आस्तिकायण आणि नास्तिकायण - नीरक्षीरविवेकी संवाद

Submitted by ती पुन्हा गाईल on 17 December, 2023 - 00:47

शीर्षक अगदी ढोबळ दिलेलं आहे. या लेखाला शीर्षक काय द्यावे हे समजत नाही. मुळात हा लेख लिहावा का ? प्रकाशित करावा का हे ही कळत नाही. गेल्या काही वर्षात काही धूमकेतूसारखे विचार येतात आणि दिसेनासे होतात. नंतर त्याचा मागमूस राहत नाही. पण पुन्हा काही काळाने नवा धूमकेतू दिसला कि जुन्यांची आठवण व्हावी तसा प्रकार आहे. या वेळी हे विचार मावळण्याच्या आत मांडावे असे वाटल्याने हा प्रपंच. याला आस्तिक नास्तिक संघर्ष म्हणायचे का हे वाचून ठरवावे. पण दिशा पाहून आत्मा ओळखून त्याप्रमाणे प्रतिसाद द्यावेत ही विनंती.

गेल्या काही वर्षात आपली वाटचाल पुन्हा अविवेकाकडे चालली आहे का अशी शंका यावी अशी परिस्थिती दिसत होती. अवैज्ञानिक गोष्टींचा झुंडीने प्रचार, त्याला विरोध करणार्यांचा असांसदीय भाषेत केलेला उद्धार यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती.

या विरोधात सुरूवातीला क्षीण का होईना आवाज उठला. सत्य सांगणे गरजेचे असते. असे म्हणतात कि सत्याला प्रचाराची गरज नसते. कारण सत्य हे फक्त सत्य असते.

तुझं सत्य
माझं सत्य
याचं सत्य
त्याचं सत्य
असे सगळे वर्ख गळून पडतात तेव्हां उरतं ते निखळ सत्य.

पण सत्याचे पापुद्रे चढवून असत्य प्रसवलं जातं तेव्हां सत्य आणि असत्य यातला फरक समजणे जिकीरीचे होते. यातून स्युडो सायन्सचा उदय होतो. सायन्स हे दुसरे तिसरे काहीही नसून सत्याचा शोध आहे. हा शोध निरंतर आहे. आजचे सत्य उद्या कालबाह्य होते आणि नवेच सत्य समोर उभे ठाकते तेव्हां ते सत्य स्विकारणे हा दृष्टीकोण अंगिकारणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टी होय. ही वैज्ञानिक दृष्टी प्रस्थापित करणे मानवासाठी श्रेयस्कर आहे. त्याच बरोबर सदसदविवेकबुद्धीचा अंगिकार करणे हे ही श्रेयस्कर आहे.

वैज्ञानिक दृष्टीचा प्रचार आणि प्रसार होत गेला कि आपोआप स्युडो सायन्स, अवैज्ञानिक बाबींना आळा बसतो. त्यामुळे सत्यासाठी आवाज उठवणे खूप गरजेचे होते.

आपली जिथपर्यंत पोहोच आहे तिथपर्यंत आपले म्हणणे पोहोचले आहे असे रॅशनल कंपूला वाटत नाहीये का ?
आपले रॅशनल विचार आपल्या परीघात जिथपर्यंत पोहोचायचे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचा त्यांच्यावर जो काही सकारात्मक / नकारात्मक परिणाम व्हायचा तो झालाच असेल.

ज्याप्रमाणे अवैज्ञानिक प्रचाराचा अतिरेक हा नॉशिया आणतो तसे उठता बसता रॅशनॅलिझमचा अतिरेकी प्रचार सुद्धा नॉशिया आणतो का ?
विचार आत्मसात व्हायला वेळ द्यावा लागतो. सतत मारा करून बुद्धीला विचार करायला वेळ मिळत नसेल तर मग ते पीअर प्रेशर ठरते. जे लोक स्वत:चे मत मांडायला कचरतात ते एकीकडून सनातनी आणि दुसरीकडून पुरोगामी यांच्या कचाट्यात सापडतात. त्यांना काय बरोबर काय चूक हे कळेनासे होते.

