सलमानभाई - विक्रमसिंग सूर्यवंशी / विक्की
शीबा - सोनिया
अमृता सिंग - राजकुमारी सूर्यलेखा
शक्ती कपूर - राजगुरू
सईद जाफरी - सलमानचा बाप
कादर खान - संग्रामगडवाले बाबा
सुरूवातीला स्क्रीनवर ही वरची सगळी नावं पडत असतानाच बॅकग्राऊंडला कादर खान दऱ्याखोऱ्यांतून चिंताग्रस्त अवस्थेत भटकतोय. त्या खंडहरात पडीक भग्नावशेषांमध्ये गूढ सावल्यांचा डान्स चाललाय.
संग्रामगड नावाचं गाव. तिथे काहीतरी अजीब घटना घडतायत. तशी गाववाल्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे तिथे उत्खनन करावं लागणाराय. सोनियाचा बाप पुरातत्व खात्यात कामाला आहे. त्याच्याकडे ही सगळी जबाबदारी आलेली आहे.
भाई आणि भाईचा बाप, काय काम करतात ते दिग्दर्शक सांगत नाही. सांगण्यासारखं काही नसेलही.
सोनियाचा बाप आणि भाईचा बाप मित्र आहेत.
न्यूयॉर्कमध्येच लहानाचा मोठा झालेला भाई आता नाचत नाचत मायदेशी परतलाय. येताना सगळ्यांसाठी गिफ्ट्सही आणलेत त्यानं. भाई संस्कारी आहे, सगळ्यांच्या योगक्षेमाची चिंता वाहणारा आहे.
संग्रामगडचे ताजे अपडेट्स देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावावी लागतेय. देशाच्या कानाकोपऱ्यातून पत्रकार आलेलेयत. त्यांना एका ऑडिटोरियममध्ये बसवून उत्खननाचे फोटो दाखवतात. ते झाल्यावर सईद जाफरी मध्येच स्टेजवर घुसतात आणि भाई-सोनियाच्या लग्नाची घोषणा करून पसार होतात.
भाई ॲडव्हेंचर क्लबचा सदस्य आहे. भाईस धाडसी कृत्यांची चाह आहे. त्यास दुनिया एक्सप्लोर करायची आहे. आयुष्यात रोमांच हवाय. सबब भाई मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयार नाहीये. तसा तर तो अजूनही तयार नाहीये.
परंतु बाप तिकडे नातवंडांची स्वप्नं बघत भावूक झालेलाय. बापाचं मन राखण्यासाठी भाईस लग्न करावं लागतं.
लग्नाच्या पार्टीत संग्रामगडवाले बाबांचं आगमन. बाबांस विनंती करण्यात येते की संग्रामगडची कहाणी सांगून व-हाडीमंडळींच्या कुतुहलाचं शमन करावं. बाबा विनंतीस मान देऊन निरूपण चालू करतात. पिढ्यानपिढ्यांपासून पाझरत ही कहाणी बाबांपर्यंत आलेली आहे.
हजारो वर्षांपूर्वीचं एक संग्रामगड नावाचं समृद्ध राज्य. परंतु तिथं एक मग्रूर राजकन्या सत्तेवर आली आणि सगळा इस्कोट झाला. तिनं जनतेला छळलं. अजूनही ती प्यासी आत्मा बनून लोकांना छळतेय. शेतकऱ्यांच्या पिकांना आपोआप आगी लागताय. भूकंप, वादळं, ज्वालामुखी, स्फोट, प्रलय सगळं एकदमच घडवून आणण्याची तिची क्षमता आहे. डेंजर प्रकरण आहे.
तेवढ्यात कादरबाबांच्या नजरेस भाई पडतो. कादरबाबा चपापतायत. बाबांच्या लायटा लागतायत. भाईची पूर्वजन्मातली ओळख बाबांना पटतेय.
प्यासी आत्माचा एक फोटोग्राफ पुरातत्ववाल्यांच्या हाती लागलाय. फोटो पॉवरफुल आहे. बाबा तो फोटो फाडण्याचा प्रयत्न करतात. आणि जीव गमावतात. छोटा रोल आहे कादरखानचा.
कादरबाबांचं सर्वांसमक्ष पोस्ट मार्टेम. पोस्ट मार्टेमवाला डॉक्टर बेंटेक्स आहे.
"प्रवासी बंधू आणि भगिनींनो, इकडे लक्ष द्या" ह्या सेल्समनटाईप चालीवर तो पाठ केलेली वाक्यं सुसाट स्पीडनं म्हणून टाकतो आणि गपकन् बंद पडतो. ह्याचं पाठांतर विसरणार तर नाही ना, या धास्तीनं इतर कलाकार त्याच्याकडे बघतायत.
