“मुरुगन, यू देअर? ऐक तुझ्यासाठी काम आहे. प्लान असा आहे, मुंबई वरून अमेरिका, अमेरिकेतून दुबई, दुबईतून इराक, इराक मधून उझबेकिस्तान. तिकडून अफगाणिस्तान नंतर आउटर मंगोलिया, मधेच एक वेळ ऑस्ट्रेलिया, पुन्हा अफगाणिस्तान...”
एव्हढे आढेवेढे, एव्हढा द्राविडी प्राणायाम. ग्रेमॅनचे प्लानिंग हे असं असतं.
केकूही आता शिकलाय. किराणा भुसार दुकानात तो हेच डावपेच वापरतो. आधी हवा पाण्याच्या गप्पा. नंतर लक्स, पार्ले-जी, शाम्पूचे सशे अशी सटर फटर स्टेशन घेत गाडी एकदम बासमती तांदुळावर, “बासमती काय भाव?” दुकानदार चमकून खरा भाव बोलून जातो. असो.
“ते समजलं. शेवटी कुठे जायचं ते बोला.”
“ओके, शेवटी पाकिस्तान. तिथे पोचल्यावर पुढच्या सुचना मिळतील.”
“ग्रेमॅन सर, तुम्ही झीरो झीरो सेवेनला का नाही पाठवत? नेहमी नेहमी मीच का? शेवटी ह्यात मला काय मिळणार?” केकुने सरळ मुद्द्याला हात घातला.
“झीरो झीरो सेवेनच्याने हे काम होणारे असते तर मी तुझ्याकडे का आलो असतो? आणि राहता राहिला “मला काय मिळणार?” बोल क्या चाहते हो. जो चाहोगे वो मिलेगा अगर तुम जिंदा वापस आ गये तो.”
केकू एक भीषण डायलॉग टाकणार होता पण आजकल त्याचाही उबग आला होता.
“देखो सर, मी इन्कम टॅक्स कधी चुकवला नाही. फकस्त ते रिटर्न भरायचे मला फॉरएवर माफ करा. मला ते अर्थशास्त्राचे जागरण – आय मीन – जार्गन मला कधी समजलं नाही. 80 CC म्हणजे अर्धा ग्लास. एव्हढेच आपल्याला माहित.”
“हम्म्म, बघतो. मुरुगन, आय टी रिटर्न म्हणजे जिवंतपणाचे व्यवच्छेदक लक्षण! मला प्रेसिडेंट बरोबर डायरेक्ट लाईन ओपन करावी लागेल.”
“असं असेल तर मग तुम्ही चीन आणि पाकिस्तान. रहा झेलत. ह्या कामात मी जर कामी आलो तर माझ्या कुटुंबाला LICवर सोपवणार काय?”
“अरे माझ्या मुरु, अस अभद्र नको बोलूस रे.” केकूला पुढे बोलायची संधी न देता ग्रेमॅनने आपली कार पुढे काढली. “हे बघ, अजून पाच मिनिटात कुरिअर येऊन तुला किट डीलीवर करेल ते घे नि मुकाट्याने कामाला लाग.” फोन बंद झाला.
ग्रेमॅनच्या इच्छे विरुद्ध जाणे शक्यच नव्हते. काहीही म्हणलं तरी अनेक कठीण समयी त्यानेच देवासारख धावून येऊन केकूला वाचवले होते.
कुरिअर आलाच.
“इथे Q. G. मुरूगन कोण आहे? त्याच्या साठी कुरिअर आहे. तुम्ही का? काही आय डी प्रूफ? रेशान कार्ड? चालेल. इथे सही करा, ही बॅग घ्या नि मला मोकळं करा.”
तर असे हे एकूण केकुचं लाईफ. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!
केकू “खयालोमे”पेटीचे झाकण उघडून घरी परतला तर बायको लाटण्याला तेल लावून वाट भाघात होती. पोळीला तेल नाही लावणार एक वेळ.
“या. झाली घराची आठवण? कुठे उनदडायला गेली होती स्वारी? इकडे पोळी भाजी कोण आणणार? त्या पेटीतून झक्कास जेवण झाले असणार! बोलाची कढी बोलाचा भात. बायको गेली झालनात. ही पेटी घरात आली. जणू माझी सवत. उद्या मी काय करते तुम्ही पेटीत गेलात कि पेटीला बाहेरून कुलूप लावते. मग बसा त्या नटव्या सटव्यांच्या बरोबर... “
“अग अग किती बोलतेस? मी एव्ह्ढा इंटरनॅशनल स्पाय! स्पाय तिन्ही जगाचा, बायकोपुढे भिकारी.” बायको समोर केविलवाणा केकू.