एक वेळ अशी येते की सनातनी प्रचारातली हवा निघून जाते. पुढे पुढे ही मंडळी पूर्वीच्या जोमात आणि जोशात तसला प्रचार करू शकत नाहीत. याचाच अर्थ त्यांचा स्वत:च्या कॅंपेनवरचा विश्वास उडालेला असतो. हवा गेलेली असते पण निव्वळ कंपूत असण्याने प्रचार करणे कर्तव्य उरलेले असते. ही वेळ घुसळणीची असते. अशा वेळी समाजाला वेळ द्यावा लागतो.

रोजच्या रोज नवे दैदीप्यमान विचार देऊन आपण सर्व काळ समाजाला दिपवू शकत नाही. उलट वारंवार तेच तेच विचार मांडत राहील्याने त्याला एक प्रकारचा रेझिस्टन्स तयार होतो. अती काहीच चांगलं नाही. मग ते उत्तम का असेना !

हल्ली श्रद्धेला सुद्धा वैज्ञानिक आधार देता येतो. सश्रद्ध मनुष्य सुद्धा आपल्या श्रद्धेला विज्ञानाशी जोडून घेऊ पाहतो. हे सगळेच बंडलबाज असतात असे मत बाळगणे हा विवेक नाही. कोण कुठल्या हेतूने आपले मत बनवतो हे तपासणे हा नीरक्षीरविवेक वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या जोडीने बाळगणे हे शहाणपण आहे. तसेच आपल्या श्रद्धा तपासून घेत वैज्ञानिक दृष्टीकोणाला सोडचिट्ठी न देणे हे ही शहाणपण आहे.

कुणाच्या श्रद्धांवर रोज उठून आक्रमण करणे हे ही शहाणपण नाही. एखाद्याची श्रद्धा अत्यंत वैयक्तिक असेल, त्या श्रद्धेची सक्ती होत नसेल आणि एखादा व्यक्ती त्यात खूष असेल, त्याची भरभराट झाली आहे असा त्याचा समज असेल तर त्याच्या पर्सनल स्पेसवर अतिक्रमण करून त्याला चर्चेला भाग पाडून माझं हे मत स्विकारच असा दुराग्रह योग्य आहे असे वाटते का ?

आपली मतं कितीही अचूक असू द्यात ती आक्रस्ताळी होताहेत का ? आपण ज्या सनातनी विचारांना विरोध केला त्यातल्या आक्रस्ताळी प्रचारामुळेच त्या विचारांचे अवमूल्यन आपोआप होत असते. आक्रस्ताळीपणा ही रणनीती झाली. ती विचारांवर मात करते. विचार सत्याकडे झुकणारे असणे आणि सत्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. सत्याची सक्ती करता येत नाही. ते मांडले तर पाहिजेच पण कुणाच्या विचारांची मग ते चुकीचे का असेनात गळचेपी तर होत नाही ना हे पाहणे हे विवेकवादात येत नाही का ?

बद्रीनाथला पहाटे उठून गेलो होतो. बद्रीनाथचा संपूर्ण इतिहास माहिती होता. पण माझ्यासोबत जो साथीदार होता तो स्वत: मानसशास्त्रज्ञ होता. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा नातू आणि पुरोगामी विचारांशी नाते असणारा होता. पण वैयक्तिक जीवनात सश्रद्ध होता. त्याच्या साठी हजारो वर्षांचा इतिहास माहिती असणे गरजेचे नव्हते. मानसशास्त्रातले त्याचे योगदान वादातीत आहे. फावल्या वेळेत जाहीरात कंपन्यांसाठी मॉडेलिंग करणे हा छंद असल्याने सोशल मीडीयात जाऊन वैचारीक लढाया करणे, आपल्या मताचा हिरीरीने पुरस्कार करणे यापासून तो अलिप्त होता.

त्याने पहाटे तीनच्या थंडीत मंदीर उघडण्याची वाट बघत नदीच्या काठावर वाट पाहिली. त्याच्या सोबत मी सुद्धा होतो. थंडी मी म्हणत होती. मंदीर उघडले तेव्हां ठिकठिकाणचे साधू वगळता कुणीच नव्हते.

