Submitted by भरत. on 31 October, 2023 - 02:30
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागलेत. कुठे काय वाचण्यासारखं वाटतंय , वाचल्यावर कसं वाटलं याची नोंद करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"साहित्य परिषद (नाशिक)"च्या
"साहित्य परिषद (नाशिक)"च्या दिवाळी अंकात, माझा 'भारताची युपीआय क्रांती' हा *लेख* आणि 'मराठी साहित्य' विषयक *शब्दकोडे* यांचा समावेश.
"शब्दराज" दिवाळी अंकात माझ्या
"शब्दराज" दिवाळी अंकात माझ्या 'जनमनात जनधन' या लेखाचा समावेश.
अनुभव अंक उ त्त म आहे. सहायक
अनुभव अंक उ त्त म आहे. सहायक संपादक मायबोलीकर आहेत.
त्यांच्या पुस्तकांची जाहिरात दिसली.
अभिनंदन!
अनुभव
अनुभव
इतिहासाचे वर्तमान - राजेश्वरी देशपांडे. यांचे लेख लोकसत्तेत वाचले आहेत, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं आहे ते कळलं. पण हा लेख सामान्य वाचकांपेक्षा इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिल्यासारखा वाटला. तात्त्विक भाग जास्त वाटला.
समुद्राच्या तळाशी - गौरी कानेटकर, मी मुस्लिम आहे म्हणजे काय? - हिलाल अहमद , ईशान्येच्या कळा - मुकुंद कुलकर्णी , आन्या निद्रिंगहॉस (युद्ध छायाचित्रकार) , मी आणि माझं सोलापूर (चित्रमय) - शिरीष घाटे हे लेख आवडले. अक्षरनामाचा प्रश्ननामा - राम जगताप - वाचकांनी वर्गणी भरायला हवी हे सांगण्यासाठी लिहिला असं वाटलं. मुद्दा पटला.
आठवणींच्या सुटता गाठी - नरेंद्र चपळागावकर. पूर्वी दर दुसर्या दिवाळी अंकात अनिल अवचटांचे लेख असत, तसं चपळगावकरांचं होतंय का, इतके त्यांचे लेख मी दिवाळी अंकांत वाचलेत. काही आगामी पुस्तकाचे अंश आहेत. हा लेख शेवटी पर्सनल आणि पसरट झाला.
आयुर्वेदासंबंधी संशोधनात सर्वथा नवा पायंडा पाडणार्या डॉ अशोक वैद्य यांच्यावरच्य लेखाच्या पूर्वार्धातील भाषा फार सुंदर आहे. पण उत्तरार्धात काहीतरी गडबड वाटली. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आणि रुची आडकर असे दोन लेखक आहेत. सुरुवातीला नोबेलच्या तोडीचं संशोधन म्हटलंय, ते नेमकं काय ते कळलं नाही.
सानगावकरांचा दिवस ही कथा आहे. ललित म्हणून छापली आहे. आम्ही कथा छापत नाही, असा अंकाचा बाणा आहे का? कथा आवडली. त्यांनी अनुभवलेल्या किमयेसाठी मोजलेल्या पैशाचा मुद्दा नुसताच स्पर्श करून सोडून दिलाय. शिवाय ते यंत्र एकदाच वापरता येईल का? प्रत्येक वेळी पैसे मोजावे लागतील? असे प्रश्न मायबोलीची सवय झाल्याने पडले.
अमेरिकेत भारतीयांचा डंका? - कौमुदी वाळिंबे . यांनी मायबोलीवरच्या एका (आणि एकाच ) चर्चेत भाग घेऊन विचार करायला लावणारे काही लिहिले होते हे आठवले. मराठी आद्याक्षरे जोडून त्यांचे सदस्यनाम होते. हा लेख आवडला. लेखात मांडलेले मुद्दे या आधी कधी डोक्यात किंवा वाचनात आले नव्हते. अमेरिकेतील मायबोलीकरांनी विशेषतः अध्यक्षीय निवडणुकीत रस असणार्यांनी वाचावा.