भाईला संग्रामगडचं रहस्य खुणावतंय. भाईला धाडसाची आवड आहे, ही वस्तुस्थिती सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. सगळी फॅमिली एका वडापसदृश जीपमध्ये बसून संग्रामगडकडे जातेय. मध्येच एक गाणं आलेलं आहे. तर मग सगळ्यांना जीपमधून उतरून नाचावं लागतं. नाचताना वेळेचं भान उरत नाही. सूर्य मावळतो. संध्याकाळ होते. हा तर प्यासी आत्म्याची ड्युटी चालू व्हायचा टाईम. चकवा. अशी भयाण काळवेळ.
डाकबंगला. रखवालदार कसा असावा यासंदर्भात रामसे बंधूंनी जी मार्गदर्शक तत्वे लिहून ठेवलेलीयत, हा त्याबरहुकूम आहे..! कोड्यात बोलणारा, म्हातारा, हातात कंदील, चेहऱ्यावर मफलर, भयाचं सावट वगैरे..!
भाई संग्रामगडला आल्याची खबर प्यासी आत्माला लागणं. खंडहराचं द्वार आपसूक उघडणं. पुरातत्व वाल्यांची टीम आत उतरणं. सर्वेक्षण करण्याच्या नावाखाली पाचेक मिनिटं सगळ्यांनी इकडंतिकडं धुमाकूळ घालणं. तिथं एक जीर्ण हस्तलिखित सापडणं. त्यात राजघराण्याची हकीकत असणं.
राजगुरू श्री. शक्ती कपूर यांनी ते हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली असणं.
ह्या बिंदूवर आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागतं.
तीच ती गर्विष्ठ राजकन्या अमृता सिंग. या पृथ्वीवर माझ्याशी लग्न करायला योग्य पुरूषच नाही, असा तिचा दावा. आणि समजा तसा कुणी पुरूष आढळलाच तर ती त्याला मरणवाट दाखवत असते. परिणामी राजमाता, राजगुरू वगैरे हतबल आहेत. कारण राज्याला वारस मिळत नाहीये. कसं होणार? काय होणार? चिंता आहे.
इथे भाईची एंट्री..! म्हणजे पूर्वजन्मातला विक्रमसिंग सूर्यवंशी..! भाईचा कॉस्च्युम/पेहराव सगळा प्राचीन आहे. फक्त टाईट जीन्स आणि शूज तेवढे बदलायचे राहिलेत.
भाई तलवारबाजी व तत्सम स्कीलसेटचा डेमो दाखवतो. अमृतासिंगचा दिल जिंकतो. अमृतासिंग भाईवर भाळते.
त्यातूनच पुढे मग समजा अमृतासिंगला सुहागरात्रीची मज्जा वगैरे कळते. आणि तिला ती गंमत कायमस्वरूपी हवी, असं वाटू लागतं. परंतु भाई म्हणतोय की नाय. मी तुला फक्त झलक दाखवायला आलतो. तेच माझं प्लॅनिंग होतं. आता मी चाललो. मला तुझ्याशी काय घेणं देणं नाय. भाई निष्ठुर आहे, करारी आहे. एकदा ठरवलं की ठरवलं. कुणाचं ऐकत नाय मग.
भाई जायला निघतो. राजगुरू श्री. शक्ती कपूर तलवार उपसून वाट अडवतात. कारण आता हा राज्याच्या इभ्रतीचा वगैरे सवाल निर्माण झालेला आहे.
परंतु भाईपुढं टिकेल असा कोण आहे? भाई सूर्यवंशी आहे. नजरेत त्याच्या सूर्याचं तेज आहे. त्या नजरेच्या एका कटाक्षात शत्रूसैनिकांची धनुष्यं गळून पडतात. सगळ्यांचं अवसान गळाठतं.
परंतु राजगुरू एकटे भाईस भिडतात. तलवारींची खणाखणी..!
तिकडे पॅरलली अमृतासिंगचं जोरदार भाषण चाललेलंय. ती भाईला शाप देतेय. पुन्हा जन्म घेण्याचा धमकीवजा आदेश देतेय. आणि शेवटी किंचाळत टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करतेय. भाईचं लक्ष तिकडे वळतं तेवढ्यात राजगुरू डाव टाकतात आणि भाईच्या पाठीत तलवार खुपसतात.
अलीकडे कटाप्पानंही बाहुबलीच्या पाठीत अशीच तलवार खुपसली. माणसं इतिहासापासून काहीही शिकत नाहीत. असा घात होतो मग.
राजमाता राजगुरूंना झापतेय. पाठीमागून वार करणं बरोबर नाय वगैरे. राजगुरू पश्चातापाच्या आगीत दग्ध. त्यांचं ऐहिक जंजाळातून मन उडतं. विरक्ती येते. आणि ते स्वतःस एकांतात डांबून घेतात. आणि तिथं बसून बसून काय करायचं म्हणून ही सगळी कहाणी लिहून काढतात.
