वेळ सकाळची. गाडीला नेहमीप्रमाणे ऑफीसला जाणाऱ्याची गर्दी. वान्द्रे स्थानकात मी गाडीची वाट पाहत उभे होते. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत मी चढले. गर्दी जास्त असल्यामुळे दाराजवळ उभी होते. दादर स्टेशन आलं. लोकांचे लोंढे उतरले. तशी उभं राहायला थेाडी मोकळी जागा झाली. एक वयस्कर स्त्री गाडीत चढली. पेहराव निटनेटका, हाती बॅग बहुतेक ऑफीसला जात असावी. चढल्या चढल्याच ती छान गाणं म्हणायला लागली. वयस्कर असल्यामुळे मी तिला आत येण्यासाठी जागा करुन दिली. तर ती दाराजवळच उभी राहिली. बरं निट पकडून उभं राहायचं तर चालत्या ट्रेन मध्ये ती हात बाहेर काढून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेन मधील लोकांना हात दाखवून हाय म्हणत होती. तिच्या आजूबाजूला उभ्या असणाऱ्या बऱ्याचजणींनी तीला एकदोनदा आत यायला सांगितले. पण ती काही ऐकत नव्हती. क्षणात एक हात सोडायची तर कधी उनाड मुलांसारखी बिनधास्त ओरडायची. तर कधी गाणी म्हणायची.
एका क्षणी तर एकदम हात सोडला. माझ्या छातीत धस झालं. तर ती हसत होती. मी तिला आत येण्यासाठी परत विनंती केली तर मला म्हणाली, “ Dont Worry मला काही होत नाही.”
दुसऱ्या बाजुने ट्रेन आली की ती गाणं म्हणायची “ लैला मै लैला कैसी मै लैला ...” आणि मग त्या दुसऱ्या ट्रेनमधील लोकं हसायची. ट्रेन मधील काही लोक “ ओ मेरी लैला म्हणायचे.” तिही हसून त्यांना दाद देत होती. कोणाला I Love You म्हणायची, त्यावर काहीजण तिला I Love U Too म्हणत होती. तर काही लोकं हसत होती.
तिचं हे वागणं पाहून आम्ही सर्वंचजण हसत होतो. मरीन लाइन्स आल्यावर ती मला म्हणाली, “ तुला मी वेडी वाटत असेल ना.” मी काहीच बोलले नाही. ती म्हणाली, “ बेटा एक गोष्ट सांग आज तू खुप हसली ना. आणि तूच काय जवळ पास सर्वंच हसत होती. गाडीत बसलेले उभे असलेले सर्व चेहरे जणू जगाची सर्व चिंता आपल्यालाच आहे अश्या अर्विभावात असतात. सतत चिंता आणि कामाच्या तणावाखाली असतात. मी आज असे वागले तर थेाडा वेळ का होईना पण सर्वजण आपल्या चिंता विसरुन हसले तरी. नाहीतर आजकाल कोणाला हसायलाही वेळ सापडत नाही.”ती बोलत होती आणि आम्ही सर्व ऐकत होतो. चर्चगेट आलं आणि ती हास्य वाटप करणारी देवदूत गर्दीत हरवून गेली. पण मला मात्र अंतर्मुख करून गेली. खरचं आपण शेवटच असं खळखळून कधी हसलो होतो हेही आठवत नाही. गालात हसण्यापासून ते थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखे हसण्यापर्यंत असे हसण्याचे विविध प्रकार हे फक्त पुस्तकातच वाचायला मिळतील की काय असं वाटायला लागल आहे. आपण सतत कसल्या तरी विचारात असतो. सतत काम काम आणि काम. आपण घराबाहेर पडतो ते कामाच्या ताणाचा डोंगर घेऊनच. मग वाटेत कोणी आलं की आपल्याला साधा धक्का ही सहन होत नाही. कोणी आवाज चढवला की आपण पदर खेाचुन भांडायला काय, मारायला काय, हल्ली तर चावायलाही लागलो आहे. बरं हे तर बाहेरचे झाले .घरच्या लोकांवर ही तेच प्रकार चालू असतात. ज्या मुलांबाळासाठी आपण कमवत आहोत त्यांनाही आपण सतत ओरडत असतो. कारण काय तर कामाचा ताण. आपण कामासाठी नाही तर काम आपल्यासाठी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसऱ्यांना हसविण्यासाठी पण माणस जगतात यावर माझा विश्वासच नव्हता. पण या देवदूताने हसा व हसून जगा हा संदेश दिला. या हास्य देवदूत तुम्हाला भेटला तर तुम्हालाही नक्की वाटेल की जगवा तर असं.
“ जिंन्दगी हँसने गाने के लिऐ है, पल दो पल , इसे खोना नहीं, खेा के रोना नहीं........” या गाण्याच्या ओळी सदैव मनात ठेऊन हसत जगा.
छान.
छान.
खतरों के खिलाड़ी हास्यजत्रा
खतरों के खिलाड़ी हास्यजत्रा फ्यूजन छान आहे पण त्यांनी आता बसून शांतपणे एकाच डब्यावर हसवण्यासाठी लक्ष केंद्रित करत कार्य करणे अधिक सुरक्षित असले तरी कठीण टास्क वाटल्याने हां सोप्पा मार्ग अवलंबिला असण्याची शक्यता आहे.
(त्यांना सायकोथेरपीस्टची नितांत गरज असावी.)छान लेख
छान लेख
आनंद सिनेमातल्या जयचंद, मुरारीलाल भेट आठवली.
https://youtu.be/dDkwIcP4P7w?si=9wLZPJ9-0bguGcmM
स्टोरी छान रचली आहे. पण नाही
स्टोरी छान रचली आहे. पण नाही आवडली. एकतर ती स्त्री वयस्कर असेल तर स्वतःहून असे काही डेरिंग करणार नाही आणि केलेच तर फर्स्ट attempt last attempt झाले पाहिजे होते. यातून जर बोधच घ्यायचा झाला तर तो एवढाच कि लोकांना हसवण्यासाठी असले फालतू डेरिंग कुठल्याही वयोगटातील स्त्री किंवा पुरुषाने करू नये. ज्यांना जेव्हा आनंद मिळवायचा असेल त्याने तो तेव्हा मिळवावा पण ट्रेन मध्ये असले उद्योग करू नये. ट्रेनचे stunt करून लोकांना हात, पाय , जीव गमवावे लागले आहे. त्या हास्यदेवदूताचे रूपांतर यमदूतात झाले नाही म्हणून त्यांना अनेक गुड लक.
यातून जर बोधच घ्यायचा झाला तर
यातून जर बोधच घ्यायचा झाला तर तो एवढाच कि लोकांना हसवण्यासाठी असले फालतू डेरिंग कुठल्याही वयोगटातील स्त्री किंवा पुरुषाने करू नये.>> +१११
सर्वांनी उत्तम प्रतिक्रीया
सर्वांनी उत्तम प्रतिक्रीया दिल्यात त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. कोणत्याच वयातील लोकांनी असे फालतू डेरिंग करु नये. पण ही स्टोरी रचली नसून, सत्यघटनेवर आधारीत आहे.
मला त्या स्त्रीचा हसविण्या मागचा हेतू आवडला म्हणून लिहावेसे वाटले. तुम्हा सर्वाच्या मताशी मी सहमत आहे. परत एकदा सर्वाचे धन्यवाद. परमेश्वर आपल्यासर्वाचे भले करो.