मायबोलीकर प्रीति छत्रे यांचा मैं और मेरा नॅट जिओ हा लेख शीर्षकाप्रमाणेच बोली भाषेत आहे. लेख आवडला. पण मी नॅट जिओ हे नियतकालिक कधी पाहिलं नसेल तर त्यातून मला नक्की काय मिळेल हे लेख वाचून कळलंय का असा प्रश्न पडला. लेखाचा फोकस तोच असेल असं नाही. लेख लिहिण्यामागे एक तात्कालिक कारण आहे. त्या अनुषंगाने चौकटीतली रीडर्स डायजेस्टबद्दलची माहिती आवडली. मी रीडर्स डायजेस्टचा अनेक वर्षे वर्गणीदार होतो. आणि त्यातल्या लेखांनी आणि त्यांच्या इतर काही पुस्तकांनी एके काळी मित्रवत मार्ग दाखवला, हे यानिमित्ताने नमूद करतो.
या अंकातल्या बर्याच जाहिरातीही वाचनीय आहेत.
नॅट जिओ
रिडर्स डायजेस्ट वाचून (भाबडा नसलेला) आशावाद निर्माण होतो. निदान मला तरी होतं. आताच कॉलनीतल्या एका बाईची आई स्ट्रोकने अचानक कोसळली आणि बेडरिडनच झाली तिनं आहेत का विचारलं मी सगळा गठ्ठा देऊन टाकला. आहेत फॅन्स RD चे .
छान लिहिले आहे भरत.
भरत, सविस्तर अभिप्रायाबद्दल
भरत, सविस्तर अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
अनुभवच्या मुख्य संपादकांकडे अभिप्राय पोहचवला आहे.
मला कोणे एके काळी रिडर्स
ललिता-प्रीति, तुमच्या लेखावरच्या माझ्या प्रतिक्रियेवर तुमची प्रतिक्रिया इथे लिहिलीत तर आनंद होईल. (हे काय लिहिलंय मी?)
अर्थात तुमच्यावर काही बंधन नसेल, तर.
तुमची प्रतिक्रिया इथे लिहिलीत
तुमची प्रतिक्रिया इथे लिहिलीत तर आनंद होईल
>>>
'नॅशनल जिओग्राफिक मासिकाशी असणारी माझी अॅटॅचमेन्ट' यावर फोकस ठेवूनच तो लेख लिहिला आहे. ते मासिक कसं असतं, त्यात कोणकोणते विषय असतात हे 'अनुभव'च्या वाचकांना थोडं तरी माहीत असणार असं गृहित धरलंय. (ज्यांना माहित नाही ते त्याबद्दल माहित करून घेण्याचा प्रयत्न करतील, अशीही एक इच्छा आणि अपेक्षा.)
माझ्या डोक्यात हा विषय बरेच दिवस घोळत होता. 'अनुभव'च्या आणि 'समकालीन प्रकाशना'च्या पुस्तकांच्या कामातल्या माझ्या सहभागात, आमच्या एडिटोरियल चर्चांमध्ये हा विषय, ही अटॅचमेन्ट या ना त्या प्रकारे सतत डोकावत होतीच.
तात्कालिक कारण हा ट्रिगर ठरला.
नॅट जिओइतकीच मी रीडर्स डायजेस्टचीही फॅन आहे. मात्र गेली काही वर्षं रीडर्स डायजेस्ट वाचलं गेलेलं नाही.
बाय द वे, कौमुदीलाही तुमचा अभिप्राय कळवला आहे.
हो. पटलं आणि तसंच वाटलं होतं.
हो. पटलं आणि तसंच वाटलं होतं.
कालनिर्णय दिवाळी अंक चांगला
कालनिर्णय दिवाळी अंक चांगला वाटला.