मीनव्हाईल अमृतासिंगचं रूपांतर भटकती आत्मा मध्ये झालंय. ती भाईच्या पुनर्जन्माची वाट बघतेय. विरहाग्नीत तडपतेय. भाई नाही तर काही नाही. भाई नाही तर जीवास शांती नाही, अशी मनाची अवस्था. शिवाय हजारो वर्षांचा हा काळ कसा काढायचा, हा पण प्रश्नच आहे. उत्तर सोपं आहे.
सूर्य मावळला की खंडहरातून जमिनीवर यायचं. वीजांचा कडकडाट करायचा. फुल्ल मेकअप साजशृंगार दागिने वगैरे घालून नाचायचं. पोराबाळांना घाबरंवायचं. जाताजाता पिकं जाळायची. गाववाल्यांच्या जीवनात भीतीचा माहौल निर्माण करायचा. आणि सूर्य उगवला की परत माघारी जायचं. असं तिचं रूटीन आहे. अनंत काळापासून हे दुष्टचक्र चाललेलं आहे.
क्लायमॅक्स. भाई, अमृता सिंग आणि भाईची बायको सोनिया यांच्यामध्ये देमार डायलॉगबाजी. एक संपला की एक.
अमृतासिंग सोनियाला आदेश देतेय की तू तुझं मंगळसूत्र तोडून टाक. कारण मंगळसूत्र तुटलं की भाई सोनियाच्या कचाट्यातून मुक्त होणार असतो. तसा कन्सेप्ट आहे.
सोनिया हा आदेश धुडकावून लावतेय. सोनिया पतिव्रता आहे. सुहागन वगैरे आहे. ती अमृतासिंगला मंगळसूत्राचं महत्व पटवून देतेय. मंगळसूत्राचं नातं श्वासांशी जोडलेलं असतं, वगैरे सैद्धांतिक मांडणी. सोनिया अधूनमधून अमृतासिंगच्या सदसद्विवेकबुद्धीलाही आवाहन करतेय. घोळात घ्यायला बघतेय. प्रेम ह्या संकल्पनेची व्याख्या करतेय.
आणि ह्या दोन स्रियांचं घमासान भाईसाठी चाललेलं आहे. कारण तो सूर्यवंशी आहे. एक दुर्मिळ प्रकारातला पुरूष. नरशार्दुल. किंवा तत्सम नरपुंगव वगैरे.
हा हंत हंत! इतक्या अप्रतिम,
हा हंत हंत! इतक्या अप्रतिम, अद्वितीय आणि काय ते अभिजात वगैरे वगैरे असलेल्या कलाकृतीची ही अशी चेष्टा का चालली आहे?
अहो मध्येच थांबला की लेख
अहो मध्येच थांबला की लेख वाचता वाचता..., क्रमश : पण नाही. का सूर्यवंशी आहे म्हणून सूर्य मावळला की लिखाण बंद असा नियम घालून दिलाय राजगुरूनी.
सगळी फॅमिली एका वडापसदृश
सगळी फॅमिली एका वडापसदृश जीपमध्ये बसून संग्रामगडकडे जातेय
भाईचा कॉस्च्युम/पेहराव सगळा प्राचीन आहे. फक्त टाईट जीन्स आणि शूज तेवढे बदलायचे राहिलेत.
. शिवाय हजारो वर्षांचा हा काळ कसा काढायचा, हा पण प्रश्नच आहे. उत्तर सोपं आहे.
सूर्य मावळला की खंडहरातून जमिनीवर यायचं. वीजांचा कडकडाट करायचा. फुल्ल मेकअप साजशृंगार दागिने वगैरे घालून नाचायचं. पोराबाळांना घाबरंवायचं. जाताजाता पिकं जाळायची. गाववाल्यांच्या जीवनात भीतीचा माहौल निर्माण करायचा.
>>>> चांगलं चाललंय. पूर्ण करा कि स्टोरी.
भारी लिहिलंय... पुढची गोष्ट
भारी लिहिलंय... पुढची गोष्ट सांगा राव पाटील..!
पाहिलाय हा पिक्चर आवडीने
पाहिलाय हा पिक्चर आवडीने
आमच्या बालपणी फार हवा होती याची...
आता चीर फाड लेख वाचतो
आधी वाटले कोविडनंतर आलेलं
आधी वाटले कोविडनंतर आलेलं संकट कि काय !
भारी...
भारी...