समोर बद्रीनाथाची मूर्ती होती. दिवे आले होते. त्याने हात जोडले. माझ्या डोळ्यासमोर हजारो वर्षांचा इतिहास होता. दीड हजार वर्षांची ऐतिहासिक मूर्ती समोर होती. त्याचे डोळे मिटलेले होते. चेहर्यावर आत्मिक समाधान दिसत होते. थोड्या वेळाने त्याचे डोळे उघडले तेव्हां दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्याच्या या भावना त्याच्या पुरत्या खर्या नाहीत का ? तो या भावनांचा प्रचार करणार नाहीये. त्याच्या श्रद्धांमुळे त्याची अवनती होणार नाही. तो मिश्रा आहे म्हणजे उच्चवर्णिय आहे. याचाच अर्थ या श्रद्धांमुळे त्याच्या निन्म सामाजिक दर्जाचे उदात्तीकरण होत नहीये. गुलामीत राहण्याचे कारण त्याच्याकडे नाही. मुख्यमंत्र्याचा नातू आणि प्रभावी राजकारणी घराणे अशी पार्श्वभूमी असल्याने त्याची श्रद्धा ही गांजल्यामुळे आलेली नाही.

तर मग खाजवून खरूज काढून तुझ्या डोळ्यातून अश्रू का आले म्हणून वाद घालण्यात अर्थ नसतो.

तंबूत पोहोचल्यावर त्याने त्याच्या मानसिक अवस्थेचे वर्णन करायचा प्रयत्न केला पण मला ती अवस्था सांगता येत नाही असे त्याचे म्हणणे होते. तो एका वेगळ्या तरल पातळीवर पोहोच ला होता.

महिनाभराने परतीच्या प्रवासात त्याने मला हात का जोडले नाहीत असे विचारले तेव्हां माझी स्थिती सांगितली. तेव्हां तो हसला आणि म्हणाला तुझ्या जागी तू योग्य आहेस. माझ्या जागी मी.

ही भूमिका आपण का स्विकारत नाही.
ज्यांना ही भूमिका लागू करणे धोक्याचे आहे ते सोडून इतरांसाठी आपण आपले म्हणणे सौम्यपणे का सांगू शकत नाही?
सध्या सोशल मीडीयात सनातन्यांना उत्तर देता देता तोच आक्रस्ताळीपणा आपल्यात सुद्धा आलेला आहे का असे वाटू लागले आहे.
काय वाटते ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर, संतुलित लेख....
माणसानं निर्लेप आयुष्य अनुभवावं असचं वाटतं.

छान लिहिलय. पटलच. आज फार गरज वाटतेय अशा समन्वयाची.
वु अॅग्री टू डिफर हा स्टँड का घेता येऊ नये एका विशिष्ट कालावधी/ चर्चे नंतर? सतत हमरातुमरी, सतत कुरघोडी, सतत वैयक्तिक पातळीवर उतरणे,... या सगळ्यातून काय साध्य होते, खरच कळत नाही.

याच स्वरुपाचे विचार इथे लिहिले होते :
https://www.maayboli.com/node/11520

आक्रस्ताळेपणा करणे, कोणाला चर्चा करण्यात रस नसताना सारखे चिडवत तेच तेच बोलणे हे टाळावे हे पटते.

कुठे काही "अतार्किक/ अवैज्ञानिक" दिसले तर आपले मत तिथे मांडण्याचा नास्तिकांचा अधिकार आहे, जसा आपल्या श्रद्धेसंबंधी श्रद्धावान लोकांना लिहिण्याचा हक्क असतो.

नास्तिक लोकांवर सरसकट असं का म्हटलं जातं? इथे माझ्यासारखे अनेक नास्तिक आहेत, जे अकारण कधीच आस्तिक्यावर टिकाटिपण्णी करत नाहीत.

विश्व हे परिवर्तन वादी आहे योग्य वेळी योग्य ते परिवर्तन होत राहते.
पण कोणताच बदल हा कायम स्वरुपी टिकत नाही.

समाजाला पण तोच नियम लागू आहे.
त्या मुळे स्वतः मध्ये हवे ते बदल करा पण दुनियेला बदलायला जावू नका.
काही निष्पन्न होणार नाही

लेख आवडला.

असत्य प्रवसलं जातं ## हे सुधारावे लागेल

<<<एखाद्याची श्रद्धा अत्यंत वैयक्तिक असेल, त्या श्रद्धेची सक्ती होत नसेल आणि एखादा व्यक्ती त्यात खूष असेल, त्याची भरभराट झाली आहे असा त्याचा समज असेल तर त्याच्या पर्सनल स्पेसवर अतिक्रमण करून त्याला चर्चेला भाग पाडून माझं हे मत स्विकारच असा दुराग्रह योग्य आहे असे वाटते का ?>>>

पूर्णपणे सहमत..

