२०२३ : वैद्यकीय संशोधनाची झेप

Submitted by कुमार१ on 6 December, 2023 - 00:14

आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे हे सदर गतवर्षी चालू केले ( https://www.maayboli.com/node/82828). आपण सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद दिल्याने समाधान वाटले. यंदाची ही आवृत्ती सादर करताना आनंद होत आहे. गेल्या वर्षी उल्लेख केलेले संशोधन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प दीर्घकालीन असल्याने अद्याप त्यांच्या संदर्भात निष्कर्ष यायला वेळ लागेल. यंदा आपण वैद्यकाच्या अन्य काही क्षेत्रातील संशोधनांवर नजर टाकू.
विविध संशोधनांची ३ गटांमध्ये वर्गवारी करतो :
• रोगनिदान पद्धती
• रोगोपचार व प्रतिबंध
• वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणे

रोगनिदान पद्धती

१. कर्करोगाचे अत्यंत लवकरच्या अवस्थेत(शून्यावस्था) निदान झाल्यास त्यावरील उपचार प्रभावी ठरतात आणि रुग्णाचे आयुष्य सुसह्य होते. असे निदान करण्यासाठी सोप्या व सुटसुटीत चाचणीचा शोध गेली काही वर्षे चालू आहे. या संदर्भात भारतातील एका संशोधनाने यंदा बरीच प्रगती केली आहे. मुंबईतील Epigeneres Biotechnology या वैज्ञानिक संस्थेने एका परदेशी संस्थेच्या सहकार्याने HrC या नावाची सुटसुटीत रक्तचाचणी विकसित केलेली आहे. या नावामागच्या इतिहासाला भारतीय संदर्भ आहे.

HrC हे नाव या संस्थेच्या संचालकांच्या मेहुण्यांची आठवण म्हणून दिलेले आहे. ते मेहुणे म्हणजे महाराष्ट्रातील माजी उच्चपदस्थ पोलीस अधिकारी (ADGP) हिमांशु रॉय (=Hr). रॉयना कर्करोग झालेला होता आणि तो पार मेंदूत पसरला होता. त्यातून त्यांना नैराश्य आल्याने त्यांनी 2018 मध्ये आत्महत्या केली. या घटनेने व्यथित होऊन त्यांच्या मेव्हण्यानी प्रस्तुत संशोधनाचा ध्यास घेतला. कर्करोगाच्या शून्यावस्थेत काही विशिष्ट प्रकारच्या पेशी रक्तात संचार करतात. रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यावरून त्या शोधता येतात. त्यांचे अस्तित्व रक्तात दिसून आल्यास शरीरातील अनेक प्रकारच्या कर्करोगांची चाहूल लागते. म्हणून या चाचणीला pan cancer रक्तचाचणी असे म्हटले जाते. रोगनिदानाव्यतिरिक्त या चाचणीचा उपयोग, कर्करोग उपचारानंतर पुन्हा तो रोग उद्भवतो आहे का, हे तपासण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. सध्या या संशोधनाने चांगली गती घेतलेली आहे.

2. जंतुसंसर्ग रोगांचे झटपट निदान : अशा रोगांमध्ये संबंधित आजार कोणत्या जिवाणू किंवा विषाणूने झालेला आहे हे जाणणे महत्त्वाचे असते. या संदर्भातील प्रचलित खात्रीशीर चाचण्यांमध्ये रुग्णाचा रक्तनमुना प्रयोगशाळेत पाठवला जातो आणि त्या चाचण्यांना बराच वेळ देखील लागतो. त्याऐवजी डॉक्टरांच्या खोलीतच रुग्णाचा नमुना घेऊन तिथल्या तिथे वीस मिनिटात नवीन चाचणी करता येणार आहे. या चाचणी तंत्रज्ञानात (p-LFAs) नॅनोकणांचा वापर केलेला आहे. हे कण रक्तातील विशिष्ट जंतूचा अँटीजन किंवा त्या विरोधी अँटीबोडीज चटकन ओळखू शकतात. नवी चाचणी जुन्यापेक्षा 1000 पट अधिक संवेदनशील असेल. ही चाचणी पुरेशी विकसित झाल्यानंतर त्यासाठी रुग्णाच्या शिरेतून रक्त घ्यायची देखील गरज नसेल. वेदनारहित सूक्ष्मसुयांच्या मदतीने त्वचेवरून देखील नमुना घेता येईल. या चाचणीचा उपयोग जंतूसंसर्गाव्यतिरिक्त अन्य दाहजनक आजारांत (उदा. rheumatoid arthritis) देखील करता येईल.