“अहो इंटरनॅशनल स्पाय!, घ्या ती पिशवी आणि त्या मामा काणे कडून पोळी भाजी घेऊन या. सामानाची यादी टाका मारवाड्याकडे. येताना दोन कटिंग चहा प्लास्टीकच्या पिशवीतून आणा. दोन कप पण दे म्हणव.”
केकुला घरा बाहेर पडताना खूप काळजी घ्यावी लागते, घराच्या वर अवकाशात मित्र आणि शत्रू राष्ट्रांचे जिओ सिंक्रोनस उपग्रह वाट बघत असतात. त्याच्या डोक्यावर भिर भिरत असतात. केकू डेक्कन जिमखान्यावर गेला कि सगळे उपग्रह डेक्कन वर. ताबडतोब संदेशांची देवाणघेवाण सुरु. आता हा काय करतो म्हणून सगळे घाबरलेले. हे पहा एक सँपल:
“केकू संभाजी बागेत मिसेस बरोबर भेळ खातो आहे.” सीआयएच्या पुण्यातल्या एजेंटचा सीआयए चीफ एडगर हूएवरला डायरेक्ट संदेश.
“थांब जरा. मी त्याला माझ्या मॉनिटर वर घेतो. हा, आता दिसतोय. काय खातोय? भेळ? पुन्हा थांब. भेळेची विकी उगडतो. “भेळ हा एक चटकदार चवदार पदार्थ आहे. पुण्याची भेळ साऱ्या विश्वात...” अरे वा. नंतर सवडीने वाचेन. बॅक टू केकू. मी बघतो आहे एक जण टोकदार सळीने भेळेचे इतःस्ततः फेकलेले कागदांचे टाचण करतोय. लोक स्वतः जाऊन कागद कचरा पेटीत का नाही टाकत? काय? त्यांना कमीपणा वाटतो? एनीवे, आपल्याला काय करायचंय. कीप इट अप. पीछा मत छोडो. आणि हा, केकूच्या भेळेचा कागद ट्रॅशमधून उचलून मला कुरिअर करा. केकू खूप हुषार आहे. तो कागदाचे शंभर तुकडे करून फेकेल. पर्वा इल्ले. मला ते सगळे तुकडे पाहीज्यात, आपले एक्स्पर्ट ते जुळवून वाचतील. हो सकता है पुतीनसे संदेशा आया होगा. त्या भेळवाल्याला पण ट्रॅक करा. चला बसू नका. कामाला लागा. जय मागा.”
“येस्स सर. डन. माझा पण तुम्हाला जय मागा. ओवर अँड आउट.”
केकूला हे माहित आहे. पण त्याच्या बायकोला ह्याची काडीमात्र कल्पना नाही. हे एक प्रकारे ठीकच आहे नाहीतर सगळ्या सोसायटीत महिला मंडळात बोंबाबोंब.
लग्न झाल्यावर कधीतरी त्याने मुर्खासारखे बायकोवर इम्प मारण्यासाठी तिला आपले गुपित सांगितले. “पुष्पे, उद्या माझी बुश बरोबर मिटिंग आहे तेव्हा उद्या डबा देऊ नकोस.”
“कोण हा बुश?”
“अग बुश म्हणजे पोटूस.”
पोटूस? कोण हा आणि त्याचा लंचबॉक्सचा काय संबंध? तिने हा किस्सा मैत्रिणींना सांगितला तर तिला सगळ्यांसाठी आईसक्रिम ऑर्डर करावे लागले होते.
“तुझा नवरा दिसतो खरा जॉनी पंक्रियास सारखा, थोडा थोडा.”
असा हा केकू उद्या वाशिंग्टनला रवाना होईल.
“भाजीवाले भैय्या, चांगले पाच किलो बटाटे दे. उद्या वाशिंग्टनला जातोय एक दोन महिने.”
केकूला भाजीवाला. लिफ्टवाला, वाचमन, दुधवाला, इस्त्रीवाला, धोबी, फुलवाली, पंक्चरवाला, डबाबाटली वाली, भंगारवाला, चण्यामन्या बोरवाला कुणीही सिरीअसली घेत नाहीत. चालायचेच. तुम्ही असं त्याला फाट्यावर मारू नगा.
तेव्हा त्याची उद्याची गोष्ट उद्याला.
अश्या प्रकारे लेवल २ संपली आहे.
Starting new session Yes/No?
You have selected No.
Do you want to Save/Kill Keku Person?
Ok.
