✪ शारीरिक पातळीवर आई न होऊ शकण्याची वेदना
✪ घटस्फोट, ताण आणि सामाजिक चाको-या
✪ रक्तापलीकडच्या भावनिक नात्याची गुंफण
✪ डिप्रेशनमधून पुढे येणारी मुलगी- एक्स्प्रेशनची बॉस तेजश्री प्रधान
✪ बेस्ट सीईओ पण नापास बाबाचा प्रवास
✪ चाको-या मोडणारी "प्रेमाची गोष्ट"
✪ छोट्या "सईचा" अप्रतिम अभिनय
नमस्कार. सामान्यपणे टीव्हीवरच्या मालिका म्हंटल्या की ठराविक मांडणी असते. त्याच त्या गोष्टी दाखवल्या जातात. क्वचितच काही उल्लेखनीय असं बघायला किंवा अनुभवायला मिळतं. पण सध्या असा एक अनुभव अनेकांनी घेतला येत असेल. स्टार प्रवाहवरची "प्रेमाची गोष्ट" मालिका! समाजात सुरू असलेल्या गोष्टी, ताण- तणाव, घटस्फोट, शरीराच्या पातळीवर आई न होणं व त्याची वेदना, समाजाच्या नजरेमुळे होणारी घुसमट अशा गोष्टी ह्या मालिकेत आहेत. पण त्याबरोबर अशी चाकोरी कशी मोडता येते, शरीराने नाही पण मनाने व भावनेने नातं कसं जोडलं जातं हेही त्यात बघायला मिळतं आहे.
मालिकेची गोष्ट थोडक्यात सांगायची तर सागर कोळी (राज हंचनाळे) हा बेस्ट सीईओ पण छोट्या सईचा (इरा परवडे) तिला वेळ न देणारा बाबा आहे. त्याचा व त्याच्या बायकोचा घटस्फोट होतो. छोट्या सईला तिची विभक्त झालेली आई प्रेम देत नाही आणि बाबाकडे वेळ नसतो. ती जणू नो मॅन्स लँडमध्ये जगत असते. अशा वेळेस तिच्या आयुष्यात येते तिच्या शेजारी राहणारी मुक्ता आंटी. काही नाती अगदी आपोआप जोडली जातात. हार्ट टू हार्ट कनेक्ट होतात. असं छोट्या सईचं व मुक्ता आंटीचं नातं जुळतं. डॉ. मुक्ता (तेजश्री प्रधान) ही शारीरिक कारणामुळे आई होऊ न शकणारी मुलगी. त्यामुळे ठरलेलं लग्न मोडल्यावर सतत अनेकांचा नकार पत्करत असलेली मुलगी. त्या डिप्रेशनमधून पुढे येऊन डॉक्टर म्हणून स्वत:चा व्यवसाय करणारी मुलगी. तिला सई भेटल्यावर मुक्ताचा आई होण्याचा प्रवास सुरू होतो. छोट्या सईला मुक्ता आंटी व मुक्ताला सईची ओढ निर्माण होते. इतर अनेक कथानक- उपकथानक ह्यामधून जात ही मालिका पुढे जाते. सध्या ही मालिका अशा वळणावर आली आहे जिथे छोट्या सईला तिची माया लावणारी आई मिळणार आहे आणि परत एकदा ती तिच्या बाबांकडे राहायला येणार आहे. सईच्या नजरेतून मुक्ता आंटीची मुक्ता आई होण्याचा प्रसंग भावुक करतो आणि छोट्या सईने म्हणजे इरानेही अभिनयाची कमाल केली आहे.
इतर मालिकांमध्ये असतं तसं ह्या मालिकेतही ताण, अहंकार, स्वत:ला खरं करण्याची वृत्ती, दुष्टपणा अशा गोष्टी आहेतच. नकारात्मक भुमिका करणा-यांनीही प्रभावी वाटेल असंच काम केलं आहे. पण त्याबरोबर बापू, पुरूभाऊ अशा पात्रांचा समंजस दृष्टीकोण मनाला भावतो. जीव लावणा-या मित्रांचीही ही गोष्ट आहे, एकमेकींना खुन्नस देणा-या आणि सतत भांडणा-या व्यक्तीरेखाही आहेत. पण त्याबरोबर बेस्ट फ्रेंड असलेल्या जिजूसारख्या नात्याचीही त्यात केमिस्ट्री आहे. अशा अनेक विपरित छटा एकत्र आणूनही त्या गंभीर किंवा "लाउड" न होता हलक्याफुलक्या राहतील अशी काळजी दिग्दर्शकांनी घेतली आहे. सहाय्यक भुमिकांमधील पात्रंही लक्ष वेधून घेतात.
अशा ह्या गोष्टीतली पात्रं सामाजिक मान्यता, जातीभेद अशा चाको-यांच्या अलगद पलीकडे जातात. शरीराने किंवा लौकीक अर्थाने आई असणं ह्याही पलीकडे खरं आईपण असणं किती महत्त्वाचं हे ही गोष्ट सांगून जाते. जन्म देणारी आईसुद्धा कधी कधी आई नसते आणि जिचा काहीच संबंध नाही ती व्यक्तीसुद्धा छोट्या सईच्या नजरेत "बेस्ट मॉम" ठरते हे ह्यात दिसतं. एका बाजूला जिथे समाजात अनेक लोक संवादाचे पूल तोडून डेड एंडकडे आणि एकाच बाजूकडे जाताना दिसतात तिथे अशा संवाद करणा-या व जोडणा-या व्यक्तीरेखा बघताना वेगळा आनंद मिळतो. नात्यांचा अर्थ, पालक असणं, जिव्हाळा, बाँडिंग अशा अनेक पैलूंवर भाष्य करणारी अशी ही वेगळी गोष्ट ठरते. जिथे रस्ता संपला आहे असं वाटतं, तिथे रस्ता संपत नसतो हे सांगणारी ही मालिका ठरते.
- निरंजन वेलणकर 09422108376. 16 डिसेंबर 2023.