३. झोपेतील श्वसन-अवरोध (sleep apnea) : ही एक त्रासदायक समस्या असून काहींच्या बाबतीत गंभीर होऊ शकते. तिचे निदान करण्यासाठी सध्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये त्वचेवर विविध प्रकारचे संवेदक लावावे लागतात आणि ते रुग्णासाठी कटकटीचे असते. या संदर्भात एका सोप्या चाचणीवर संशोधन चालू आहे. यामध्ये एक संवेदक बसवलेली विशिष्ट कॅप्सूल रुग्ण तोंडावाटे घेतो. पुढे ती कॅप्सूल पचनसंस्थेत गेल्यानंतर त्यातील यंत्रणेमार्फत (accelerometer) त्याच्या झोपेतील नाडीचे ठोके, श्वसनगती आणि त्यातील अडथळ्यांचा कालावधी या महत्त्वाच्या गोष्टी सहज मोजल्या जातात. कालांतराने ही कॅप्सूल शौच्यावाटे बाहेर पडते. ही पद्धत विकसित झाल्यास अशा रुग्णांसाठी ते सुखावह असेल. या चाचणीचा उपयोग झोपेच्या विकाराव्यतिरिक्त दमा आणि अन्य दीर्घकालीन श्वसनरोधांच्या (COPD) निदानासाठीही करता येईल.
(झोपेतील श्वसन-अवरोधाचे सध्याचे उपकरणे वापरून केलेले उपचारही तसे कटकटीचे आहेत. त्या दृष्टीने या आजारावरील औषधाचा शोधही घेतला जात आहे. त्या संदर्भातील प्रयोग नुकतेच सुरू झाले. श्वसनमार्गातील स्नायूंवर परिणाम करणाऱ्या एका औषधद्वयीची चाचणी या संदर्भात चालू आहे).

• रोगोपचार व प्रतिबंध

१. औषध निर्मितीची आधुनिक संकल्पना : बऱ्याच आजारांच्या मुळाशी पेशींमधील कुठल्या ना कुठल्या प्रथिनाची समस्या असते. कधी ते प्रथिन अति प्रमाणात तर कधी ते खूप कमी प्रमाणात तयार होते. सर्वप्रथम पेशीत प्रथिन तयार कसे होते ते पाहू.
प्रथिनाच्या निर्मितीचा मूलभूत संदेश DNA मध्ये असतो त्या आदेशानुसार एक विशिष्ट mRNA तयार होतो. हा रेणू मूळ संदेशाचे रूपांतरण करतो आणि अखेरीस प्रथिन तयार होते.
dogma.jpg
सध्याच्या वापरातील बहुसंख्य औषधे कुठल्या ना कुठल्या प्रथिनाच्या क्रियांवर परिणाम करतात – क्रिया वाढवतात/कमी करतात. म्हणजेच प्रचलित औषधे वरील यंत्रणेच्या शेवटच्या टप्प्यात काम करतात. या ऐवजी औषध निर्मिती करताना,
‘जर त्या प्रथिनाची निर्मितीच थांबवता आली तर?’
असा एक विचार पुढे आलेला आहे.
या संकल्पनेत siRNA या प्रकारचे रेणू औषध म्हणून वापरले जातात. शरीरात गेल्यानंतर ते संबंधित mRNA निष्प्रभ करून टाकतात. त्यामुळे अपेक्षित असलेल्या प्रथिनाची निर्मितीच थांबते. या प्रकारचे औषध इंजेक्शन रूपात दिल्यास त्याचा परिणाम दीर्घकाळ (काही महीने) टिकतो असे आढळले आहे. परिणामी रोज गोळ्या घेण्यापासून रुग्णाची सुटका होऊ शकते.
असे एक औषध (Zilebesiran) सध्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर प्रायोगिक स्वरूपात वापरले गेलेले आहे. भविष्यातील सखोल संशोधनानंतर या नव्या संकल्पनेचे भवितव्य स्पष्ट होईल.
(https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMoa2208391)

२. क्षयरोग प्रतिबंधाची नवी लस : क्षयरोग हा विकसनशील देशांचा ज्वलंत आरोग्य प्रश्न ! सध्या त्याच्या प्रतिबंधासाठी ‘बीसीजी’ ही एकमेव लस उपलब्ध आहे. ती शक्यतो बालक जन्मताच त्याला दिली जाते. या लसीमुळे मिळणारे संरक्षण काही प्रमाणातच आहे. ते संरक्षण साधारण मुलांच्या शालेय वयापर्यंत पुरते. अजून एक मुद्दा. क्षयरोगाचे अनेक प्रकार आहेत. बीसीजीमुळे मिळणारे संरक्षण, मेंदू आवरणाचा आणि शरीरभर पसरणारा क्षयरोग यांच्या बाबतीत यशस्वी झाले आहे. परंतु मोठेपणी होणाऱ्या फुफ्फुसांच्या क्षयरोगाच्या बाबतीत ते तितकेसे उपयुक्त ठरलेले नाही. त्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून क्षयरोगावरील नव्या प्रकारची लस करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून चालू आहेत. अशा सुमारे 15 संशोधन प्रकल्पांपैकी 3 लसी यंदा संशोधनाच्या प्रगत टप्प्यात आल्यात.
((https://www.nejm.org/doi/10.1056/NEJMoa1803484)
या रोगावरील प्रभावी लस तयार करणे हे खूप आव्हानात्मक असून त्यासाठी एखादे दशक सुद्धा खर्ची पडू शकेल. नवी लस तयार झाल्यानंतर ती पौगंडावस्थेत दिल्यास प्रौढपणीच्या क्षयरोगाचा प्रतिबंध करेल अशी अपेक्षा आहे.

3. गाऊट उपचार : गाऊटचे प्रमाण अविकसित देशांमध्ये वेगाने वाढते आहे. बऱ्याच जणांचा आजार प्रचलित औषधांनी आटोक्यात येताना दिसत नाही- विशेषता मधुमेह आणि गाउट या सहव्याधी असताना. हा आजार नियंत्रणात न राहिल्यास प्रत्येक अटॅकगणिक हृदय आणि मेंदूवर देखील विपरीत परिणाम होत राहतो. अशांसाठी काही प्रभावी नवी औषधे विकसित होत आहेत. उदा : AR882, PEGylated uricase (एन्झाइम), interleukin-1beta inhibitors.

4. अ‍ॅस्पिरिनची घोडदौड : मुळात वेदनाशामक आणि दाहप्रतिबंधक गुणधर्म असलेल्या या औषधाच्या शोधाला आता 125 वर्षे उलटली आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळीप्रतिबंधक म्हणून देखील त्याचा वापर रूढ आहे. आता एका नव्या दिशेने त्याची घोडदौड सुरू आहे. यकृताच्या आजारांमध्ये steatosis हा एक महत्त्वाचा आजार, ज्यामध्ये यकृतात मोठ्या प्रमाणात मेद साठते. यावर उपचार म्हणून कमी डोसमधील (८१mg) अ‍ॅस्पिरिन देण्याचे प्रयोग यंदा सुरू झालेत. सुरुवातीच्या या प्रयोगांमधले निष्कर्ष आशादायक आहेत.(https://www.clinicaltrials.gov/study/NCT04031729?term=low-dose%20aspirin...).

• वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणे

१. थर्मल कॅमेरा तंत्रज्ञान : यामध्ये विशिष्ट प्रकारचा संवेदक-कॅमेरा शरीरासमोर धरून शरीर तापमानाची नोंद घेतली जाते. शरीरातल्या अनेक आजारांमध्ये त्वचेच्या तापमानात फरक पडतो या तत्वास अनुसरून thermography तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. ते रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत सोपे आणि इजाविरहित तंत्र आहे.
चित्र पहा :
thermography.jpg

संबंधित कॅमेरा व्यक्तीच्या पुढे धरलेला आहे. त्यातून चेहऱ्याचा व्हिडिओ काढला जातो. पुढे तो व्हिडिओ क्लाऊड सॉफ्टवेअरमध्ये पाठवला जातो. मग कम्प्युटर व्हिजन व मशीन लर्निंगच्या मदतीने शरीरातील काही बिघाडांचा अंदाज येऊ शकतो. उदाहरणार्थ, मधुमेह (प्रकार-२), उच्चरक्तदाब, मेदबिघाड, स्तन-कर्करोग, विविध प्रकारचे संधिवात, इत्यादी. म्हणून अतिशय सोपी असलेली ही इजाविरहित परीक्षा काही आजारांची चाळणी चाचणी म्हणून वापरता येते.
नोव्हेंबर 2023मध्ये भारतातील १३व्या सामाजिक नवकल्पना राष्ट्रीय परिषदेत ‘आरका रिसर्च’ या संशोधन संस्थेला हे तंत्रज्ञान ३ आजारांसाठी विकसित केल्याबद्दल ‘अंजनी माशेलकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. (https://indianexpress.com/article/cities/pune/tech-that-detects-risk-of-...)

२. E-nose उपकरणे : शरीरातील चयापचयातून निर्माण होणाऱ्या रसायनांपैकी काही वायुरूप असतात व ती काही प्रमाणात श्वासातून उत्सर्जित होतात. या नव्या उपकरणांच्या साहाय्याने मानवी श्वासाचे रासायनिक पृथक्करण करता येते. त्यातून संबंधित व्यक्तीचा श्वास-तपशील मांडता येतो. हा तपशील निरोगी अवस्था आणि विविध रोगांमध्ये अर्थातच भिन्न असतो. अशा उपकरणात मानवी वास संवेदनेशी साधर्म्य दाखवणारे रासायनिक संवेदक बसवलेले असतात. त्यांच्यामध्ये श्वास सोडल्यानंतर वायूच्या वासानुसार त्यांचे यथायोग्य पृथक्ककरण संगणकीय पद्धतीने केले जाते. गेल्या काही वर्षांपासून हे संशोधन जोरात आहे.
ENose.png
खालील आजारांची चाळणी चाचणी म्हणून त्याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे :
A . विविध प्रकारचे श्वसनरोग : दमा, श्वसनमार्गातील दीर्घकालीन अडथळा, जंतुसंसर्ग आणि फुफ्फुसांचा कर्करोग. या कर्करोगाचे लवकर निदान व्हावे आणि त्याचा प्रकार समजावा या मुद्द्यावर संशोधनात विशेष भर दिलेला आहे.
B. संधिवात
C . आतड्यांचे दाहजनक आजार
D . मूत्रपिंडाचे आजार
या प्रकाराची चाळणी चाचणी रुग्णांसाठी अर्थातच इजाविरहित आणि सुटसुटीत असेल.
.. (https://iopscience.iop.org/article/10.1088/1752-7163/acb791/pdf#:~:text=....)

३. ‘Smart' Stethoscope: सध्याच्या डिजिटल युगात पारंपरिक Stethoscopeला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन स्मार्ट प्रकारचे सुधारित उपकरण तयार केलेले असून सध्या त्याचे प्रयोग चालू आहेत.
smart stetho.jpg

या उपकरणाने फोनोकार्डिओग्राम आणि इसीजी अशा दोन तपासण्या एकाच वेळी करता येतात. सध्या याचा उपयोग प्रसूतीनंतर होणाऱ्या हृदयस्नायू दुर्बलतेच्या (cardiomyopathy) रुग्णतपासणीसाठी केला जात आहे. अशा रुग्णांसाठी या उपकरणाने केलेली चाळणी चाचणी बऱ्यापैकी उपयुक्त असल्याचे दिसले आहे. या चाचणीत काही दोष आढळल्यासच संबंधित रुग्णाची पुढे एकोकार्डिओग्राम ही तपासणी केली जाते. या सोप्या चाळणी चाचणीमुळे एकोकार्डिओग्राम या तपासणीचे प्रमाण सुमारे एक चतुर्थांशवर खाली आणता येईल. भविष्यातील अधिक संशोधनाची उत्सुकता आहे.