Saving person Keku
Level 1 terminated.
Thanks for using “Khayaalome”
“Khayaalome” is a registered Trade Mark of
Dr Nanavre Business CyberWorld.(LLC). Incorporated in Pune H.O. Dulya Maruti Lane No 7, Sadashiv Peth. Old Pune.
पत्ता कुणालाही विचारा. कुणीही सांगेल!(आपल्या जबाबदारीवर)
आमची कुठेही शाखा नाही. (प्लीज नोट. शाखा म्हणजे ब्रांच)
################################
डॉक्टर ननवरे आणि त्यांचे सहकारी प्रभुदेसाई ह्या दुकलीने “खयालोमे” हे जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर बनवले आणि त्याचा विकास केला. त्या पाठीमागची आपली भूमिका डॉक्टरांनी एका उन्हाळीक व्याख्यान मालिकेत टिस्मामं पुणे येथे दिलेल्या भाषणात विशद केली आहे. त्यातून खालील उद्धृत करत आहोत. ते म्हणतात,
“मित्रहो आत्ताच आपण “Khayaalome” ह्या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षित पाहिलेत. ह्यात केकू ह्या व्यक्तिमत्वाच्या विविध अतृप्त मनोकामनांचे प्रक्षेपण पाहिले. आज आपण भोवताली नजर फिरवली तर आपणास काय दृष्टीस पडते? तर अनेक बिचारे जीव कुढत कुढत मारून मुटकून जीवनाचे जू मानेवर घेऊन जगताना दिसत आहेत. काय होतास तू, काय झालास तू! अशी परिस्थिती
आपल्या जीवनाची शोकांतिका ही आहे.”
“ज्याला कविता करायच्या आहेत तो झाला आहे पोलीस. डॉक्टर डॉक्टरकीवर लाथ मारून नाटक सिनेमात अभिनय करताहेत. जो महाविद्यालयात मराठी शिकवतो आहे, तो वर्तमानपत्रात होमिओपॅथिवर लेख प्रसिद्ध करतो आहे. आणि हे पहा अर्थशास्त्राचे प्राध्यापक चालले आहेत टीवी वर क्रिकेटच्या सामन्याचा “आखो देखा हाल” वर्णन करायला. ठीक आहे काही लोकांना ही दुहेरी कसरत साध्या झाली आहे. पण इतरांचे काय? मला कित्येक लोक असे भेटले आहेत कि जे केवळ आई वडिलांनी धक्का दिला म्हणून इंजीनिअर झाले. दाताचे डॉक्टर झाले. किंवा गुरांचे डॉक्टर झाले. बिचारे. कुत्र्याला टेबलावर आडवा पाडून त्याची तपासणी करताना त्यांना शेक्सपिअर आठवत असेल का? का चार्ल्स डिकन्स? अशा अभागी जीवांनी जीवनाशी जीवघेणी तडजोड कशी करावी?”
(इथे डॉक्टरांचा गळा भावनांनी भरून गेला. पाण्याचा एक घोट घेऊन त्यांनी भाषण पुढे सुरु केले.)
“तर अशा लोकांसाठी म्हणून आम्ही हा सिम्युलेटर बनवला आहे. “खयालोमे”चा उपयोग करून निदान काही वेळ तरी आपण आपले मिसलेले जीवन जगू शकाल. जसा हा केकू, पीडब्ल्यूडी मध्ये साधा कारकून, पण युवराज, गँगस्टर वा इंटरनॅशनल मास्टर स्पायचे रोमहर्षक जीवन जगला. आपणही असेच “सेकंड लाईफ” जगू शकाल.”
म्हणून आम्ही आमच्या सॉफ्टवेअर घोषवाक्य ठेवले आहे.
“जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी!”
आज इतकेच पुरे आहे.”
प्रभुदेसाई मात्र चिंतातूर होता.
"कसली चिंता करतोयस तू?" डॉक्टरांंच्याने रहावले नाही.
"एक विचारू का सर?"
"विचार. विचार."
"जसंं आपण केकूूला सिम्युलेट केलंं तसंं आपल्यालाही कोणीतरी सिम्युलेट करत असेल नाही का?"
डॉक्टरांनी वर बोट दाखवले, "सबका मालीक एक! सबसे बडा हीरो. लेवल झीरो."
(समाप्त.)
सर्व माबो करांना दिवाळीच्या
सर्व माबो करांना दिवाळीच्या शुभेच्छा! तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची जावो!
काही पंचेस जमून आलेत... मस्त
काही पंचेस जमून आलेत... मस्त .
केकू की कहानी आवडली