज सकाळी ८ वाजता घरी गेल्यात. त्यामुळे आमच्या वेळेची चौकशी करण्यात तुमचा वेळ खोटी करण्यापेक्षा तुम्ही कोण आहे आणि तुमचं काम काय आहे ते सांगा. "
"ओह सॉरी. माझं नाव... एक काम करा, त्यांना एवढंच सांगा कि आपल्या ऊसाला लवकरच कोल्हा लागणार आहे."
"अरे भो***, तू समोर तरी ये फक्त तोच ऊस तोडून तुझ्या *** नाही घातला तर आयुष्यभर बक्कल लावणार नाही वर्दीवर. ठेव फोन हरामखोर."
"तुम्ही निरोप द्यायचं काम करा साहेब, बाकी सगळं मॅडमना समजेल. "
खटक... वैतागून बनंशंने फोन आपटला.
"साला हातात भेटू दे कधी, चामडी लोळवतो साल्याची. आमच्या मॅडम विषयी काहीही बोलतो काय!" त्याच्या वैतागण्यामागे कारण सुद्धा तसंच होतं. बॉस विषयी एक वाकडा शब्द सुद्धा त्याला सहन होणार नव्हता. नाना पाटेकरच्या यशवंत सिनेमावरून प्रेरणा घेऊन त्याच्या मॅडमने पोलीस खातं निवडलं होतं. यशवंत लोहार सारखं पहले लाथ फिर बात या तत्वावर गुन्हेगारांसोबत डील करणाऱ्या इन्स्पेक्टर निशा राऊत यांना डिपार्टमेंटने त्यांच्या कामाला एकदम शोभणारं नाव दिलं होतं - लेडी लोहार...
तेवढ्यात बाहेर काहीतरी गडबड ऐकायला आल्यामुळे बनंशं बाहेर आला.
"हरामखोर, तुझ्या चोरीच्या नादात त्या बाईचा जीव गेला असता तर काय केलं असतं- थांब तुला आत्ता सरळ करते टायर मध्ये टाकून. " मांजराच्या पिल्लाला मानगुटीला उचलून आणावं तसं लेडी लोहार त्या माणसाला घेऊन येत होत्या. अवतारावरून पक्का छपरी वाटत होता, रंगवलेले केस, मावा खाऊन लाल झालेलं दात आणि अंगात भडक कपडे. पोलीस स्टेशन मध्ये आल्या आल्या मॅडमने त्याला खुर्चीवर आपटलं. एकदा बाहेर जाऊन गर्दी पांगली आहे का याचा कानोसा घेतला आणि ऑर्डर दिली.
"हवालदार, २ कडक चहा सांगा."
चहा आल्यावर एक ग्लास स्वतःकडे घेऊन दुसरा त्या छपरी माणसासमोर ठेवत त्यांनी विचारलं- "चल बोलायला लाग आता."
"मॅडम, माझ्याकडे पक्की खबर आहे. पुढच्या काही महिन्यात ऊसाला मोठ्ठा कोल्हा लागणार आहे आणि ... "
"तुझ्या आयला... " त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बनंशंने त्याला उचलून आपटला. "काय सकाळपासून चालू आहे रे तुम्हा लोकांचं, कोल्हा लागणार आहे. लांडगा लागणार आहे. तुम्हा सगळ्यांना घोडा लावायला पाहिजे नीट. "
"हवालदार, थांबा आणि त्याला जरा नीट बघा, खबरी आहे तो आपला. " लेडी लोहारने वेळीच थांबवलं नाहीतर आज बनंशंने सचिनचा खिमा केला असता.
"हा बोल सचिन, काय काय कळलं आहे तुला?"
"सध्या तरी काही खास नाही, पण गोवा हायवेच्या बार वरती जो कोळी आपण हेरून ठेवला होता त्याच्याकडे लोकांची ये जा वाढली आहे. आणि त्यांचं पुढचं टार्गेट नक्कीच उसाचं शेत आहे. "
"ओह आय सी. खबर किती पक्की आहे?"
"शंभर टक्के, या हवालदाराच्या बक्कलची शप्पथ. खाली टपरीवर माझा भाऊ काम करतो त्याने बबनशेठला पाहिलं आहे काही दिवसांपूर्वी. दुसरा कोण होता माहित नाही, नवीन कोणीतरी वाटत होता. "
"ऑल राईट. तूझं कमिशन तुला नेहमीच्या जागी नेहमीच्या वेळी मिळेल. आत्ता इथून निघ आणि परत कामाला लाग. बक्कल नंबर शंभर- याच्या कुल्ल्यावर लाथ मारून याला बाहेर काढा, सगळ्यांना दिसलं पाहिजे नीट कि आपण एका छपरीला बाहेर हाकलवाला आहे."
"अगदी आनंदाने मॅडम. "
"मार बाबा, किमान ४ लाखाची लाथ आहे हि, मार तू... " बाहेर पडता पडता सचिन तोंडात पुटपुटत म्हणाला.

हिरवं शेत काय, ऊस काय, कोल्हे कोण, घोडे कोण?... कळेल कि सगळं, पुढच्या भागात... किंवा त्याच्या पुढच्या... क्यूकी रेस... तो अभी बस शुरु हुई है..

क्र... म... शः ...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults