केलं उसनवार, सगळं मुसळ केरात....

Submitted by ASHOK BHEKE on 13 December, 2023 - 10:43

केलं उसनवार, सगळं मुसळ केरात.... अशोक भेके

एका चाळीत राहणारे ते जोडपे. भाड्याने घर घेऊन राहत होते. त्यांच्या भाषेवरुन ते सातार पट्ट्यातील असावेत. नवीनच लग्न झालेले असावे. नांव त्याचं रामा तर तिचं अंजना. कामाला होता मस्जिद बंदरच्या व्यापार्‍याकडे. काट्यावर काम करीत होता. तुटपुंजा पगार. घरभाडे जाऊन त्याच्या हातात काहीच उरत नव्हते. पण लग्नापूर्वी त्याचे भागत होते. पण लग्न झाले आणि खर्च वाढला. बायको दिवसभर घरी एकटी म्हणून तिच्या मनोरंजनार्थ गड्याने शेठजी कडून आगाऊ रक्कम घेऊन छोटा टीव्ही घेतला. केबल कनेक्शन आले. बायको खुश झाली. टीव्ही आला तिचा वेळ जाऊ लागला. पण तो पर्यन्त शेजारी पाजारी यांच्याशी तिची मैत्री जडली. त्या मैत्रिणीकडे असलेले स्मार्ट मोबाइल पाहून तिला तिच्या साध्या मोबाईलवर चीड आली. रात्री नवरा घरी आला. जेवला आणि लाडात तिने त्याला सांगितले *मला एक स्मार्ट मोबाईल हवा....* अचानक झाडावरून माकडाने येऊन टपली मारून जावे तसा तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. स्मार्ट मोबाईल घेणे शक्य नव्हते. टीव्ही चे हफ्ते पगारातून कट होत होते. अजून मोबाईल साठी रक्कम उसनवार मागायची तर शेठजी उभ्या उभ्या तासेल म्हणून त्याने लाडातच तिला सांगितले, *सध्या शक्य नाही....* बायको हिरमुसली. तिच्या नाराजीमुळे नवरा मात्र चलबिचल झाला. दुसर्‍या दिवशी त्याने मित्राच्या मदतीने एक मोबाईल खरेदी केला. Net pack सहित बायकोला दिला. बायको पुन्हा खुश झाली. बायकोने हातात मोबाईल घेऊन मैत्रिणीच्या मदतीने त्यात Facebook, What’s-app सुरू करून घेतले. परिस्थितीची जाण असून देखील मूर्खाच्या नंदनवनात भटकायला लागला होता. घरात नाही एक तीळ अन मिशाला पिळ कशाला हवा होता. पण बायको नावाचं बिर्‍हाड एकमेंव कारणीभूत होते. तीन महिन्यापूर्वी झालेल्या लग्नातल्या साड्या असून देखील दर महिन्याला नव्या साडीचे मागणे असायचे.

रामा दुकानात खपखप्पुन मेहनत करीत होता. पण बायकोची हौसमौज पूरवीत होता. कर्जाच्या हप्त्याने बेजार झाला होता. पण तो कुणाला सांगू शकत नव्हता. बायकोच्या गरजा पूरविणे त्या कष्टकरी माणसाला भारी पडत होते. मैत्रिणीच्या नादाने तिला ब्युटीपार्लर दिसू लागले होते. गरिबाच्या घरातील टी मुलगी. आई बापाने हौस पूरविली नव्हती. ती नवर्‍याकडून पूर्णत: करून घेण्याच्या मोहाला बळी पडत चालली होती. मैत्रिणीच्या घरची देखील अशीच परिस्थिती होती. घरभाड्याने त्या देखील राहत होत्या. पण कुणाचे भाऊ त्यांना हवं नको ते पाहत होते. दाजी गरीब आहे म्हणून मेहुणा बहिणीची काळजी घेत होता. तर माझी लेक फार फार हलखीचे जीवन जगत आहे म्हणून आई आपल्या लेकीला तिच्या साठवणुकीतले पैसे लेकाला न विचारता परस्पर देत मुलीची हौस भागवीत होती. पण अंजनाच्या घरी असे काही नव्हते. भाऊ लहान होता. अन आईच्या हातात साधी दमडी देखील नव्हती. त्यामुळे तिची मदार मात्र नवर्‍यावर होती. नवरा साधा अगदी मेटाकुटीस आला होता. त्या भाड्याच्या घरात दोघांना देखील राहणे मुश्किलीचे त्यात पाहुणे आले की, विचारता सोय नसे. झोपण्यास जागा नसे. मग वळकटी घेऊन समोरच्या मोकळ्या जागेत पडायचे. दमलेले शरीर जमिनीला टेकताच मढयासारखे वाटायचे. शेजारीपाजारी जाता-येता कुत्सितपणे पाहायचे. शौचाला जाणारे आपले चिंपाट सांभाळून न्यायचे.

रामाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला होता. सासुरवाडीचा पाहुणा आला की मटणाचा बेत ठरलेला असायचा. आमदणी कमी आणि खर्च अमाप झाल्याने नवरा बायको मध्ये थोडंसं शितयुध्द घडू लागलं होतं. हळूहळू त्याला उग्रस्वरूप येऊ लागले होते. दररोज आता किरकिर सुरू झाली होती. रामा आता त्रस्त होऊ लागला होता. एकेदिवशी मित्रांच्या सल्ल्याने शांत मन करण्यासाठी दारूच्या गुत्याकडे वळला. आता आग दोघांकडून लागली. दारू प्याल्यावर त्या दिवशी स्वर्गाहुन सुंदर प्रत्यय आला होता. झोप शांत लागली होती. बायकोने केलेली किरकिर त्याला ऐकू आली नव्हती. गाढ झोपी गेला होता. हळू हळू तो व्यसनाधीन होत गेला. आमच्या डोळ्यासमोर तो आता झिंगलेल्या अवस्थेत टोल सावरत येताना पाहत होतो. चांगला तरुण वाहयात गेला होता. दारूच्या नादात तो कामावर देखील दांडी मारू लागला होता. सुरूवातीला तब्येतीच्या कारणाने शेठजीने सांभाळून घेतले. पण त्याच्या कानावर त्याच्या व्यसनाचे किस्से गेल्याने त्याला जबरदस्त कानउघाडणी केली. पण सुधारणा दिसून आली नाही.

रामा आणि अंजना यांचे घरातले शीतयुध्द हळूहळू दरवाजाबाहेर आले होते. रात्री थोडी झाल्यावर अंजनाचे गाल ललिलाल बिना ब्युटीपार्लर मध्ये न जाता होऊ लागले होते. शेजारी पाजारी त्याला समजावित होते. पण तो त्याही पलीकडे गेला होता. रोज रोज मारहाण झाल्याने अंजना कंटाळली होती. आई बापाला कळविले. आई बाप आले जावईबापू ऐकण्याच्या मनस्थितीतीच नव्हते. शेवटी लेक होती. आई बापांनी तिला तात्काळ कपडे भरायला सांगितले आणि घेऊन गेले. एका वर्षाच्या आतच संसार दुभागला गेला. दोन ओंडके जवळ आले होते. संगम झाला होता. पण एक दुर्दैवाची लाट आली आणि ते दोन ओंडके विभक्त झाले. बायकोच्या हट्टाखातर एक माणूस वाया गेला होता. उद्या काय होईल ते होईल पण

रामा आणि अंजना सारखी अनेक कुटुंबे आहेत. परीस्थितीने गांजली आहेत. पण त्यांना घरी टीव्ही, मोबाईल आदि मनोरंजनाच्या वस्तु अपेक्षित आहेत.कर्ज काढून घेत असतात.कमाई कमी असते, पण हातात मोबाइल असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण... दुचाकी हवी... पांघरून पाहून पाय पसरायला हवे पण लाखाशिवाय बात नाही आणि वडापांव शिवाय काही खात नाही, अशी देखील माणसं दिखाव्याच्या गर्दीत दिसून येतात. हरविलेली या माणसांचे भविष्य अंधारमय करायला ती स्वत:च जबाबदार असतात. घरात नाही तीळ पण मिश्याला भारी देती पीळ. कमाईत शून्य पण माज करणारी माणसं समाजात प्रतिष्ठित असतात का? हा सवाल त्यांच्या मनाला का खात नाही...! जे आयुष्य आपण जगतो, त्या आयुष्याला व्यवस्थित आकार देण्याऐवजी दिखाऊ पणाच्या डामडौलात आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. आयुष्यात वाहता झरा आणि फुलता मळा कसा निर्माण करू शकू, याचा विचार व्हायला हवा.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी मला पण तसे वाटायचे की हे गरीब असूनही असे का जगतात, चार पैसे का जमवत नाहीत. पण मग कामानिमित्त साईटवर जायचो तेव्हा रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे आयुष्य जरा जवळून बघायला मिळाले. एक बाई रोज १०० रुपये कमवून वाण्याकडे जायची. तिच्याकडे १ ताटली असायची त्यात ती १० रुपयाची भाजी, १० रुपयाचे भाकरीला पीठ, १० रुपयाचे तांदूळ, १० रुपयांचा मसाला, हळद/तिखट वगैरे आणि एका छोट्याशा वाटीत बाळासाठी १० रुपयाचे दूध घेऊन जायची. कधी ४ पैसे जास्त मिळाले तरच थोडी चहा पावडर. खूप वाईट वाटायचे. त्या काळी मी १०० रुपयांची तर नुसती सिगरेट प्यायचो. म्हणून मग जरा ४ पैसे मिळाले की हे लोक थोडी दारू पितात, लॉटरीचे तिकीट काढतात, त्यांच्या पिचलेल्या आयुष्यात २ सुखाचे क्षण शोधायचा प्रयत्न करतात.

