३१ ऑक्टोबर म्हणजेच हॅलोविन दिवस मला नऊ वर्षांपूर्वी अजिबात माहित नव्हता. हळू हळू इतर पालकांबरोबर गप्पा मारताना हॉलोवीन चा पोशाख, ऑफिसमध्ये किंवा इतरत्र होणाऱ्या मोठ्यांच्या पार्ट्या ह्यांविषयी कळत गेले.
इतकी मोठी बाई, दोन मुलांची आई असूनही, निरनिराळे पोशाख करून संध्याकाळी भोपळ्याच्या आकाराच्या छोट्या बादल्या घेऊन “ट्रिक Or ट्रीट “ साठी फिरायचं, आणि कँडी गोळा करायच्या ह्या विचारांनी मी हरखून गेले. घरी पण मोठी चॉकलेटची बॅग आणली इतर मुलं आली तर त्यांना द्यायला.
मग कोरीव नक्षीदार केलेल्या लाल भोपळ्याविषयी ऐकलं, “जॅक ओ लँटर्न“.
मग ३ भोपळे आणि कार्विंग किट आणले. सुरुवातीला भोपळा कापणे थोडे जाड गेले. पण मग नंतर जमवले.
त्यात led दिवे लावून बाल्कनीत ठेवले.
मुलांसाठी कॉस्टको, टार्गेट की पार्टी सिटी इथून पोशाख आणले. मुलांना घेऊन ७-८ घरांमध्ये ट्रिक or ट्रीट करायला घेऊन गेले. आमच्या बिल्डिंगमध्ये विशेष कोणी ट्रिक or ट्रीटला न आल्याने जमवून आणलेली आणि घरी आणलेली सगळी चॉकलेट मुलांनी फस्त केली.
आणि नंतरच्या काही वर्षात हॉलोवीन चे नावीन्य संपून मुलांनी अतिप्रमाणात चॉकलेट/ कँडी गोळा करून फस्त करू नयेत ह्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु झाले. मिडल स्कुल नंतर म्हणजेच ६-७ वीनंतर मुलांचा उत्साह आपोआपच कमी होत गेला. नंतर covid मुळे.
Photo by Taylor Foss
Photo By Conner Baker on Unsplash
----
Photo By Sandro Gonzalez
इकडे ऑगस्ट पासून हॅलोवीन कॉस्च्युम्स, कॅन्डी किंवा इतर वाटायच्या वस्तुंनी दुकाने भरायला सुरुवात होते. मुख्य रंग ३ केशरी, काळा आणि जांभळा. पार्टी सिटी सारख्या दुकानात बघावे तिकडे हाडांचे सापळे (अर्थात खोटे), कवट्या, मोठे मोठे कोळी, त्यांची जाळी ह्यांचे साम्राज्य दिसू लागते. हळू हळू त्या वस्तू प्रत्येकाच्या घरासमोरच्या अंगणात दिसू लागतात. जेव्हढे म्हणून भीतीदायक, अंगावर काटा आणणारे करता येईल तेव्हढे करण्याचा चंग बांधला जातो किंवा चढाओढच लागते म्हणा ना!
त्यातल्या त्यात छोट्या मुलांचे पोकेमॉनपासून ते स्पॉंज बॉब, किंवा फायर फायटर पासून ते नेव्हीसील पर्यंत किंवा मरमेड पासून ते चेटकिणी पर्यंत चे पोशाख बघायला जरा मजा वाटते.
परंतु मोठ्या मुलांचे, माणसांचे रक्त बंबाळ किंवा भुतासारखे पोशाख अगदीच (मला) ओंगळवाणे वाटतात.
आठवडा - दोन आठवडे आधीपासून शाळेत मुलांना एखादी हॉरर मूवी (मुलांची ) दाखवणे, घरच्या पार्ट्या, शाळेमध्ये हॅलोवीन ऍक्टिव्हिटीज ह्यांना सुरुवात होते. मुख्य हॅलोवीन दिवशी बहुतेक शाळांत परेड असते शिक्षिका, मुले वेगवेगळे हॉलोवीन पोशाख घालून येतात.
Photo by Kenny Eliason
Photo By Edgar Solo on Unsplash
मोकळ्या ठराविक जागी पम्पकिन पॅच सुरु होतात. म्हणजे तिकडे वेगवेगळ्या मापाचे बरेच भोपळे विकायला ठेवलेले असतात. मग साहजिकच मुलांच्या आवडीचे इतर खेळ वगैरेही ठेवतात. बरीच छोटी मुले आणि पालक एखाद्या शनिवारी रविवारी संध्याकाळी तेथे छान रमतात. आमच्या स्कूल डिस्ट्रिक्टचा पण एक पपंकीन पॅच होता तेथे मुलाच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीज चे वेगवगळे स्टॉल होते. आणि एक हॉरर मेंझ म्हणजे भूलभूलैय्या तयार केलेला. सगळ्यात जास्त गर्दी अर्थातच तिकडे होती.
