पक्या......

Submitted by sarika choudhari on 15 December, 2023 - 06:41

पंकज अर्थात पक्या आजच तुरुंगातून सुटून आला. रात्री खुप मार मार मारल होतं पोलीसांनी त्याला. कारणही तसच होत. पाकीट मारल होतं त्यानी एका साहेबाच. आणि हे काही नवीन नव्हतं.आठवड्यातून दोनदा पोलीस स्टेशनची वारी असायचीच. पोलीस स्टेशन बाहेर त्याचे मित्र वाट पाहत होतेच. पक्याची स्वारी निघाली वस्तीत. टवाळ पोरं घर नाही. घर असुन घरात कोणी नाही आणि असलं तरी कोण ऐकणार आहे घरातल्याच. जन्मापासुन मारामाऱ्या भांडण पाहत आलेली ही पोरं. आता तर शरीरा बरोबर मनही निबर झाली होती त्यांची. आता कशाच काही वाटत नाही त्यांना. पक्या हा वस्तीतलाच. वडील दारुनी गेले. आई सारखी आजारी तीनेही एक दिवस हे जग सोडले.आता उरला तो पक्या घरात आठराविश्व दारीद्र्य मग पोट भरणार कसं. एकच उपाय चोरी. मग सुरवात झाली पाकीटमारीची . आणि मित्र भेटले तेही पाकिटमारचं . सकाळी उठल्यावर चहा पिण्याऐवजी दारु पिणारे ही टोळी.वस्तीकडे जाताना रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे एक वेडी बसली होती. पक्याची नजर तिच्यावर गेली. मित्र सोबतीला असल्याने त्यांने आपली नजर दुसरीकडे वळवली.

आज पक्या तुरुंगातून सुटून आला म्हणुन पार्टी करणार होते. सर्व पोरं नाक्यावर आली व तिथेच बसून टवाळक्या करु लागली. आजचा दिवस असाच गेला. आता उद्यापासून परत कामाला सुरवात. सकाळी पक्या उठला घरात खायलाच काय पण प्यायला पानी सुध्दा नव्हतं. तसाच चरफडत बाहेर पडला . खिशात पैसे नव्हते मग काय आज कुठला तरी सावज पकडायचा होता. पक्या स्टेशन वर आला गर्दी बारीच होती. त्या गर्दीतील एक सावज पक्यानी हेरलं. तेवढयात गाडी आली गर्दी गाडीत चढण्यासाठी एकमेंकाना पुढे ढकलायला लागली. पक्यानी त्याचा फायदा उचलला व गर्दीत सामिल होऊन त्यानी आपली शिकार शोधली. काम फत्ते झालं. एक पाकिट पक्याच्या हाताला लागलं. तो तसाच सुसाट सुटला आणि वस्तीत आल्यावरच थांबला. धाप लागली होती पण पाकिटात किती पैसे असतील या उत्सुकतेने त्यानी पाकिट उघडल आणि तो आनंदाने नाचायलाच लागला. आजची कमाई मस्त झाली होती. त्यानी मित्रांना पार्टी दयायची ठरवली. सगळयाना घेऊन तो जेवायला गेला. जेवणा बरोबरच ओली पार्टी पण झाली. सर्वजण नशेतच वस्तीत आले. आणि जागा मिळेल तिथे पडले. पक्याला जाग आली तेव्हा काळोख पडला होता. तो तसाच उठला व चालत निघाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली ती वेडी बसलीच होती. तो तसाच तिला पाहत उभा राहिला. रात्र वाढत गेली. रस्त्यावरील गर्दी कमी झाली. तेवढ्यात गाडीवर एक जोडप आलं. हातातील पिशवी त्यांनी त्या वेडी जवळ भिरकावली. तशी तिने पिशवीवर झडप घातली व त्यात काय आहे ते पाहयला लागली. त्यात तिला खायला मिळाल. तिचा चेहरा आनंदाने फुलला. ती त्यातला खाऊ लागली. पोटात आगेचा डोंब उठला होता आणि पक्या तिला सारखं घुरत होता. त्याच्या मनात मात्र वसनेचा डोंब उसळला होता.
रस्त्यावर आता शुकशुकाट होत होता. तसा पक्या हळुहळु त्या वेडीच्या दिशेने जाऊ लागला.ती वेडी खाण्यात गुंग होती. पक्या तिच्या मागे बसला व हळुच तिला स्पर्श केला ती विरोध करत नाही हे पाहुन त्याची हिमंत वाढली तो अजुन तिच्या जवळ आला. तसं तिने त्याच्याकडे पाहिल व खाण्यातला एक घास उचलला व त्यांच्या तोंडा समोर धरला. घास तोंडा जवळ पाहुन त्याने तिच्या कडे पाहिल तर तिच्या डोळयात आईचे प्रेमळ भाव दिसले. त्याला एकदम त्यांची आई आठवली आपली आई देखील आपल्याला अशीच प्रेमाने घास भरवत होती. आता मात्र त्याला त्याचीच लाज वाटली तो खजिल झाला. तसाच उठला आणि चालायला लागला त्याची पावलं आपोआप घरी वळली. घरी आल्यावर आई च्या आठवणीने रड रड रडला. रात्रभर विचार केला. सकाळ झाली तसा निर्धाराने उठला व सरळ त्या वेडी कडे गेला. तिला घरी आणलं. खायला दिलं. व तो घराबाहेर पडला . त्याची आजची सकाळ काही वेगळीच होती. पक्या आज बस स्टॅड वर उभा होता. पण पाकीटमारी साठी नाही तर पेपर विकण्यासाठी. आज खऱ्या अर्थाने पक्याच्या जिवनाला सुरवात झाली होती.

