आदिती - एक उभरती कलाकार .

Submitted by किंकर on 1 December, 2023 - 00:34

परदेशी स्थायिक झालेल्या बहुतेकांची मायभूमीची ओढ त्या माती इतकीच आपल्या आप्तेष्ठांची, सण-वारांची, परंपरांची आणि संस्कृतीची असते. यातील कोणी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी तर कोणी व्यावसायिक कलाकार म्हणून विविध कलोपासना करणारे असतात. त्यांना या प्रगल्भ क्षेत्राचा थेट संपर्क तुटल्याचे खूप जाणवते. असे अनेक जण आपली कला साधना निष्ठेने चालू ठेवतात आणि आपल्या संस्कृतीची पाळेमुळे दूरदेशी ठामपणे रुजवतात. पण आमच्यासारखे तानसेन नसून कानसेन असणाऱ्यांची मात्र थोडी कुचंबणा होते.

दिवाळी असो वा गणेशोत्सव, उत्सवाचे वातावरण हे घरातील उत्साहाइतकेच आजूबाजूचे चैतन्य, लगबग आणि तयारी यामुळे बहरते. त्याची उणीव परदेशी जाणवल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी या सण उत्सवांची झलक इंटरनेट वर पाहून मनाचे समाधान करणारे आम्ही, दर वर्षी नव्याने येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली संस्कृती शोधतो. या वर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान अचानक बाप्पांच्या दोन गीतांना सामोरे जाणे झाले. त्यातील एक गाणे होते - आदिश्री म्युझिक यांचे नवीन गाणं ' बाप्पा तु गजानना'.

कॅलगरी येथील श्री योगेश आणि सौ. वैशाली पाटील यांची कन्या अदिती, जी मूळची शिरुड, अमळनेर येथील आहे, तिने गायलेल्या - 'बाप्पा तू गजानना .. ' या गाण्याने खान्देशातील एक झाकले माणिक आपल्यासमोर चमकुन आले आहे. केवळ बारा वर्षांच्या आदितीने हा म्युझिक व्हिडीओ साकारताना गाणे अतिशय सहज सुंदरतेने गायले आहेच. पण तिने तिच्या नावातील सर्जनशीलता, आणि गाण्यातील सात्विकता सहजतेने जपताना अभिनय देखील जात्याच कलाकार असल्याची साक्ष दिली आहे. आता नुकतीच तिची दोन नवी गाणी प्रकाशित झाली आहेत - श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी आणि स्वामी. या रचना देखील तिने तितक्याच सुरेल सहजतेने सादर केल्या आहेत. यांचे विडिओ सुद्धा लवकरच प्रकाशित होतील.

तिच्या या सहज सुंदर वावरामुळे केवळ दोनच महिन्यात तिच्या ' बाप्पा तु गजानना' व्हिडिओला अठरा लाखांहून अधिक लोकांनी भेट देत त्या गाण्याचा आनंद लुटला आहे. अनेक वृत्तपत्रांनी देखील तिच्या व्हिडिओच्या यशाचे कौतुक केले आहे. संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना तिने जो सुंदर कलाविष्कार केला आहे त्याची दाखल अनेक टीव्ही कलाकारांनीही घेऊन कौतुक केले आहे.

आता अदितीने सुरु केलेला हा गायन आणि अभिनय कलेचा प्रवास अधिक सजगतेने करावा. संगीताचा शास्त्रीय पाया भक्कम करून, गरजेनुसार त्या क्षेत्रातील तज्ञ् जाणत्या लोकांचे योग्य मार्गदर्शन घेतले तर तिचे भवितव्य अनेक उच्च यशाची शिखरे मोठ्या सहजतेने सर करेल यात शंकाच नाही.

यासाठी तिला कुटुम्बीयांच्यासह सर्व सहृदांचे आशीर्वाद आणि प्रेरणा नेहमीच बरोबर राहील. आणि अदितीची उत्तरोत्तर प्रगती पाहताना आम्हा सर्व कॅलगरीकरांना ती आमच्या परिवारातील एक सदस्य आहे याचा नेहमीच अभिमान व आनंद होईल. तिचे भवितव्य उज्ज्वल आहे अशी आम्हा सर्वानाच खात्री वाटते आणि तिने जोमाने पुढे जावे याच मनपूर्वक शुभेच्छा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उभरती ?

नमस्कार
अजिंक्यराव पाटील,
लेखाच्या शीर्षकात ' उभरती ' या शब्दाचा वापर ' उदयोन्मुख ' या शब्द ऐवजी झाला आहे . मूळ संस्कृत आधारित या शब्दाचा वापर हिंदीत अधिक केला जातो .

परदेशी स्थायिक झालेल्या बहुतेकांची मायभूमीची ओढ त्या माती इतकीच आपल्या आप्तेष्ठांची, सण-वारांची, परंपरांची आणि संस्कृतीची असते. >> बहुत एल ओ एल विधान है.

मुलीचे अभिनंदन पण पुढे जायचे असेल तर ट्रेनिन्ग आवश्यक आहे.

अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अदितीला शुभेच्छा ..!>>>+१
चार महिने कॅलगरीत राह्यले पण बऱ्याच गोष्टी आता कळताहेत.
किंकर तुम्ही कॅलगरीत राहता का ?
तिथे असताना जोगळेकर ताईंचा नाचाचा व मकरंदबुवांच प्रवचन असे दोन मराठी कार्यक्रम पाहिले व ऐकले...

झम्पू दामलू , रूपाली विशे - पाटील , अश्विनीमामी , सामो - आपण सर्वांचे मनपूर्वक आभार !

मंजूताई - कॅनडात प्रथम टोरोंटो येथे येणे झाले . गेले एक वर्ष मुक्काम कॅलगरी येथे आहे .

अभिनंदन !
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!