निलेशचा फोन वाजला त्यांनी फोन उचलला व एकदम म्हणाला “ अरे बापरे, कधी झालं?, कशी आहे ती ? ती तिकडे सुखरूप पोहचली का ?
मला एकदम भिती वाटली. कोणाचा फोन असेल, कोणाला काय झालं असेल. असे अनेक प्रश्न मनात आले. फोन ठेवताच मी निलेशला घाबरुन विचारले “ काय झालं ?”
तर निलेश म्हणाला, “ आपल्या गावातील ती शंकुतला आहे ना, तिला वेड्याच्या दवाखान्यात नेले आहे. ”
मी म्हणाले , “ शंकुतला, तीच का लोकांना त्रास द्यायची, दगड मारायची .”
तसा निलेश म्हणाला, “अगं नाही, नाही , ती खुप चांगली मुलगी होती. नंतर ती वेडी झाली पण स्व:तहुन कधी तिने कोणाला दगड मारला नाही की त्रास दिला नाही.”
माझ्या मनात शंकुतलाचे विचार सुरु झाले. मला आठवते तिची पहिली भेट . माझे नुकतेच लग्न झाले होते व त्या गावात नवरी म्हणून आले. दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्यासाठी मी नातेवाईकांसोबत निघाले. मंदिराजवळ पोहचताच एक वेडी एकदम माझ्याजवळ आली मी खुप घाबरले व काही कळण्याआधी मी इकडे तिकडे पळायला लागले.माझ्यासोबत असणाऱ्यांनी तिला तेथून घालवले व मला म्हणाले घाबरु नको ती काही करत नाही. पण त्या दिवसापासून मला तिची भिती कायम मनात होती.
शंकुतला एक वेडी म्हणून गावात ओळखली जात होती. फाटले , मळके कपडे , आंघोळ न केलेली , चेहरा कावराबावरा .तिचं बाह्यरूप पाहिल्यावर कोणीही घाबरेल. आजही ती खिडकी समोर अचानक पाहुन मला तिची खुप भिती वाटली. दुसरी भेट झाली ती, मी बांळतपणाला गावात आले तेव्हा. मी माझ्या बाळाला घेऊन झोपले होते. जाग आला तो गोंगाट ऐकून . बाहेर मुलांचा ओरडाओरडा ऐकू येत होता. कसला आवाज म्हणून मी खिडकीतून पाहण्यासाठी उठले व खिडकीतून डोकावणार तर माझ्यासमोर एकदम एक विचित्र चेहरा समोर आला. तोच चेहरा जो मंदिरात अचानक समोर आला व मी पार घाबरले लगेच मागे सरकले. तो चेहरा आत तर येणार नाही ना याची मला भिती वाटत होती. छातीची धडधड वाढली होती. पण मी हिंमत करुन खिडकी बंद केली व माझ्या बाळाला जवळ घेतले.
बाहेर मुलांचा आवाज मोठमोठ्यानी येत होता. “ शंकुतला , शंकुतला, मारा तिला दगड ” असं म्हणून मुलं बहुतेक तिला मारत होती.
कोणी म्हणत होतं ,“पळा, पळा शंकुतला चिडली. ती आपल्याला मारेल.” कदाचीत तिही मुलांकडे दगड मारत असावी. तेवढयात कोणाचा तरी आवाज आला. “मुलांनो पळा एखादा दगड लागेल कोणाला. आणि तिलाही त्रास देऊ नका,चला पळा.” मुलांना पळवुन लावले व शंकुतलेला जाऊ दिले. मी आतूनच बाहेरच्या परिस्थीतीचा आढावा घेत होती. आता सर्व वातावरण शांत झालं होतं. मी शंकुतलेच्या विचारात एवढे गुंग झाले होते की निलेशच्या आवाजाने भानावर आले.
पण मला शंकुतला बद्दल उत्सुकता निर्माण झाली. शंकुतला अशीच होती की तिच्या वेडं होण्या मागे काही कारण किंवा इतिहास आहे. मी निलेशला तिच्या बद्दल विचारलं.
निलेश सांगायला लागला की, “ शंकुतलाची आई लहानपणी वारली. वडील निट सांभाळत नसल्यामुळे मामानी तिला गावी आणले.”
शंकुतला सोज्वळ ,सुंदर मुलगी. लांब केस, रंग सावळा पण तरी चेहरा तजेलदार. शंकुतला, बघता क्षणी मनात भरणारी. शंकुतला कामातही हुशार. मामीला कामात मदत मिळाली त्यामुळे मामी खुश होती.