Group content visibility: 
Use group defaults

ट्विस्ट छान आहे..
माणुसकीची एक कृती किती परिणामकारक झाली..

>>>> घुरत होता.
हे हिंदी वाटतय. मराठीत घुरत म्हणत नाही.
कथा ठीक.

सर्वांनी उत्तम प्रतिक्रीया दिल्यात त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीयांमुळे नवीन लिखानास प्रात्साहन मिळत आहे. “घुरत होता” या शब्दाप्रमाणे कितीतरी शब्द आपण मराठीत सहज वापरतो. कधी कधी ते शब्द मराठी असल्याचा भास होतो. पण तरीही या शब्दाला मराठीत शब्द असेल तर नक्की सांगा. आमच्यापण ज्ञानात भर पडेल. सर्व प्रतिक्रीयाचे मनपुर्वक स्वागत. परमेश्वर आपल्या सर्वाचे भले करो.

>>>>>>> “घुरत होता” या शब्दाप्रमाणे कितीतरी शब्द आपण मराठीत सहज वापरतो. कधी कधी ते शब्द मराठी असल्याचा भास होतो.
मी मराठीत आणि पुण्यात आणि माझ्या वर्तुळात ऐकलेला नाही. अर्थात पुण्याबाहेरचा हा शब्द असू शकतो. आपलं वर्तुळ फारच मर्यादित असतं. कोणत्याही पुस्तकातही वाचलेला नाही. टक लावुन पहाणे, एकटक पहाणे, पापणी न लवता न्याहाळणे हे मला सुचलेले शब्द.

>>>>अर्थात पुण्याबाहेरचा हा शब्द असू शकतो. >>>>
घुरत होता, घुरतोस काय हा ग्रामीण मराठी शब्द आहे.. सदाशिव पेठी मराठी बोली आणि पुण्यातच इतरत्र बोलली जाणारी मराठी वेगळी.
पुण्यात बरेच लोक आजुबाजूच्या खेड्यातून आलेत त्यामुळे तसे आहे.

दसा, माझी शाळा नारायण पेठी व आजोळ व पर्यायाने आईची भाषा सदाशिव पेठी होते. परंतु आम्ही रहात असू वानवडी/कोंढवा भागात जिथे गावाहून पुण्यामध्ये आलेले व स्थाईक झालेले अठरापगड जातीचे लोक होते. आणि तरीही मी हा शब्द ऐकला नाही. माझे संपूर्ण बालपण या वानवडी/कोंढवा भागातच गेले मला ग्रामिण अ‍ॅक्सेन्ट, भाषा यांचे आकलन आहे.
पण अर्थातच हा शब्द मिस झालेला आहे.

(आमच्याकडे “काय घुरतोस रे, तो घुरुन बघतो..असे शब्द वापरतात.)
खरं तर , दर दहा कोसावर भाषा बदलते. मी मूळची विदर्भतील, त्यामुळे माझे बरेचसे शब्द वेगळे येतात. कारण लिहण्याच्या ओघात प्रमाण भाषा सोडून, बोली भाषेत लिहीले जाते. पण माझ्या लिखाणात सुधारणा करण्यासाठी आपल्यासारखे ज्ञानी वाचक असल्यामुळे , मी स्वत:ला भाग्यवान समजते. पण मी लिहिताना दक्षता घेईल. आपण सर्व वाचक मला सांभाळून घ्या.

>>>>>.खरं तर , दर दहा कोसावर भाषा बदलते.
हे खरे आहे.
>>>>पण मी लिहिताना दक्षता घेईल.
असं काही नाही. दसाही नविन, अनवट ग्रामिण शब्द वापरतात. ते खूप आवडते. फक्त मला हा शब्द माहीत नव्हता त्यामुळे मी सांगीतले.

जाऊ दे पक्या सुधारला ते महत्वाचं. पक्या अशीच प्रगती करत एके दिवशी मोठा उद्योजक होईल.

घुरून बघणे हा शब्दप्रयोग मराठीत मी बऱ्याचदा ऐकला आहे,
तुम्ही वपरला त्या अर्थाने नाही, तर घुरून बघणे म्हणजे खुन्नस देणे.

घुरून बघणे हा शब्दप्रयोग मराठीत मी बऱ्याचदा ऐकला आहे,
तुम्ही वपरला त्या अर्थाने नाही, तर घुरून बघणे म्हणजे खुन्नस देणे.

सर्वाच्या प्रतिक्रीयांसाठी खूप खूप आभार, तुमच्या सारखे वाचक मिळाल्यावर आणखी एक कथा लिहावी वाटते..रोखून पाहणे शब्दासाठी धन्यवाद सर.