रात्रभर पडणारा पाऊस पहाटे उघडला. पण वातावरण कुंद होतं, निरुत्साही होतं. आषाढघनांनी सकाळही झाकोळून गेली होती. अंघोळ आटपून अरूण देवपूजा करत होता. तिथेच शांतीची सकाळची कामं चालली होती. डब्यांचा स्वैपाक, अथर्वची शाळेची तयारी, घरातली आवराआवर, पाणी भरून ठेवा, एक ना दोन. पण शांतीच्या हालचालीत एक शिणवटा होता. अरूणला तो जाणवला. गेले काही दिवस ते एक सावट घरावर होतंच. शांतीची नोकरी सुटली होती. या आठवड्यात शेवटचा दिवस होता. दोघांच्या कमाईत कसाबसा घरखर्च भागत होता. पण आता परिस्थिती कठीण होणार होती. काल रात्रीही दोघं तेच बोलत होते. कमी पगाराची का होईना शांतीला दुसरी नोकरी मिळणं आवश्यक होतं. पण..
अरूणला तिच्या मनातल्या उलाघालीची जाणीव होती. 'शांतू, आटप लवकर, उशीर होऊन चालणार नाही गं'. शांतीनं मान वरती केली तेव्हा तिचा चेहेरा रडवेला होता. अरूणनं डोळ्यांनीच अथर्वच्या दिशेनं इशारा केला. शाळेचा गणवेष, पाठीवर दप्तर, खिशात रुमाल, अंघोळ आटपून टापटिप भांग पाडून ताजातवान्या प्रसन्न चेहऱ्यानं तो आईबाबांकडे पहात होता. त्याच्याकडे नजर जाताच शांतीचाही चेहरा उजळला! तिनं असोशीनं त्याला हातानं जवळ ओढून त्याची पापी घेतली. 'हं, चला, चला, आटपा', हे म्हणताना अरुणचा स्वरही आनंदला होता.
अरुण आणि शांता घरातून एकत्रच बाहेर पडले. अरूणच्या पाठीवर त्याची अवजारांची धोकटी होती. शांतीच्या स्कूटीवर समोर अथर्वची शाळेची बॅग, खाण्याचा डबा आणि तिचा डबा अशा पिशव्या आणि तिच्या मागे तिला घट्ट पकडून अथर्व बसला होता. उत्तम नगरचा रस्ता भरून वाहत होता. रस्त्यावर छोटी मोठी डबकी होती. सकाळच्या कामावर जायच्या घाईत दुचाकीस्वार प्रयत्नपूर्वक ती टाळत होते. शहरात जाणाऱ्या रस्त्यावरच्या गर्दीत अरूण वाट काढत काढत पुढे गेला.
सरळ रस्ता. एका बाजूला मैदान, दुसऱ्या बाजूला सैन्यदलाच्या आवाराची लांबच लांब भिंत, त्यामुळे इकडून तिकडून वाहनं यायचा त्रास नाही. त्यात सकाळी कामावर जायची घाई. त्यामुळे आपसूकच सगळ्या वाहतुकीचा वेग वाढला होता. समोरून येणाऱ्या तीन चाकी टेंपोचा अंदाज घेत एका खड्ड्यात साठलेल्या पाण्याला चुकवत अरुण पुढे सरकला. त्याच खड्ड्यात वेगात येताना टेंपोचा पुढचं चाक आपटलं आणि आख्खा टेंपो झिंगल्यासारखा हेंदकळला. पुन्हा वेग घेण्यासाठी ड्रायव्हरने ॲक्सलरेटर पिळला अन् ...