आपण आपल्या कोशात असतो, आपल्याला त्यांचे खरे प्रश्न माहीतच नसतात. काहीही म्हणा, पण पोटाची भूक एकदम बेकार. ती भल्या भल्यांना आयुष्यातून उठवू शकते.

तद्दन भंपक कथा. एवढा गांजलेला मनुष्य लग्न करतो तर पहिल्या फटक्यात बायकोला म्हणेल घरी बसण्यापेक्षा कामधंदे कर आणि घे स्वतःला काय पाहिजे ते... हा .. हा .... हा .....

तद्दन भंपक कथा. एवढा गांजलेला मनुष्य लग्न करतो तर पहिल्या फटक्यात बायकोला म्हणेल घरी बसण्यापेक्षा कामधंदे कर आणि घे स्वतःला काय पाहिजे ते... हा .. हा .... हा ..... >>> Really? इथे माबाेवर काही व्यक्ती कोणत्या विश्वातून आल्यात हे कळतच नाही. तुम्ही लोक कधी गरीब किंवा मध्यमवर्गीय नव्हताच का? असे कितीतरी राजा, अंजना अजूनही आजूबाजूला सापडतील किंबहुना आमच्या शेजारी आहेत.
तसेच प्रश्न गरीब किंवा श्रीमंत असण्याचा नाहीच आहे काही काही श्रीमंत लोक बघण्यात आलेत जे त्यांचे स्टेटस टिकून राहावा म्हणून उगाचच लोन काढून कार आणि आयफोन वगैरे घेत असतात.

उपाशी बोका, तुमचा प्रतिसाद वेगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल आहे. कथेत जरा वेगळा प्रकार आहे. इथे त्या बायको पिचलेल्या आयुष्यात मनोरंजनाचे क्षण शोधt नव्हती. तर बाईला परिस्थितीची जाण नव्हती.

जगात बाकी सर्व प्रकारची लोकं असतात. या दोन्ही प्रकारची देखील खूप आहेत. पाहण्यात येतात आजूबाजूला..

उपाशी बोका, तुमचा प्रतिसाद वेगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल आहे. कथेत जरा वेगळा प्रकार आहे. इथे त्या बायको पिचलेल्या आयुष्यात मनोरंजनाचे क्षण शोधt नव्हती. तर बाईला परिस्थितीची जाण नव्हती.

जगात बाकी सर्व प्रकारची लोकं असतात. या दोन्ही प्रकारची देखील खूप आहेत. पाहण्यात येतात आजूबाजूला..

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 16 December, 2023 - 14:23 >>>>>>>स ह म त

उबो, निल्सन +1
एक विश्व चांगले मांडले आहे.
सात आठ वर्षापूर्वी 40 रूपये रोजचे घेऊन एका वेळच्या जेवणाचा शिधा बांधून घेणारे मजूर जवळपास होते. दोन वेळेचं जेवण + पेट्रोल + केरोसीन हा रोजचा खर्च. खोलीभाडं महिना 3 ते 4 हजार. म्हणजे दिवसाला दहा ते वीस रूपये. आकस्मिक डिकल इत्यादी खर्च वेगळा. दोघेही कामाला गेले तर 400 ते 500 रूपये रोज. मूलबाळ असेल तर बाई घरात. शाळेची आबाळ.
तरीपण टिव्ही + मोबाईल घ्यायचेच.