आवाज छान असल्यामुळे गावातील महिला मंडळातही तिची वर्णी लागायची. शिवाय शिक्षण मॅट्रीक पास असल्यामुळे बालवाडीत शिकवायची. बालवाडीतील मुलांची ती फार लाडकी होती. ती छान गाणी , गोष्टी सांगून शिकवायची. शिवाय आई प्रमाणे मुलांवर माया करायची. तिच्या लग्नासाठी मामांनी मुलं पाहायला सुरवात केली होती. ती अशीच एकदा गावी नातेवाईकांच्या लग्नसंभारंभासाठी गेली लग्नसंभारंभातून परत आल्यावर काही दिवसातच तिला अचानक वेड्याचे झटके यायला लागले. मामांनी मोठ्या शहरात जाउुन तिच्यावर उपचार केले. परत आल्यावर ती चांगली वागायची .पण काही दिवसांनी ती परत वेड्यासारखी वागायची. कोणी म्हणायचं तिच्यावर कोणी जादुटोणा केला तर कोणी म्हणायचं डोक्यावर परिणाम झाला. पण खरं कारण काही कळलं नाही .मामांनी बरेच उपचार केले. मात्र आर्थिक परिस्थीतीमुळे त्यांना उपचार थांबवावे लागले. पुढेपुढे तर तिला अंगावरील कपड्याचेही भान राहत नव्हते.
त्यामुळे तिला खेालीत बंद करून ठेवावं लागायचं.तिला मोकळ सोडलं की ती गावात पळून जायची . पुढेपुढे वेडेपण वाढत गेले.आता तर ती घरी पण यायची नाही.कुठेही झोपयची. एकदा अशीच ती मंदीरात झोपली असताना एका युवकांनी नशेत तिच्यावर बळजबरी केली. तिचा आरडाओरडा ऐकुन गावातील लोकं जागी झाली व त्या युवकाला बेदाम मारले. या प्रकाराने ती खुप घाबरली होती. एक चांगली मुलगी म्हणुन ती गावात ओळखली जायची. शालीनता काय हे तिच्याकडून शिकावं असे लोक म्हणायचे. ती वेडी असली तरी गावातील लोकं तिचा चांगुलपणा विसरले नव्हते. लोकं तिला कधी खायला द्यायचे कधी तिला साडी द्यायचे. पण तिने स्वत:कधी कोणाला काही मागितले नाही. काही टारगट मुलं तिला चिडविण्यासाठी दगड मारायची.पण तिने कधी मुलांना दगड मारला नाही. पण मुलांना पळविण्यासाठी दुसऱ्या दिशेने दगड भिरकावायची.तिचा दगड लागुन कोणी जखमी झालं असं ऐकल नाही. वेडी होती पण कधी कोणाला इजा केली नाही. आणि आता बिचारीला वेड्याच्या दवाखान्यात नेले आहे. पुढे काय होणार तिच देव जाणे असं म्हणून निलेश थांबला.
हे सर्व ऐकून मी सुन्न झाले. निलेश सांगत होता त्यांच सर्व चित्र माझ्या डोळ्यापुढे उभं राहलं.मला शंकुतलाबद्दल खुप वाईट वाटत होते. दिवस असेच पुढे गेले. एक दिवस गावाच एक माणूस घरी आला. तेव्हा मी न राहवून त्याला शंकुतला विषयी विचारले. तो म्हणाला “तिचा काही पत्ता नाही”
मी म्हणाले “का, काय झाल असं.”
तर तो म्हणाला, “ काही दिवसापुर्वी तिच्या मामानी वेड्याच्या दवाखान्यात जाऊन चौकशी केली पण शंकुतला नावाची कोणीच या दवाखान्यात भरती झाले नसल्याचे समजले.शिवाय त्या तारखेला कोणीच त्या गावातून पेंशन्ट आला नाही. असे त्यांनी सांगितले.पोलीसाकडे चौकशी केली तर ती गाडीतून उतरून पळून गेली म्हणाले.पण आजुबाजुला चौकशी केली असता तिला गावातून नेत असताना जंगलात सोडून दिल्याचे कळले”.
हे ऐकून तर मला धक्कच बसला. त्या निष्पाप जीवाचे लचके जंगलातील प्राण्यांनी तोडले असणार या विचाराने अंगावर काटा आला. नियतीच्या मनात काय होतं कोण जाणे एका चांगल्या मुलीच्या जीवनाचा खेळखंडोबा झाला. परत एकदा आपण जीवनाच्या रंगमंचावर नियतीच्या हातातील कठपुतळ्या असल्याचा अनुभव आला.
शकुंतला असे नाव असते.
शकुंतला असे नाव असते.
सुन्न!
सुन्न!
बापरे. असं कसं करू शकतात?
बापरे. असं कसं करू शकतात?
तर तो म्हणाला, “ काही
तर तो म्हणाला, “ काही दिवसापुर्वी तिच्या मामानी वेड्याच्या दवाखान्यात जाऊन चौकशी केली पण शंकुतला नावाची कोणीच या दवाखान्यात भरती झाले नसल्याचे समजले.
>>> मग तिला परस्पर कोण वेड्याच्या इस्पितळात घेऊन गेलं होतं ?
एडिट होत असेल तर ते 'शंकुतला'
एडिट होत असेल तर ते 'शंकुतला' ऐवजी 'शकुंतला' करा....... का ती वेडी होती तिचे कोणी न्हवते म्हणून नावात काय ... चालायचे असे नका करू.