डाकबंगला. रखवालदार कसा असावा यासंदर्भात रामसे बंधूंनी जी मार्गदर्शक तत्वे लिहून ठेवलेलीयत, हा त्याबरहुकूम आहे..! >>
नक्कीच या ड्युटीसाठी काही डिप्लोमा वगैरे असेल.
सोनिया हा आदेश धुडकावून
सोनिया हा आदेश धुडकावून लावतेय. सोनिया पतिव्रता आहे. सुहागन वगैरे आहे. ती अमृतासिंगला मंगळसूत्राचं महत्व पटवून देतेय.
<<<<<<<
मग अमृता म्हणते 'शी बा... ऐकतच नाही ही माझं!'
भाई मुळात अमृता त्याच्या मित्राच्या स्थळाला नाकारून त्याला मारून वगैरे टाकते म्हणून तिला धडा शिकवायला येतो ना?
सुषमा सेठच्या फोटोला आत्मा घाबरतो कारण फोटोच्या आत मा असते, हाही भाग रंजक आहे.
अफाट लिहलय तुम्ही, पिक्चरचा
अफाट लिहलय तुम्ही, पिक्चरचा शेवट पण समाविष्ट करा(च). माझ्या शाळेच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर सुर्यवंशी च एक मोठं पोस्टर लावलेल आठवतं. त्यावर सोनेरी केसांचा विग लावलेला आणि त्याच पोनिटेल घातलेला सलमान खान, टाळ्या रंगाचा अप्सरा आणि राजकन्यांचा युनिफॉर्म जो हिंदी पिक्चर मध्ये असतो तो ड्रेस असे हे दोघे उभे आणि खाली आधुनिक कपड्यांत लोणारी शीबा असे एकमेकांना अजिबात मॅच न होणारे तिघे जण दिसायचे. त्यामुळे फार उत्सुकता वाटायची हे सगळे एकाच वेळी एकाच स्टोरी त कसे काय असतील. ह्या प्रश्नाचे उत्तर आज तुमच्या मदतीने मिळाले.
हा हंत हंत! >> rmd +१
हा हंत हंत! >> rmd +१
मग अमृता म्हणते 'शी बा... ऐकतच नाही ही माझं!' >>
भाई मुळात अमृता त्याच्या मित्राच्या स्थळाला नाकारून त्याला मारून वगैरे टाकते म्हणून तिला धडा शिकवायला येतो ना? >> करेक्ट!
संप्रति१ >> लिहा की हो अजून. या सिनेमात एवढा ठासून मालमसाला आहे की तुम्ही इतकं भन्नाट लिहूनही हात आखडता घेतला असंच वाटतंय.
या सिनेमाविषयी तीन बाबी मला फार इंटरेस्टिंग वाटतात (इतरही आहेत पण या प्रामुख्याने)
१) या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा पोर्टफोलिओ - मिस्टर नटवरलाल, दो और दो पांच, आणि खून पसीना. एवढं तगडं ट्रॅक रेकॉर्ड असताना त्याने हा प्रकार बनवला.
२) डायलॉग्ज - वानगीदाखल दोन
अजित वच्छानी सलमानच्या जन्माची कथा सांगताना - "गॉड, वो भी क्या मिस्टरी थी. ऐसा लग रहा था, जैसे बच्चा इस दुनिया में आने से इनकार कर रहा हो. अमरिका के डॉक्टर तक परेशान हो गये. लेकिन टचवुड आज हमारा विकी बिलकुल हेल्दी, होनहार, और बहुतही प्यारा बच्चा हैं."
आणि हा प्यारा बच्चा शीबाला बघितल्यानंतर - "डॅड गडबड होईंग" "व्हाय होईंग?" "मैं जो कपडे अमरिका से लेकर आया हूं वो सोनिया के खूबसूरती को शोभा नही देंगे.
(मागून एक नोकर) - "नही बेटा देंगे." "क्यों?" "क्योंकी गरम गरम आलू के पराठे बन रहे हैं."
३) अंधश्रद्धा निर्मूलन
जेव्हा भाई, शीबा आणि कं. संग्रामगडला निघतात तेव्हा वाटेत त्यांना काळी मांजर आडवी जाते. भाई गाडी न थांबवता तशीच चालवत राहतो. शीबा त्याला म्हणते की अरे अपशकुन झाला, गाडी साईडला घे. यावर भाई गाडी मागे फिरवतो. हायवेवरून उतरून कच्च्या रस्त्याने त्याच मांजराचा पाठलाग करतो. जिवाच्या आकांताने पळणार्या मांजराला गाठतो, चालत्या गाडीत बसल्या बसल्या उचलतो, गाडी परत फिरवतो, हायवेवर जिथे ती आडवी गेली होती तिथे परत जातो. मग गाडीतून तिला खाली सोडतो आणि म्हणतो,
"जा वापस मावशी".
पायस
पायस