आता मुख्य गोष्ट म्हणजे हॅलोवीन कॅण्डीजची. तर दरवर्षी ह्या हॅलोविन कॅण्डीजच्या खपाचे आकडे एकापेक्षा एक वरचढ असतात. सामान्यतः सगळ्यात जास्त किंवा लोकप्रिय हॅलोवीन कॅण्डी म्हणजे रेसेस पीनट बटर कप. काही बिलियन डॉलर्स म्हणजे काही शे कोटी डॉलर्स एव्हढी उलाढाल दरवर्षी हॅलोवीनला होते.
ह्या वर्षी मी शाळेतील काही मुलांना विचारले असता, साधारण १०० ते ४०० ह्या रेंज मध्ये प्रत्येकी कॅण्डी कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी शाळांमध्ये पोटदुखी मुळे घरी राहिलेल्या मुलांची संख्याही लक्षात घेण्यासारखी असते. माझी मुले फुशारकीने पूर्वी म्हणत इतक्या कॅण्डी गोळा करून मग दुसऱ्या दिवशी त्याच ब्रेकफास्ट म्हणून खायचा प्रघात आहे, अर्थात तो आमच्या घरी कधी पडला नाही म्हणा.
हॉलोवीनला भोपळ्याला भारी महत्व असते. त्या दरम्याने दुकानांत पंपकिन फ्लेवरचे कुकीज, कपकेक, पाय इ. इ. बरेच पदार्थ मिळतात.
असो! तर सुरुवातीला आकर्षण वाटलेला हा हॅलोवीन नंतर नंतर खूपच कमर्शिअल, creepy वाटू लागून आवडेनासा झाला.
हे झालं हॅलोवीनच आताच अमेरिकेतील स्वरूप जे हळू हळू बऱ्याच देशांमध्ये पसरलं गेलय.
पण हॅलोवीन दिवस/ संतांचा/ मृत आत्म्यांचा दिवस हा फार पूर्वीपासून म्हणजे काही शे वर्षांपासून विशेष करून आयर्लंड आणि स्कॉटलंड मध्ये पाळला जाई. पूर्वी ह्या दिवशी चर्चमध्ये बेल वाजवायचे. काळे कपडे घालून ख्रिश्च्न लोक, हातात पोकळ केलेले कंद त्यात मेणबत्ती ठेवून गेलेल्या मृतात्म्यांना आठवत, घंटा वाजवत जायचे. ते मेणबत्ती ठेवलेले कंद म्हणजे मृत व्यक्तीच्या आत्म्याचं प्रतीक. काही ठिकाणी हे दिवे मृतात्म्यांना घरी यायची दिशा दाखवते असाही एक समज होता.
मृतात्म्यांच्या नावाने गोल छोटे सोल केक बनवून वाटण्याची प्रथाही पाळली जाई. काही ठिकाणी त्यांच्यासाठी ते रात्रभर टेबलवर मांडून ठेवण्यात येई. हे चांगले मृतात्मे इतर दुष्ट शक्तीपासून रक्षण करण्यासाठी येतात असाही एक समज. सोळाव्या शतकात आर्यलंडमध्ये बहुरुप्यासारखे वेगवेगळे पोशाख किंवा मुखवटे घालून घरोघरी गाणी म्हणत जायचं आणि काही खाऊ मागायचा ही प्रथा पडली. जर कोणी खाऊ दिला नाही तर त्यांची खोड काढायची हेही चाले. स्कॉटिश आणि आयरिश लोक जेव्हा अमेरिकेत वसाहतीला आले तेव्हा त्यांनी इकडे ह्या पद्धती आणल्या. मग इतर वसाहती मधून हळू हळू अमेरिकेत सगळीकडे पसरल्या. विसाव्या शतकानंतर त्याना आजचे स्वरूप प्राप्त होऊन हळू हळू अमेरिकेतून इतर देशांमध्येही त्याच स्वीकार होऊ लागला.
१-२ नव्हेंबरला विशेष करून Mexican लोक Día de los Muertos किंवा Day of the Dead पाळतात. ह्या दिवशी ते त्यांच्या कुटुंबातील मृत व्यक्तींचे आयुष्य साजरे करतात. घरात मृत व्यक्तींचे फोटो ठेवून, झेंडूची फुले, कवटी वगैरे ठेवून आरास केली जाते. त्या गत व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ बनवतात, त्यांच्या विषयी बोलून, गप्पा गोष्टी करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देतात.
---
---
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
माहितीपूर्ण आणि शिवाय रंजक
माहितीपूर्ण आणि शिवाय रंजक पद्धतीने लिहिलेले आहे.
छान लेख..हॅलोविन बद्दल अधिक
छान लेख..हॅलोविन बद्दल अधिक विस्तृत माहिती मिळाली.
छान लेख..हॅलोविन बद्दल अधिक
छान लेख..हॅलोविन बद्दल अधिक विस्तृत माहिती मिळाली. >> +1
वरवर माहिती होती, फोटो हो छान.
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मस्त माहिती.
मस्त माहिती.
मेक्सिकोबद्दल मीना प्रभूंच्या पुस्तकात वाचलं होतं
मस्त माहिती.
डबल पोस्ट.
धन्यवाद अन्जु!
धन्यवाद अन्जु!