आक्रित घडलं... टेंपोचा मागचा दरवाजा खाडकन उघडला. टेंपोचा वेग एवढा होता की दरवाजा बिजागऱ्यांवर फिरला अन् समोरून येणाऱ्या वाहतुकीवर काही कळायच्या आत फाडकन आदळला. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना हा आघात झाला. अरुण उजवीकडे होता. त्याला जणू एक लाल भिंत चालून आल्याची जाणीव झाली. प्रतिक्षिप्त क्रियेने त्यानं ब्रेक दाबला, पण ती भिंत त्याच्या मोटरसायकलवर येऊन आदळली. त्याच दरवाज्यानं त्यांच्या शेजारच्या गाडीवाल्यालाही फटकारले होता. त्यानी मारलेल्या तातडीच्या ब्रेकमुळे अंदाज चुकल्याने मागचा गाडीवाला येऊन धडकला. चारसहा दुचाक्या एकमेकांवर धडकल्या, तोल जाऊन पडल्या. पडतापडता अरुणला छातीत काही तरी जोरात दुखल्याची जाणीव झाली.
आपल्याच विचारात दुचाकी चालवणाऱ्या शांतीची तंद्री भंग झाली ती समोरून येणाऱ्या अपघाताच्या आवाजांमुळे. प्लास्टिक तुटतं होतं. काचा फुटत होत्या. गाड्या एकमेकांवर आदळत होत्या. जमिनीवर घासटल्या जात होत्या. लोखंडावर लोखंडाचे कर्कश आवाज अंगावर काटा उठवत होते. करकचून ब्रेक दाबल्याचे आवाज येत होते. आणि माणसं ओरडत, किंकाळत होती. कोणी आश्चर्यानं, कोणी वेदनेनं.
तोल सांभाळून तिनं गाडी थांबवली, समोरच्यावर आपटण्यापासून वाचवली. अरुण!?.. अरुण आहे पुढे. तिच्या काळजात धस्स झालं. आता वाहतूक थांबली होती, गर्दी तुंबली होती. एकच गोंधळ उडाला होता. तिनं स्कूटी कडेला घेतली. पर्समधून फोन काढून अरुणला लावला. रिंग तिच्या कानात घुमत होती. पण तो फोन उचलत नव्हता. पुन्हा, पुन्हा...अपघाताच्या आजूबाजूला बरीच गर्दी झाली होती. अरुणनं फोन का नाही घेतला? एवढा पुढे नसेल गेला तो. शर्ट फाटलेला, चष्मा फुटून वेडावाकडा झालेला, कुणी लंगडतंय, कुणी कळवळतंय, जखमी लोकं, रक्ताचे ओहोळ रस्त्यात, ड्रेस रक्ताने भरलेले, कुणी रस्त्यातच बसून तर कुणी कडेला लवंडून विव्हळतंय, त्यांना मदत करुन त्या रगाड्यातून बाहेर काढणारी लोकं, हाकारे-डोंबारे, पार्क केलेल्या गाड्या, पोलिसांच्या शिट्ट्या, ॲंब्यलन्सचे सायरन... इतका वेळ भरून आलेलं आभाळ गळायला लागलं. आता अपघाताच्या बाजूबाजूनी कामाला निघालेली लोकं वाट काढू लागली होती. शांतीनं जरा बावरूनच गाडी गर्दीत पुढे सरकवली. ती अथर्वला सांगत होती, अथर्व तिकडे बघू नकोस, घाबरू नकोस. आणि अथर्व ओरडला - पप्पा, पप्पा,...
****
पॅसेज मधे उघडणारा दरवाजा अंधारला होता. ढगातून वाट काढत उतरत्या उन्हाची केविलवाणी तिरीप खिडकीतून कोपऱ्यातल्या टिव्हीच्या टेबलावर उतरली होती. खोलीत तेवढाच काय तो प्रकाश होता. त्याच टेबलावर अरुणचा हार शिळा झालेला फोटो होता. खोलीत कॉटवर सासू मुटकुळं करून पडली होती. खिडकीच्या भिंतीला पाठ लावून प्लास्टिकच्या खुर्चीत शांतीचा भाऊ बसला होता. शेजारीच त्याची भरलेली बॅग होती. दिवस उरकले होते. पोलीस, वकीलाची कामं मार्गी लागली होती. काढलेली सुट्टी संपली होती. आता परत गावी निघायचं. स्वयंपाकघराच्या दारात शांती उभी होती.