शरीरातील विविध यंत्रणा आणि त्यांच्या संबंधित वैद्यकाच्या अनेक शाखांमध्ये निरंतर संशोधन चालू आहे. त्यापैकी काही ठळक संशोधनांची ही होती ओझरती ओळख. गंभीर स्वरूपाच्या आजारांचे निदान लवकरात लवकर होण्यासाठी त्या संदर्भातील चाळणी चाचण्यांना अलीकडे खूप महत्त्व आले आहे. या चाचण्या रुग्णासाठी शक्य तितक्या इजाविरहित आणि सुटसुटीत होतील यावर संशोधनाचा भर दिसून येतो.

वैद्यकाच्या अनेक प्रांतांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर टप्प्याटप्प्याने होत आहे आणि ते स्वागतार्ह आहे. या आधुनिक विषयाचा आढावा यापूर्वीच दोन स्वतंत्र लेखांमध्ये घेतलेला आहे (https://www.maayboli.com/node/83016). शस्त्रक्रियांच्या प्रांतात यंत्रमानवी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर गेल्या काही वर्षांपासून होत आहे. भारतातही हे तंत्रज्ञान बऱ्यापैकी रूढ झालेले आहे. आजच्या घडीला भारतात अशी ६६ तंत्रज्ञान केंद्रे कार्यरत आहेत.

येणाऱ्या नव्या वर्षात वरील सर्व संशोधनांची अधिक प्रगती होऊन नव्या सुखकर रोगनिदान पद्धती आणि सुधारित औषधोपचार संबंधित रुग्णांना उपलब्ध व्हावेत ही सदिच्छा !

आपणा सर्वांना कायम उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा देखील व्यक्त करतो.
***********************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक आणि माहितीपूर्ण लेख +१
>>झोपेतील श्वसन-अवरोध (sleep apnea)>>> या आजारामुळे संगीतकार बप्पी लाहीरी यांचे निधन झाल्याचे आठवले

वैद्यक क्षेत्रातील नवीन वाऱ्यांचा गोषवारा छान.

नुकतेच 'रोबोटद्वारा गुडघ्याच्या शस्त्रक्रिया' अशी एका प्रसिद्ध रुग्णालयाची जाहिरात बघितली आणि इथे हा लेख ! वेगवान बदल होत आहेत.

हे संशोधन प्रत्यक्ष जेव्हा वापरले जाईल.
व्यक्ती तितक्या प्रकृती नुसार ते बहुसंख्य लोकांना लागू होवू ध्या .
नंतर त्या वर काही प्रतिक्रिया देता येईल.

डॉक्टर, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.

१. HrC मार्कर टेस्टचाच प्रकार आहे का? कॅन्सर वेळेत डिटेक्ट होण्यासाठी नियमीत करावी लागेल का ती चाचणी?

२. या चाचणीचा उपयोग जंतूसंसर्गाव्यतिरिक्त अन्य दाहजनक आजारांत (उदा. rheumatoid arthritis) देखील करता येईल. >>> याबद्दल थोडी अधिक माहिती देऊ शकाल का?

सर्वांना धन्यवाद !
१. वाऱ्यांचा गोषवारा >>> शब्द्प्रयोग आवडला Happy

२. हे संशोधन प्रत्यक्ष जेव्हा वापरले जाईल... >>> भविष्यात तेव्हाचा वेगळा आढावा घेउच ! हा संशोधन प्रारंभ आहे.

३. @माधव ,
प्रश्न चांगले आहेत . जरा वेळाने घेतो

@माधव
HrC >>
१. होय, ही चाचणी म्हणजे रक्तासंबंधित सोपा मार्करच आहे. त्याचे संभाव्य उपयोग असे आहेत :
. कर्करोगाचा अंदाज बांधणे, तो लवकरच्या स्थितीत ओळखणे तसेच, प्रत्यक्ष रोगाचे उपचार झाल्यानंतर त्यांचा प्रभावीपणा तपासण्यासाठी.
. कर्करोग ओळखण्याबरोबरच त्याचे वर्गीकरण देखील करता येईल.