त्या श्रद्धेने दुसर्‍या कोणाचे काहीही नुकसान होत नसेल किंवा काही त्रास होत नसेल तर खरेच वादावादी करू नये.

लेख आवडला. पुन्हा नक्की वाचेन.

छान लेख.

लहान मुलांना आस्तिक बनवावे की नास्तिक?
https://www.maayboli.com/node/77376

हा प्रश्न मी एकदा मायबोलीवर विचारला होता. चर्चाही झाली होती.
कोणाला त्याचे नव्याने उत्तर सुचले तर तिथे जरूर द्या.

माझा स्वतःचा आजवरचा प्रवास साधारण ३ टप्प्यात असा झाला आहे.

१) घरच्यांच्या आणि समाजाच्या प्रभावाखाली बनलेला आस्तिक
२) आपल्याला कुठल्या देवाची गरज नाही, देव वगैरे बंडल असते असे समजणारा आणि ते लोकांना पटवून द्यायला हुज्जत घालणारा अप्रगल्भ नास्तिक
३) प्रत्येकाच्या देवाधर्माच्या श्रद्धेचा आदर करणारा प्रगल्भ नास्तिक

फार फार सुरेख लिहीलेले आहे.
>>>>>>रोजच्या रोज नवे दैदीप्यमान विचार देऊन आपण सर्व काळ समाजाला दिपवू शकत नाही. उलट वारंवार तेच तेच विचार मांडत राहील्याने त्याला एक प्रकारचा रेझिस्टन्स तयार होतो. अती काहीच चांगलं नाही. मग ते उत्तम का असेना !
_/\_

चिंतन आवडले. याला ठोस असे काही उत्तर नाही.
अस्तिक व नास्तिक यात एक मोठा स्पेक्ट्रम आहे. सर्व नास्तिकांना ही एका वर्गात टाकता येणार नाही व अस्तिकांनाही. नास्तिकांनाही प्रतिक लागतात. लोगो,फोटो,घोषवाक्ये यातून ते व्यक्त होताना दिसतात.अमूर्त गोष्टीला मूर्त करण्यासाठी काही प्रतिके लागतात. हम होंगे कामयाब हे पुरोगामी कार्यक्रमात म्हटले जाणारे स्फ्रूतीगान हे भाबडा का होईना आशावाद व्यक्त करतो.
. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला काही गोष्टींचे नव्याने आकलन होत असते. ही अनएंडिंग प्रोसेस आहे.श्रद्धेचा जसा कडवेपणा असतो तसा अश्रद्धेचाही असतो. हा कडवेपणा आपापले विरोधकांना डिवचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वापरला जातो. कुरुंदकर म्हणतात की खरे अस्तिक वा खरे नास्तिक 1 टक्काच असतात देव धर्म श्रद्धा अश्रद्धा अंधश्रद्धा नास्तिक्य अस्तिक्य पुरोगामी प्रतिगामी, जात, अस्मिता अशा शब्दांमूळे काही लोक ट्रिगर होतात
नास्तिकतेच्या टप्प्यातील काही लोक सश्रद्ध व अस्तिक लोकांविषयी ममत्व बाळगून असतात त्यांना कट्टर नास्तिक लोक 'कच्चे मडके' असे संबोधतात. त्यांचे मते ईश्वर मानणार्‍यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व नास्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. सामाजिक दबावामुळे तसे थेट म्हणण्याचे ते धाडस करत नसतील पण त्यांच्या लेखनशैलीतून/ बोलीतून तसे जाणवते. ईश्वर मानणारा तो अंधश्रद्ध अशी ती थेट मांडणी आहे. ईश्वर ही अवैज्ञानिक संकल्पना जो मानतो तो विज्ञाननिष्ठ तर नाहीच नाही पण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाराही नव्हे.
मानवी मन हे अजून विज्ञानाला संपूर्णपणे उमगलेले नाही. यावर दुमत नसावे. ईश्वर या संकल्पनेचा उगम मानवी मनात आहे. या मनाचे स्थान मेंदूत आहे हे आजतरी विज्ञानाला मान्य आहे. ईश्वर ही संकल्पना प्रत्येकाची वेगळी असू शकते. निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन वगैरे वगैरे. मानवी मनाला कधी ना कधी आधाराची गरज लागतेच. मग तो अस्तिक असो वा नास्तिक. मनुष्य हा काही जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे कि ज्याला विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन वगैरे गोष्टीचा प्रोग्राम फिड केला आहे. त्याला भावना आहेतच की.
आता राहिला मुद्दा उपयुक्ततेचा. जोपर्यंत ईश्वर या संकल्पनेची उपयुक्तता मानवी जीवनात आहे तो पर्यंत ईश्वर ही संकल्पना राहणारच. ज्यावेळी ही उपयुक्तता संपेल त्यावेळी ईश्वर ही संकल्पना आपोआप हद्दपार होईल. कारण ईश्वर ही संकल्पना मानवानेच निर्माण केली आहे.