दरवाज्याजवळ अंधारात स्टुलावर एक इसम बसला होता. मध्यमवयीन, कष्टाचं जीवन जगण्याच्या खुणा बाळगणारा अवतार. चेहेऱ्यावर थकवा होता, आवाजात ताण.
"मामा, मी जवर आहे तवर पोराच्या शिक्षनाचा खरचं मी बघतो. ताईंना त्याची काळजी नको."
"..."
"टेंपोचा इंशुरन हाए. तुमाला नुक्सानभरपाई मिळल. तुम्हाला ठावं हाए. पन माज्या मनाला बरं वाटत नाही"
"दाजींचा जीव गेला. कस्ची नुक्सानी देताव?"
कॉटवरून सासूचा हुंदका आला. म्हातारीची कुडी गदगद हलत होती.
"मामा, मी मालक है. तुमची धा वेळा, नै हजार वेळा माफी मागल. डायवरनं काय केलं ते तो भोगल. पर मी काय चुकी केली सांगा? माजाबी धंदा बसला की. चूक केली वाटतं डायवर ठेवला. दादांचा जीव गेला हे माज्याबी डोक्यातून जात नै. पन करू काय? पोरगं तुमचं हुशार हाये, शिकलं तर नाव काढेल"
"हायेच ते".
"मामा, मी काय कोनी अमीर नै. माळकरी है. तुमी पायलंए. हे एवडं नाई म्हनू नगा. पोराचं शिक्शान मी करतो. ताईंना म्हातारीचं औषधपानी बघायचंय, घर चालवायचंय, म्हाईतीए मला. पोरगा शिकला तर नाव काढलं. चांगल्या साळंत आहे. आता फिया काय कमी असतात व्हय?" तो थांबला.
"का? जड झालं काय आम्हाला भाच्याचं शिक्षाण?" भावाचा आवाज जरा चढा लागला.
"दादा, हो म्हणून सांग त्यांना" संथ स्वरात शांती म्हणाली. "त्यांचा फोन नंबर घे. गरज लागली की फोन करु म्हणावं". ती वळून स्वयंपाकघरात गेली आणि मोठमोठ्यानं आवाज करत भांडी आवरू लागली.
दार धाडकन उघडलं होतं. तिनं मागे वळून पाहिलं. दारात अथर्व उभा होता. त्याच्या मागे संध्याकाळच्या उन्हात बाहेरचा पॅसेज मात्र उजळला होता.
****
ऑफिसच्या रिसेप्शन मध्ये शांतीचा हात धरून अथर्व उभा होता. अरूणचे साहेब ओणवे होऊन त्यांच्या गालाला हात लाऊन म्हणाले, 'अथर्व, खूप खेळायचं, खूप शिकायचं हं! आणि आईला त्रास द्यायचा ... नाऽही!' अथर्वनं हसऱ्या चेहऱ्याने मान हलवली. वातावरणातल्या आनंदी तरंगांचा त्यालाही अंदाज आला होता. शांती म्हणाली, 'होते मी जॉईन एक तारखेपासून, सर'. साहेब ओके म्हणाले. तिला अनुकंपा तत्त्वावर अरूणच्या कंपनीत जॉब मिळाला होता. शांती वळली, अथर्वनं न सांगता सगळ्यांना बायबाय केलं. सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर स्मितहास्य फुललं. दरवाजा लोटून ती बाहेर पडली. नुकतीच एक श्रावणसर रस्ते लख्ख धुवून गेली होती, निळ्या आकाशात दोन चार चुकार ढग होते. बाकी आसमंत उजळून निघाला होता.
मस्त जमली आहे कथा
मस्त जमली आहे कथा
मस्त कथा.
मस्त कथा.
>> पटकन विसकटुन पुन्हा परत
>> पटकन विसकटुन पुन्हा परत झटकन आवरलेला पसारा आठवला
छान कथ!
छान कथा!
कथा आवडली.
कथा आवडली.