पहिला भाग
https://www.maayboli.com/node/84439
बीप बीप...बीप बीप... विशालच्या हातामधल्या घड्याळाचा आवाज झाला. संध्याकाळचे साडेसात वाजत वाजले होते. सवयीनुसार त्याच लक्ष बारच्या दाराकडे गेलं, कोणत्याही मिनिटाला मॅक्सि त्या दारातून येणार होती. लोकांसाठी बँक भले साडेपाचला बंद होत असेल, पण सगळं पेपर वर्क आवरायला एखाद दीड तास सहज जातो, तिथून घरी जाऊन फ्रेश होऊन बरोबर साडेसातला मॅक्सि बार मध्ये हजार होत असे. गेले सहा महिने तिचा हा क्रम चुकला नव्हता, म्हणून शेट्टीअण्णा पण तिच्यावर खुश होता. बार मध्ये यायचं, ड्रेस बदलून ८ ते १० गाणी म्हणायची आणि १० वाजले कि आपल्या वाटेने निघून जायचं. सहा महिन्यात तिने इथे कोणासोबतही कामाशिवाय बोलणं केलं नव्हतं, मित्र किंवा मैत्रीण बनवणं तर दूरच. शेट्टीच्या मर्जीतली म्हणून सगळे तिच्यापासून अंतर ठेवून असायचे. बार मधले गिर्हाईकसुद्धा लांबूनच फर्माईश द्यायचे. मूळची गोव्याची असलेली डिकॉस्टा जबरदस्त गळा घेऊन जन्माला आली होती, पण तिचं गाणं ऐकण्यापेक्षा तिला पाहायलाच लोक जास्त उत्सुक असायचे. अस्सल गोवन सौंदर्याचा वारसा लाभला होता तिला, रशियन झक मारतील असा. आणि तिला ते पुरेपूर माहित असल्यामुळे तिने स्वतःच सगळ्यांना एका सुरक्षित अंतरावर ठेवलं होतं, गुलबकावलीच्या फुलासारखं. आणि अशी हि मॅक्सि आज चक्क विशालकडे पाहून स्मितहास्य करत होती. गाणं म्हणताना हळूच त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत होती. साला हा आठवडा विशालचं नशीब खरोखरच फळफळलं होतं बहुतेक, आधी तो कालचा बँकवाला आणि आज चक्क मॅक्सि. आयुष्यात पहिल्यांदा विशालने दोन वेळा ड्रिंक बनवताना गडबड केली. १० वाजत आले, मॅक्सि तिचं शेवटचं गाणं संपवून घरी न जाता सरळ बार काउंटर वरती आली.
"एक ब्लॅक डॉग , लार्ज! ऑन द रॉक्स. "
च्यायला डायरेक्ट काळा कुत्रा! ते पण ऑन द रॉक्स! आज काहीतरी खास होतं नक्कीच.
"हियर इस द ड्रिंक फॉर अ लवली लेडी. "
विशालने उगाच गूळ पाडला. खरं तर तिला पहिल्यांदा इतकं जवळून पाहत होता तो, आणि त्यामुळे पुरता भांबावून गेला होता. गालावर एक हलकीशी खळी दिसत होती तिच्या. त्या खळीने आत्तापर्यंत किती बळी घेतले असतील देव जाणे.
"विशाल, राईट?" एका घोटात तो ग्लास रिकामा करत तिने प्रश्न विचारला.
"हं? हा हो विशाल, तुला आय मीन तुम्हाला माझं नाव माहित आहे? "
"अंहं, माहित नव्हतं पण कालच कळलं."
"म्हणजे?" बुचकळ्यात पडत विशालने विचारलं
"म्हणजे वाघाचे पंजे, बघ विशाल- मला उगाच विषय फिरवत बसायला आवडत नाही, म्हणून डायरेक्ट सांगते, कालचं तुझं आणि त्या टकल्या अशोकचं बोलणं ऐकलं आहे मी. आणि तू कोणाला इतक्या सहज ते पण विनाकारण डिस्काउंट देशील असं मला तरी वाटत नाही. अशोकला आमच्या बँकेत सगळे कॅलक्युलेटर म्हणून ओळ्खतात, आकडेमोडीत त्याचा हात कोणी धरी शकत नाही, पण बाकी दुनियादारीची अक्कल शून्य. पण तुझ्याकडे ती भरभरून आहे, त्यामुळेच काल मुद्दाम त्याचं कार्ड तू बदलून दिलं हे सुद्धा मी नोटीस केलं आहे. कसं आहे ना, मांजर कितीपण डोळे मिटून दूध पित असेल तरी बाकी जगाचे डोळे उघडे असतात हि गोष्ट विसरून चालता कामा नये."
"हम्म, पुढे बोल, मला वाटतं तुला मुद्द्याचं बोलायला आवडतं असं तू म्हणाली होतीस."
"बरोबर, तर मुद्दा असा आहे कि जो काही प्लॅन होईल त्यात मला ५% कमिशन हवंय, ५ तुझ्याकडून आणि ५ बबनकडून. "
"बबन कोण?"
" तू त्याला बबनशेठ म्हणावं असं मी सजेस्ट करेन, त्याला एकेरी हाक मारायची आणि तरी हातपाय सही सलामत ठेवायची मुभा खूप कमी लोकांना आहे. "
"ठीक आहे, कुठे भेटतील तुमचे हे बबनशेठ?" वैतागून विशालने विचारलं.
"उद्या सकाळी, साडेसात वाजता तुझ्या बिल्डिंगच्या खाली तयार राहा, आणि हो बबनला उशीर केलेला आवडत नाही, चलो गुड बाय हँडसम, आणि हो, आजच्या ड्रिंकचे पैसे माझ्या कमिशन मधून कापून घे बरं का, १०% डिस्काउंट वजा करून. "
हळूच डोळा मिचकावून मॅक्सि निघून गेली, आणि विशाल आ वासून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.
क्र... म... शः ...
उत्कंठावर्धक..
उत्कंठावर्धक..
हे पण छान..
हा भागही छान..
पुढील भाग लवकर लवकर टाका...
पुढील भाग लवकर लवकर टाका...
मस्त!!
मस्त!!
वाचतेय तुमची कथामालिका..!
वाचतेय तुमची कथामालिका..!
छान सुरु आहे कथा...!