Happy खूप छान- संयत लेखन, मनापासून आवडले. बरेचदा अगदी अगदी झाले.

रोजच्या रोज नवे दैदीप्यमान विचार देऊन आपण सर्व काळ समाजाला दिपवू शकत नाही. उलट वारंवार तेच तेच विचार मांडत राहील्याने त्याला एक प्रकारचा रेझिस्टन्स तयार होतो. अती काहीच चांगलं नाही. मग ते उत्तम का असेना !
>>>>> लक्ष लक्ष अनुमोदन.

सर्वांचे धन्यवाद.

कॉमी - कुठे काही "अतार्किक/ अवैज्ञानिक" दिसले तर आपले मत तिथे मांडण्याचा नास्तिकांचा अधिकार आहे, जसा आपल्या श्रद्धेसंबंधी श्रद्धावान लोकांना लिहिण्याचा हक्क असतो. >>> याबद्दल काहीच म्हणणे नाही किंवा आक्षेप सुद्धा नाही. धाग्याचा विषय फक्त आपल्या वर्तुळात आपले म्हणणे मांडून झालेले असताना function at() { [native code] }इरेक करणे, पुन्हा पुन्हा तीच ती मांडणी त्याच त्याच लोकांपुढे करणे आणि ज्याच्या पासून त्रास नाही, जो अजेण्ड्याचा भाग नाही अशा व्यक्तीच्या सहज म्हणून व्यक्त झालेल्या श्रद्धेवर संशय घेत हल्ला करण्याबद्दल आहे.
हेल्दी वातावरणात अशांशी चर्चा होऊ नये असा याचा अर्थ नाही. पण जर एखाद्याला नको असेल तर थांबले पाहिजे, आदर केला पाहिजे.

भ्रमर - सत्याचा पापुद्रा लावून असत्य प्रसवणे असेच म्हणायचे आहे. म्हणजे एखाद्या खोट्या गोष्टीला हेतुतः वरकरणी सायंटिफिक दाखवून तिच्या आडून अजेण्डा राबवणे.

प्रघा - धन्यवाद सविस्तर प्रतिसादाबद्दल. समजून घेईन.

आस्तिकाला ‘देव नाही’ म्हणू नये कोणी
एवढेही ठार नास्तिक असू नये कोणी

- संदीप खरे

विचारमंथन चांगलं मांडलं आहे. शीर्षकही आवडलं - आस्तिक/नास्तिकाचा प्रवास कसा होतो आहे आणि पुढे कुठल्या दिशेने झालेला उपकर असू शकेल ते आयन.

हा विषय गुंतागुंतीचा आहेच - इथे मायबोलीवरच यावरून कित्येक वाद/चर्चा घडल्या आहेत.
मुळात या शब्दांच्या व्याख्या ठरवण्यापासूनच गोंधळ सुरू होतो. ‘शाकाहारी > दुग्धाहारी > अंडाहारी > पक्ष्याहारी > पश्वाहारी’ वगैरेंसारख्या त्यातही पायऱ्या आहेत - किंवा ते एक रंगपटल (spectrum) आहे असं वाटतं. ‘देवावर विश्वास आहे पण कर्मकांडावर नाही’ किंवा ‘धार्मिक नसतानाही सांस्कृतिक परंपरा म्हणून सणवार करायला आवडतात’ इत्यादी.

विवेक जपावा - हे तर बहुधा सगळ्या जगण्याचंच सार. पण विवेकाची व्याख्यादेखील व्यक्तीगणिक बदलते. ‘आपली money management हीच योग्य आणि इतर सगळे उधळे किंवा कृपण’ अशासारखंच याही बाबतीत प्रत्येकालाच वाटतं.