चाचणी किती कालांतराने करावी लागेल हे व्यक्तीसापेक्ष असेल. म्हणजेच-
१. ती व्यक्ती सामान्य निरोगी व्यक्ती आहे आणि चाळणी चाचणीला सामोरे जाती आहे, किंवा
२. एखाद्या कर्करोगाचा विशेष धोका असलेली व्यक्ती आहे.

२. दाहजनक आजारांत (उदा. rheumatoid arthritis) >>>

विविध दाहजनक आजारांमध्ये रक्तात विशिष्ट प्रथिने किंवा cytokines संचार करीत असतात. ती ओळखण्याचे काम ही नवी चाचणी अधिक संवेदनशीलतेने करेल. तसेच त्या प्रथिनांचे प्रमाण देखील मोजता येईल. >>> लवकर निदान.

>>>(उदा. rheumatoid arthritis)>>>
हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असतो हे खरे आहे का?

डॉक्टर, उत्तरांकरता आभार!

पण लवकर निदान झाल्यास rheumatoid arthritis बरा होऊ शकतो / त्याची तिव्रता आटोक्यात राहू श्कते का ? (सॉरी, चुकीच्या धाग्यावर विचारतोय, पण विषयाच्या ओघात विचारून टाकले)

@ साद
RA हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असतो हे खरे आहे का?

होय, हे खरे आहे. RA हा ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे. असे आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात असतात आणि RA हाही त्याला अपवाद नाही.
सर्वसाधारणपणे,
स्त्री : पुरुष आजाराचे प्रमाण असे :
४:१ ( वयोगट ५०च्या आत) आणि
२:१ (वयोगट ६०च्या पुढे)

स्त्री-हार्मोन्स संबंधित काही घटक हा आजार घडवण्यास कारणीभूत ठरतात तर अन्य काही घटक संरक्षक देखील असतात. एकंदरीत स्त्री-हार्मोन्स आणि RA याची कारणमीमांसा गुंतागुंतीची आणि वादग्रस्त आहे.

@माधव
RA हा आजार खऱ्या अर्थाने ‘बरा’ होत नाही !
परंतु लवकर निदान झाल्यास आणि वेळेवर उपचार सुरू केल्यास remission चांगल्या प्रकारे होते. साधारणपणे, प्रथम लक्षणे दिसल्यानंतर जर तीन महिन्यांच्या आत उपचार सुरू झाले तर रुग्णाचे भवितव्य चांगले राहते.

मात्र,
आजार वयाच्या 30 वर्षांच्या आत उद्भवणे, स्त्रीलिंग आणि सांध्याखेरीज इतरही शरीरभरातील लक्षणे असणे, या घटकांमुळे आजार तीव्र स्वरूपाचा होण्याची दाट शक्यता असते.

वाचतोय ....
हिमांशू रॉय यांचा उल्लेख आला आणि मन हेलावलं. धडधाकट शरीरयष्टी लाभलेले रॉय डोक्यात गोळी झाडून घेतील अशी कधी कल्पना केली नव्हती. आत्महत्येचं कारण मेंदूचा कर्करोग हे आता कळलं. मी त्यांच्या या कृतीवर कविता केली होती....
सलाम

( हिमांशु रॉय Addl. IG )

आधी जखम मनाला
मग धाय धाय गोळी

जोवरी निरोगी काया
लाविलीस तिज माया
येता वनवास कपाळी
संपविली येथली खेळी
मग धाय धाय गोळी

दिले नाव गाव कायेने
झुंजला तूही तडफेने
देहा येता रया पांगळी
लालेलाल कानाची पाळी
मग धाय धाय गोळी

मर्द रांगडा तू शिपाई
मर्जी पुढे तुझ्या न काही
मृत्यूचेही एनकॉंटर होइ
झाडली शेवटची गोळी
मग धाय धाय गोळी

तिरंग्यास तू आलिंगिले
जनसेवेस्तव जीवा वेचिले
सलामी तुज फैरींची एकवीस
उडेल बंदूकीची गोळी
मग धाय धाय गोळी

दत्तात्रय साळुंके

द सा ,
अप्रतिम कविता ! मन हेलावले
..
सामो ,
होय, त्या आजाराचे एकंदरीत स्वरूप बघता घाबरणे स्वाभाविक आहे.

