फुकटचे सल्ले!

Submitted by चिमण on 7 December, 2023 - 05:17

शाळा कॉलेजात असताना अनेकांनी येता-जाता मला "सरळ" वळण लावण्याच्या नावाखाली केलेल्या फुकटच्या उपदेशांनी माझं पित्तं फार खवळायचं! कधी (म्हणजे बर्‍याचवेळेला) मी मारलेल्या बंडला उघडकीस आल्या तर 'खोटं बोलू नकोस, खोटं बोलल्यानं पाप लागतं'. कधी रविवारी सकाळी जरा उशीरा पर्यंत लोळलो तर लगेच 'उठा आता, नुस्ते लोळत पडू नका. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती आरोग्य लाभे! समजलेत काय चिमणराव?' अशी हजामत! असलं काही सतत ऐकल्यावर कुठल्याही कुणाचंही डोकं फिरेल, मग माझ्यासारख्या टीनेजराची काय कथा? बरं, याबद्दल कुणाकडे तणतण केली तर 'तू मोठ्यांचा आदर करायला पाहिजेस, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजेस' हे वरती!

पण जसजसं माझं वय वाढत गेलं आणि आयुष्य अनेक अनुभवांनी समृद्ध होत गेलं तसतसं त्यातलं बरचसं तितकंस बरोबर नव्हतं हेही लक्षात आलं. आणि आता वयाची साठी ओलांडल्यावर कुठल्याही मोठ्या माणसाची तमा न बाळगता मी इतकं नक्की म्हणू शकतो की .. कधीही खोटं न बोललेली व्यक्ती अस्तित्वात नाही. थोडं फार खोटं बोलल्याशिवाय या जगात कुणीही कसं काय जगू शकेल? प्रत्येकावर काहीना काही कारणामुळे खोटं बोलण्याचा प्रसंग येतोच येतो. कधी तिर्‍हाईतांसमोर आपल्या खर्‍या भावना व्यक्त न करण्यासाठी म्हणा, कधी आपला मूर्खपणा उघडकीस येऊ नये म्हणून, कधी दुसर्‍याचं मन राखण्यासाठी तर कधी कायद्यातील पळवाटांचा फायदा करून घेण्यासाठी म्हणा प्रत्येक माणूस खोटं बोलून चुकलेला आहे. आयला, मराठी भाषा जरा गमतीदारचआहे.. इथे खोटं बोलल्यामुळे माणूस चुकला असं मला म्हणायचं नाही आहे. आयर्लंड सारखा देश कंपन्यांना कमी टॅक्स लावतो म्हणून कंपन्या त्या देशामधे आपलं मुख्य कार्यालय आहेअसं कागदोपत्री दाखवतात. स्टॅंप ड्युटी कमी पडावी म्हणून घराची किंमत कमी दाखविणे आणि उरलेली रक्कम रोकडा देणे हे तर सर्रास चालते. कायदा तिथे पळवाट!

असंही म्हणता येत नाही की पूर्वी माणसं अजिबात खोटं बोलत नव्हती व हल्लीच्या काळातच बोलायला लागली आहेत. कारण या गोष्टीला महाभारतापासून 'नरो वा कुंजरो वा' सारखी उदाहरणं आहेत. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र, ज्याच्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. अवन्तिराजाच्या हत्तीचे नाव देखील अश्वत्थामा होते, ज्याला भीमाने युद्धात मारले. श्रीकृष्णाने सांगितले की, 'द्रोणाचार्याना सांगा, अश्वत्थामा मारला गेला.' भीमाने सांगितलेली पुत्र निधनाची बातमी ऐकून द्रोणाचार्य दु:खी झाले. परंतु खात्री करण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराला विचारले. कारण युधिष्ठिर हा कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलणारा होता. द्रोणाचार्यांचा भीमावर विश्वास नव्हता हे एक वेळ समजून घेता येईल पण त्यांचा खुद्द श्रीकृष्णावर देखील विश्वास नव्हता हे खूप सूचक आहे. त्यामुळे, महाभारताच्या काळात देखील लोक धादांत खोटं बोलत होते असा सहज निष्कर्ष काढता येईल. द्रोणाचार्याचा विश्वास होता तो फक्त युधिष्ठिरावर! पण सत्यवचनी युधिष्ठिराने देखील त्यांना 'नरो वा कुंजरो वा' म्हणून गंडवलं. हे पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य याच्या सीमारेषेवरचं असं काहीसं तो बोलला, आणि Rest is Mahabharat!