मी बहुधा काहीच हाती लागू न देणारी लंबीचवडी पोस्ट लिहून दाखवली आहे या ठिकाणी. Proud

@भ्रमर, ओह ओके !! धन्यवाद.

मी बहुधा काहीच हाती लागू न देणारी लंबीचवडी पोस्ट लिहून दाखवली आहे या ठिकाणी >>> Lol

पण विवेकाची व्याख्यादेखील व्यक्तीगणिक बदलते. >>> मान्य.
अगदी संयमाची व्याख्या सुद्धा ज्याची त्याची बदलते. संयमाचे दुसरे नाव फिरोजखान असे म्हटलेच आहे.
कुर्बानी मधे वसनमोहत्यागिणी झीनत अमान फिखा ला विचारते कि "क्या देखते हो ?" तेव्हां तो "सूरत तुम्हारी" हे उत्तर देतो.
ती सुद्धा त्याच्या उत्तरावर "चल झूठे" म्हणत नाही म्हणजे ते खरेच होते.

एव्हढा संयम अ‍ॅनिमल च्या काळातल्यांना कसा कळणार ?
सांगायचे म्हणजे व्याख्या साक्षेपी असतात.

>> अगदी संयमाची व्याख्या सुद्धा ज्याची त्याची बदलते. संयमाचे दुसरे नाव फिरोजखान असे म्हटलेच आहे.
कुर्बानी मधे वसनमोहत्यागिणी झीनत अमान फिखा ला विचारते कि "क्या देखते हो ?" तेव्हां तो "सूरत तुम्हारी" हे उत्तर देतो.
ती सुद्धा त्याच्या उत्तरावर "चल झूठे" म्हणत नाही म्हणजे ते खरेच होते.>> Lol
लेख पटला. मी नेहमीच दोन गोष्टींच्या मधोमध उभी असते. ना १००% इकडे ना तिकडे. पूर्ण आस्तिक, पूर्ण नास्तिक असं नाहीच.

आपल्या श्रद्धा तपासून घेत वैज्ञानिक दृष्टीकोणाला सोडचिट्ठी न देणे हे ही शहाणपण आहे.

कुणाच्या श्रद्धांवर रोज उठून आक्रमण करणे हे ही शहाणपण नाही. एखाद्याची श्रद्धा अत्यंत वैयक्तिक असेल, त्या श्रद्धेची सक्ती होत नसेल>>> पटलं

हा विषय गुंतागुंतीचा आहेच -
मुळात या शब्दांच्या व्याख्या ठरवण्यापासूनच गोंधळ सुरू होतो. ‘शाकाहारी > दुग्धाहारी > अंडाहारी > पक्ष्याहारी > पश्वाहारी’ वगैरेंसारख्या त्यातही पायऱ्या आहेत - किंवा ते एक रंगपटल (spectrum) आहे असं वाटतं. ‘देवावर विश्वास आहे पण कर्मकांडावर नाही’ किंवा ‘धार्मिक नसतानाही सांस्कृतिक परंपरा म्हणून सणवार करायला आवडतात’ इत्यादी. >>>हे खर आहे.

लहान मुलांना आस्तिक बनवावे की नास्तिक? >>>>
खर तर आपण काही बनवू नये. त्यांना स्वानुभवातून घडू द्यावे म्हणजे ते जे काही बनतील त्यांचे विचार सुस्पष्ट असतील, त्यांच्या कृती किंवा त्यांच्या विचारा मागची कारणे त्यांना माहीत असतील. आयुष्य थोड सोपं होईल त्यांच्यासाठी..

काही भाग पटला नाही; विशेषतः हे 'त्या' लेखमालेच्या संदर्भात असेल तर. एकदा त्यांनी त्यांचे अनुभव सार्वजनिक करायला सुरुवात केली की त्यावर प्रतिक्रिया देणं , हे त्यांच्या पर्सनल स्पेसवर आक्रमण होत नाही.
शिवाय हल्ली ( हे हल्ली किमान शंभर + वर्षे मागे नेता येतं- प्रचारतंत्राचा उदय झाल्यापासून - ढोबळमानाने पहिल्या महायुद्धापासून) कोण अजेंडा धरून लिहितंय, कोण वापरलं जातंय, आणि कोण विशिष्ट उद्देशाने निर्मिलेल्या सिस्टिम /जालाचा भाग झालंय हे सांगणं कठीण आहे. उदा: मैं भी अण्णा हजारेचा काळ आठवा.

