भेट -भाग ४

Submitted by केजो on 2 November, 2023 - 12:36

"मला अजूनही आठवतंय आपण सहावीत होतो. मी आणि नेहा एका बेंचवर बसायचो. आमच्या बेंचमागेच तुमचा बेंच होता. तू आणि ओमकार! त्यावेळी चक्क उंच मुलींमध्ये गणना व्हायची माझी! त्यामुळे शेवटून दुसरा बेंच. त्यात नेहा म्हणजे उंच, स्पोर्ट्समध्ये/ नाचात /अभ्यासात सगळीकडेच पुढे. आम्ही दोघी मधल्या सुट्टीत नाव-गाव-फळ-फुल खेळायचो. तर नेहमीसारखीच ती जिंकत होती. तिच्या बाजूनी बरीच जणं होती. आणि मी एकटीच माझी वही लपवून लिहीत होते. तेवढ्यात तू आलास मागून. मी चिडून वही आणखीनच लपवली. मला वाटलं माझी उत्तरं तू फोडशील आणि तिलाच जिंकवशील! ते तुला न सांगताही कळलं. तू म्हणालास-मी तुझ्या बाजूनी आहे! इतकं भारी वाटलं सांगू! आणि मग जिंकणं-हरणं नाममात्र राहिलं... तुला हे काही आठवतही नसेल."
"आठवत कसं नाही? तू तेव्हा लाल रिबीन बांधून दोन पोनीटेल्स बांधायचीस. छोटी मिनी माउस! आणि कायम नाकावर राग असायचा, भांडायला तय्यार! तुला मी रेडोबा नाव ठेवलं होतं."
"माहितीये मला. पण मी दाखवलं नाही कधी तसं. तर तेव्हा असं छान वाटलं पण ते तिथपर्यंतच मर्यादित होतं. मग मी मॉनिटर असताना तू घरचा अभ्यास केला नाहीस तरी तुझं नाव सांगायचे नाही कधीच. शाळा सुटली की आपण घरी जाताना एकत्र जायचो, शाळेजवळच तुझं घर होतं. मी बरीच लांब राहायचे, पण ती दहा एक मिनिटं मजेत जायची एकत्र जाताना. पुढे सातवीत असताना मला एका मैत्रिणीनी सांगितलं की इतिहासाच्या पुस्तकाच्या मागे तू माझ्या नावामागे आय लव्ह यु लिहिलेलंस. ते खरं की खोटं हे अजूनही माहिती नाही. पण ते ऐकून मी तुझ्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघायला लागले. खरं सांगू, इतकी भीती वाटली. मुलींचं नाव खराब होतं, जग नावं ठेवतं. काय आणि काय! तेव्हा इतकं छोटं जग होतं न आपलं! मग मी तुझ्याशी बोलणं खूपच कमी करून टाकलं. असं वाटायचं की सगळ्यांना माहितीये आणि आता माझं काही खरं नाही. कसली भीती होती, काय माहिती. त्यातच आपल्या शाळेचे महान नियम! सातवीनंतर 'अ' आणि 'ब' अशा तुकड्या वेगळ्या केल्या. सातवीचा रिझल्ट लागला. तुला मार्क किती मिळाले ह्यापेक्षा तू माझ्या तुकडीत आहेस की नाही, ह्याची मला जास्त उत्सुकता होती. म्हणून तुला शोधत होते. तर तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस. का कोणास ठाऊक, माझ्यापासून तू काहीच लपवणार नाहीस, अशी एक वेडी आशा होती मला. पण तू माझ्याशी एक अक्षरही बोलला नाहीस. मग संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी पुढच्या वर्षी तू माझ्या वर्गात असशील की नाही, ह्याच विचारात गेली. त्या काळात ना घरी फोन होते ना कोणाशी उघडपणे तुझ्याबद्दल बोलण्याची हिम्मत!"
"कसं बोलणार? मला 'ब' तुकडीत टाकलेलं. इतका राग आला होता नं. 'ब' म्हणजे बुद्धू एवढंच माहिती होतं. त्यात तुला 'अ', म्हणजे तू मला चिडवणार असं वाटलं मला."
"आपण कित्ती वर्ष ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी न बोलल्यानी गैरसमज करून घेतलेत नं? तर असो, शाळेची पुढची तीन वर्ष मी रोज शाळेत लवकर यायचे. तुमची शाळा सुटायची आणि आमची भरायची. तेव्हा तुझी एखादी झलक बघायला मिळेल म्हणून धावत पळत लवकर पोचायचे. तू बघून न बघितल्यासारखा करायचास. पण मी माझ्याच नादात होते, तुला लांबूनच बघून खुश व्हयायचे. तेव्हा घरात लॅण्डलाइनही नव्हती, त्यामुळे संपर्क असण्याचं संबंधच नव्हता. दहावी झाल्यानंतर तू कोणत्या कॉलेजला गेलास, काय करतोयस ह्याचीही काही कल्पना नव्हती. त्यातच मी आणि शाळेतल्या काही मैत्रिणी पाणीपुरी खायला गेलेलो. माझी टर्न यायची मी वाट बघत असतानाच समोरच्या गृपमधली एक मुलगी माझ्याजवळ येईन म्हणाली तू नूतन मराठीमध्ये होतीस का? मी हो म्हण्टलं. १९९०ची बॅच का? मी म्हण्टलं, हो. तशी ती निघून गेली आणि तिचा पूर्ण ग्रुप खो खो हसायला लागला. मला काही कळलंच नाही. माझी एक मैत्रीण त्यांच्या ग्रुपच्या जवळच उभी होती तर तिनी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. तर त्या ग्रुपला मी तुझ्या शाळेत होते हे माहिती होतं, कारण आता तू त्यांच्या कॉलेजमध्ये होतास. त्या सगळ्यांना तू सांगितलेलंस की मी तुझ्या मागे लागलेय! इतकं भयंकर वाटलं न ते ऐकून! एरवी कमीत कमी तीन प्लेट पाणीपुरी खाणारी मी, त्या तिसऱ्या पुरीनंतर आजतागायत पाणीपुरी खाऊ शकले नाहीये मी. डोळ्यातलं पाणी ठसक्यानी आलंय असा बहाणा करून मी घरी निघून आले."