मला मात्र या उदाहरणावरून एकच गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपलं महाभारताच्या काळापासून फेक न्युज पसरवण्यावर प्रभुत्व होतं. फेक न्युज तंत्राचा वापर करून पांडवांनी द्रोणाचार्यांचा बळी घेतला आणि युद्ध जिंकलं. आता लागलेले बरेचसे शोध आमच्या वेदात मधे लिहून ठेवलेले होते असं म्हणणार्‍यांनी या गोष्टीची सुद्धा टिमकी वाजवायला हरकत नाही. पुढे ब्रिटिशांनी बर्‍याच बनावट बातम्या पसरवून दुसरं महायुद्ध जिंकलं, त्याबद्दल ते अजूनही स्वत:ची पाठ थोपटून घेतात. याच ब्रिटिशांनी 2022 मधे बोरीस जॉन्सन या त्यांच्या पंतप्रधानाला खोटं बोलल्याबद्दल डच्चू दिला. या त्यांच्या वागण्यात काही सुसंगती दिसते का? तर नाही. उलट, आमच्याकडे महाभारताच्या काळापासून खोटं बोलणं सर्वमान्य आहे. आमच्याकडच्या मंत्र्यांनी कितीही बंडला मारल्या तरी ते परत परत निवडून येतात हा त्याचा पुरावा आहे.

तुम्हाला कधी कुणाचे नोकरीच्या अर्जा बरोबर पाठवलेले CV वाचावे लागले आहेत की नाही हे मला माहीत नाही. पण मला अनेक CV ( दुर्देवाने ) वाचावे लागले आहेत. कुठल्याही CV चा धनी नेहमी प्रचंड कष्ट करणारा, सर्व कौशल्यांमधे पारंगत, सर्वांशी मिळून मिसळून रहाणारा, सर्वांना नेहमी मदत करणारा, प्रश्नांना सामोरा जाणारा आणि ते सुटेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणारा असा सर्वगुणसंपन्न उमेदवार असतो. असे हजारात एक दोन उमेदवार असतील तर एक वेळ ठीक आहे. पण सगळे? असे खरच सगळे असते तर कंपन्यांचं प्रचंड भलं झालं असतं आणि भारताचं नाव सगळ्या क्षेत्रात उज्वल झालं असतं, नाही का? पण "माझं सगळ्यांशी जमत नाही, मला इंग्रजी संभाषण चांगलं जमत नाही, माझ्या कामात चूक काढली तर माझं डोकं फिरतं, मला पटकन राग येतो" , असं सगळं खर सांगितल्यावर नोकरी मिळणार नाही हेही तितकंच खरं आहे.

आता लग्नाला बरीच वर्ष झाल्यामुळे मी इतकं नक्की म्हणेन की बायकोला कमी बंडला मारा. मी मार्क ट्वेनशी या बाबतीत सहमत आहे. तो म्हणाल्याप्रमाणे 'जर तुम्ही तिला खरं सांगितलं तर तुम्हाला काहीही लक्षात ठेवायची गरज नाही'. कारण, बायका एक वेळ महत्वाच्या गोष्टी विसरतील पण कोण, कधी व काय म्हणालं होतं ते आजन्मी विसरणार नाहीत! त्यामुळे, कधीना कधी मारलेल्या बंडलेशी विसंगत काही तरी बरळून आपणच आपलं पितळ उघडं पाडू शकतो.