संयत भाषेबद्दल बोलायचं तर हा ज्याचा त्याचा स्वभावगुण. तिथे संयत भाषेत आक्षेप नोंदवणारे अन्यत्रही तसंच करतात. त्यांच्या लेखनावर जेव्हा जहाल टीका होते, तेव्हाही संयत भाषेतच उत्तर देतात. उलट काही जण प्रत्येक ठिकाणी जहाल , टोकेरी भाषा वापरतात. पुन्हा - पब्लिक फोरमवर हे चालणारच.

आता आक्षेप घेतलेले ज्यांना खटकतात त्यांच्यासाठी दुसर्‍या क्षेत्रात वापरली जाणारी एक संज्ञा लागू पडते - Suspension of disbelief is the avoidance—often described as willing—of critical thinking and logic in understanding something that is unreal or impossible in reality, such as something in a work of speculative fiction, in order to believe it for the sake of enjoying its narrative..

If I may add, they believe it because they want/ need to believe it , either knowing fully well or half heartedly.

बाकी प्रत्यक्ष आयुष्यात आस्तिक आणि नास्तिकांची जोडपी सुखाने नांदत असतात. देव न मानणारे विंदा बायकोसाठी आपलं सुतारकामाचं कौशल्य वापरून देव्हारा घडवतात. (पुस्तक वाचल्याला बराच काळ लोटलाय. चूभूदेघे). माझ्या नात्यातला नास्तिक तरुण मुलगा घरच्या झाडावरचं फूल काढून आजीला देवाला वाहण्यासाठी देतो.

सत्य हे फक्त सत्य असते म्हणजे काय? जशी अधिक माहिती मिळते , तसे कालचे सत्य आज असत्य असल्याचेही कळते. सगळ्यात मोठं उदाहरण - आपली सूर्यमाला पृथ्वीकेंद्री आहे असा समज बराच काळ होता. मग ते असत्य असून ती सूर्यकेंद्री आहे, हे कळलं. नव्या माहितीच्या उजेडात विज्ञान आपलं कालचं सत्य आज असत्य आहे, हे स्वीकारायला तयार असतं.

भरत , न पटणे हा तुमचा अधिकार आहे.
पण काही एक गृहीत धरून पटवून न घेणे याबद्दलच आहे ते. पुन्हा एकदा वाचा. कदाचित काही मुद्दे आपोआप स्पष्ट होतील.

हो.
मुळात कोणाचा उद्देश काय हे न पाहता, मांडलेल्या गोष्टी . मुद्द्यांवर impersonal असं ( व्यक्तिगत न होता) लिहिणं वावगं वाटू नये.
थांबतो.

धन्यवाद. चर्चा करू नये, उद्देश लक्षात आल्यानंतर प्रतिवाद करू नये असे कुठेच म्हटलेले नाही.

Submitted by भरत. on 18 December, 2023
>> +१

<< विज्ञान आपलं कालचं सत्य आज असत्य आहे, हे स्वीकारायला तयार असतं. >>

पण याला धर्म/देवावरचा विश्वास तयार असतो का? एखाद्या गोष्टीवर कुठलीही चिकित्सा न करणाऱ्या, आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्या आस्तिकांना असे प्रश्न पडत नाहीत.

माझ्या मते आस्तिक/नास्तिक हा वाद निरर्थक आहे. मी स्वतः: apatheist आहे, देवाच्या असण्याने किंवा नसण्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही.

खाद्या गोष्टीवर कुठलीही चिकित्सा न करणाऱ्या, आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्या आस्तिकांना असे प्रश्न पडत नाहीत>>>>

आस्तिक म्हणजे सरसकट सगळे अंधश्रद्ध, देवभोळे, अविचारी, अवैज्ञानिक, अशास्त्रीय, किंवा तर्कशून्य..
तर
नास्तिक म्हणजे अत्यंत विचारी, वैज्ञानिक, शास्त्रीय, सडेतोड व विचारांची धार असणारे, तर्क शास्त्री ..
त्यामुळेच एकंदर नास्तिक उजवे किंवा अस्तिकांच्या वरचढ ..

असे एकंदर ढोबळ मानाने जे वर्गीकरण गेले काही दिवस मा बो वर वाचायला मिळतंय त्याच हसू येतंय.

Pages