तो काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिनी त्याला थांबवलं.
"स्पष्टीकरण नकोय मला, खरंच. खूप वर्षांपूर्वीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किती खरं-किती खोटं काहीच माहिती नाही. खऱ्या-खोट्याची शहनिशा करण्याची तेव्हा हिम्मत नव्हती, आणि आता इतक्या वर्षांनंतर इच्छाही नाहीये. पण इतकी वर्ष हे सगळं आत साठवून ठेवलं ते आता वाहतं करायचंय. तर घरी आले आणि खूप रडले. माझ्यासाठी जे खूप हळुवार न उमलेलं, न व्यक्त केलेलं असं खूप खास होतं, त्याची अशी परवड झाली होती. स्वतःचीच खूप घाण वाटली. वाया गेलेली मुलगी अशी जी व्याख्या होती, ती मला लागू पडत होती. तुझ्या दृष्टीने मी तुझ्या मागे पडले होते आणि तू ते सगळ्यांना सांगत फिरत होतास! माझ्या मनातले सगळे खेळ खोटे होते. मी न बघितलेल्या त्या इतिहासाच्या पुस्तकात माझं नावच नसावं बहुदा. तोही माझ्या मैत्रिणींनी केलेला एक खेळच असावा. सगळ्या जगावरचा विश्वास उडाला. खूप रडून झाल्यावर मनाशी एक निर्धार केला, आता साक्षात मदनाचा पुतळाही माझ्यासमोर आला तरीही मी ढळणार नाही."
तेव्हाचं सगळं आठवून आजही तिच्या गळ्यात आवंढा आलाच. असंही आज-काल कारण नसतानाही डोळे भरून यायचे. गायनॅकनी सांगितलंच होतं की वयाच्या ह्या टप्प्यावर हे असं होणारच. मूड स्विनग्स, डोळे भरून येणं, एकटं वाटणं, बरंच काही होणारच. पण मन प्रसन्न ठेवायचं! जे आवडेल ते करायचं. जे मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं.
तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या रडण्याचं कारण आपण केलेला मूर्खपणा आहे, आपल्यामुळे ती कित्ती हर्ट झालीये, ह्याची जाणीव त्याला पहिल्यांदाच झाली.
"तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कदाचित हे सगळं माहितीही नसेल. मी स्वतःला समजावलं शेवटी, की ते एकतर्फी प्रेम होतं. हे असं मुलं करतात हे ऐकून होते. मुलीही एकतर्फी प्रेम करतात हे माहितीच नव्हतं, आणि असं करणारी ती मुलगी मी होते! हा एवढा मोठ्ठा धक्का होता ना! शाळेतली ती तीन-चार वर्ष मी कुठल्यातरी धुक्यात वावरत होते. इतर मुलींची अफेयर्स होत होती, तुटत होती, नव्याने होत होती. तूही काहींना प्रपोज केलेलंस, पत्र लिहिलेलंस असं काहीबाही कानावर यायचं. तरीही मी त्या "अफवांवर" विश्वास ठेवायचे नाही. स्वतःलाच समजवायचे की तुला मी खूप आवडते पण तुला आपलं प्रेम खूप सिक्रेट ठेवायचंय म्हणून तू बोलून दाखवत नाहीस! कसली मूर्ख होते मी!", आणि ती खो-खो हसत सुटली. त्याच्याकडे बघण्याची हिम्मतच होत नव्हती.
तसंच लाटांकडे बघत, तो उठून गेला नाहीये ना एवढी खात्री करून, तिनं स्वगत सुरु ठेवलं.
"पण तुझ्या मैत्रिणींमुळे मी जमिनीवर आले. स्वतःला सावरलं आणि अभ्यासात बुडवून टाकलं. अर्थात त्या काळात फेसबुक/इन्स्टा नसल्यानी तुझी काही खबरबात कळण्याचा प्रश्नही नव्हता. आधी बीकॉम, ते करता करता सीए, मग एमबीए! त्यात इंटर्नशिप, आर्टिकलशिप हे ओघानी आलंच. एव्हाना माझ्या जखमा भरत आल्या होत्या. तेव्हाच नवरोबाची ओळख झाली आणि पहिला मित्र झाला तो माझा! त्यानी लग्नाचं विचारल्याबरोबर हो म्हणून मोकळी झाले. तोपर्यंत कोणत्याही मुलानी माझ्याकडे त्या नजरेनी बघितलंच नव्हतं बहुदा, त्यामुळे पहिल्या मुलानी विचारल्या बरोबर त्याला घट्ट धरून ठेवलं!", पुन्हा बेदम हसू आलं तिला, स्वतःचीच कीव येऊन. बेंचवर ठेवलेल्या तिच्या हातावर त्यानं हलकेच थोपटलं. त्यानी बळकटी येऊन ती पुढे बोलती झाली…

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरेरे , पाहिलं अव्यक्त प्रेम ....
तिच्या आठवणी वेगळ्या असतिल अस वाटल होत... असो
छान लिहिलय
त्याच उत्तर काय असेल ह्याची उत्सुकता आहे.

मस्त लिहिलंय.

त्याच उत्तर काय असेल ह्याची उत्सुकता आहे. >>> +१