"मोठ्यांच्या सल्ल्यानुसार वागा" हा अजून एक फुकटचा सल्ला! बहुतेक वेळेला हा सल्ला मोठ्या (वयाने) माणसांकडूनच मिळतो. केवळ मोठ्या माणसानं सांगितलं म्हणून काही तरी करायचं याला कोणतेही तर्कशुद्ध कारण नाही. बहुतेक वेळेला मोठ्यांचं विचारचक्र घड्याळाच्या काट्यासारखं एकाच कक्षेत फिरत असतं. त्या कक्षेबाहेरचा विचार कुणी मांडला तर त्याला प्रचंड विरोध होतो हे ऐतिहासिक सत्य आहे. ही शिकवण कुठल्याही माणसाला सखोल विचार करण्यापासून परावृत्त करणारी आहे. अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाचं फारसं कुणी सखोल विश्लेषण न केल्यामुळे विज्ञानाची प्रगती बरीच वर्ष खुंटली. नंतरच्या शास्त्रज्ञांनी त्याच्या बाहेरचा विचार केल्यामुळे केवळ सर्व शास्त्रं पुढे गेली. गॅलेलिओने चर्च मधल्या तथाकथित ज्ञानी लोकांचं ऐकलं असतं तर त्यानं त्याचं संशोधन प्रसिद्धच केलं नसतं. किंवा आईन्स्टाईनने न्युटनचं संशोधन हे ब्रह्मवाक्य मानलं असतं तर जनरल रिलेटिव्हिटीचा शोध त्यानं लावला नसता. केट विंस्लेटच्या नाट्यशाळेतल्या शिक्षकाने तिला त्यावेळेला सांगितलं की "तू जरा स्थूल असल्यामुळे तुला मुख्य भूमिका मिळणार नाहीत, दुय्यम भूमिकांवर समाधान मानायला लागेल". हे तिनं तिला मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराच्या भाषणात सांगितलं. या उलट मी "सुसंगत तर्कशुद्ध संतुलित विचार करायला शिका" असा सल्ला देईन.

कॉपी करू नका... हा सल्ला परिक्षेच्या संदर्भात ठीक आहे. पण तो सगळ्याच बाबतीत लागू होत नाही. उदा. झेरॉक्स कंपनी! ही कंपनी फक्त कॉपी करून जगते. कॉपी न करण्याचं व्रत जर जपानी लोकांनी आचरणात आणलं असतं तर टोयोटा सारख्या कंपन्या अस्तित्वात आल्याच नसत्या. अर्थात ते नुसते कॉपी करून थांबले नाहीत तर ते कॉपीत सतत सुधारणा करीत राहीले. आणि त्यामुळेच ती जगातील आघाडीची कंपनी झाली. याच्या उलट अ‍ॅंब्यॅसेडर गाडी बाजारात आणणारी हिंदुस्थान मोटर्स कंपनी! ही गाडी ऑक्सफर्ड मधे बनणार्‍या मॉरिसची कॉपी होती. हे मॉडेल बरीच वर्ष बाजारात होतं पण त्यात त्यांनी फारशा सुधारणा नाही केल्या आणि त्या गाडीचा खप कमी कमी होत गेला. बरेच गायक इतर गायकांची कॉपी करून पुढे आले. नंतर त्यांनी स्वत:ची शैली विकसित केली. किशोरकुमार सुरुवातीला सैगलची कॉपी करायचा. कारण सैगलचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. त्याला त्याच्यासारखं गावं असं वाटायचं आणि जाणता अजाणता तो त्याची कॉपी करायला लागला. एके काळी त्यानं कॉपी केली म्हणून त्याच्या गाण्यांचा दर्जा मुळीच कमी होत नाही.

कधी कधी माझ्या डोक्यात असा विचार करतो की समजा मला बॅक टू द फ्युचर मधला डॉ. एमेट ब्रॉऊन भेटला आणि मला माझ्या शाळेतल्या काळात घेऊन गेला तर मी माझ्या शाळकरी मला काय सांगेन? मला दिली गेलेली शिकवण आणि आलेले अनुभव यातली तफावत नक्कीच स्पष्ट करून देईन. अडचण एव्हडीचआहे की माझा एकंदरीत लक्ष केंद्रित करण्याचा काल बघता मी ते सगळं ऐकायची मुळीच शक्यता नाही.

== समाप्त ==

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy
सल्ले फुकटचे असले तरी कामाचे आहेत!

छान लिहिलंय.

कुठल्याही CV चा धनी नेहमी प्रचंड कष्ट करणारा, सर्व कौशल्यांमधे पारंगत, सर्वांशी मिळून मिसळून रहाणारा, सर्वांना नेहमी मदत करणारा, प्रश्नांना सामोरा जाणारा आणि ते सुटेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणारा असा सर्वगुणसंपन्न उमेदवार असतो. >> यावर आधारीत एक मजेशीर व्हिडिओ आहेत. त्यातला एक
Dad's fake job interview : https://www.youtube.com/watch?v=y5Z05wGvMOw

नेहमीप्रमाणे खुसखुशीत लेख. Happy

एक फुकटचा सल्ला देतोय.
"मायबोलीपासून फार दिवस दूर राहू नका. लिहिते राहा. त्याने आम्हां वाचकांना तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर, सुसंगत तर्कशुद्ध संतुलित विचार करण्याची प्रेरणा मिळते."