अतुल देऊळागावकरांच्या पृथ्वी अत्यवस्थ या लेखात भरपूर छायाचित्रे आहेत. मॅक्सवेलप र्किन्स : लेखकांचा संपादक - निळू दामले, प्रा.प्रियोळकरांच्या वेगळ्या वाटा - डॉ मीना वैंशंपायन , रंङधुरंदर विद्याधर गोखले - शुभदा दादरकर , भारतीय सैन्यदलांची क्षेपणास्त्र सज्जता- अनिकेत साठे हे लेख माहितीप्रद आहेत. विजय पाडळरांच्या अमिताभवरच्या लेखात १९७३ साली प्रदर्शित झालेल्या त्याच्या चार चित्रपटांवर व त्याच्या तोवरच्या प्रवासावरही लिहिलं आहे. जंजीर , नमक हराम, अभिमान, सौदागर . सगळंच छान छान असं लिहिलेलं नाही. मुळात हे चार चित्रपट एकाच वर्षातले हीच माझ्यासाठी नवलाची गोष्ट. अमिताभच्या अँग्री यंग मॅन प्रतिमेबद्दलचं हे निरीक्षण चपखल वाटलं - नेमक्या शब्दांत कधी वाचलं होतं असं आठवत नाही. - हा राग किंवा प्रतिशोध एकट्यासाठी नव्हता, सर्व पीडितांसाठी होता. त्याला आपला कोणताच स्वार्थ साधायचा नव्हता. हा राग मुळात मनाने सुसंस्कृत असलेल्या माणसाचा राग आहे.
अशोक राणेंनी तीन देवियाँ या लेखात आशा पारेख, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्याबद्दल लिहिलं आहे. आशा पारेखबद्दल चांगलं काहीच नाही. तरीही तिच्या फताड्या आवाजाचा उल्लेख सुटला. शर्मिला टागोरबद्दल फार वाईट लिहिलेलं नाही. वहिदा बद्दल वाईट काही लिहिलेलें नाही. इथे या अभिनेत्री + त्यांचे चित्रपट असं वाचावं.
दिलीप चावरे यांच्या रॉबर्टो रोसेलिनीवरच्या लेखात भरपूर मसाला आहे.
जोगती परंपरेतीक दंतकथा मंजम्मा- प्रकाश खांडगे यांचा लेख तुटक वाटला. भाषांतरकाराच्या मदतीने घेतलेल्या मुलाखतीवर बेतला आहे. लेखातलं हे वाक्य लक्षात राहिलं - मंजुनाथचे कुटुंब शेट्टी हे उच्चवर्णीय असल्यामुळे देवी अंगात येणं वगैरे गोष्टी त्याच्या घरी मान्य नव्हत्या. अशा प्रथा कनिष्ठ जातीच्या लोकांमध्ये असतात, त्या अज्ञानातून येतात, असे त्याचा भाऊ त्याला वारंवार सांगत असे.
शरद वर्देंचे लेख वाचून हे छान रचून सांगतात असं वाटू लागलं आहे. - चिनी कूटनीती. उगाच कशाचा कशालाही संबंध जोडलाय असंही वाटत राहिलं.
महेश केळुसकरांचे फ्रायकू आवडले.
मेट्रो ३ चे शिव धनुष्य पेलताना - अनिकेत जोशी - मेट्रोच्या कामातली आव्हाने कळली. शेवटी पोलिटिकल टोन आला आहे.
याऊपरही काही लेख आणि कथा आहेत. त्यांना पास.
अंक झी मराठी प्रायोजित वाटतो. झेन विनोद नावाची पानपूरके आहेत.
हा धागा छानच!!!
हा धागा छानच!!!
मला दिवाळी अंक वाचायला आवडतात.
साधारण 2000 नंतरच्या गेल्या 23 वर्षातील दिवाळी अंक मला ऑनलाईन pdf स्वरूपात किंवा विकत कुठे मिळू शकतील का, याची माहिती मिळवण्यासाठी इथे लिहित आहे.
माहिती असल्यास नक्की कळवा.
बुकगंगावर जुने दिवाळी अंक
बुकगंगावर जुने दिवाळी अंक दिसताहेत.
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Diwali%20Ank...
एकेक वर्ष देऊन शोधता येईल.
Pages