यंदाच्या सर्वच संशोधनांना मूळ लेखात स्थान देणे शक्य नव्हते. त्या व्यतिरिक्त जी काही वैशिष्ट्यपूर्ण संशोधने होत आहेत त्यांची दखल प्रतिसादातून घेत राहीन.
.. ..
लठ्ठपणासंबंधी नवे काही :
मुळात ही खूप क्लिष्ट समस्या आहे. त्याच्या कारणमीमांसेत जनुके, पर्यावरण, आहार व जीवनशैली, प्रक्रियायुक्त खाण्याचा भडिमार, हॉरमोन्स .. वगैरे सर्व प्रस्थापित मुद्दे असून संशोधक ते कोळून प्यायलेले आहेत. परंतु तरीही सर्व लठ्ठ व्यक्तींना लागू होईल असे समाधानकारक स्पष्टीकरण अद्याप मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून आता लठ्ठपणामधील मेंदूतील संदेश यंत्रणांच्या संदर्भातील संशोधन होत आहे.

अशाच एका संशोधनातून एक नवे गृहीतक पुढे आले आहे. मेंदूमध्ये एक भूक नियंत्रण केंद्र असते. एखाद्याचे नेहमीचे जेवण झाल्यानंतर त्या केंद्रातून स्मरणशक्ती केंद्राला संदेश जातो. काही जणांच्या बाबतीत या दोन केंद्रांमधील संदेशवहनात मोठा अडथळा होऊन बसलेला असतो. त्यामुळे, अशा लोकांचे नेहमीचे जेवण झाल्यानंतर एक प्रकारे ते लोक, ‘आपण आता पुरेसे जेवलो आहोत’ हेच विसरून जातात आणि ते अजून खात बसतात.

या गृहीतकावर अधिक अभ्यास चालू आहे.
https://www.nature.com/articles/s41586-023-06459-w

वजन कमी करणे ह्या वर लक्ष केंद्रित करण्याची काहीच गरज नाही.

म्हणून तर वजन आणि हेल्थ हा विषय किचकट आहे.
वजन योग्य असले म्हणजे निरोगी व्यक्ती आहे आणि जास्त वजन असेल तर तो व्यक्ती रोगी आहे .
हे स्पष्ट सिध्द झालेले नाही.
आपण किती जेवण घेतो ह्याचा वाजनशी काही संबंध नाही.
४० किलो वजन असणारी लोक. खूप मोठा आहार घेतात अशी पावलोपावली उदाहरण दिसतील.
आणि मोजून खाणारे ओव्हर weight आहेत ह्याची पण खूप उदाहरणे आहेत

धन्यवाद.
..

औषधी इंजेक्शनच्या प्रांतातले नवे संशोधन वैशिष्ट्यपूर्ण आहे. काही औषधी इंजेक्शन्स दररोज किंवा दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा देखील घ्यावी लागतात. त्यातून जर ती दीर्घकाळ घ्यायची असतील तर रुग्ण जेरीस येतो. त्या दृष्टीकोनातून काही औषधांच्या बाबतीत हे नवे संशोधन आहे.
hydrogel.jpg

तेच औषध हायड्रोजेल स्वरूपात इंजेक्शनने दिले तर ते शरीरात अत्यंत हळू गतीने पसरत राहते आणि एका इंजेक्शनचा प्रभाव काही महिने टिकू शकतो.
(उदा. मधुमेहावरील GLP-1 प्रकारची औषधे).

बरोबर.
GLP-1 प्रकारच्या (किंवा अन्य) औषधांच्या संदर्भात ते लिहिलंय.
हा दुवा ( २१ नोव्हेंबर, २०२३ चा ) द्यायचा राहून गेला होता :
https://www.cell.com/cell-reports-medicine/fulltext/S2666-3791(23)00486-X

Pages